संध्याकाळ




ती

शाळेत खेळताना जेव्हा पाहिलं तुला

तू समोर उभी, मागे मोती तलाव ओला, 

मातेरी रंगाने फ्रॉक निळा मळलेला,

मैत्रिणीसोबत तू पटकन पोबारा केला,

 

अवचित एकदा त्या दिवशी परत,

आकाशात ढगांचा वर्ग होता भरत,

शिकवणीवरुन येताना होईल सोबत,

बोलावं तुझ्याशी मनातलं भांडत, 

म्हणून पळत येऊन प्रयत्न केला,

तर मैत्रिणीसोबत तू पोबारा केला.

            

त्यानंतर एकदम कॉलेजात दिसलीस, 

गुलाबी रंगात वयात होती आलीस,

तलावा काठी जेव्हा थोडी विसावलीस,

नारिंगी ड्रेसमध्ये जणू अप्सरा भासलीस,

निळ्या ओढणीने पण घात माझा केला,

पुन्हा रजनीसोबत तू पोबारा केला.

 

महिने वर्षे मध्ये निघुन किती गेली,

कर्तव्ये फेडताना रयाच ना उरली,

पोटामागे फिरता जेव्हा हळुच ओझरली

प्लॅट्फॉर्म मैदाने तुला रस्ताभर शोधली.

परत एकदा माझा पचका केला गेला,

पुन्हा यामिनीसोबत तू पोबारा केला.

 

असाच एक दिवस उतरलो गावात,

मंद मृदगंध भरुन घेतला मनात,

स्टेशन सारे मुग्ध तुझ्याच रंगात,

भास मला होता की मीच स्वप्नात,

पुसायचं तुला म्हणून हात पुढे केला,

पुन्हा निशेसोबत तू पोबारा केला.


निवृत्तीनंतर आता साठी झाली पार,

माझ्यापाशी आहे बघ माझी जोडीदार,

हिशेब सारे पुरे करू प्रश्नच उरले फार,

तिघे बसु संगतीने बोलु एकवार.

मी, तू आणि माझी संध्याकाळ,

मी, तू आणि माझी संध्याकाळ.




Comments