हुडा - एक साहसी खेळ
आधीच स्पष्ट करतो की हा हुडा
हरियाणातील नसून आपल्या सिंधुदुर्गातील कुणकेरी गावचा आहे. लहानपणी कधीतरी हा हुडा तसेच नेरुरपारची
रथयात्रा बघण्याचा योग आला होता, पण तेव्हा
चिकित्सा म्हणजे काय ते ठाऊक नव्हतं. आज मागे वळुन बघताना त्यावर
विचार करावासा वाटला म्हणुन हा लेखनप्रपंच.
हुड्याची प्रथा या गावात एक परंपरा म्हणुन भक्तीभावाने आजही सुरु आहे. पण काहींच्या मते त्यातुन म्हणे अंधश्रध्दा पसरतात म्हणुन असे प्रकार त्वरीत बंद केले पाहिजेत. मला वाटतं हे असं मत मांडताना श्रद्धा-अंधश्रद्धा या एकाच दृष्टीकोनातून विचार केला जातो आणि त्याची नीटशी चिकित्सा केली जात नाही. कोणत्याही जुन्या प्रथेकडे श्रद्धा-अंधश्रद्धा याच्याहीपुढे जाऊन बघण्याची आणि उगम शोधून चिकित्सा करण्याची गरज असते. अन्यथा ती वरवरची मलमपट्टी ठरू शकते.
हुडा कसा साजरा करतात? हा होळीचाच एक प्रकार असतो, ज्यात एक मोठा, लांबच लांब लाकडी ओंडका एका ठिकाणी उभा केलेला असतो. त्याला संपुर्ण पानाफुलानी सजवलेले असते. प्रत्यक्ष कार्यक्रम सुरु होतो तेव्हा ढोलाच्या गजरात गावातील काही मंडळी त्या हुड्याच्या वरच्या टोकावर जाण्यासाठी सुरुवात करतात. त्यांच्यात एक प्रकारची चढाओढ लागलेली असते. जेव्हा ही मंडळी वर पोचतात, त्यानंतर खाली उभी असलेली इतर जनता, प्रेक्षक, गावकरी या वर चढलेल्या मंडळीवर दगड फेकायला सुरुवात करतात. गावकर्यांची अशी धारणा आहे की वर असलेल्या मंडळीना दगड लागत नाहीत यात देवाचा आशीर्वाद, कृपा असते. नंतर हे सर्व लोक खाली उतरुन जवळच्याच ग्रामदैवतेच्या मंदिरात जातात आणि आशीर्वाद घेऊन प्रसाद भक्षण करतात.
मला वाटतं, इतर अनेक भारतीय प्रथाप्रमाणेच ही प्रथासुध्दा जेव्हा कधी सुरू झाली आणि त्या त्या गावचे रहिवासी त्यात सहभागी होऊ लागले, तेव्हा कदाचित त्यांना 'विज्ञान' या शब्दाचा अर्थ माहीत नसावा.
पण काही शहाण्यांचा
या सर्वामध्ये अंधश्रध्दा शोधण्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यासाठी ही मंडळी विज्ञानाचा
आधार घेत यातील अनेक गोष्टींचे पृथ:करण करतात, जसे की त्या लाकडी
खांबाची उंची इतकी जास्त असते, म्हणजे जवळपास साठ
सत्तर फुट, की त्यावर साधारणशा माणसाचा
दगड पोचणारच नाही. दुसरा मुद्दा सांगितला जातो की वर चढणारे जेव्हा एका ठराविक उंचीच्या
पलीकडे गेले की त्यानंतरच दगड फेकायला परवानगी असते. ज्यामुळे सुध्दा दगड वरच्या माणसाना
लागत नाहीत, नव्हे तिथपर्यंत पोचतच नाहीत.
वर चढण्यासाठी त्या खांबाला पायर्यासदृश्य रचना केलेली असते. इत्यादी इत्यादी...
आपण त्या सगळ्याचा
विचार न करता मुख्यत्वे आपल्या खेळाचा विचार करु.
हो, एक साहसी खेळ या स्वरूपात या हुड्याची सुरुवात होऊन पुढे सहभाग वाढवण्यासाठी किंवा गैरवापर, गैरप्रकार टाळण्यासाठी त्याला देवाची सांगड घातली गेली असावी अशी शक्यता असू शकते. म्हणजे निदान आज तसा विचार करायला काहीच हरकत नसावी.
या हुड्याची उंची, पायऱ्यांसदृश्य रचना, वर चढणारी माणसे, त्यांची क्षमता, वाजणारे ढोल, दगड मारण्याची पद्धत या सगळ्याचा एकत्र विचार करता, काही मुद्दे वेगळ्या प्रकारे मांडावेसे वाटतात.
१. एवढ्या उंचीवरच्या लक्ष्यापर्यंत पोचणे तसे कठीण आणि साहसाचे काम, त्यामुळे मला तरी हा साहसी खेळच जास्त वाटतो.
२. खेळ म्हटला की पारितोषिक आले, आणि पुर्वीच्या काळी ते भविष्यासाठी 'देवाची कृपा' किंवा भूतकाळातील दुष्कर्माची सजा या सदराखाली असावे.
३. यात एक प्रबोधनाचा भाग सुध्दा आहे.
'लक्ष्य कितीही कठीण असले तरीही सरावाने आणि प्रयत्नाने ते साध्य करता येते.'
४. दगड मारणे यातही असाच काहीसा भाग मला दिसतो.-
'आपल्या लक्ष्याकडे, ध्येयाकडे पोचण्याचा प्रयत्न करत रहा, खाली उभे असलेले लोक कितीही दगड मारू देत, आपले प्रयत्न सोडू नका, खाली न बघता नजर आपल्या लक्ष्यावर ठेवा.'
५. तुम्ही ध्येय साध्य केल्यावर तुमच्यासाठी ढोल वाजतील तर तुमच्या दिशेने काही टीकेचे दगडसुद्धा येतील. विचलित होऊ नका आणि आपल्या विजयाचा काही क्षण आनंद घ्या. जास्त काळ आकाशात/उंचावर राहू नका, तिथे तुम्ही एकटेच असता. त्यानंतर पुन्हा जमिनीवर या, देव आणि त्याचे पारितोषिक तिथेच सर्वांच्या सोबतच मिळणार आहे.
६. ध्येय गाठण्यासाठी वयाची अट नसते. सातत्य आणि प्रयत्न यातूनच ते साध्य करता येते.
कदाचित हे सगळं असं आणि इतक्या वैज्ञानिक पध्दतीने सांगणे तेव्हा जमत नसावे, म्हणून अशा प्रकारचे खेळ रचले गेले असावेत. शिमगोत्सवात विविध प्रांतात रचले जाणारे असे कलाप्रकार हा असाच कलागुणांना वाव देणारा, करमणुकीतून प्रबोधन करणारा, आनंद देणारा प्रकार असावा, ज्या पुढे चालीरीती, प्रथा-परंपरा बनून गेल्या.
रथ ओढणे यातही सामूहिक ताकद, एकीचे बळ दाखवण्याची योजना असावी, ज्यात देव आणून बसवल्याने त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण (इम्प्लेमेन्टेशन) सोपे झाले.
पुढे पुढे आपण यातले फक्त देव लक्षात ठेवले आणि मुळ उद्देश विसरत गेलो. ज्याचे पुढे अधिक व्यापारीकरण होत गेले, आणि संधीचे मार्केटिंग होऊन त्यातून अंधानुकरण वाढत गेले.
आताच्या नव्या
पद्धतीनुसार, नव्या वैज्ञानिक
दृष्टिकोनीय चिकित्सेनुसार बहुतेक वेळा या सर्व प्रथांचे स्पष्टीकरण हे
श्रद्धा-अंधश्रद्देच्या मोजपट्टीवर केले जाते आणि म्हणून येणारे उत्तरही त्या चौकटीतुन तितकेच मर्यादित येते. त्याचा सर्वांग विचार होतच नाही. त्याऐवजी हे सगळं कसं जुनाट
आणि चुकीचं आहे हे सांगण्याकडेच सगळा कल दिसुन येतो.
आइन्स्टाइन म्हणतो त्याप्रमाणे शिक्षण हे खरं-खोटं शोधण्यापेक्षा विचार उद्युक्त करणार असलं पाहिजे, आणि एकदा विचार करायचा असं ठरलं तर या दोन शक्यतांच्या पलीकडे अधिक खोलात जाऊन विचार करण्याने कदाचित अधिक समर्पक, अधिक जवळची उत्तरे मिळवण्यात खरे विज्ञान दडले असावे.
तसंही, हीसुद्धा विज्ञानावरची एक श्रध्दाच, ते अंतिम सत्य नव्हे.
त्यामुळे आपल्याला हुड्यावर नाही चढता आले तरी त्यातून शिकण्यासारखे खूप आहे, आणि जर खाली दगड फेकणार्यांच्या गर्दीत उभे असला तरी निराश होऊ नका,
कारण, कुणीतरी म्हटलं आहेच,,,
कौन कहता है आसमां में छेद नहीं होता,
एक पथ्थर तो तबियत से उछालो यारो !
प्रविण धुरी
१६/०३/२०२०








Comments
Post a Comment