पैल तो गे काऊ...
(भाग दोन)
आता वळुया झाडुकडे - स्वच्छतेच्या कार्यातील दुसरा शिलेदार.
झाडु - स्वच्छतादुतच पण मर्यादित
तो झाडु की ती झाडु ? काहीही असो. आपण आत्तापुरतं 'ती झाडु' असं सम्बोधतच पुढे जाऊ. कारण आपल्या या चिंतनाच्या पहिल्या भागात नायकाचं कथानक झालं, आता वेळ आहे नायिकेची. तसा हा भाग छोटासाचा आहे, म्हणजे कसं आहे की नायिकाप्रधान काही करायचं तर एकतर त्यांची संख्या कमी आणि नायकप्रधान कथेमध्ये तिच्या वाट्याला तसे प्रसंग कमी. पण म्हणुन महत्व कमी होतं का? नाही, इथेसुध्दा एका झाडुची भुमिका तितकीच महत्वाची आहे. तिचं महत्व नायका इतकंच आहे. (हे खरंतर नायिकेने मुलाखतीत सांगायचं वाक्य. असो).
घरातील, परिसरातील कचरा झाडणारी, घाणीची साफसफाई करणारी ही झाडू खरंतर एका कोपर्यात लटकवलेली, नाहीतर पलंगाखाली पडलेली असते, तीही सहजासहजी दृष्टीस पडू नये अशी. आणि तरीही तिला लक्ष्मी म्हणून पुजलं जातं. हा विरोधाभास कसा?
झाडूरुपी लक्ष्मीला अशी वागणुक देण्यामागे काय बरं प्रयोजन असावं ?
आमच्याकडे दसर्याच्या एक दिवस आधी, खंडेनवमीला शस्त्रपुजेसोबत झाडूची सुध्दा पुजा होते. एवढंच नाही तर आमची आजी वा आई, नविन केरसुणी वापरायला काढण्यापुर्वी तिची हळद-कुंकु लावुन पुजा करायच्या. काय असेल या सगळ्याचा अर्थ ?
मला वाटतं, पुन्हा एकदा या सगळ्यांमागे तीच कृतज्ञतेचीच भावना असली पाहिजे. जिचा उपयोग करुन घर स्वच्छ केलं जाणार, ती झाडू बनते अंगणातल्या माडापासुन किंवा वनातल्या एखाद्या झाडापासुन. बरं, तिचं काम त्या कावळ्याप्रमाणेच कचरा, घाण साफ करायचं, ज्यामुळे घरातला आणि आसपासचा परिसर रोगमुक्त राहण्यास हातभार लागणार. जेवढं आपण आणि आपल्या कुटंबातील सदस्य निरोगी, तेवढीच वैद्याची, उपचारांची गरज नाही, आणि म्हणुन खर्च नाही. तितक्याच जास्त प्रमाणात आपण कष्ट करु शकणार, म्हणजे पुन्हा त्या कष्टातुन मिळणारा परतावा जास्त. हे एवढे फायदे जर एका झाडुच्या कामी येण्यातुन मिळतात तर तिचे ऋण मानलेच पाहिजेत.
आणि त्यासाठी तिला लक्ष्मीरुप मानुन तिची पुजा करण्यात चुक ती कसली? नांगराची, शस्त्रास्त्रांची पुजा करण्यामागे सुध्दा कदाचित हाच हेतु असावा... कृतज्ञता मान्य करण्याचा, आणि त्यातुन मुक्तीसाठी प्रार्थना करण्याचा.
आता बदललेल्या इतर प्रथा-पध्दती प्रमाणे, झाडू सुध्दा त्याला अपवाद राहिली नाही. नैसर्गीक घटकांचा उपयोग करत जन्माला येणारी झाडू आपलं कार्य करताना झिजुन झिजुन याच निसर्गात एकरुप होऊन जायची. पण जसा काळ बदलला, तसं तिचं रुपही बदललं. यांत्रिकीकरणा सोबत कृत्रीमता वाट्याला येताच अधिक टिकाऊपणाच्या हव्यासात जसं तिचं झिजणं कमी झालं, तसंच तिच्यातलं लक्ष्मीचं रुपही हळुहळु दिसेनासं होऊ लागलं. काही गावां-गावांमधुन, काही घरांमधुन तिचं अस्तित्व अजुनही टिकुन आहे, तरी तिचं महत्व कमी होत जातंय आणि तिची केली जाणारी पुजा हा आता फक्त एक सोपस्कार बनुन राहिला आहे.
या चिंतनकथेचा मुख्य नायक आणि मुख्य नायिका यांची ही तर्हा, तर इतर पात्रांची काय बरं अवस्था असेल! तरीही आपण त्या उपकथांकडे एक नजर नक्कीच टाकली पाहिजे.
'पाहुण्या' उपकथा
या चिंतनातील इतर पात्रं म्हणजे खरंतर अशा काही ठरावीक वस्तु वा प्राणी-पक्षी नाहीयेत. जसं एखाद्या सिनेमात मुख्य पात्रांसमवेत कथेतील घर, झालंच तर झाड अशी काही पात्र असतात ना, अगदी तसंच, इथेही या चिंतनात सोबतची पात्रं म्हणुन काही घटना घेऊन बघायचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे कावळ्याचा संबंध आपल्या जीवनातील तीन महत्वाच्या घटनांशी जोडला जातो. नव्या पाहुण्याचे येणे, इहलोकीच्या पाहुण्याचे निघुन जाणे आणि स्त्रीचा मासिकधर्म. आता उपकथानक म्हटलं की मुळ कथेला फाटे फोडणं आलंच. म्हणुनच या तीनही घटना थोड्या वेगळ्या प्रकारे स्वतंत्रपणे बघु.
नवीन पाहुण्याचे येणे आपल्याला कावळा कळवतो असं म्हटलं जातं, असो. पण या इहलोकी जो नवा पाहुणा येतो त्याचा जन्म जीवशास्त्रीय दृष्टीकोनातुन, प्रत्यक्ष जन्म होण्याच्या (अंदाजे) नऊ महिने नऊ दिवस आधी झालेला असतो. यामुळेच मातेच्या उदरात असताना अशा जीवाला संपवण्याला आपल्या घटनेच्या/कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरवण्यात आले आहे. पण आजचा मुद्दा तो नाही आहे.
महत्वाचे आहे ते अशा (नव्या जीवाच्या) बाळाच्या जन्मानंतर काही दिवस मानण्यात येत असलेली 'अस्पृश्यता'. हा शब्द थोडा दाहक वाटतो, पण काही वर्षापुर्वीपर्यंत अशी प्रथा होती, ज्यानुसार, त्या नवबाळंतीण मातेला आणि नवजात बाळाला स्पर्श करण्याची मुभा घरातील इतरांना नसे. त्यांचे कपडे वेगळे, अंथरुणं वेगळी, भांडी-कुंडी वेगळी, आणि हे कमी म्हणुन की काय, या सोबतच त्या घरातल्या देवघरात बसलेल्या देवांनासुध्दा दहाबारा दिवसांचा सक्तीचा उपवास; आंघोळ नाही, पुजा नाही, फुले नाहीत, नैवेद्य नाही, इतकेच काय, तिकडे दाखवला जाणारा धुपसुध्दा आता त्या घरात आलेल्या नव्या पाहुण्याकडे.
आज वैद्यकीय शास्त्र एवढं प्रगत झालेलं असताना आपण जर मागे वळुन बघितलं तर आपल्याला त्यामागच्या आपल्या पुर्वजांच्या शास्त्रशुध्द दृष्टीकोनाचं निश्चितच नवल वाटेल. त्याकाळची परिस्थिती, संपर्काची, दळणवळणाची मर्यादित साधनं, अशा स्थितीत घरात होणारी बाळंतपण, प्रामुख्याने शेतीची किंवा इतर कामं करणार्या सर्व माणसांचा घरातला राबता आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणुन होऊ शकणारे संभाव्य आजार आणि मृत्यु. त्या आजारपणाचं, मृत्युचं प्रमाण कमी करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी माणसाने इतर अनेक प्रथांप्रमाणे देवाचा आधार घेत घातलेली बंधने. या सगळ्याचा उद्देश हा फक्त संसर्गजन्य वा अन्य कोणत्याही संभाव्य आजारापासुन दोघांना वाचवणे इतकाच होता. पण बारकाईने बघितलं तर लक्षात येतं की मधल्या काळात हळुहळु मुळ उद्देश मागे पडला आणि फक्त प्रथा शिरजोर झाल्या. आज जिथे शिक्षण, विज्ञान, वैद्यकशास्त्र, दळणवळण, संपर्क, यात इतके सकारात्मक बदल झाले आहेत, इतकी प्रगती झाली आहे, त्याचवेळी वाढलेली लोकसंख्या, अपुर्या सुविधा, अपुरी जागा या सगळ्यामुळे बरीच बंधने गळुन पडली आहेत, नाहीशी झाली आहेत. किंवा त्यांचा मुळ उद्देश लक्षात घेत आपण त्याच्याशी तडजोड करुन नव्या साधनांचे सहाय्य घेत मध्यम मार्ग काढला आहे.
पाहुण्याच्या येण्याशी संबंधित असलेले पहिले उपकथानक अशा रितीने आता आपल्या मुख्य हिरोच्या सहभागाशिवायच पुरे होताना दिसु लागले आहे. आता तिसरा भाग आधी बघु आणि नंतर वळु दुसर्या म्हणजे पाहुण्याच्या निघुन जाण्याच्या भागाकडे.
पहिले आणि शेवटचे उपकथानक हे स्त्री-पुरुष अशा दोघांशी संबंधित आहे, पण या दुसर्यात मात्र मुख्यत्वे फक्त स्त्रीचा संबंध जास्त येतो. मुलीला वयाची बारा-चौदा वर्षे पुर्ण होता होता सुरु होणारा हा शारिरीक बदल तिच्या वयाच्या पंचेचाळीस सत्तेचाळीशी पर्यंत राहतो. या कालावधीत दर अठ्ठावीस तीस दिवसानंतर ज्या शारिरीक क्रियेला ती सामोरी जाते, त्याचा संबंध खरंतर माणसाच्या प्रजनन क्षमतेशी, प्रक्रियेशी आहे. त्या अठ्ठावीस दिवसांत आपल्याला न दिसणारे बदल तिच्या शरिरात घडत असतात, आणि त्या चक्राच्या शेवटी तीन-चार दिवसांसाठी काही दृश्य बदल घडतात. आता खरंतर हे सगळं आज सांगायची काहीच गरज नाही आहे, कारण पुन्हा एकदा आपण केलेली प्रगती, आणि अगदी खोलातुन समजुन घेतलेलं शरीरशास्त्र.
पण पुर्वीच्या काळी मात्र याच चार दिवसांना जास्त महत्व दिलं गेलं, आणि काही बंधने घातली गेली. याचा अर्थ असं काहीतरी होतं जे त्यांना कदाचित शास्त्रशुध्द माहिती नव्हतं, पण तरीही त्या चार दिवसात घरातल्या स्त्रीला बंधनात अडकवण्यात आलं. असं का? आज ती सारी बंधने काढुन टाकुन स्त्रिया वावरताना दिसत आहेत. तर मग ज्या गोष्टीसाठी ही बंधनं घातली गेली त्या समस्या किंवा कारणं आज समुळ नाहीशी झाली आहेत का? जर याचं उत्तर हो असं आहे तर अजुनही काही विवक्षित ठिकाणी या बंधनावर आधारीत नियम का अस्तित्वात आहेत?
असो, प्रश्न खुप आहेत, आणि त्या सर्वांची उत्तर काही आपणच सोडवली पाहिजेत असं नाही. त्यामुळे आपण फक्त आपल्या मुळ प्रश्नाकडे वळुयात, मुळात पुर्वजानी अशी काही बंधने का घातली असतील? मला वाटतं अजुन थोडा विचार केला तर आपल्याला याचं उत्तरही मिळुन जाईल.
पुर्वीच्या काळी मुलींची लग्न कमी वयातच होत आणि जेव्हा ती मुलगी प्रत्यक्ष वयात येई (प्रजननाच्या दृष्टीकोनातुन) तेव्हा ती बहुधा आपल्या सासरीच असे, किंवा क्वचित माहेरी असे. या काळात तिच्यात होणार्या शारिरीक दृष्य बदलासमवेत जे काही अदृष्य (हार्मोनल) बदल होत, त्याच्या परिणामांची कारण मीमांसा करणं तेव्हा शक्य होत नसे. उदा. मनात उत्पन्न होणार्या भावना, किंवा अचानक उद्भवणारी असह्य डोकेदुखी, पोटदुखीसारखी आजारपणं. कित्येकदा या गोष्टी आणखी तीन चार वर्षानंतर किंवा एखादं मुल झाल्यानंतर कमी होतं. पण या चार दिवसात तिच्या शरिराला आराम मिळावा, घरातली कामं, आणि शेतावरची श्रमाची कामं करण्यापासुन थोडी उसंत मिळावी या उद्देशाने बहुधा तिला सुट्टी दिली जात असावी. त्यावेळची घरांची रचना, एकुण माणसे, घरातील बाळगोपाळांची संख्या विचारात घेता, तिला एखाद्या वेगळ्या खोलीत किंवा एखाद्या 'कोपर्यात' जागा दिली जात असावी. त्या आजारपणावरचे विशेष उपचार माहित नसल्याने तिने दिवसभर आराम करावा, खाणं-पिणं त्याच जागी व्हावं आणि बरं वाटताच शुचिर्भुत होऊन पुन्हा कामाला लागावं अशी ही एकंदर रचना.
पण नंतरच्या काळात पुन्हा एकदा प्रथा आणि बंधने तशीच राहिली, आणि मुळ उद्देश मागे पडला. आजही जर आपण आजुबाजुला लक्ष देऊन बघितलं तर दिसुन येईल की आपण आता कालबाह्य झालेली ती बंधनं झुगारुन दिली आहेत. ते चार दिवसातले त्रास कमी करण्यासाठी अनेक शास्त्रीय प्रबंधांचे आधार, अनेक प्रगत औषधे आपल्या हाताशी आहेत, पण खरंच त्रास कमी झालाय? त्या चार दिवसांत स्त्रीची जी काही मानसिक अवस्था असते त्यात औषधानी बदल करता आलाय? विविध प्रकारची बाह्य साधनं वापरुन दृश्य बदलावर नियंत्रण मिळवत आजच्या धावपळीच्या जीवनात ती अधिक श्रम करतच आहे, पण तिच्या आत, अंतर्मनात (कदाचित) जी भावनिक उलथापालथ होत असेल, त्यावर आपण काय उपाय केलेत? की इतर दिवसांप्रमाणेच त्या चार दिवसातही तिच्या काम करण्याच्या क्षमतेमुळे ते तितकेसे महत्वाचे उरले नाहीत?
तेव्हा कावळा शिवला म्हणुन घरातच जबरदस्तीने बाजुला बसवण्यात येणार्या स्त्रीची भावना आणि त्यापोटीची वाटणारी काळजी, आता त्या कावळ्यांच्या संख्येप्रमाणेच हळुहळु लुप्त होऊ लागली आहे, असं तर नाही ना?
इथेच संपतो आपल्या हिरोचा, कावळ्याचा दुरदुरवरुन संबंध असलेला दुसर्या उपकथानकाचा भाग.
आता तिसरा आणि शेवटचा भाग. या इहलोकी आलेल्या पाहुण्यांच्या परत जाण्याचा, ज्याचा कथानकाच्या नायकाशी येणारा संबंध आपण सुरुवातीला बघितला. त्यामुळे इथे त्याचं उपकथानक असल्याने थोडे वेगळे मुद्दे विचारात घेऊ. पहिल्या उपकथानकात जी एक अस्पृश्यता डोकावली होती, तशीच काहीशी ती इथेसुध्दा येते. पुर्वीच्या काळी एखाद्या माणसाचं या भुतलावरून प्रयाण झाल्यावर त्या घराशी, त्या घरातील माणसांना पुढील अकरा दिवस प्रत्यक्ष स्पर्श टाळुन सगळे व्यवहार केले जात. बर्याच अंशी कमी झाली असली, तरी आजही काही ठिकाणी ही पध्दत दिसुन येते. पण त्याची कारणमीमांसा करण्यापूर्वी आणखी एका मुद्द्याचा उल्लेख इथे करावासा वाटतो.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर, त्या पार्थिव शरिराचं दहन करण्याच्या पध्दतीमध्ये एक छोटीशी आणि अंगवळणी पडलेली अशी एक गोष्ट असते, ती म्हणजे छोट्याशा मातीच्या मडक्यातुन अग्नी घेऊन जाण्याची पुर्वांपार चालत आलेली पध्दत. ते नेण्याची सुध्दा एक विशेष पध्दत असते, बांबुच्या तीन छोट्या काठ्या (किंवा काड्या) काथ्याच्या सुंभाने एकत्र बांधुन त्यावर एका मडक्यात अग्नी म्हणजे कोळसे, शेणाच्या गोवर्या असं जे उपलब्ध असेल ते प्रज्वलित करून नेलं जातं. ही पध्दत आजच्या विद्युत दाहिनीच्या युगातही तशीच सुरु आहे. त्याचं कारण एकच आपली प्रथा, रुढी, परंपरा. मी जेव्हा यावर थोडा विचार करुन त्याची मीमांसा करायचं ठरवलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यावेळच्या तात्कालिक परिस्थितीला अनुसरून ही पध्दत सुरु झाली असावी. म्हणजे असं की पुर्वी जेव्हा अग्नी प्रज्वलीत करता येणार्या साधनांचा उदा. माचिस, लाईटर अशा गोष्टींचा शोध लागला नव्हता, तेव्हा अग्नी वाहुन नेणं कठीण होतं. गावातल्या घरापासुन अंत्यविधी करण्याचं ठिकाण दुरवर बहुधा गावाच्या बाहेर नदीकाठी असायचं आणि तिथे तर अग्नीची कोणतीच सोय नसणार. मग अशा वेळी घरीच अग्नीची तयारी करुन, त्याकाळी वापरात असणार्या मातीच्या भांड्यातुन तो इच्छित स्थळी घेऊन जायचा. गरम मडक्याचा त्रास होऊ नये म्हणुन काठ्यांचा आणि दोरीचा वापर करून ते वाहुन नेण्याची सोय करायची.
ही पध्दत खुपच सोयीची असल्याने पुढे तशीच रूढ झाली, जी आजतागायत अगदी विद्युतदाहिनीची सोय झाल्यावर सुध्दा परंपरा म्हणुन तशीच सुरु आहे. आता पुन्हा एकदा मागे वळुन त्या अकरा दिवसातल्या अस्पृश्यता आणि त्यासोबतच्या विविध मुद्द्यांचा विचार करू.
गेल्या एक-दोन शतकांत वैद्यकशास्त्रात
झालेल्या एकंदर प्रगतीचा आणि विकासाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की
पुर्वीच्या काळी मृत्युचं कारण पटकन कळुन येत नसे. माणसांच्या दैनंदिन राहणीमानाचा,
कामाच्या स्वरुपाचा आणि त्याच्या आरोग्याचा घनिष्ट संबंध जसा आज आपण बघतो, तसा तो त्याकाळी सुध्दा असावा. प्रामुख्याने केली जाणारी शेतीची आणि
शेतीशी संलग्न कामे, व्यापार आणि त्यापायी होणारा प्रवास, राज्यकारभार आणि संरक्षण या तीन भागात त्यावेळची जीवनशैली आपल्याला
विभागता येईल. संरक्षण या विभागात येणारी बहुतांश जनता ही पहिल्या विभागाशी सुध्दा
संबंधित होती. मला वाटतं या गोष्टीचा सरळ संबंध त्यांच्या आरोग्याशी आणि म्हणुनच
मृत्युशी लावता येण्यासारखा आहे. यातुन उद्भवणार्या आरोग्याच्या समस्या ढोबळ
मानाने काहीशा अशा :
- लढाईत येणारं कायमचं अपंगत्व किंवा मृत्यु
- प्रवासापायी येणार्या जनसंपर्कातुन येणारे साथीचे प्रादुर्भाव,
संसर्गजन्य आजार,
- शेतात, रानात काम करताना होणारे हिंस्त्र जनावरांचे हल्ले, चावे, विषबाधा, वगैरे.
- अन्य साथींचे प्रादुर्भाव.
स्त्रियांच्या वाट्याला यातल्या तिसर्या आणि चौथ्या शक्यते बरोबरच प्रसुतीकालीन समस्या आणि काही बाबतीत शारिरीक क्षमतेबाहेरची अपत्य-संख्या ही सुध्दा कारणे दिसुन येतील. जो जीव या सगळ्यातुन निभावला आणि दिर्घायुषी झाला, त्याला पुढे जावुन वार्धक्य आणि त्यासोबतच्या व्याधीना तोंड द्यावं लागत असावं. अपंगत्व, साथीचे आजार, संसर्गजन्य आजार आणि वार्धक्य या चार गोष्टींमुळे बहुतांशी रुग्णांच्या वाट्याला एकटेपणा हा ठरलेलाच. पिढी दर पिढी चालत आलेल्या उपचारांचं स्वरुप हे बर्याचदा माहित असलेल्या झाडपाल्यांचे आणि त्यासोबतीने अंगार्या-धुपार्याचे. या सर्वांचा परिणाम म्हणुन काही वेळा बळावलेले आजारपण, त्यातुन वाट्याला येणारी अस्वच्छता आणि एकटेपणाचं जीवन.
अशा व्यक्तीचा काही दिवसांनंतर जेव्हा मृत्यु होई, तेव्हा त्या पार्थिवाला अंत्यविधीच्या स्थानापर्यंत वाहुन नेणं गरजेचं असे. आणि त्यासाठी सगळ्यात आधी त्याला स्नान घालुन स्वच्छ करुन, दुसरी वस्त्रे घातली जात असावीत जेणेकरून नातलगांना, आप्तेष्टांना, गावातील लोकांना ते पार्थिव घेऊन जाणं सोपं होई. त्याचवेळी त्या व्यक्तीने वापरलेले कपडे, अंथरूण-पांघरूण अशा सगळ्या वस्तुंचे विसर्जन केले जाई, म्हणजेच एकतर नदीपात्रात फेकुन दिले जात किंवा जाळुन टाकण्यात येत, यातली दुसरी शक्यता जास्त. तसेच अंत्यविधीला हजर असणारी माणसे आपल्या घरात प्रवेश करण्यापुर्वी आंघोळ करून, शुचिर्भुत होऊन प्रवेश करत. तसं करण्यामागे संभाव्य संसर्ग टाळणे हीच शक्यता जास्त.
कदाचित याचाच पुढचा भाग म्हणुन होऊ शकणारे संसर्ग टाळण्यासाठी अशा घरातील माणसांशी काही दिवस कमी संपर्क ठेवणे, त्या घरी जाऊन आल्यास स्वत:च्या घरात प्रवेश करण्यापुर्वी स्वच्छ आंघोळ करणे अशा पध्दती अस्तित्वात आल्या. ज्या घरात अशी घटना घडली असेल, त्या घरातील माणसे आपल्या वाट्याला आलेलं दु:ख पचवण्यासोबतच, पुढील आठ-दहा दिवस घरातील, आवारातील साफसफाई करणे, स्वछता करणे, कपडे, अंथरूणे धुऊन स्वछ करणे अशी संभाव्य आजाराच्या शक्यतेची कारणे दुर करण्याचा प्रयत्न करीत. या काळात घरात स्वयंपाक केला जात नसल्याने किंवा तसं संभव नसल्याने शेजार-पाजारच्या घरातुन अशी सोय केली जाई. आणि या सगळ्याचा शेवट घरात एखाद्या होम हवनाने होई, ज्यायोगे त्यातील विविध तुप, समिधादि पदार्थांचं ज्वलन आणि त्यामुळे होणारा धुर यांच्या उपयोगाने घरातील वातावरण निर्जंतुक केलं जात असे.
याआधीच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे, कधीतरी इतर गोष्टींचा प्रभाव वाढत गेला आणि मुळ उद्देश मागे पडुन फक्त काही पध्दती तेवढ्या, त्यात झालेल्या काही बदलांसोबत रूढी-परंपरा म्हणुन सुरु राहिल्या. झपाट्याने बदलत गेलेले विज्ञान, वैद्यकशास्त्र, बदललेलं राहणीमान या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणुन माणसाचं जीवनमान वाढलं, साथीचे आजार, संसर्गजन्य आजार कमी झाले, रोगांचं स्वरूप बदललं, उपचार पध्दती बदलल्या, मृत्युची कारणे बदलली. आता पुर्वीसारखं सांत्वनपर भेट देऊन आल्यावर आंघोळ करण्याचं प्रमाण कमी झालं आहे, इतकंच काय, तर काही वेळा माणसं अंत्यविधीला हजर राहिल्यावर परस्पर ऑफिसला जाऊ लागली आहेत. पुर्वीसारखे घरातील सारे कपडे धुणे आता शक्य नाही, तसंच घरात होम-हवन सुध्दा शक्य नाही. बदललेल्या उपचार पध्दती आणि उपलब्ध वैद्यकीय साधने यांमुळे आजारी माणसे बहुतांश वेळा रुग्णालयातच उपचार घेतात आणि यातुन बरं होऊन परतायची शक्यता संपल्यावर तिथेच आपली यात्रा संपवतात. त्यामुळे रुग्णाचे कपडे, बिछाने फेकुन देण्याचे प्रमाण कमी झाले.
एखाद्या सुखांत असणार्या, कथानकाच्या शेवटी नायकाची जीत असणार्या कथेतल्या नायकासारखं, एवढं सगळं झाल्यावरही टिकुन राहिला आहे तो फक्त आजच्या कथाभागाचा आपला नायक आणि त्याला जोडुन असणार्या काही पध्दती.
या चिंतनाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपण त्याला निसर्गसंवर्धनाचा, निसर्गाप्रति असलेल्या आपल्या कृतज्ञतेचा भाग समजु आणि आजची कावकाव इथेच थांबवु.
© प्रविण धुरी (16 डिसेंबर 2019)




Comments
Post a Comment