कोरांटी

कोरांटी

रंग रंगुली नार नवेली | ना नखरा ना सुगंध भारी|
ना पराग ना केशर ल्याली | सहज जगावे कडेकपारी| 


ना दाणा ना पाजी पाणी | रुजण्याची मम भारी उर्मी|
कुरकुरणार ही नाही वाणी | जरी न लाभली वितभर भूमी| 


आला बहर ना कुणा खबर| हळूच होता नजरानजर|
पावलेच थबकतील तसूभर| पाहुनी तो कुसुमभार मनोहर| 


नाजूक रूपही रंग ही न्यारे | हिरवाईचे कोंदण ल्यावे|
ना मधु ना प्रभावळ सारे | जीवनगाणे रंगून गावे| 


सजवा सखीचा केशसंभार| वा न्यावे मजला देवपूजेस्तव|
अथवा शुष्कावे वारंवार | स्वीकारीत ते कटू-वास्तव्य| 


ना मधु ना अंगी सुवास | ना आप्त ना सखे सोबती|
भ्रमती मकरंद ना गुंजनास | ना झडती डंका नौबती| 


म्हणती जगती मज कोरांटी | साधेपणातच माझी ख्याती|
रुजून कडे कपारी - रानटी | अर्पणातच मम साफल्य पुर्ती| 

-
स्मिता सामंत-तिरोडकर

Comments