मोकळं आभाळ

 

मोकळं आभाळ

निघालो तुझ्याकडुन तेव्हा भरुन आलं होतं,

मन कुठलं कुठलं आभाळ, काही काही कळत नव्हतं,

निर्णय काय घ्यायचा, कसं संपवायचं सारं,

प्रश्नांचा भडिमार सुरु होता,

                  ... माझं सोडवणं मात्र जुळत नव्हतं.


दगडधोंड्यातली वाट, काट्या कुट्यातून चाललो,

वादळं, तुफान, न बधता, तुला शोधत राहिलो,

पंख होते जाणिवांचे, दृष्टी होती क्षितीजाकडे,

प्रवास इथला सुरू होता,

                  ... माझं थांबणं मात्र जुळत नव्हतं.


आलो आज ठरवून इथे विसर्जन करतो सगळ्याचे

सुख, दु:ख, आर्जव, अपेक्षा, मीपणाच्या निर्माल्याचे,

झाला स्पर्श पावलांना त्या धीरगंभीर अथांगतेचा

प्रवाह तिथला सुरु होता,

                  ... माझं असणं मात्र जुळत नव्हतं.


ढग बनुन धुमसत होते, मनातल्या विचारांचे धुर,

वारा घालत होते भरीला, काळजातले उसासे निष्ठुर,

उजळणारं क्षितीज अन चंदेरी किनार सारं होतं खुणावत,

अंधार विझत होता,

                  ... माझं जळणं मात्र जुळत नव्हतं.


अंधुकशा डोळ्यातल्या मोत्यांवर, एक किरण चमकला,

आभाळ लोटून थेट कवडसा, आतल्या जमिनीवर पोचला,

तुझं गर्भगृहातलं रुप आठवता, आशेचं बी अंकुरलं,

अश्रुवर्षाव सुरुच होता,

                  ... माझं हसणं मात्र जुळत नव्हतं.


~~~~~

प्रविण धुरी - 12/09/2019


Comments