मुलं ही देवघरची फुलं

 Are Children in India More Tolerant Than Their Parents?


मुलं ही देवघरची फुलं

खूप वेगळा आणि तितकाच सेन्सिटिव्ह विषय आहे हा. प्रत्येकाची अशा विषयांकडे बघण्याची दृष्टी आणि त्याबद्दलची जाणीव वेगवेगळी असणार आणि त्यावर अवलंबून येणाऱ्या प्रतिक्रियासुध्दा

यासाठी मुळातुनच विचार केला तर,,,

(हे विचार म्हणजे काही अंतिम सत्य नाही, या सर्वाला सन्माननीय अपवाद असणारच, आणि त्यामुळेच मेजॉरीटीचा असा विचार करणं शक्य होतं)

 

मुलं होण्याविषयी आपल्या कडे अगदी टोकाचे मतप्रवाह असतात,

एका टोकाला 'मुलं ही देवघरची फुलं'

तर दुसरीकडे 'इतक्यात? अजून पाच वर्ष तरी नको'

यामध्येच कुठेतरी आणखी दोन गट येतात.

एकीकडे काही ना काही कारणाने उमलण्या-पूर्वीच अवेळी खुडली जाणारी कळी 

तर

दुसरीकडे मंदिर, बाबा,  महाराज असं वाट चालत चालत दूरवर पंचेचाळिशी कडे पोचलेली जोडपी.

 

देवाघरची फुलं असं म्हणून चुकीच्या परंपरा/रितिभाती, किंवा परिस्थितीमुळे आलेली असहायता, कदाचित आणखी दोन कमावणारे हात येतील अशी आशा, किंवा अज्ञाना मुळे,  वा दारिद्रयामुळे नकार देण्याची क्षमता नसल्याने, कुणा एकाच्या हट्टापायी ओटीत येणार दान फक्त रस्त्यावरील गर्दी वाढवण्याचं काम करत असते. 

मग हाती उरतं काय! तर त्याच हाताना आल्यागेल्या समोर पसरवत वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी उरणारी लाचारी, अवेळी हरवणार बाल्य.

आता यात चूक कुणाची?

 

याच्या उलट दुसरी बाजू,,,

अनेक उपासतापास, बुवा-बाबा, देव-देवता, त्या सर्वांची वेगवेगळी साधना आणि कायकाय,,, 

थोडा समजूतदारपणा असेल तर यासोबतच वेगवेगळे डॉक्टर्स, वैद्य, यांच्याकडे चेकप्स आणि औषध.

इतकं सगळं करताना कौटुंबिक दबावापायी किंवा आपलंच वंशफुल असावं अशा हट्टापायी वाट बघण्यात पंचेचाळिशी येते. शेवटी सल्ला मान्य करत दत्तक घेण्याचं ठरतं, पण सारे सोपस्कार पूर्ण करेस्तोवर अजून दीड दोन वर्षे जातात, मग लक्षात येते दोघांच्या वयामध्ये येणार अंतर अन भविष्यात दिसणारी जनरेशन गॅप. दोघांमध्ये किती वयाचा पाहुणा घरी आणावा यावर एकमत न झाल्यास निर्णय बारगळतो अन एका बालकाचा भविष्यकाळ उज्वल होताहोता राहून जातो.

यात चूक कुणाची?

 

पूर्णपणे फुलू न देता, अवेळी खुडली जाणारी कळी हा असाच एक अभागी जीव. वंशवृद्धीसाठीच्या पारंपरिक चुकीच्या कल्पना किंवा कौटुंबिक अवास्तव अपेक्षा यातूनच त्या घराच्या हट्टापायी एक कळी उमलण्यापूर्वीच संपवली जाते. एकीकडे पुरेसं खतपाणी आणि मशागत करूनही परसातल्या मोगऱ्याला कळ्या येत नसल्याने सतत खंतावलेले चेहरे, तर दुसरीकडे, येणार फुल हे लाल गुलाबाचंच हवं यासाठी सतत लाल रंग उधळणारे काही चेहरे.

 

या कळीला वेळीच उमलू दिलं नाही, तर चूक कुणाची?

 

या सर्वांत 'पाच वर्षे नको' असं म्हणून नियोजन पद्धतीने जन्माला येणारं मुलं मात्र काही अंशी नशिबवान. योग्य वेळी लग्नाचा निर्णय घेतला गेला आणि  नियोजनाने मूल जन्माला घातलं तर निदान त्याचं नीट संगोपन होऊन समाजात काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता वाढते. पण यांच्याही समस्या असतातच.

 

एक किंवा दोन, बहुतेक वेळा एकच, त्यात पाळणाघर किंवा तत्सम रचनेत होणारी वाढ, पुरेसा वेळ देता येत नाही ही उणीव भरून काढण्यासाठी वेळोवेळी पुरवले जाणारे हट्ट, या सगळ्यातून घडणार बाळ हे अकाली प्रौढ होण्याची शक्यता जास्त. नात्यांची न उसवलेली जाण, एकलकोंडेपणा, काही वेळा वाढलेला हट्टीपणा, तडजोड म्हणजे काय, आदर-अनादर, अभिमान अन स्वाभिमान यातील अंतर म्हणजे काय, असं बरंच काही त्या इवल्याशा जीवाला वेढुन टाकतं.

यातून घडणार व्यक्तीमत्व मोठ झाल्यावर परदेशी स्थायिक होण्याकडेच कलतं.

 

यात चूक कुणाची?

 

अजाणत्या वयात कमाई करण्यासाठी वापरले जाणारे हात जितके दुर्दैवी, तितकेच कमाईच्या वयात हात आखडता घेऊन, जबाबदारी टाळून, दूर निघून जाणंही पालकांसाठी अभागी असण्याचंच लक्षण.

जर समाजाचे हे सारेच घटक एकाच पातळीवर आले तर?

एकमेकांच्या गरजा समजून वागले तर?

 

बदल हा जगाचा स्थायीभाव आणि आशेवरच जग चालतं हे जर मान्य केलं, 

तर...

IVF हॉस्पिटलमधील वाढणारी गर्दी,

अनाथ जीवांबद्दल वाढणारी आपुलकीची भावना

दत्तकविधाना संबंधी दिसणारी जागरूकता आणि त्यात होणारी वाढ,

आणि यासोबत कमी होणारी सरकारी अनास्था

अशी सगळी बदलणारी परिस्थिती

भविष्यकाळाच्या उदरात दडलेल्या एका उज्वल पहाटेची आस मनात उत्पन्न केल्याशिवाय रहात नाही.

 

आज चूका होत असतीलही, पण भविष्य निश्चितच उज्वल आहे.

 

Grandfather in UP teaches 'A' for alcohol, 'B' for beedi | The ...

Comments