सौभाग्यवतींचा (?) मान

 

      मध्यंतरी हळदीकुंकु या विषयाच्या अनुषंगाने एक लेख वाचनात आला होता. त्यामध्ये काही प्रश्न किंवा मुद्दे ठासुन भरलेले होते. तसेच नंतर वाचनात आलेल्या त्यावरच्या प्रतिक्रियांमधुन एकट्या स्त्रियां-विषयीच्या व्यथा आणि काही ठिकाणी त्यावर उचलण्यात आलेली स्वागतार्ह पाऊले यावर वाचायला मिळाले. त्यामुळे जरी त्या लेखाची सुरुवात सवाष्ण, विधवा आणि कुमारिका अशा सरसकट सर्व स्त्रियांना अपेक्षित असलेल्या मानसन्मानाच्या मुद्द्याने झाली तरीही नंतर त्याचं स्वरुप एकाच ठिकाणी एकवटलं होतं असा मला वाटलं. आणि म्हणुन या सगळ्यातुन मला दिसुन येणारा मुळ प्रश्न "फक्त सौभाग्यवतींचाच मान का?" आणि सोबत येणारे इतर प्रश्न यावर माझं मत मांडायचा हा छोटासा प्रयत्न. या लेखात मला दिसुन आलेले मुद्दे काहीसे असे होते.

 

अ) सरसकट सगळ्या स्त्रियाना मान मिळत नाही, तो दिला गेला पाहिजे.

आ) स्त्रीच्या आयुष्यात नवरा असेपर्यंत तिला मान मिळतो.

इ) एकट्या स्त्रीला संरक्षणाची आणि समाजाची खरी गरज असते.

ई) मंगळसुत्र, कुंकू सारखी प्रसाधनं नेहमी वापरण्याची मुभा स्त्रीला असावी.

उ) पारंपारिक मानसीक गुलामगिरी आणि खरे स्त्री स्वातंत्र्य.

 

       थोडासा खोलात जाऊन विचार केला तर लक्षात येईल की हळदीकुंकू, ओटी भरणे, तसेच मंगळसुत्र, कुंकू याला सौभाग्यलंकार मानणे या पध्दती मध्ययुगात (नक्की माहीती नाही) कधीतरी सुरु झाल्या असाव्यात. आणि हळुहळु त्याचं मुळ स्वरुप बदलत जात नंतर त्या आजच्या प्रथा बनल्या असाव्यात. त्यावेळच्या समाजरचनेचा विचार केला तर लक्षात येईल की त्या काळाला अनुसरुन स्त्री आणि पुरुष यांच्या कामांची एकमेकाला पुरक अशी नीट विभागणी झालेली होती. पुरुष हे बहुतांशी अंगमेहनतीची म्हणजे शेतीची,  संरक्षणाची, व्यापाराची अशी बाहेरील कामे करीत असत आणि स्त्रियांकडे स्वयंपाक, मुलांचं संगोपन आणि शेती-विषयक अशी घरातील, आजुबाजुच्या परिसरातील छोटी मोठी कामे विभागलेली होती. त्या काळात मुलांची लग्न लवकर केली जात आणि त्यातुनच एकत्र कुटुंबपध्दतीमुळे घरात जसा माणसांचा राबता जास्त असे, तसंच काम करणारे हातही अधिक असत. यातुनच कुटुंब आणि समाजातील सुदृढ नातेसंबंध जपत एकमेकां-विषयीच्या जबाबदार्‍यांची पुर्तता केली जात असे.

    संरक्षणाची जबाबदारी पुरुषाकडे असल्याने यातुनच पुढे कुटुंब, घर, वस्ती, गाव अशा विविध पातळ्यावर जबाबदारीतुनच अधिकाराची भावना निर्माण झाली. या सगळ्यात पहिला बदल घडला जेव्हा कुणातरी एकाला दुसर्‍याकडील संपत्ती, राज्य, प्रदेश, जडजवाहिर, गाई-घोडे हस्तगत करावेसे वाटले. आणि त्याचाच पुढचा भाग म्ह्णुन दुसर्‍या(कडील) स्त्रीबद्दलचा मोह, आकर्षण निर्माण झालं आणि तिला मिळवण्याचा / वश करुन घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यासाठी अर्थातच कोणत्या ना कोणत्या प्रलोभनाची गरज होती, मग ती पराक्रमाची, अधिकाराची असेल किंवा सोने-चांदी, जडजवाहीर सारख्या वस्तुंची असेल. आपल्याकडे जे असेल त्याचा उपयोग करुन दुसर्‍याचा पराभव करायचा आणि त्याच्याकडचं आपल्याला जे हवं असेल ते मिळवायचं अशी रीत तयार झाली असावी. संरक्षण ही पुरुषाची जबाबदारी मानली गेल्याने या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणुन स्त्री ही आपसुकच 'अधिकारात असलेली संपत्ती' बनत गेली.

    यातला पराक्रम जो सैन्यबळावर अथवा वैयक्तीक सामर्थ्यावर आधारीत होता तो वगळता प्रलोभनात पाडणार्‍या इतर गोष्टींचा उपयोग हळुहळु वाढु लागला असावा, जेणेकरुन 'अधिकारातील संपत्ती' इरतत्र जाऊ नये. यातच जर कुणा पुरुषाचा लढाईत अथवा आजारपणाने मृत्यु ओढवला तर मागे राहिलेल्या विधवा स्त्रीची जबाबदारी तिथल्या जुन्या/नव्या कुटुंबप्रमुखावर येऊ लागली. कदाचित या जबाबदारीतुनच नंतर कधीतरी सती-प्रथा सुरु झाली असावी. तसेच उत्तरेकडील काही समुदायांमध्ये आजही ऐकु येणारी चादर टाकण्याची पध्दत, अशा स्त्रीला आधार देण्याकरिता सुरू झाली असावी.

    या सगळ्यात सौभाग्यप्रतिके कशी आणि कुठुन आली ?

    आपल्या देशात बहुतेक सण-उत्सव हे शेतीशी-निसर्गाशी संबंधीत आहेत. त्यामुळे बहुतांश सण अगदी गावातील जत्रा सुध्दा पाऊस निघुन गेल्यावर आणि शेतीतील महत्वाची कामे संपल्यावर असतात. त्याचं कारण अर्थातच विविध भागातील लोकांनी एकत्र येऊन देवाण-घेवाण करुन एकमेंकाच्या गरजा पुर्ण कराव्यात. यातुनच व्यापार वाढतो, सर्वांच्या हाताला काम मिळतं आणि त्या त्या भागाचं अर्थकारण उभं राहतं.   

    याचाच एक भाग म्हणुन घर-परिवारातील, वस्तीतील स्त्रिया एकत्र येऊन विशिष्ट दिवशी स्नेहमिलन करत असाव्यात. ज्यात बर्‍या-वाईट प्रसंगावरील गप्पा-गोष्टी, सुख-दु:खाचं देवाण घेवाण होत असावं, ज्यात सुरुवातीला कदाचित सगळ्यांचा सहभाग असावा. आणि यातुनच निरोप घेताना हळदी-कुंकू लावण्याची पध्दत तयार झाली असावी.

    पण जिंकुन आणलेल्या स्त्रीला कदाचित यात स्थान मिळत नसावं, तिला या कुटुंबाचा (किंवा समाजाचा) भाग बनता येत नसावं. आणि याचाच परिणाम म्हणुन मत्सर, द्वेष यासारख़्या भावनांतुन विविध कल्पित कथा/वर्णन उदयाला आली, जी पुढे जाऊन नकाराची कारणे बनत गेली. याचाच काहीसा संबंध विधवा स्त्रीच्या संबंधाला, अस्तित्वाला नाकारण्यात झाला असावा. ज्यामुळे पुढे जाऊन अशा स्त्रियाना सण उत्सवादि कार्यातुन वगळण्याकडे कल वाढत गेला.

    आणि म्हणुन मला वाटतं, वैधव्य आलेल्या स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणुक ही या सर्व घटनांचा, बदलांचा सामाजिक स्तरावर हळुहळु अंगिकारलेला परिणाम होता, जो त्यावेळच्या परिस्थितीजन्य प्रश्नांना उत्तरे शोधण्यातुन जन्माला आला होता. इतर अनेक गोष्टी प्रमाणे कालानुरुप यात काही बदल होत गेले, नंतर वाढु लागलेल्या कर्मठपणासोबत यात दैवी गोष्टींचा आधार घेत अनेक बंधने घातली गेली आणि अनेक वर्षानंतर तीच बंधने परंपरा बनत गेली. यातुनच कधीतरी मंगळसुत्र आणि कुंकू याचा संबंध विवाहीत स्त्रीच्या सौभाग्याशी जोडण्यात आला, जो वर उल्लेख केल्याप्रमाणे विशिष्ट पुरुषाचा संबंध आणि अधिकार सिध्द करण्याकरिता वापरला गेला.

    पुढे जाऊन इतर रुढी-परंपरा प्रमाणे मुळ उद्देश बाजुला पडला आणि व्यक्तीचं महत्व कमी होऊन त्या बंधनांचं, प्रतिकांचं महत्व वाढत गेलं. मुळातच शिक्षण घेण्याकडचा आणि देण्याकडचा निरुत्साह आणि नंतर नंतर वाढत गेलेली परकीय आक्रमणं यात धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली या रूढी-परंपराचा अधिकच बाऊ केला गेला आणि एकट्या स्त्रीच्या वाट्याला मग ती कुमारिका असो, विधवा असो की परित्यक्ता असो मोठ्या प्रमाणात बंधने तिच्या वाट्याला आली. विवाहीत स्त्री सुध्दा यातुन सुटली नाही, फक्त सामाजिक दृष्टीकोनातुन विवाहित पुरुषाचं कथित संरक्षण तिला लाभलं होतं एवढंच. कथित यासाठी की तीच स्त्री  कौटुंबीक पातळीवर खरोखरच संरक्षीत होती का, जशी आधीच्या समाजात होती हा एक अभ्यासाचा वेगळा विषय होऊ शकतो.

    जसजसा काळ उलटत गेला तसतसा यात थोडा थोडा बदल होत गेला. पण रुढीच्या नावाखाली नकारात्मक बंधने वाढवणार्‍या बहुसंख्याच्या तुलनेत, सकारात्मक बदल करणारे समाजसुधारक संख्येने कमी पडल्याने या बदलांचा वेग जरुरीपेक्षा कमीच राहिला, परिणामत: बर्‍याच दशकांपर्यंत नवनवी बंधने आणि प्रथा मात्र वाढत गेल्या. एका बाजुला अशा प्रथा सांभाळणारा स्त्रीवर्ग तर दुसरीकडे नवनव्या क्षेत्रात अधिकाअधिक वर्चस्व मिळवण्यासाठी धडपडत असणारा पुरुषवर्ग यातुन 'एकट्या' स्त्रीचे प्रश्न अधिक बिकट आणि दुर्लक्षीत होत राहिले.

    खरंतर स्त्रीला स्वातंत्र्य हे अगदी फार पुर्वीपासुन आहे, फक्त त्या त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीनुसार त्याच्या व्याख्या वेळोवेळी बदलत राहिल्या. कामाच्या जबाबदारीच्या विभागणीनुसार स्त्रीची भुमिका बदलत गेली तशीच पुरुषाची सुध्दा बदलत गेली. नंतरच्या काळात जशा पराक्रम गाजवणार्‍या स्त्रिया या समाजाने पाहिल्या, तसेच विविध बल्लवाचार्य सुध्दा यातुनच निपजले. विधवा किंवा परित्यक्त्या स्त्रीच्या वाट्याला येणार्‍या आयुष्यासाठी जर दुसर्‍या एखाद्या स्त्रीसोबत पुरुष जबाबदार असेल, तर अशा स्त्रीयांच्या उध्दारासाठी काम करणारे हातही काही वेळा पुरुषांचे होते. पण दुर्दैवाने यांची संख्या मात्र अगदीच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत राहिली.

    माझ्या मते, मराठी किंवा हिंदु संस्कृती मानणार्‍या प्रदेशाविषयी विचार करायचा झाल्यास, गेल्या पाच-सहा (किंवा कदाचित अधिक) शतकांमध्ये झालेल्या परकीय आक्रमणाच्या काळात स्त्रीवर्गाचं रक्षण करण्याच्या हेतुने काही अधिकची बंधने घातली गेली, आणि बहुसंख्य वर्गाकडुन ती पाळली जावीत यासाठी त्याला देव या संकल्पनेशी जोडुन मांडण्यात आली.     

    जसजसा शिक्षणाचा आवाका वाढला, प्रसार वाढला आणि आपला इतर समाजवर्गाशी संबंध वाढला तसा एकविसावे शतक येता येता वैयक्तिक आणि स्त्री स्वातंत्र्याच्या व्याख्येतही बदल झाला. चार भिंतीच्या आत असणारा स्त्रीवर्ग मोठ्या प्रमाणात अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागला. कुटुंबाच्या संकल्पना बदलल्या, नैतिकतेच्या व्याख्या बदलल्या. आणि यालाच समांतर कुठेतरी पुरुषवर्गामध्ये सुध्दा बदल होत गेला. विविध प्रकारच्या माध्यमातुन होणारा भडिमार आणि सभोवताली वाढलेला स्त्रीवर्गाचा वावर, मोह आणि वर्चस्वाची भुक या दोघांचा अंमल वाढवत होता. याचा परिणाम म्हणुन मुळचा संरक्षकाच्या भुमिकेत असणारा पुरुष वेगाने भक्षकाच्या रुपात परिवर्तित होऊ लागला होता. अशा घटकासाठी एकटी सापडणारी स्त्री सहजरित्या लक्ष्य बनु लागली, अत्याचाराची शिकार होऊ लागली. अतिशय वेगाने या लालसेने, या भुकेने वयाची मर्यादा सुध्दा ओलांडली आणि समाजातल्या काही दुष्प्रवृत्तीच्या नजरेत स्त्री ही फक्त एक उपभोग्य वस्तु ठरली.

    बदल हा निसर्गाचा स्थायीभाव असल्याने, एका बाजुला अशी काळी बाजु डोकं वर काढत असतानाच, दुसरीकडे काही चांगले बदल होत होते. समाजात एकट्या पडलेल्या स्त्रियांसाठी पुन्हा एकदा स्त्रीवर्गा-कडुनच प्रगतीची, सकारात्मक बदलाची पावले उचलली जात होती. विधवा, परित्यक्त्या स्त्रीचा पुनर्विवाह करुन त्याना मुख्य प्रवाहात सामावुन घेतलं जात होतं. यातच बर्‍याच स्त्रियानी विवाह (वा पुनर्विवाह) न करता 'एकटी' राहण्याचा निर्णय घेउन आणखी एक धाडसी पाऊल उचललं. ज्याचा कदाचित दुसरा अर्थ 'आम्ही समर्थ आहोत, उगाच आमच्या संरक्षणाचा बाऊ करु नका' असा असावा किंवा बदलत्या जीवनशैलीला अनुसरुन स्वत:च्या आर्थिक, भावनिक, शारिरीक आणि इतर गरजा भागवण्याचं स्वातंत्र्य तिने मिळवलं असावं.

  

 एखाद्या संध्याकाळी अशाच काही समवयीन, समविचारी स्त्रियानी एकत्र यावं आणि चहा-पोहे, थालिपीठ, इडली किंवा पास्ता-पिज़्ज़ा सारख्या चीजांचा यथेच्छ फडशा पाडत गप्पा हाणाव्यात, एक स्नेहमिलन घडवुन आणावं. निरोप घेताना आपणच लावलेल्या झाडाचं एखादं रोपटं, आवडीचं एखादं पुस्तक किंवा तत्सम गोष्टीचं 'वाण' एकमेकीना द्यावं.    

    आधीच्या हळदीकुंकूसारख्या स्नेहमिलनाचा उद्देश हा विरंगुळ्याचे चार क्षण एकत्र घालवणे, सुख-दु:खाची देवाणघेवाण करणे असा होता, ज्यासाठी आता अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. त्यातल्या हळदीकुंकवाच्या साधनाला (निमित्ताला) स्वतंत्र सोडुन बाकी गोष्टी करणं आणि तोच उद्देश साध्य करत दे'वाण' घे'वाण' करणं नक्कीच शक्य आहे.

‍‍‍‍~~~~~~~

प्रविण धुरी (12 डिसेंबर 2019)

(या लेखातील मांडलेली सर्व मते आणि विचार हे तर्कावर आधारित आहेत, त्याला कोणताही शास्त्रीय आधार शोधण्याचा प्रयत्न करु नये. हे सर्व असच घडलं असावं असाही माझा दावा नसुन, ही फक्त मला वाटणारी एक शक्यता आहे. )


Comments

Post a Comment