एक विकेंड मैत्रीसाठी

 

Shegaon Gajanan Maharaj Mandir

एक विकेंड मैत्रीसाठी

 

तीन महिने आधी तिकिटे काढली होती, तरीही येतानाची अगदी आधल्या दिवसापर्यंत प्रतीक्षा यादीतच. तरीही मनाची तयारी करून गेलोच सगळे,,, गुरुवारी संध्याकाळी सुरू केलेला प्रवास शुक्रवारी पहाटे संपला अन देवदर्शन वगैरे करून...

अरे विसरलोच, सुरुवातीपासून सुरुवात करायला हवी, नाहीतर तुम्हांला संदर्भच नाही लागायचा, आणि मग शीर्षकाचा आणि आतील घटनांचा सूर जुळवता जुळवता, तारच तुटायची.

त्याचं असं झालं,,, 

शुक्रवारची महाशिवरात्रीची सुट्टी जोडून आल्याने शनिवार - रविवार आम्ही कुटुंबीय तीन दिवसीय बेत बनवून शेगांवला जाऊन आलो. आणि मुख्य कार्यभाग उरकल्यावर तिथून ऐंशी मैलावर असलेले लोणार सरोवर सुध्दा पाहून आलो. या दोन दिवसांच्या छोटेखानी सहलीत दोन गोष्टी घडल्या... मैत्रीचे महत्व सांगणाऱ्या.

जातेवेळी प्रवासातच आमची ओळख एका दहा जणांच्या गृपबरोबर झाली. हे सगळेजण विविध नोकऱ्यांमधून निवृत्त झालेली मंडळी होती. कुणी एमटीएनएल, कुणी एमएसइबी, कुणी ब्रिटानीया तर कुणी आणखी कुठे,,, तसेच सगळे मुंबईतून जाणारे असले तरी त्यांची वास्तव्याची ठिकाणे वेगवेगळी होती.

साठीच्या घरातली ही सगळी मंडळी आमचा उत्साह निश्चितच वाढवणारी ठरली. ओळखी झाल्या, ओळखी निघाल्या, अन मैत्री झाली. 

Anand Vihar Bhaktniwas, Shegaon. walk-tour - YouTube 

शेगावला पोचल्यानंतर राहण्याची व्यवस्था, चहापान, दर्शनासाठीची सोबत, रांगेतलं ताटकळणं, जेवणाची पंगत अशा विविध प्रसंग आणि कारणातून एकमेकांविषयी अधिक समजलं, अन नातं अधिक जवळकीचं अन विश्वासाचं होत होत दृढ बनत गेलं. दुसऱ्या दिवशीचा त्यांच्या प्रवासाचा बेत ठरवताना आणि त्यासाठी वाहन ठरवताना त्यात आम्हां मंडळींचा थोडासा हातभार लागला. दुसऱ्या दिवशी त्यांच्यातील काही मंडळी माहुरगड भेटीसाठी रवाना झाली.

आणि आम्ही निसर्गाची किमया असणारं आणि सोबत अनेक कथा वाहणारं लोणार सरोवर बघण्याच्या मोहिमेवर निघालो.

इथे दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीची दखल घेणं भाग पडतं. आमच्या या सहलीत जशी ही एक मैत्री अनुभवता आली, तशीच आणखी एक मैत्री फार जवळून बघता आली,,, त्याचा साक्षीदार होता आलं.

शेगांवमध्ये दर्शन घेऊन बाहेर येईतो आमची भेट झाली मामा-भाच्याच्या जोडीशी. हे दोघेही आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेत एका तीस वर्षांपूर्वीच्या मैत्रीमुळे. त्यातल्या मामाची बहीण आणि माझी बहीण यांची अनोखी मैत्री,,, ज्याकाळात फक्त पत्र हे एकच माध्यम होतं आणि पोस्टमन हा एकच दुवा होता, त्या काळापासून जुळलेली, जपलेली मैत्री. त्यातल्या एकीचा मुलगा आपल्या आईच्या सांगण्यावरून स्वतःची गाडी घेऊन त्या कधीही न बघितलेल्या मावशीच्या अन आमच्या दिमतीस हजर होता. पहिल्या संध्याकाळी त्याने आम्हाला नांदुरा इथलं मंदिर दाखवलं तर दुसऱ्या दिवशी लोणार सफर घडवून आणली.

उल्का पिंड के टकराने से बनी थी ये झील ...

हो, आणि माहुरगड साठी गाडीसुध्दा याच्याच मित्राची ठरवली.

लोणार आणि सोबतच चालुक्यकालीन काही मंदिरांची भेट झाल्यावर अर्थातच आम्ही सगळे त्याच्या घरी पोचलो, शिरपुरला. तिथली दोन मैत्रिणींची भेट आणि तिचे पती व मोठा मुलगा यांचं आदरातिथ्य, त्यांचा मनमिळावू बोलका स्वभाव, जुन्या पुराण्या आठवणी, गप्पागोष्टी आणि बासुंदीचा बेत... यात संध्याकाळी निघायला थोडा उशिरच झाला. पण पुन्हा एकदा भाच्यानेच सही सलामत आणि वेळेत आम्हाला स्टेशनवर आणून सोडलं.


खरंतर, एवढी गोड माणसे होती ती,, त्यांच्या आपुलकीने मनात एकच रुखरुख लागून राहिली की इथे या सर्वांसोबत आणखी काही काळ मिळायला हवा होता.

आम्ही सगळे, विशेषतः माझी बहिण आणि आई घरी परतलो तेच मुळी एकदम ताजेतवाने होऊन आणि मला खात्री आहे यात त्या सदाबहार मैत्रीच्या नात्यांचा नक्कीच महत्वाचा वाटा आहे.

परतीच्या प्रवासात आमच्या सर्वांच्या सीट्स वेगवेगळ्या डब्यात आल्या आणि तरीही आम्ही सगळे न कंटाळता प्रवास पूर्ण करून घरी आलो, मला वाटतं याचं बरचसं श्रेय त्या अठ्ठेचाळीस तासातल्या क्षणांना जातं.

आयुष्यात जुळणारी मैत्रीची नाती जपली पाहिजेत, जोपासली पाहिजेत,,,, कदाचित आयुष्याच्या संध्याकाळी तीच जास्त उपयोगी पडतील.

गेल्या दोन दिवसात हीच गोष्ट मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली.

File:072-face-with-head-bandage.svg - Wikimedia Commons आमच्याच एका मित्राचा गेल्या आठवड्यात छोटासा अपघात झाला,,, छोटासा म्हटलं तरी अपघातात मार त्याच्या डोक्याला लागला आणि दोन ठिकाणी टाके घालावे लागलेत. त्याच्या कुटुंबियांनी सगळी धावपळ केली, योग्य ते उपचार मिळाले आणि आता तो बरा होतोय. पण यात एकच वाईट गोष्ट घडली ती म्हणजे ही बातमी मित्र म्हणवणाऱ्या आम्हांला इतक्या उशिरा समजली. फेसबुक, व्हॉटसएपने आम्हाला पुन्हा एकदा जवळ तर आणलं आहे पण आम्ही खरंच जवळ आलोय का?

की फक्त या आभासी दुनियेत जवळ आलोय?

की मित्र म्हणून फक्त गृपवर गप्पा करणे, वादविवाद करणे, आणि 'मेसेज आला म्हणजे अजुन आहे' असं गृहीत धरणे इतक्या पुरतेच आपण या सगळ्याचा उपयोग करतोय?

या वेगवेगळ्या तीन प्रसंगातून मला मात्र एका गोष्टीची प्रकर्षांने जाणीव झाली आहे.

जशी मैत्री जमवता येते तशी ती जोपासता आणि वाढवता आली पाहिजे. ती आपल्यापर्यंत न ठेवता त्यात आपल्या कुटुंबियांना सामील करून घेतलं पाहिजे. त्या मैत्रीच्या कक्षा वाढवत ठेवल्या पाहिजेत.

प्रत्येकाचं स्वतःच असं एक मैत्रीचं, नात्याचं वर्तुळ असतं,,, ते असावं,,, प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वभावानुसार, आवडीनुसार त्यांची त्यांची वर्तुळ असावीत. पण यातली काही वर्तुळं एकमेकांत गुंतली तर आपल्या भोवतीचा तो गुंता अधिक घट्ट होत जाईल, ती नाती अधिक दृढ होत जातील.

आणि यासाठीच प्रत्येकाने एक विकेंड मैत्रीसाठी ठेवायला काहीच हरकत नसावी.

-

प्रविण धुरी (२७/०२/२०२०)

And we have so many great friends and family - blessed ...


Comments