सय तूझिया घराची, येते राहुन राहून,
भेट आपली स्मरते, येते भरून भरून.
दिस वाराचा सुट्टीचा, होता आपल्या भेटीचा,
येता समोरा समोरी, मिळे संकेत मनाचा.
तू ग आलीस सामोरी, हाती तबक चहाचा,
नख खुपते उंबरा, भिंती डोलती आनंदा.
आई खुषीत डोलते, बाबा मिशीत हासती,
झोका झोपाळ्याला देती, गाठ दोघांची बांधती.
जेव्हा निघालो तिथून, दार हलके बोलले,
असा येऊनी जाऊनी, घर आहेच आपले.
नाते जुळले तुझ्याशी, जसे धरती गगन,
डोले खुषीत येऊन, तुळशीचे वृंदावन.
स्वागता तत्पर सदा, झाडापेडाचे अंगण,
रोप लावले अंगणी, येते आठव फिरून.
- प्रविण धुरी
Comments
Post a Comment