डियर डायरी,
आज मी तुझा निरोप घेते आहे. माझ्या आयुष्यातील तुझं स्थान खूपच महत्वाचं आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळचं असेल. पण आता काही काळापुरता मी तुझा निरोप घेणार आहे.
गेले वीस दिवस मला तुझी खूप चांगली सोबत मिळाली. मला हा एकटेपणा खायला यायचा तेव्हा तुझाच आधार होता. तू होतीस म्हणून मी हे सगळं सहन करू शकले. तुझ्याशी हे सगळं शेअर करून मला खूप बरं वाटायचं.
तुला आठवतं,,,
त्यादिवशी काकांच्या निघून जाण्याने आधीच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आई पपा तर एकदम हादरून गेले होते. पपांची अवस्था बघून तर मलाच कसंसं व्हायचं. पण कुणाकडे आणि काय बोलायचं हेच समजत नव्हतं.
आणि त्यानंतर पप्पांना ताप आला, मग आईला, ताईला सगळ्यांनाच लक्षणं दिसू लागली तेव्हा तर खूपच भीती वाटू लागली होती.
दोन दिवसांनी जेव्हा पप्पा आम्हा सगळ्यांना घेऊन टेस्ट करायला गेले, तेव्हा आतून खूप रडू येत होतं. सारखी भीती वाटत होती, गेले महिनाभर टीव्हीवरच्या बातम्यांनी अधिकच घाबरायला झालं होतं.
आमचं पुढे काय होणार असेच विचार मनात यायचे. ताईशी बोलायचे पण तिच्याकडे तरी कुठून असणार होती उत्तर?
माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला तेव्हा थोडं बरं वाटलं, पण बाकीच्यांचे रिपोर्ट यायचे होते.
आणि जेव्हा आले, ते बघून तर आम्ही सगळेच हादरलो. पप्पा सगळ्या हॉस्पिटलना फोन करत होते. मला तर काहीच सुचत नव्हतं. तिघांना आता काय करणार, कुठे नेणार, कसली औषध देणार,,, अनेक प्रश्न डोक्यात उड्या मारत असायचे.
सकाळी ऍम्ब्युलन्स येऊन तिघांना घेऊन गेली, खूप प्रयत्नाने मी स्वतःला आवरलं. त्यांनी माझी काळजी करू नये म्हणून मी गप्प होती, त्यांनाच धीर देत होती.
पण मी आतून किती घाबरली होती, माझं तेव्हा काय झालं होतं हे फक्त तुला माहिती आहे.
एकटीला ते घर खायला उठत होतं, मनात नको नको ते विचार येत होते. मी यापूर्वी सुध्दा एकटी राहिली होती, पण ही वेळ वेगळीच होती. कसंबसं सगळं आवरून घेतलं, कुणाशी तरी बोलावं असं सारखं वाटत होतं, पण कुणाशी बोलणार, हे सगळं कुणाला सांगणार,,, ते समजून घेतील का असे विचार मनात यायचे.
त्यातच आमची बिल्डिंग सील करताच कुणी बाहेरून यायचा प्रश्नच मिटला होता.
दुपारी शेजारच्या काकीनी जेवण दिलं आणि थोडा वेळ बोलल्या, तेव्हा थोडा धीर आला. त्यांनीच सांगितलं की दोन्ही वेळचं जेवण त्या देतील आणून, मला काही करायची आवश्यकता नाही.
पण जेवावसचं वाटत नव्हतं. त्या तिघांच तिकडे काय झालं असेल, या विचारानेच अस्वस्थ वाटायचं.
खाऊन घेतलं आणि मनात ठरवलं, धीर धरायचा, सगळं ठीक होणार... पण आपण घट्ट राहील पाहिजे, त्यासाठी हे मनातलं कुणाला तरी सांगितलं पाहिजे, म्हणून तुझ्याशी दोस्ती केली.
आणि तू सुध्दा चांगल्या जिवाभावाच्या मैत्रिणीसारखी माझ्या सोबत राहिलीस.
एक एक दिवस सरत नव्हता. तिघांचीही काळजी वाटायची. फोनवर बोलायला मिळायचं, तेव्हा सांगायचे की ते ठीक आहेत, बरे आहेत, काही त्रास नाही आहे,,, पण ते लोकं सांगतात ते कितपत खरं असणार ही शंका मनात यायचीच. टीव्हीवर रोज रोज त्याच प्रकारच्या बातम्या आणि हॉस्पिटलमध्ये होत असलेले पेशंटचे हाल बघितले की जास्तच भीती वाटायची,, मी टीव्ही बघायचा बंदच करून टाकला.
मोबाईलवर, नेटवर वेळ घालवायची पण किती वेळ तेचतेच ... कंटाळा यायचा. बाहेर कुठे जायची सोय नव्हती, संध्याकाळ झाली की लाईट चालू करायचे ते सकाळपर्यंत... तेवढाच आधार वाटायचा.
दहा दिवस कसे काढले हे फक्त तुला माहिती आहे. कारण मीसुध्दा त्यांना त्रास होऊ नये म्हणून, खरं नाही सांगायची. काकीनी दिलेलं जेवण आणि मी बनवलेला चहा हे मात्र आवर्जून सांगायची. तेवढंच आईला बरं वाटायचं.
पपानी जेव्हा सांगितलं की उद्या ते लोक घरी येणार आहेत, तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला होता. आधीच्या दहा रात्री मी काळजीने झोपत नव्हते, पहाटेला कधी तरी माझा डोळा लागायचा, मध्येच रडू यायचं... पण त्या रात्री मला आनंदाने झोप येत नव्हती, उद्या सगळेजण पुन्हा घरी येणार या बातमीसारखी दुसरी कुठलीच आनंदाची गोष्ट नव्हती.
मी खरंतर त्याच वेळी तुझा निरोप घ्यायचा ठरवलं होतं, पण माझा दुसऱ्या दिवशीचा आनंदही तुला सांगावा म्हणून एक दिवस वाढवला.
पण जेव्हा दुसऱ्या दिवशी आईने सांगितलं की अजून दहा दिवस मला एकटं राहायचं आहे, तेव्हा मात्र माझं सगळं धैर्य संपलं,,, इतके दिवस खूप प्रयत्नानी बांधून ठेवलेला बांध फुटला आणि मी अक्षरशः ऑक्साबोक्शी रडले, वाटत होतं, आईच्या कुशीत शिरावं,,,, पप्पानी मला जवळ घ्यावं,, ताईच्या मिठीत शिरून तिला सगळं सांगावं,,, पण असं काहीच झालं नाही...
त्यानंतर मी पुन्हा एकदा एकटी, तुझ्या सोबतीत, घरात आम्ही सगळे होतो, आता पूर्वीसारखी शांतता नव्हती, आवाज होते, पण त्यात मी नव्हते. त्यांचं अवतीभवती असणं सुध्दा खूप मोठा आधार वाटत होता, आता झोपताना लाईट सुरू ठेवायची गरज नव्हती. घरात जेवण बनत होतं, तरीही काकीनी मात्र पुढचे दहा दिवस जेवण देणं सुरूच ठेवलं.
कारण आता मी क्वारंटाईन होते.
आईचा पाय बघितला, तिला झालेली जखम बघितली, पण मी काहीच करू शकत नव्हती. सगळं काही ताईच करायची.
एक तर आमच्यात ती मोठी, म्हणजे, माझ्यापेक्षा तिलाच आई-पप्पा जास्त वेळ मिळालेत आणि आता सुध्दा बघ ना कसं ते...
पण मला माहित होतं,, ही परीक्षेची वेळ आहे, आणखी काही दिवस असेच काढायला लागणार आहेत.
तोपर्यंत, तू आणि मी; आपली भन्नाट जोडी जमली आहे.
पण आज हा शेवटचा दिवस...
आज जेव्हा माझं क्वांरंटाईन संपलं तेव्हा मी तिघांनाही मनापासून, अगदी कडकडून भेटली. गेल्या वीस बावीस दिवसातली सगळी कसर भरून काढली.
खूप बोललो आम्ही,,
आता तिघंही बरे आहेत, बिल्डिंगवरचा बॅनर सुध्दा काढला गेलाय, पपा घरूनच काम करणार आहेत, आई मात्र जाणार आहे ऑफिसला, ताई सुध्दा तिचं काम सुरू करेल.
तिकडची परिस्थिती कशी होती हे अजून नाही सांगितल त्यांनी, तरी एक ना एक दिवस मला ते कळणार आहेच.
मग मी येईनच परत तुझ्याशी बोलायला.
तोपर्यंत, तुझा निरोप घेते...
तुझीच
सखी.

खूप सुंदर लिखाण..
ReplyDelete