बंडुचा मैत्री-संग्रह

Speaking in Front of an Audience. We all had that moment where we ...


बंडुचा मैत्री-संग्रह


                ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे मित्रत्वाच्या नात्याने परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेकांसाठी पर्वणीचा दिवस. त्यातलाचा एक मी, तसा तो माझ्या साठीही फार महत्वाचा. आयुष्याच्या पुस्तकातल्या मैत्री या प्रकरणाने इतकं काही भरभरुन दिलं आहे, इतकं प्रेम आणि इतके समृद्ध अनुभव दिले आहेत, की त्यातुन मुक्त होण्याऐवजी सदैव त्या मैत्रीच्या ऋणात राहण्यातच जास्त आनंद मिळणार आहे. अशाच एका मैत्रीदिना निमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा योग आला. तिथल्या अनेक वक्त्यांपैकी बंडु माझ्या चांगलाच लक्षात राहिला. 

      रविवार तसा सुट्टीचा दिवस, आरामात उठुन सावकाशीने दैनंदिन कामं आटोपून, दहा वाजेपर्यंत नाश्ता, दोन-अडीच पर्यंत जेवण, त्यात जर 'खाट खाट' 'भुर्र्रर्र,,, स्स्स्स,,, हा$$$' असे विशिष्ट आवाज करणारं जेवण असेल तर थोडी लांबलेली वामकुक्षी. आणि मग सुस्तावलेली संध्याकाळ. पण आज असं काहीही होणार नव्हतं. कारण आजचा रविवार तर विशेष दिवस होता. आज, मैत्रीदिनाच्या निमित्ताने सुंदरवाडी गृपतर्फे एक छोटासा स्नेह-मेळावा ठरवला होता आणि तिकडे सर्वजण आपापले मैत्रीबद्दलचे विचार, अनुभव मांडणार होते. आठवण करून देण्यासाठी गुरुवारी बाबामहाराजांचा फोन आला, आणि मी वेळेवर हजर झालो. उपस्थितांच्या गाठीभेटी घेत माझ्यासाठी राखुन ठेवलेल्या दुसर्‍याच रांगेतल्या मधल्या खुर्चीवर मी स्थानापन्न झालो. माझ्या मागच्याच रांगेत तो बसला होता, आकाशी रंगाचा फुल हाताचा शर्ट, खिशाला एक पेन अडकवलेला, डोळ्यावर काळ्या-लाल फ्रेमचा चष्मा, केसांचा छानसा काढलेला भांग प्रवासाने विस्कटलेला दिसत होतं शांतपणे डोळे मिटुन. मनातल्या मनात उजळणी चालु असावी असं वाटत होतं, काय बोलायचं, कुणाविषयी बोलायचं, काय सांगायचं, काय गाळायचं, असं बरंच काही डोक्यात सुरु असावं. हातातील डायरी आणि बाहेरच दिलेली कार्यक्र्माची स्मरणिका असं सगळं घेऊन तो बसला होता. हॉलभर सुरु असलेल्या गोंगाटाचा जसा काही त्याच्यावर कसलाच परिणाम होत नव्हता. नकळत माझी उत्सुकता चाळवली. मी शेजारीच बसलेल्या पंतांकडे चौकशी केली, तेव्हा समजलं की अशा कार्यक्रमापुर्वी तो असाच काहीसा तणावात असल्यासारखा वाटतो. नंतर होतो नीट.

      साडेदहाला मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसा आजचा कार्यक्रम अनौपचारिक स्वरुपाचा असल्याने प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या गोष्टीना फाटा देण्यात आला होता. सुरुवातीपासुनच माईक हाती असल्याने, आपसुकच सुत्र-संचालनाची सगळी सूत्र नाईक बाईनी आपल्या हाती घेतली आणि एक छानसं संस्कृत सुभाषित बोलत आजच्या या दिवसाचा आणि स्नेह्मेळाव्याचा उद्देश विशद केला.

      आणि मग सुरु झाला एक प्रवास... मैत्रीच्या दुनियेची सुंदर सफर घडवणारा... अतुट मैत्रीच्या सुरस रम्य कथा, कधी अनेक वर्षानंतर या गृपमुळे झालेली रमेश सिप्पीच्या सिनेमासारखी बिछडे हुओंकी भेट, तर काहींची पहिल्या बिडीपासुन सुरु होऊन आजही संध्याकाळच्या बियरपर्यंत अख़ंड अव्याहत चालु असणारी दोस्ती. एकामागुन एक वक्ते येत होते, आपले मैत्रीविषयीचे विचार, आपले अनुभव मांडत होते आणि ते सर्व ऐकुन मी मात्र भारावल्यासारखा बसुन होतो.   

      कुणी दोघी लग्नानंतर आज भेटत होत्या, नावं बदलल्यामुळे जवळ असुन ओळख लागत नव्हती... तर आज भेटल्यावर कुणाला तरी आपल्या बालमैत्रीणीत जवळचं नातं सापडलं होतं 'तिच्या चुलतभावाच्या मेहुणीच्या दिराच्या आत्येभावाची बायको म्हणजे ही' आणि असंच बरंच काही... 

      एकामागुन एक सदस्य येत होता आणि आपले कडुगोड अनुभव मांडत होता... आजारपणात झालेली मदत, हातात काही काम नसताना दिलेला हात, लग्न करण्यासाठी दिलेली साथ, तर कुणीतरी कधीकाळी दाखवुन गेलेला हात अन त्यातुन सावरण्यासाठी पुन्हा मिळालेली मैत्रीची साथ...  

      आयुष्यात आलेल्या मित्र-मैत्रीणी आणि त्यातल्या काहींचं असणारं विशेष स्थान याविषयी बोलताना काहींचे डोळे पाणावत होते, तर ते ऐकताना इतरांचा हात उगीचच डोळ्यात काहीतरी गेल्याची जाणीव होऊन पापण्यांपर्यंत पोचत होता. सारं वातावरण मैत्रीच्या मंद सुगंधाने भारावल्यासारखं झालं होतं.

      भाई, दादा, तात्या, अण्णा, ताई, माई, बाई, बाबा, गुरु, चेला, कुणी भाषाप्रेमी, कुणी गावप्रेमी, कुणी विज्ञान, कुणी अध्यात्म, कुणी शिक्षक, कुणी कथा-साहित्य... या सर्वांचा आधार घेत जो तो आपले विचार मांडत होता. अशा एकापेक्षा एक सुंदर आणि फर्ड्या वक्त्यांसमोर आपण काय बोलणार या विवंचनेत मी गुंग असतानाच, पितामहजी पुढ्यात आले आणि हातानेच इशारा करत सुचना केली, 'यानंतर तू जा'. ते हातवारे बघुन मी जरासा गांगरलो होतो, पण लगेच माझ्या लक्षात आलं की ते माझ्यासाठी नसुन मागील व्यक्तीसाठी आहेत. मी मागे वळुन बघितलं तर तो आपल्याच तंद्रीत होता. मी हलकेच आवाज दिला आणि समोरुन येणार्‍या सुचनेविषयी सांगितलं. तसा तो उठुन उभा राहिला आणि वाट काढत खुर्च्यांमधुन बाहेर आला.

      मनातल्या मनात शब्दांची जुळवा-जुळव करत आणि तळाहाताला आलेला घाम रुमालाने पुसत पुसतच तो उठला आणि माईकसमोर जाऊन उभा राहिला. आणि...

 Speaking in Front of an Audience. We all had that moment where we ...

      "नमस्कार मंडळी," प्रत्यक्ष हात जोडुन त्याने नमस्कार केला होता.

      "आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आज मैत्रीदिना निमीत्ताने इथे जमलो आहोत, हेच खरंतर आजच्या दिनाचं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी पुरेसं आहे. त्यात माझ्यापेक्षा अधिक अनुभवी, चार पावसाळे अधिक पाहिलेल्या काहीनी आधीच बरंच काही आपल्यासमोर मांडलं आहे, त्यापेक्षा वेगळं असं माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही असं मला वाटतं, तरीही माझ्या आयुष्यात आलेल्या मैत्रीपर्वाची एक झलक मी आपल्यासमोर ठेवतो आहे. आपल्यापैकी अनेकांशी माझं बोलणं अथवा चॅटींग होत असतं, तरीही मी माझा परीचय देतो, माझं नांव प्रद्युम्न गुलाबराव दरवाढेकर..."

      हॉलमध्ये अचानक एकदम शांतता झाली, दहा सेकंदातच मागच्या खुर्च्यान्मधुन चुळबुळ सुरु झाली. मागे बसलेल्याना नाव बहुधा कळलेलं नव्हतं. ते बघुन बंड्याच बोलला,

      "हो कळलं मला ते म्हणुनच, सोप्या शब्दात बंडु."

      "तर मला वाटतं, मैत्री जुळायला, मित्र अथवा मैत्रीण असं नातं बनायला विशेष कसली अट नसते. शिक्षण, रंग, रुप, जात, धर्म, पैसा या सर्वांपलीकडे जाऊन दोन व्यक्तीमध्ये मैत्री जुळु शकते. कुठल्याशा जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे स्वभाव जुळला की झालं... मग तो परस्पर भिन्न स्वभाव असला तरीही. किंबहुना भिन्न अथवा विरोधी स्वभावाच्या दोन व्यक्तींचं नातं कधीकधी अधिक घट्ट असलेलं दिसुन येतं. याच तत्वाला अनुसरुन माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं भेटत राहिली, मैत्री होत राहिली. आमच्या आवाटातील, प्राथमिक शिक्षण घेताना जिपच्या शाळेतील, नंतर हायस्कुलातील, कॉलेजातील, नोकरीला लागल्यावर कंपन्यांमधील... हा सिलसिला अजुन सुरुच आहे."

      "तो अमिताभ आणि रेखाचा... तुमचं बोला" उजवीकडच्या पाचव्या लायनीतल्या एका खुर्चीचा आवाज आला.

      " हॅ हॅ हॅ... खरं आहे... आणि तरीही त्यांची मैत्री अजुन टिकुन आहे. माझा असा काही सिलसिला नसला तरी मैत्री मात्र छान अनुभवता आली. शाळेत असताना काही मित्र अन एक दोन मैत्रीणी होत्या. पुढे कॉलेजात गेलो तसं यांच्या संख्येत भरच पडत गेली. आणि या आभासी दुनियेत का होईना गेली तीन वर्षे तुमच्यासोबत आहे, त्यामुळे घाऊक दोन सव्वा-दोनशे लोकं एकदम मैत्रीच्या यादीत जोडली गेली." 

      एवढं ऐकल्यावर हे काहीतरी वेगळंच रसायन आहे अशी एक शंका माझ्या मनात येऊन गेली. काही रांगांमधुन चुळबुळ सुरुच होती. माझा अंदाज होता की मागच्या काही खुर्च्यांवर तर वेगळ्याच विषयाना सुरुवातही झाली असावी. बंडुचं बोलणं पुढे सुरुच होतं.

      "ख़रंतर जेव्हा आपण मोठे होत असतो, अन अजुन तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवायला एखादी पायरी शिल्लक असते, अशा वेळी एक सुप्त इच्छा मनात घर करु लागते, की आपल्या मित्र परिवारात नवीनवी भर पडत असताना त्यात एखाद दुसरं सौंदर्यस्थळ सुद्धा असावं. तशी ती माझ्याही मनात निर्माण झाली, पण... तसा काही योग इतक्यात नसावा बहुधा. सीनियरला गेल्यावर आयुष्याला अशी काय कलाटणी मिळाली की त्यातुन मैत्रीच्या नात्याचा खरा अर्थ तर कळलाच, पण कोणतेही गैरसमज होऊ न देता आणि शुद्ध, पवित्र भावनेनं हे मैत्रीचं उदात्त नातं कसं टिकवायचं हे देखील शिकता आलं."

                'सौंदर्यस्थळं शोधली तर सापडतात, आपसुक चालत येत नाहीत.' यावेळी आवाज डाव्या कोपर्‍यातुन आला होता. तिथे काही खुर्च्यांमधुन छोटीशी खसखस पिकली. पण त्याकडे दुर्लक्ष करत बंडुचं बोलणं सुरु ठेवलं.

      "खरंतर मैत्री ही कुणाची कुणाशीही होऊ शकते. आताशा तशी ती खुल्लम खुल्ला करता येते. पण तुम्हाला तर माहितीच आहे, आजपासुन पंचवीस-तीस वर्षापुर्वी परिस्थिती अशी नव्हती. तेव्हा फक्त मुलांची मुलांशी आणि मुलींची मुलींशी मैत्री होत असे. एका मुलाने एखाद्या मुलीकडे नुसतं बघणं किंवा साधं हसणं (याला शुद्ध मराठीत असणारा 'स्मित' हा शब्द त्यावेळच्या फक्त कादंबरीमधुनच सापडायचा) याचासुद्धा वेगळा अर्थ काढला जायचा. तसा अर्थ बहुधा बाकीचे बघणारेच काढायचे, पण त्या दोघाना मात्र पुढचं वर्ष किंवा उरलेली वर्ष कठीण जायची. असो."

rethinking public speaking blog — Public Speaking Courses with a ...

      "इतकं सगळं असुनही मी जो काही आज आहे, जसा घडलो (अथवा बिघडलो) आहे, त्याचं जास्त श्रेय मी या सगळ्या मैत्रिणीनाच देतो. त्यांच्यासोबत वावरण्याने, बोलण्याने दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या,

                एक म्हणजे काही अंशी न्युनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढायला मदत झाली, आणि दोन, पुरुषी वर्चस्व असलेल्या जगात स्त्रीचीसुध्दा भुमिका असते याची जाणीव होत होत, दुसर्‍या बाजुकडे बघायची सवय लागली."

      आता बंडुच्या आत दडुन बसलेला विद्रोही कवी, किंवा दाबुन ठेवलेला नव-साहित्यिक बाहेर पडतो की काय अशी शंका मला वाटुन गेली. मी सहजच बाजुला बसलेल्या पंतांकडे बघितले. त्यांच्याही मनात बहुधा तसंच काही आलं असावं. त्यानी पटकन थोड्या मोठ्या आवाजात प्रश्न टाकला,

      'गुड यार, कोण खास मैत्रीण असेल तर सांगुन टाक.' 

      एखादा चपटा दगड पाण्याच्या प्रवाहात भिरकावल्यावर कसा उड्या मारत जातो आणि पाठीमागुन तरंग उमटवत राहतो, तसं काहीसं या वाक्याने झालं. हास्याची लकेर आणि 'हो' 'हो' 'होवुन जावु दे' अशा अर्थाची एक लाट संपुर्ण हॉलभर फिरुन आली.

      "शिक्षण संपवून पोटामागे धावू लागल्यावर जुन्या मैत्रीतील हे दुराव्याचं अंतर एकीकडे काही प्रमाणात वाढत गेलं, तर त्याचबरोबर दुसरीकडे माझी मैत्रीच्या बचत खात्यातील ठेवसुद्धा दिवसेंदिवस वाढत होती. हो, मैत्री ही एक ठेवच आहे, जी तुम्ही सतत वाढवत नेत असता आणि तिला पुन्हा पुन्हा वापरुन सुध्दा ती कमी न होता वाढत जाते, अधिक दृढ होते."

             "विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने, त्यानंतर आयुष्यात आलं ते फेसबुक आणि व्हाटस्एप. ज्यामुळे हे विखुरलेले, दुर गेलेले मैत्रीचे धागे पुन्हा एकदा जवळ येऊ लागले, जुळुन येवु लागले. सुंदरवाडीने यात भर घातली आणि माझी ही ठेव अल्पावधीत दामदुपटीने वाढली. मात्र आज मागे वळुन बघताना, माझ्या लक्षात येतंय की या मैत्रीसंग्रहातील काही प्रकरणांचा उल्लेख केला नाही तर, तो कृतघ्नपणा ठरेल." 

      बॅंकेतील अनुभव आणि विज्ञान शाखेचं पाठबळ यामुळे ठेव, खाते, अल्पावधी, दामदुप्पट, अशा शब्दांची पखरण करत बंडु आता कोणती आणि कोणाकोणाच्या खात्यांची प्रकरणे उघडतो हे ऐकण्यासाठी जो तो सरसावुन बसला. काहीतरी भन्नाट ऐकायला मिळेल म्हणुन काही खुर्च्यांच्या पाठी रिकाम्या झाल्या अन पुढच्या पायावरचा भार वाढला, तर हॉलमध्ये इथे तिथे रेंगाळणार्‍या काहीनी जवळच्याच रिकाम्या खुर्च्याना आपलंसं केलं.  

      " पहिलं नमन आपल्या सगळ्यांचे लाडके ताई आणि दादा यांना. पपुदादा साहेब, ज्या माणसाच्या वेळेच्या नियोजनाबद्दल अनेकाना शंका आहेत, त्यानीच वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझ्यातील कलागुणांना मी न्याय देऊ शकलो. अगदी टोकाची मते असतात, काही मते न पटणारी असतात, पण त्यामुळेच प्रतिवादी म्हणुन उभं रहायला मजा येते. त्याचबरोबर या सगळ्याचं कौतुकही वाटतं.

      आणि पोळीवाली ताई, सकारात्मक प्रोत्साहन काय असतं ते हिच्याकडुन शिकावं. टोकाची मतं तर  हिचीसुध्दा असतात, त्यात माझ्या अंदाजाने जरा शीघ्रकोपी. पण विश्लेषण आणि विवेचन करण्यात हातखंडा. काही वेळेला कुंपणावर बसलेल्याना सोयीचं व्हावं म्हणुनच हे दोघे आखाड्यात उतरतात की काय अशी शंका मला येते." हॉलभर टाळ्यांचा कडकडाट आणि हास्याच्या लकेरी उमटल्या.

      " बस्स, यांच्याबद्दल एवढं पुरेसं आहे. कारण तुम्ही सगळेच जाणता आणि सगळेच यावर बोलता. म्हणुन मी आता काहीसं इतरांविषयी बोलणार आहे."    

All the World's a Stage: Tips and Techniques to Command the ...

      आता हा बंडु आणखीन काय बोलतो म्हणुन मी सुध्दा सरसावुन बसलो.

      " मला या वाडीत येऊन, हो बरोबर ऐकलत तुम्ही आभासी असली तरी ही एक वाडीच आहे, जिथे आपण सगळे एकत्र असतो, आणि तरीही काही जणांच्या वेगवेगळ्या खोल्या इथे आहेत आणि ते आपापल्या आवडीनुसार त्यात रमतात." बंडु क्षणभर थांबला.

      या वाक्यावर हॉलमधल्या काही भागात हलके उसासे सोडले गेले असल्याचा मला भास झाला.

      " तर... अध्यात्मापासुन सुरुवात करतो... डॉक्टरनी दाखवुन दिलेली अध्यात्माची वाट आणि त्यावर पंत आणि केके सारख्या व्यक्तींसोबत संवाद साधायला मिळणे ही माझ्यासाठी एक आनंदाची बाब ठरली. बाई जरी शिस्तीला कडक असल्या तरी त्यांच्यातील हळव्या भावनीक लेखिकेला वाचणं हे म्हणजे केकवरची चेरी की काय म्हणतात तसं. फार्मावरचं ज्ञान ऐकता ऐकता, हा मसुरेकर कधी मासे या विषयावर गुंगवुन ठेवु लागला हे लक्षातच आलं नाही. 'ये हात मुझे दे दो' असं म्हणुन गब्बरने ठाकुरला हतबल करुन टाकलेले, पण आमचा चिरतरुण ठाकुर सदैव हात द्यायला तयार. कॉलेजच्या दिवसात लक्षात राहिलेल्या दोन व्यक्ती, एक अंगभुत कलेमुळे 'किशोरकुमार' आणि दुसरा त्यावेळी पाहिलेल्या नेत्रुत्वगुणांमुळे 'पंडीतजी'. यांच्याशी प्रत्यक्ष मैत्री होणे म्हणजे भाग्यच. "

      हे सगळं ऐकत असताना माझी मान आपसुक वळत होती आणि नजर त्या त्या व्यक्तीना शोधत होती. कोण माझ्या आजुबाजुच्या खुर्च्यांवर होतं तर कुणीतरी मागच्या गर्दीतुन हात दाखवत होतं. असाच एक हात अगदी बॅक बेंचर्स म्हणावं अशा भागातुन वर आला, जेव्हा बंडुने पुढचं वाक्य घेतलं.

      " या सगळ्यात आणखी एक मिश्कील पण तितक्याच दिलदार व्यक्तीची झालेली माझी ओळख, आपले हिवरे गाडीचे पर्मनंट प्रवासी, नामवंत वकीलसाहेब."

      'खुप आहेत रे हिवरे गाडीवाले' पहिल्या रांगेतील पितामहंच्या अनुनासिक स्वरातील या स्वराकडे दुर्लक्ष करुन बंडुने यादी वाचणं सुरुच ठेवलं.

      "विद्यापीठातील स्मित, एक्स-रे मशीनमागचं अविरत सेवा देणारं व्यक्तीमत्व, वर्गमित्राची बहिण हे नातं जुळलेली कवयित्री असो की सुंदर व्यक्तीचित्रण करु शकशील हा विश्वास जिला द्यावासा वाटला ती कुंपणस्वामिनी... या सगळ्याच जणींमध्ये एक चांगली मैत्रीण मिळाली. यासोबतच जिच्या प्रेमळ रुसण्याचा धसका वाटतो अशी साधी सरळमार्गी, त्यात ती आमच्या हिच्या माहेरकडची, म्हणजे जरा अधिकच जपुन आणि तिचे यजमान, या जोडीच्या मैत्रीने तर मैत्री आणखीनच खुलुन आली. जिच्या रुसण्याने तिचा मुडसुध्दा हद्द सोडतो अशी आणखी एक मैत्रीण आहे, ती म्हणे मी सांगितलेल्या चार समजुतीच्या गोष्टीने आपला सीमेपलीकडे गेलेला मुड पुन्हा आत आणते. आता कोण सांगणार हिला की बाई ग, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, मी काय सांगणार तुम्हाला... पण जाऊ द्या."

      या वाक्याचा अर्थ खरंतर मलाही लागला नाही, इतरांसारखा मीही शोधत राहिलो. उगाचच वाटुन गेलं की माझ्या उजवीकडे, काही खुर्च्या सोडुन पलीकडे बसलेली एक खुर्ची खाली मान घालुन हसते आहे. पण कदाचित तो माझा भ्रम असावा. तितक्यात बंडुने वयाने मोठ्या असणार्‍या कुणाचा तरी उल्लेख केला.

      " आणि हो आपल्या दैनंदिन वेळा सांभाळत, दिनचर्या आणि झोप वेळेत पुर्ण करण्याकडे जातीने लक्ष देणारं एक युगुल, तसं या सगळ्यांच्या बरोबरीचं पण हल्लीच एक बढती मिळालेलं, यांची कितीही थट्ट-मस्करी केली तरीही न रुसणारं, रागावणारं, अगदी एखादं छानसं मऊसुत मांजर कसं आपल्याला लळा लावतं ना अगदी तसाच लळा या दोघांचा आम्हाला लागला आहे. ही सुध्दा याच वाडीची कमाल आहे."

      यावेळी मात्र काही ठराविक ओठांमधलं लपलेलं स्मित वगळता बर्‍याच चेहर्‍यांवर प्रश्नचिन्ह आणि कपाळावर आठ्या होत्या. उत्तरं सहजासहजी सापडत नसल्याने बंडुचा हा कोड्यांचा खेळ आता थांबावा असंच मत बनताना दिसुन येत होतं.

      "सर्वांचीच नावे घेणे अथवा त्यांचे उल्लेख करणे वेळेच्या कमतरतेपायी शक्य नाही. तरीही जाता जाता शेवटी आणखी दोन तीन उल्लेख केल्याशिवाय मला हे सगळं अपुर्ण असल्यासारखं वाटेल. एक म्हणजे माझ्यातील साहित्यिक हेरुन, त्याला विवेकाचा प्रकाश दाखवणारा आणि त्या प्रकाशात पुढची वाट मोकळी करुन देणारा असा एक मित्र, दुसरा, खरंच पितामहसारखी काळजी घेणारा आणि तिसरी एक जोडी, दोघानाही बोलायला खुप आवडतं, विषयामागुन विषय, अविरत बोलणं, एक सिग्नल बघुन थांबणारा, दुसरा कितीही धडपडला तरी आपलं कार्य सुरु ठेवणारा, त्यामुळे त्यांचा एकत्रच उल्लेख करतो 'बावा'.

      तुम्हा सर्वांच्यामुळे माझ्या असण्याला अर्थ आहे. मला वेळोवेळी मिळणारं प्रोत्साहन असंच मिळत राहो आणि माझं लेखन, माझ्या कविता तुम्हाला आवडत राहो ही इच्छा व्यक्त करतो. जुने दिवस, जुन्या आठवणी, आनंदाचे क्षण, दु:खाचे प्रसंग, अ‍डीअडचणींचा काळ, आजारपणे, मुलांचे यश असं सगळं काही वाटुन घेत आपण या आभासी जगात एकत्र नांदतो राहोत.

      शेवटी परमेश्वराकडे एकच मागतो, मला घडवणार्‍या तुम्हा सर्व मित्र-मैत्रिणींच्या ऋणात मला असेच राहु द्यावे आणि आमची सर्वांची शेवटपर्यंत अशीच एकमेकाला सोबत असु द्यावी."  

      "मैत्रीदिनाच्या तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद! "

     बंडु नमस्कार करुन व्यासपीठावरुन खाली उतरला तेव्हा त्याच्या या वाक्यावर पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होत होता. मी सहजच हॉलवरुन एक नजर फिरवली. प्रत्येकजण टाळ्या वाजवत होता, आनंदी दिसत होता, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हास्य होतं. ते बंडुच्या भाषणातील भावनाना होतं की भाषण लवकर संपलं म्हणुन होतं हे जरी माझ्यासाठी आजही एक कोडं असलं तरी हा बंडु मात्र माझ्या कायमच स्मरणात राहिला.

© प्रविण धुरी  02 ऑगस्ट 2020


How does it feel to receive applause during or after a stage ...


Comments

  1. खुप आवडतो हा लेख... मुद्दाम वाचून काढते परत

    ReplyDelete

Post a Comment