सुदैवी आपण
मधली सुट्टी वा सुटलेली शाळा,
ऑफ पिरियड आला की मैदानात पळा,
फुटलेले ढोपर कधी खरचटले कोपर,
दिमतीला आयोडीन, पण काढला नाही गळा.
खोखोचा पोल, कधी हुतुतु कबड्डी,
व्हॉलीबॉलचा स्मॅश, कधी एका पायाची लंगडी,
कॅरम बॅटमिंटन आणि क्रिकेटचा स्कोर,
खेळ सगळे खेळलो पण अभ्यासात जोर,
शरीर सगळं हालायचं धावायचं, पडायचं,
जेवलेलं सगळं आपसूक जिरायचं,
आता उरलं काम अंगठ्याला सारं
मानेला डोकं बघा वाटतंय भार,
पोटऱ्या न जांघाचा तर करु नका विचार
चष्म्याखालाचे डोळे सोसती ड्रायनेसचा मार,
म्हणून म्हणतो ...
म्हणून म्हणतो आपण सारे सुदैवी होतो,
मोबाईल नव्हता आपल्यावेळी, आपणच मोबाईल होतो.
~
प्रविण धुरी






Comments
Post a Comment