मातृदिन

 Mother's Day 2020 Quotes: मदर्स डे निमित्त ग. दि ...


मातृदिन


अक्षरे ही दोन बनती शब्द दीर्घ, व्यापती आपुला आयुष्य मार्ग,

माय माता वा कुणाची माऊली, माथ्यावरी सदा तिची साऊली,

 

देवकी यशोदा वा कुंती गांधारी  अपत्ये असती तिला प्यारी सारी,

महती तिची सांगती पुत्र सारे  मातृदिनी सेल्फी संदेश न्यारे,

 

सोहळा सजतो हा एका दिनाचा  उरे का व्यर्थ बाकी पसारा दीनांचा,

जिव्हा थोडी आवरा अन थोडी वाचा  माय वा आय करा शून्य पाढा शिव्यांचा,

 

माना अभिमान मग शीर उंचावुनी  होऊ उतराई तिचे पांग जरा फेडुनी

माता वा सासू असो कन्या की भगिनी  उभी तीच लाभे आम्हां मैत्रीण बनूनी

 

अंगाई ऐकोनि मज बाल्य सरले  लाखोलीने का सांग यावे तिज वाटे

अपमान होई मुख माझें बरळे  सुटू नये तोल भय रोज मज वाटे,

 

जन्मदात्री माझी जन्मे ती मजसवे  माताच असे तिथे शक्य नसे जिथे ईश 

शब्द तिचे बनती मजला गे आशिष, बनावे सांग तिजलागी माझे का विष?

 

मातृदिनाच्या शुभेच्छा !

~

© प्रविण धुरी


Comments