एक पर्व संपताना...



एक पर्व संपताना

            एका छोट्याशा गावात राहणारी चार भावंडं, तीन भाऊ आणि एक लाडकी बहीण. आर्थिक परिस्थिती बेताचीच. आईवडीलांचं छत्र लवकर हरपल्यामुळे समाजातुनही म्हणावा तसा आधार नाही. आधारापेक्षा वाट्याला अवहेलनाच जास्त आलेली. तरीही मोठ्या भावाने सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्विकारली आणि जमेल तसे दिवस ढकलु लागले. देवाचं नांव घेत घेत येणारा रोजचा दिवस काय नवीन संकट घेऊन येतोय आणि त्याला कसे तोंड द्यायचे, कसे मार्ग काढायचे यातुनच चौघांचंही अनौपचारिक शिक्षण होत होतं. एकमेकाला धीर देत, सहकार्य करत, आपापासातील नात्याचे बंध अधिक घट्ट करत त्यांचा जीवनप्रवास सुरु होता.

             एकंदर परिस्थितीमुळे सर्वांचा अध्यात्माकडे ओढा वाढत होता. त्याच अनुषंगाने चौघातील एकाने तारुण्याच्या उंबरठ्यावर येता येता एक पुस्तक लिहुन पुर्ण केले. मातृभाषेतुन इतके अप्रतिम भाषांतर त्यापुर्वी क्वचितच कोणी केले असावे. म्हटलं तर टीका, म्हटलं तर विश्लेषण अशा प्रकारचे पुढील कित्येक पिढ्याना मार्गदर्शक बनु शकेल असे ते पुस्तकलेखन हा बहुधा त्याच्या आयुष्यातील परमोच्च क्षण असावा. हाच वारसा इतरांनाही मिळालेला. त्यामुळे जमेल तसे लेखन इतर तीन भावंडही करतच होते.

            पण ऐन तारुण्यात प्रवेश केल्यावर, खर्‍या जीवनप्रवासाची सुरुवात करायची असताना मात्र त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. ऐन एकवीशीत जेव्हा सामान्य तरुण लग्न करुन सुखी संसाराची स्वप्ने रंगवतात, नेमक्या त्याच वयात त्याने थांबण्याचा विचार करावा हे आश्चर्यच होते.

            याही पुढचे आश्चर्य म्हणजे या घटनेमागुन, अवघ्या काही कालावधीनंतर एकामागुन एक अशा रितीने इतर तीनही भावंडानी सुद्धा हाच निर्णय अमलात आणला. देह ठेवताना लहान बहिणीचे वय तर अवघे अठरा वर्षांचे असावे. पित्यासमान अणि गुरुस्थानी असलेल्या मोठ्या भावाला, आपल्यापेक्षा लहान भावंडांचे इतक्या सहजपणे आणि एका मागोमाग एक असे मृत्युला कवटाळलेले बघावे लागणे यापेक्षा मोठे दु:ख आणि दुर्दैव काय असु शकेल? शेवटी त्याच्या मृत्युने या सगळ्याचा अंत झाला आणि सोबतच एक कुटुंब, एक विद्वान वंश अशा रितीने कायमचा संपुन गेला.

            एवढ्या तरुण वयात झालेले हे मृत्यू, त्यांनी आपले जीवन संपवण्याचा घेतलेला निर्णय हा समाजातील अवहेलनेपायी होता, त्याला तोंड देण्यात आलेल्या अपयशापायी होता, की या जीवनातील आपले कार्य पुर्णत्वास नेले, आणखी करण्यासारखे आता काही उरले नाही अशा कृतकृत्यतेच्या, ध्येयपुर्तीच्या भावनेतुन होता, याचे उत्तर मात्र आता मिळू शकणार नव्हतं.

 

एक पर्व मात्र निश्चितच संपले होते...


****

            अतिशय विद्वान, बुध्दिमान व्यक्तिमत्व, ज्ञानाचे भांडार. अनेक विद्वान पंडितांशी वादविवाद करुन धर्माला पुनरुज्जीवीत करण्याचे महान कार्य. ऐन तारुण्यात चारही दिशाना प्रवास करुन अनेक संकटाना, आपत्तीना तोंड देत आपले कार्य सुरुच ठेवण्यात यश. या सगळ्यामुळे प्रस्तुत काळातील विचारवंतांमध्ये चीड निर्माण झाली नसती तरच नवल. परिणामी विषप्रयोगासारख्या वैयक्तिक आपत्तीना तोंड द्यावे लागले ते वेगळेच. पण शरिरावर याचा व्हायचा तो दुष्परिणाम झालाच आणि थकलेल्या, शक्तीहीन होत जाणार्‍या देहाने चाळीशीच्या आतच जीवनकार्य संपवण्याचा निर्णय घेतला.

            दोन धर्मातील विचारसरणी आणि त्याच्या आचरणातील तुलनेपायी एका महान विचारवंताचा असा अवेळी थांबलेला प्रवास हे खरंतर संपुर्ण मानवजातीचे नुकसान. मागे उरलेल्या अनुयायानी गुरुचे कार्य पुढे नेले, तरीही ज्ञानसागरात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन न निघणारी अशीच.

 

एक पर्व मात्र निश्चितच संपले होते...

 

***

            गुरु-शिष्य परंपरेतील आणखी एक उदाहरण, जिथे शिष्याच्या अकाली जाण्याने व्यथित होवुन गुरुने स्वत:चे प्राण त्यागण्याचा निर्णय घेतलेला. परकीय आक्रमण आणि सत्तेतुन आपल्या प्रदेशाला मोकळे करताना, प्रजेला स्वराज्य मिळवुन देताना प्रकृती अस्वास्थ्यापायी शिष्याने इहलोकीची यात्रा संपवली. त्यामुळे, अनेकाना बलदंड शरीरयष्टीचे महत्व पटवुन देत, सतत भ्रमण करत, जागोजागी प्रार्थनेसाठी मठ आणि आक्रमणाला तोंड देणारा शक्तीशाली समाज घडवण्यासाठी व्यायामशाळा उभ्या करणारा, एक समर्थ अवलिया असा निराश व्हावा की त्याने गुहेतील एकांत जवळ करुन बसावं, हे थोडेसे अचंबित करणारे.

 

एक पर्व मात्र निश्चितच संपले होते...

 

****

                                                    

            पांडुरंगाच्या, कृष्णाच्या भक्तीत लीन होवुन त्याला सर्वस्व समर्पित केलेल्या अशाच काही महान विभुती. प्राणीप्रेम आणि भुतदयेचे पाठ गिरवत, भक्तीरसाचे महत्व सांगत, अध्यात्म आणि संसारी जीवनाचा उत्तम संगम साधत, सोप्या बोलीभाषेत उपदेश करीत, समाज प्रबोधनाचे कार्य करताना नदीच्या प्रवाहाला आपलेसे करावे वाटले आणि यातच त्यानी या जन्मापासुन मुक्ती शोधली असावी.

 

सोबतच एक पर्व मात्र निश्चितच संपले होते...

 

****

 

            तीन भावंडांमध्ये याचा नंबर दुसरा. अवघ्या नऊ वर्षाचे असताना आईचे छत्र हरपले तर तारुण्याच्या उंबरठ्यावर पोचता पोचता वडिलांचे निधन झाले. मोठ्या भावाने आणि मोठ्या वहिनीने अगदी पोटच्या मुलासारखा सांभाळ केला. बालपणापासुन बुद्धी अतिशय तीक्ष्ण, त्याचा परिणाम शालेय जीवनापासुनच स्वतंत्र विचारसामर्थ्य तयार होण्यात झाला, त्यातुन व्यवस्थेविरुध्द बंड पुकारुन समाजप्रबोधन करण्याकडे कल वाढला. त्याच्या बंडखोर आणि क्रांतिकारी विचाराने भारलेले इतर तरुण त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन विचार कृतीतून उतरवु लागले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला आणि व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सगळ्याचे खापर या तरुणावर फोडले गेले. त्याची महाभयंकर अशी शारिरीक शिक्षा तर मिळालीच पण मानसिक खच्चीकरण करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला गेला.

            नजरेसमोरचे ध्येय स्पष्ट असल्यामुळे असेल कदाचित, पण या तरुणाने लेखनावर भर दिला आणि एकापेक्षा एक अप्रतिम रचना सादर केल्या. अनेक काव्ये, नाटके, पुस्तके, ग्रंथ लिहिले. व्यवस्थेच्या इराद्याना धुर्तपणे छेद देत आपली सुटका करुन घेतली आणि आपले समाज जागृतीचे, प्रबोधनाचे कार्य सुरुच ठेवले. जातीव्यवस्था, प्राणीप्रेम, देशप्रेम, भाषा, अशा विविध विषयांवर सडेतोड विचार मांडले.

            आपल्या चौर्‍याऐंशी वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक विचार मांडले, अनेक तरुणाना ध्येयासाठी मार्गदर्शन केले, स्वत:समोर वेळोवेळी नवनवीन ध्येये, उद्दीष्टे ठेवुन ती पुर्णत्वास नेली. कदाचित त्यातुन काही अपुर्ण राहिली असतील, काही अर्धवट पुर्ण झाली असतील, काही उद्दीष्टांच्या पुर्ततेसोबत तडजोड करावी लागली असेल, काही वेळा समर्थन मिळाले, तर काही वेळा प्रखर विरोधही स्विकारावा लागला असेल.

            वार्धक्याकडे झुकत असताना या सगळ्याचा जमाखर्च मांडला, तेव्हा मनात आलेल्या भावना लिहुन, मांडुन ठेवल्या, ज्यातुन समोर आलं ते ध्येयपुर्तीचे समाधान आणि आता काही करण्यासारखं शिल्लक नसल्याची, पुर्णत्वाची बाजू. आणि त्यामुळे या देह त्यागण्याच्या निर्णयाचे आत्मसमर्पण असे नामकरण झाले.

 

इथेही एक जाज्वल्य पर्व मात्र संपले होते...

 

****

     धरणीमाय हीच आपली पालनकर्ती, पोषणकर्ती असे म्हणत मेहनत करणारे कित्येक घामेजलेले जीव, आकाशाकडे नजर लावुन बसणारे, पांडुरंगाची, कृष्णाची भक्ती करत, अध्यात्म सांभाळुन संसार जगणारे आणि कित्येक संसार जगवणारे, क्रांती नसेल जमत, पण आपल्या परीने देशभक्ती पिकवणारे... परिस्थिती आणि निसर्गाच्या कचाट्यात सापडुन संकटांना, आपत्तीना तोंड देता देता एक दिवस आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाली असे म्हणुन, आपल्याच बांधावरचं एखादं झाड जवळ करतात. त्यावेळी मागे राहिलेली पुढची अथवा आधीची पिढी या घटनेला कसं बघत असावेत... जीवनात आलेली निराशा की आता करण्यासारखं आणखी काही राहिलं नाही, म्हणुन हे पाऊल...

 

एक एक करत अनेक पर्व मात्र संपतच होती आणि आहेत...


****

        उपोषण हा म्हटलं तर एक अहिंसक आणि शांतीप्रिय, आपलं म्हणणं, आपल्या मागण्या सरकार दरबारी किंवा व्यवस्थेपर्यंत पोचवण्याचा, दखल घ्यायला लावावा असा खात्रीशीर मार्ग. मागील शतकभरातला इतिहास तरी हेच सांगतो. क्रांती, आंदोलने, मोर्चे असे विविध मार्ग असतात, पण ते इतरांना क्लेश देणारे. उपोषण हा एकमेव मार्ग ज्यात आत्मक्लेश करुन त्याची दखल दुसर्‍याला घ्यायला लावली जाते. असं म्हटलं जातं की स्वातंत्र्यपुर्व काळात सर्वात यशस्वी ठरलेला उपाय कोणता असेल तर तो म्ह्णजे उपोषण. आणि म्हणुनच देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात याचा खुप मोठा हातभार होता. आजही काही ना काही कारणाने आपल्या अवतीभवती या उपोषणाचे काही प्रकार ऐकायला अथवा बघायला मिळतात.

         असेच एक उपोषण पन्नासच्या दशकात झाले होते. महात्म्याच्या विचारधारेत वाढलेल्या एका व्यक्तीने तब्बल छप्पन दिवस उपोषण केले आणि सत्तावनाव्या दिवशी व्यवस्थेचे लक्ष स्वत:कडे वेधुन घेवु न शकल्याने आपले प्राण गमावले.

          अर्थातच, ज्या मागणीसाठी हे उपोषण घडले ती मागणी या घटनेनंतर चारच दिवसानी पुर्ण केली गेली.

         पण मग हे काय होते? आत्मसमर्पण, आत्महत्या, की हत्या? 

      जीवनकार्य पुर्ण झाल्याच्या भावनेतुन केलेले आत्मसमर्पण की हवं ते घडत नाही म्हणुन आलेल्या निराशेतुन केलेली आत्महत्या?

         की मग व्यवस्थेने दुर्लक्ष करुन घडवुन आणलेली हत्या?

         आणि जर हत्या असेल, तर दोषी शोधुन शिक्षा झाली पाहिजे.

         ती होईल की नाही ठाऊक नाही, पण एक पर्व मात्र निश्चितच संपले होते...

****

     अनेक स्वप्नाळू तरुणांपैकी एक तरुण आणि त्याचा स्वप्नवत वाटावा असा जीवनप्रवास. किंवा एखादी सुंदर तरुणी आणि तिने जीवनातील ध्येयपुर्ती करत करत गाठलेले आपले लक्ष्य. त्या प्रवासात आलेल्या अनंत अडचणी, समाजातील इतर घटकांपासुन किंवा त्या त्या क्षेत्रातील प्रतिष्ठीतांकडुन वेळोवेळी उभे केलेले विरोधाचे डोंगर, टीकेचे अथवा नकाराचे विष, परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेले असताना नियतीशी आणि म्हणुन वाटेवरच्या काही 'मार्गदर्शकांशी' मनाविरुध्द, तत्वाविरुध्द करावे लागलेले सौदे... एक एक करत, अनेक समस्याना तोंड देत, ऐन तीशी-चाळीशीत प्रवास थांबवण्याचा झालेला निर्णय.     

 

एक पर्व मात्र अर्ध्यातच संपले होते...

 

****

 

            आपल्या जीवनप्रवासात अनेक संकटाना, अडचणीना तोंड देत, त्यावर मात करत आपले मार्गक्रमण सुरु असते. नियती घेत असलेल्या परिक्षेत यश मिळाले तर बक्षीस आणि अपयश आले तर शिक्षा, त्या अपयशाची किंमत मोजावी लागते. कायदा बहुधा या तत्वावरच चालत असावा. समजा कायद्याच्या दृष्टीकोनातुन ज्याला गुन्हा म्हणता येईल अशी एखादी कृती केली आणि त्यात यश मिळाले, तर अर्थातच बक्षीस मिळते. पण जर अपयश आले तर शिक्षा मिळते. उदा. एखाद्याने चोरी केल्याचे सिध्द झाले तर त्याला शिक्षा होते, म्हणजेच चोरीचा प्रयत्न अयशस्वी असतो. चोरी यशस्वी असेल तर कधीच सिध्द होणार नाही, आणि मुद्देमालासकट मिळालेला चोरीचा ऐवज ही त्या व्यक्तीची बक्षीशीच.

            याचप्रमाणे, एखाद्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला तर कलम 309 नुसार तो गुन्हा आणि त्याला शिक्षा होणे अपरिहार्य. पण जर तीच कृती यशस्वी झाली तर.... कायमची सुटका...मोक्षप्राप्ती असं म्हणायचं का? आणि अशी घटना घडुन गेल्यानंतर ही आत्महत्या, की आत्मसमर्पण, की हत्या या गोष्टीवर समाजातील इतर घटकांकडुन होणार्‍या उहापोह, चर्चा, कारणमीमांसा मधुन होणारी घटनेची आणि त्या व्यक्तीच्या भुतकाळाची चिरफाडच बघायची का?

      घटना एकच असते, एक जीव गेलेला असतो.

      पण मागाहुन त्याची कारणे शोधणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याचे अर्थ लावणे, त्या व्यक्तीच्या जीवनातील घटनांचा आलेख मांडणे, त्यावरुन त्याचे यशापयश ठरवणे आणि मग आपापल्यापरीने त्या घटनेचे, त्या मरणाचे वर्गीकरण करणे एवढेच कार्य शिल्लक उरते.

            इतरांच्या दृष्टीने जेव्हा मरणारी व्यक्ती यशस्वी असते, तेव्हा ते आत्मसमर्पण ठरते, आणि जर इतरांच्या दृष्टीने अयशस्वी असेल, तर आत्महत्या ठरते. इथे उल्लेख केलेल्या उदाहरणामधील आत्मसमर्पण मानलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुसरी बाजू खरेच किती जणाना खात्रीशीर ठाऊक असावी आणि आत्महत्या मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात निराशाच कारणीभूत होती हे तरी आपण कुठे खात्रीपुर्वक सांगू शकतो आहोत? जे काही असेल ते परिस्थिती बघुन, असलेल्या कमीजास्त माहितीवर आधारीत, काही ठिकाणी नफ्या-तोट्याची गणिते मांडून सांगितलेले, आपले प्रत्येकाचे अंदाज किंवा ठोकताळे.

            पण हेच अंदाज तर एखाद्या सामान्य मृत्यूला, म्हणजेच आत्महत्या नसलेल्या मृत्यूलासुध्दा लागू पडू शकतात. एखाद्याचा झालेला मृत्यू हा परिस्थितीच्या ओझ्याखाली, उपासमारीने, शारिरीक अथवा मानसिक आजारपणाने, अडचणींशी झगडत झगडत, आव्हानांना तोंड देत झालेला असेल तर? याप्रकारात सुध्दा निराशा आपले अस्तित्व दाखवतच असणार. किंवा दुसर्‍या बाजुचा विचार करता, आजाराशी तोंड देताना मनातून असलेली मृत्यूची प्रतिक्षा, आता आणखी काही करण्याची, बघण्याची इच्छा नसणे आणि त्यात मृत्यूचे न येणे, अशा परिस्थितीत आलेला मृत्यू ही पुर्णत्वाची, विजय मिळवल्याची किंवा आत्मसमर्पणाची भावना असू शकते.      

बघणार्‍याला हा आजारपणामुळे, व्याधीमुळे वा अन्य कारणामुळे झालेला सामान्य मृत्यू वाटला तरी त्यामध्ये आत्मसमर्पण किंवा आत्महत्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

            कायद्याने सुध्दा बदल स्विकारुन आता कलम 309 मध्ये काही बाबींचा अंतर्भाव केला आहे. असा एखादा आत्महत्येचा (अयशस्वी ) प्रयत्न आता फौजदारी गुन्हा समजला जाणार नाही, तर त्याऐवजी व्यक्तीच्या त्यावेळच्या मानसिकतेचा सहानुभुतीपुर्वक विचार करायचा आणि त्याने निराशाजनक परिस्थितीतुन हे पाऊल उचलले असण्याची शक्यता गृहीत धरायची. असे करताना त्याच्या पुनर्वसनासाठी लागणारी सर्वतोपरी मदत व्यवस्थेने पुरवायची, असे आता हा कायदा सांगतो.

            हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. पण यात फक्त अयशस्वी प्रयत्नांचा विचार केला आहे आणि उपाय सुचवला आहे, जे निश्चितच गरजेचे आहे. पण अशा अयशस्वी प्रयत्नानंतर ती व्यक्ती जिवंत असणे आणि त्याचे पुनर्वसन होणे जितके महत्वाचे, त्याहुन, आत्महत्येच्या यशस्वी प्रयोगानंतर मागे उरलेल्यांचे पुनर्वसन करणे, त्याना आधार देणे अधिक गांभीर्याचे आणि महत्वाचे मानले पाहिजे. एवढे करुनही कायदा फक्त आत्महत्या ही एकच शक्यता विचारात घेतो, त्यात आत्मसमर्पण ही भावनाच विचारात घेत नाही. याचा दुसरा अर्थ, माणसाने आपल्या जीवनात 'पुर्णत्व' कधी मानायचे आणि 'कधी थांबायचे' हे कायदाच ठरवणार, असा घ्यायचा का? की आत्मसमर्पण ही भावनाच कायदा मानत नाही असे म्हणायचे?

जर हे मान्य करायचे झाले, तर, सगळ्यांच्याच आयुष्यात शेवटापर्यंत अपुर्णत्वच असते असे कायदा मानतो, असे समजावे लागेल. आणि म्हणुन प्रत्येकाला आपले मन:स्वास्थ्य सांभाळत 'मानसिक पुर्णत्वासाठी' प्रयत्न करत रहावे लागतील.

 

        या वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने केलेल्या सगळ्या उहापोहानंतर आणि विचारमंथनानंतर मला तरी इतकेच जाणवते की...

 

Ø   'कुठे थांबायचे' हा ज्याचा त्याचा स्वतंत्र निर्णय असतो. तो प्रत्येकजण आपापल्या विचारानुसार, तत्वानुसार घेतच असतो. त्यामुळे कुणी रौप्यमहोत्सवा नंतर किंवा कुणी सहस्रचंद्रदर्शना नंतर, त्यांच्या दृष्टीने तो योग्य निर्णय असतो.

Ø   जीवनात सर्वाना सर्व वेळी सर्व काही मिळाले असे कधीच घडत नसते, उद्दीष्टांशी काही अंशी तडजोड ही होतच असते. कधी ती फार लवकर होते, कधी उशीरा होते.
 
 
Ø   कितीही वर्गवार्‍या केल्या, तरी एक पर्व संपलेले असते... एक जीव संपलेला असतो... कधीही परत न येण्यासाठी.
 

© प्रविण धुरी

26 जुन 2020


Comments