दिवाळी - तेव्हाची, आताची, ...अन मला उमगलेली


दिवाळी - तेव्हाची, आताची,  ...अन मला उमगलेली

 

    आनंदाचा, मांगल्याचा, उत्साहाचा, संपन्नतेचा उत्सव म्हणजे दिपावली

    अश्विन कृष्ण द्वादशी पासून सुरू होऊन कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत साजरा केला जाणारा दिपोत्सव म्हणजे सर्वांची लाडकी दिवाळी.

    दारातील रांगोळी आणि पणत्या / दिवे (रोषणाई या अर्थाने) लावायचे बंद करूनही, लावलेली तोरणे काढता अगदी तुलसी-विवाह म्हणजे देव-दिवाळी पर्यंत साजरा होणारा सण म्हणजे लहान-थोर सर्वांच्या आनंदोत्सवला आलेलं उधाण.

    ऋतू चक्रात होणाऱ्या बदलांमधील पुसटशी सीमारेषा, पावसाळा संपताना वाढलेलं हवेतील बाष्प, आणि त्याने वाढलेली ऑक्टोबर मधील उष्णता संपून हिवाळा सुरू झाल्याची चाहूल देणारी पहाटेची थंडी, निसर्गातील हे वेगळंच सीमोल्लंघन अनुभवण्याचा काळ म्हणजे दिपावलीचा सण.

    गेल्या काही वर्षांपासून ही दिवाळीची पहाट 'सूरमयी'  झाली आहे. अनेक शहरांमधुन लोक पहाटेच्या वेळी गायनांच्या मैफिलीला हजेरी लावतात, नटुन-थटुन सुरेल गीतांचा आस्वाद घेत दिवाळीची सुरुवात करतात. आणि नंतर घर गाठुन फराळावर हात (तोंड) चालवतात. पुर्वीच्या काळी मैफिल म्हल्यावर सायंकाळी सुरु होऊन उत्तरोतर रंगत जाणारी असायची आणि रसिक मंत्रमुग्ध अवस्थेत पहाटेच्या वेळी घराकडे जात असत. त्या मैफिलीचा साज आणि गायकीचा बाज अनुभवणारे स्वर्गसुखाचा आनंद घेत असत. आता  सुखाच्या व्याख्याही बद्लल्यात, कालोपरोत्वे एवढे बदल हे होणारच.

    पण माझ्या लक्षात असलेली, मनात आणि कानात साठवून ठेवलेली सुरमयी पहाट थोडी वेगळीच आहे. विठ्ठल मंदिरातून येणारे काकड आरतीचे सूर कानावर पडले की आमची पहाट सूरमयी व्हायची, उजळुन निघायची. थोडेथोडके नाही, तब्बल एक महिना, आमच्या तीस-बत्तिस पहाटा (पहाट, पहाटा, पहाट्या, पहाट्स  ... अनेकवचनाचा घोळ) अशा सुरांत भिजलेल्या असत, अश्विन शुक्ल एकादशी पासून सुरू होणारी काकड आरती पुढे एक महिना कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालायची.

    ' देव म्हणे माझी मानस पूजा ' हे शब्द कानावर पडताच,

    ' आरती पूर्ण होत आली, तीर्थ-प्रसादाची वेळ झाली ' याची जाणीव होत असे.

    आजही जेव्हा दिवाळीच्या दिवसात सावंतवाडीत घरी असतो तेव्हा, पहाटे उठल्यावर हे सूर कानावर पडतात आणि मन बालपणात धाव घेतं,  वाटतं मंदिरा तीर्थासाठी हातात पेला नाहीतर स्टीलची लोटी (मोठा लोटा.... छोटी ती लोटी) घेऊन असंच धावत जावं आणि मिळणारा जिलेबी, वा बुंदीचा लाडू अथवा रव्या-साखरेचं काप, किंवा असाच तत्सम मिळणारा प्रसाद घेऊन यावं. त्या पांढरट पिवळसर रंगाच्या तिर्थाला येणारा दह्या-दुधाचा मिश्र सुगंध आजही मनाच्या एका कप्प्यात (की नाकपुड्यांच्या स्मरणात) भरुन राहिलेला आहे.

    अशी ही दिवाळी प्रत्येकाच्या अंतरंगात कोणता ना कोणता रंग घेऊन नटलेली असते, आठवणीतून सजलेली असते. प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा व्यापून असते. कुणासाठी ती द्वादशीला सुरू होणारी सहा दिसांची तर, कुणासाठी अमावास्येच्या अंधारात रोषणाईने उजळून टाकणाऱ्या लक्ष्मीपूजनापासून भाऊबीजे पर्यंतची तीन दिसांची.

    एखाद्याच्या आठवणीतील दिवाळी वेगळी आणि प्रत्यक्षातली साजरी केली जाणारी... असो.


    वसुबारस यादिवशी शेणाने सारवलेला, कारिटांपासून बनवलेल्या गुरांचा गोठा, त्याची विविध रंगांच्या फुलांनी केलेली सजावट, त्या ठेवलेल्या पणतीचा मिणमिणता प्रकाश ही येणाऱ्या दीपोत्सवाची सुरुवात. आपल्या गोठ्यातली गाईगुरं आपल्याला दुध-दुभतं देऊन सुदृढ, निरोगी आणि आरोग्यदायी ठेवतात,  म्हणुन जनावरांच्या ऋणातुन थोडंसं उतराई होण्यासाठी केलेलं हे नियोजन असावं.

    

    काहींच्या मते धनत्रयोदशी हा धन्वंतरी पूजनाचा दिवस. 'धन्वंतरी' म्हणजे वैद्य असं मानलं जातं. वैद्याचं काम हे झालेले आजार बरे करणं, त्यासाठी औषधोपचार करणं. या औषधीसाठी निसर्गातील झाड्पाल्याचा, वनस्पतींचा वापर केला जातो. मला वाटतं धनत्रयोदशी हा निसर्गाच्या, वृक्ष-वेली, वनस्पतीच्या कृतज्ञतेपायी साजरा केला जाणारा दिवस असावा.  

    पण आता 'धनत्रयोदशी' मधी फक्त 'धन' या शब्दाचा चपखल वापर जाहिरातकारांनी व्यापारी वर्गासाठी करून घेतला आणि त्यांचा मात्र दिवसेंदिवस धन-त्रयदश-उदय होत गेला. पुढे पुढे या दिवशीची सोने-खरेदी म्हणजे आयुष्यभरासाठी पुण्यसंचय करण्यासारखे मानले जाऊ लागले. ज्याला जमेल तसं, जो तो सोने खरेदी करु लागला, अगदी एक ग्रॅमचा दगिना ही नविन शक्कल निघाली. नव-मध्यम वर्ग हा या सर्वांचा ग्राहक. एखाद्याला नाहीच जमले तर, टीव्ही, फ़्रिज अशी एखादी नवीन वस्तु घरात आणण्यावर समाधान मानले जाऊ लागले. पुढे पुढे हे लोण घरखरेदी पर्यंत पोचले.

आता तर यादिवशी आपण कोणतीही खरेदी करणे म्हणजे आयुष्यातील एक मोठी सुवर्णसंधी वाया घालवल्याची भावना येऊ लागते, आणि उगाचच अपराधीपणा वाटू लागतो.

    यात भर पडली ती मायाजालावरच्या मायाबाजाराची. अनेकविध योजना, किंमत-कपातीच्या घोषणा आणि त्याची जाहिरात यासमोर मुळातील त्या वस्तुचं मुल्य आणि किंमत याची सांगड बसेना, सोबतंच आवड आणी गरज यामधील अंतरही दुय्यम ठरवत या गोष्टीनी आपलं गारुड पसरवलं.

    

    यानंतर येणारा नरकचतुर्दशीचा दिवस,

    ही आमच्यासाठी दिवाळीसणाची खरी सुरुवात, हा दिवाळीचा पहिला दिवस. आदल्या रात्री चालणारी झाडलोट, धु-पूस, काही ठिकाणी चालणारा रंगकामाचा शेवटचा हात, कंदिल टांगणे, दिव्यांच्या माळा लावणे ही बाहेरची कामे पुरुष मंडळींची तर, स्वयंपाकघरातुन, झालेला फराळ नीट भरुन ठेवणे, सकाळच्या ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणुन गृहीणींची लगबग चालायची. आणि छोट्या मित्र-मंडळींची चालणारी नरकासुर बनवण्याची धावपळ.

    वाड्यातल्या/गल्लीतल्या घरांमधून सर्व टाकाऊ वस्तू गोळा करायच्या, कुठूनतरी माडाच्या सुकलेल्या झावळ्या, आणि सुक्या गवताची सोय करायची, एखाद्याचं जुनं शर्ट अथवा सदरा, पॅन्ट असा बंदोबस्त करायचा, गणपतीच्या वेळचे खास राखुन ठेवलेले आपापल्या वाट्याचे फटाके सर्वांनी एकत्र जमवायचे, या सगळ्यामधुन पहाटे पर्यंत नरकासुर साकार होत असे. त्याच्या बाह्य रंग-रुपापेक्षा आतील फटाक्यांचंच अप्रुप मोठं होतं. चार-साडेचारला त्याला जाळून त्यातून उडणाऱ्या फटाक्यांचा मजा घेऊन मग घरी तायचं, तोपर्यंत घरी जाग-माग झालेली असायची.

    नरकासुराला जाळण्यापुर्वी आजीने सांगितलेली, कृष्ण-नरकासुराचे युध्द आणि त्याचा वध करुन कृष्णाने सोडवलेल्या सोळासहस्त्र बायका ही कथा नक्कीच चर्चेत असायची. आमच्यासाठी कृष्ण हिरो होता, त्यामुळे नरकासुराला जाळण्यात एक प्रकारचा विशेष आनंद मिळायचा, छाती उगाचच अभिमानाने भरुन यायची.

    आता मात्र ठिकठिकाणी भरवल्या जात असलेल्या स्पर्धांमुळे हिरोच बदलला, मध्यंतरी 'अ‍ॅन्टी-हिरो' अशी जी काय लाट आली होती तिचा परिणाम असावा कदाचित.


  
        त्यामुळे आता नरकासुरा सारख्या दुष्ट प्रवृत्तीला जमेल तितकं सजवुन पारितोषिकाच्या मिषाने सादर केल जातं. वेगवेगळ्या वीस पंचवीस बाल-गोपाळ (?) मंडळांचे, वर्गणीच्या पैशातून उभे राहिलेले, छोट्या पाच-साडेपाच उंचीच्या पुतळ्यापासुन ते अ‍वाढव्य आकाराच्या अठरा-वीस फुटाचे, अ‍गडबंब देहाचे, राक्षसी मुखवटे धारण केलेले नरकासुर मोठ्या दिमाखात दानवॉक करत येतात, आणि जणू पारितोषिक-सुंदरीच्या स्वयंवराला ऊभे ठाकतात. नरकासुरी प्रवृत्तीचं असं उदात्तीकरण झाल्यावर, बघ्यांच्या अलोट गर्दीतील छोटेमोठे नरकासुर कुणाच्या लक्षातही न येता आपला कार्यभाग साधत असतात हे कुणाच्या गावीही नसतं.

    त्या स्पर्धेत जिंकलेला नरकासुर, कृष्णाचा वध करुन निघाल्यासारखा संपुर्ण गावात मिरवणुकीतून फिरतो. आणि सोळा सहस्त्र बायकांच्या कथेचं रुपक माहितही नसलेल्या त्या कार्यकर्त्यांच्या हातून एखाद्या क्रांतिकारकाच्या थाटात दहनासाठी सामोरा जातो. यावेळी, पूर्वी मिळणारा तो निरागस आनंद आणि अभिमान याचा मात्र कुठेही मागमूस नसतो. बदलत्या काळानुसार होणारा हा बदल अपरिहार्य असला, तरीसुद्धा, एवढा ?

     पहिल्या दिवसाची आंघोळ हा दिवाळसणातला एक विशेष सोहळा.

    उटणं, खोबरेल तेल, मैसूर सँड्ल किंवा मोती साबण, पाटावरची बैठक, कडकडीत पाणी हे जुळून आलं म्हणजे अभ्यंगस्नान जमून आलंच. सर्वांगाला तेलाने मालिश केल्यावर सुगंधी उटणे लावण्याचा सोपस्कार म्हणजे त्यावेळचं सर्वात कंटाळवाण काम. त्याचा खरखरीतपणा नकोसा वाटायचा, (मुल्तानी माती, फेशीयल, फेस मसाज याला अजुन अवकाश होता). काही काही घरांमधुन म्हणे अजुन एक अर्धवार्षिक कार्यक्रम असायचा, एरंडेल घेऊन कोठा साफ करण्याचा, तोही तितकाच महत्वपूर्ण, नंतरच्या खाण्याच नीट पचन व्हाव या उद्देशाने राबवलेला. आंघोळीच्या वेळी मिळणार ऊनऊनीत पाणी कितीही असलं तरी कमीच वाटायचं.

    त्यावेळचे नविन कपडे म्हणजे नवीन गंजी, सुरुवातीला बाह्यांची, नंतर नंतर थोडं समजुतीत आल्यावर बिन-बाह्यांची, आणि एक हाफ पॅन्ट ठरलेली. बाबांना गिऱ्हाईकांच्या कामातून वेळ मिळालाच तर शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळायची, नाहीच जमलं त्यादिवशी तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हमखास. पण हे सगळं ज्यावर्षी जमून येईल ती दिवाळी अधिक आनंदाची हे मात्र ख़रं. नविन कपड्यांसोबत छोट्या कुपीतून भिजवलेला अत्तराचा फाया, पालथ्या हातावर फिरवून मग कानात ठेवला की वेषभुषा पुर्ण झाली. यानंतर तुळशीच्या (हल्ली तुलसी म्हणतात हिला ) साक्षीने कारिटासुराचा वध, तोही डाव्या पायाच्या अंगठ्याने....कसली कसरत होती ती ! मोठ्या माणसाना बरोबर जमायचं, आम्हा मुलांची मात्र तारांबळ.

    आजही हे सगळं काही गावांमधुन, घरांमधुन निश्चितपणे होत असेल, पण त्यात एक परंपरा पुढे चालवणे हा भाग आता जास्त उरला असावा.

    घरातील सुवासिनीकडुन ओवाळून झाल्यावर विठ्ठ्ल मंदिरातील दर्शनफेरी आणि तीर्थ-प्रसाद, त्याचं घरी सर्वांना वाटप. एवढं सगळं यथासांग पार पडल्यावर मुख्य कार्यक्रम - दिवाळीचा फराळ. सकाळी नऊ-साडेनऊ वाजता सुरु होऊन माध्यान्हापर्यंत चालणारा एक सुंदर आनंदसोहळा. आळीतल्या सर्वच घरातील एक एक प्रतिनिधीचा मिळून झालेला गोतावळा एकत्र फराळासाठी प्रत्येक घरामध्ये हजेरी लावणार आणि तिथे वाढलेल्या पंगतीतल्या पानावर बसुन जिन्नसांचा आस्वाद घेऊन बाहेर येणार. तिखट कांदापोहे आणि गुळाचे पोहे, क्वचित दहीपोहे, चवळी अथवा वाटाण्याची उसळ, चकली, शंकरपाळी, लाडु, शेव-चिवडा या नेहमीच्या पदार्थांसोबत अनारसे, उकडलेली रताळी, एखाद-दुसरा खजुर, मुंबईहून आलेल्या चाकमान्याने आणलेली मैसूर पाकाची वडी असे विशेष जिन्नस कुणाकडे असतात याचं विशेष भान ठेवलं जात असे. साडे-अकरा बारा वाजेपर्यंत ही वरात दमलेल्या अवस्थेत आपापल्या पोटावरुन हात फिरवत घराचा आसरा गाठायची. या सर्व परंपरागत उपक्रमामुळे पोटाला तडस लागणे काय असते हे आम्हाला फार लवकर समजायला लागलं होतं.

    यानंतरचा, उरलेला दिवस लोळत ढकलायचा बेत आईच्या आज्ञेने धुळीस मिळायचा. आता काम असायचे ते फराळाचे ताट शेजारी-पाजारी पोचवण्याचे. फुलाफुलांचे विणकाम अथवा नक्षीदार भरतकाम केलेला सुंदर कलाकुसरीचा, शक्यतो पांढरशुभ्र रुमाल पांघरलेले फराळाचे ताट नेऊन शेजारच्या घरांमधुन पोचवणे, तसेच त्यांच्याकडे या कामासाठी कुणी नसल्यास येताना त्यांच्याकडच्या फराळाने ताट पुन्हा भरुन आणणे यात काहीच कमीपणा नव्हता. उलट कुठले घर चुकले तर नाही ना याची खबरदारी असायची. यासोबतच, त्यांची फराळाची ताटे इतरांकडे पोचवण्याचे कामही आनंदाने केले जायचे. ही अशी सगळी सर्व्हीस पुरवुन मोकळे होईस्तोवर दुपार व्हायची, पोटात काही अंशी जागा झाली असेल तर चार घास खाऊन मस्त ताणून द्यायची. संध्याकाळची वेळ ही बहुधा पणत्या / मेणबत्या लावण्यात, ऊरलेल्या फटाक्यांमधील एखादी माळ सोडवून त्यातील एक एक फटाका - फुगोटी म्हणत असू- त्याला  लावण्यात जात असे.

    आता यातले बरेचसे प्रकार बहुधा काळाच्या पडद्याआड गेलेत. सकाळची आन्हिकं आटोपून एकत्र फराळाला बसणं हेसुद्धा काही काही घरांतुन नवलाईच झालं आहे. काही गावांमधुन फराळाची पंगत अजुन भरत असली तरी त्यात नव्या पिढीचा कमी होत जाणारा सहभाग, 'पंगत ' आणि 'पंगतीतला आग्रह' हा प्रकार ईतिहासजमा करण्याला कारण ठरत आहे. तीच गोष्ट फराळाच्या ताटाची, समाजमाध्यमां मधुन आभासी शुभेछांचा वर्षाव करणारे आपण, आता फराळाचं ताट सुद्धा आभासी पद्धतीनेच पोचवतो, आणि एकाचवेळी फराळाच्या अनेक आभासी पंगती उठवतो. तिथल्या दहा बारा ग्रुपवरच्या कोंडाळ्यात रमणारे आपण प्रत्यक्षात मात्र अधिकच एकटे पडत आहोत.  

    नाही म्हणायला मोठया शहरांमध्ये काही काही सोसायट्यांमधुन सामुहिक फराळाचे उपक्रम राबवले जातात. त्यानिमित्ताने वर्षातला एखादा दिवस सारेजण कुटुंबासहित एकत्र येतात, मौजमजा करतात. आजही काहीजण ताटातुन देणे शक्य नसल्याने, पुड्यांमधुन फराळ पोचवण्याची परंपरा जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मुंबईतील आमच्या सोसायटी मध्येही लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सामुहिक फराळासाठी राखुन ठेवण्यात येतो.


दुसरा दिवस लक्ष्मीपूजन किंवा मोठी दिवाळी.  


    दिव्यांची रोषणाई बघावी ती या दिवशी. घराघरांमधुन सायंकाळच्या पुजेची तयारी सकाळपासुनच सुरु झालेली असते. हारासाठी झेंडुची फुले (गोंड्याची फुले) आणि सोबत मध्ये मध्ये ओवायला आंब्याच्या झाडाची पाने आणली जातात. फोटो पुसुन साफ करायचा, पुजेची जागा पुसुन घ्यायची, प्रसाद म्हणुन वाटण्यासाठी बत्तासे किंवा पेढे आणि पुजेसाठी केळी सफरचंद अश्या फळांची तजवीज करायची. संध्याकाळी मुहुर्तानुसार, भटजी येणार असतील तर त्यांच्या वेळेनुसार पुजा व्हायची आणि मग आम्ही बच्चे कंपनी हातात कापडी पिशवी घेऊन लक्ष्मीपुजेसाठी निघायचो. सम्पुर्ण गावभर फिरुन आल्यावर ज्याचं बत्ताश्याचं कलेक्शन जास्त असेल त्याची कॉलर ताठ असायची. काही मोठ्या दुकानामधुन दिला जाणारा गुळ-धण्याचा प्रसाद आपलं वेगळेपण जपुन असायचा. पण हे सगळं शालेय जिवनापर्यंतच.

    एकदा कॉलेज प्रवेश झाला की संध्याकाळची फेरी देवपुजे ऐवजी देव/देवी यांच्या दर्शना साठीच जास्त असायची. इष्ट-देवतेचं मुखदर्शन, संपुर्ण सजलेलं खुलुन दिसणारं रुपदर्शन होताच ती संध्याकाळ सार्थकी लागायची.

    शालेय जिवनात असताना त्या रात्री आम्हा मुलांचा आणखी एक उद्योग चालायचा. जेवणं आटोपली की आमची चार-पाच जणांची टोळी बाहेर पडायची. बंद झालेल्या दुकानांच्या बाहेर विझलेल्या मेणबत्या आता वितळलेल्या मेणाच्या स्वरुपात शिल्लक असायच्या. त्या काळी मेण 'घन ते द्रव आणि पुन्हा घन' असा सामान्य विज्ञानात शिकवल्या प्रमाणे उष्णतेच्या नियमाप्रमाणे प्रवास करायचं. आताच्या मेणबत्या मात्र बदलल्या, घनरुप अवस्थेमधुन एकदम वायुरुपात जातात, प्रगती दुसरं काय

    ते वेगवेगळ्या रंगाच पुन्हा घट्ट झालेलं मेण खरवडुन काढायच आणि पॅंट्च्या दोन्ही खिशात अथवा कधी सोबत आणलेल्या पिशवीत जमवत निघायचं. तास-सव्वा तास चालणारा हा लघु उद्योग बहुधा रात्रौ, क्वचित दुस‍रे दिवशी पहाटे चालायचा. आणि मग त्या जमवलेल्या कच्चा मालापासुन, एखाद वेळेस जमुन येणारा मेणबत्ती बनवायचा छोटेखानी गृहउद्योग साकार व्हायचा. यातुनच पुढे काही जण मोठे 'ऊद्द्योगी' घडले असावेत असा माझा कयास आहे...

    आता लक्ष्मीपुजन पुर्वीपेक्षा जास्त ऊत्साहाने साजरे केले जाते. पण एकमेकांकडे जाऊन शुभेच्छांची देवाणघेवाण आणि लक्ष्मीपुजनाचे दर्शन घेणे कमी झाले आहे. प्रसाद म्हणुन बत्तासे देणे आणि घेणे आता काही जणांना कदाचित कमीपणाचे सुद्धा वाटत असेल. तर मग गुळ-धण्याचा प्रश्नच येत नाही. त्याची जागा आता खव्याच्या पेढ्यानी घेतली आहे. एक मात्र खरं, फिरायला बाहेर पडणारी कुटुंबे आता निश्चितच वाढलीत, कदाचित वाढलेल्या त्रिकोणी-चौकोनी कुटुंब पद्धतीचा परिणाम म्हणुन असेल. पण त्यामुळे या संध्याकाळी हॉटेल, रेस्टॉरंट आणि आइस्क्रीम पार्लर मात्र ग्राहकानी ओसंडुन वाहताना दिसतात. इतक्या वर्षानंतर सर्वत्र लक्ष्मी नांदत असल्याचे हे द्द्योतक असावं बहुधा.

 

    तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा.


    पुराणातल्या कथेनुसार विष्णुचा एक अवतार बटु वामन, त्याने तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवणं आणि बळीचं पाताळात जाणं अशा कथेचं पाठबळ असणारा हा दिवस. त्याचबरोबर विक्रम संवताचा पहिला दिवस म्हणुन दिवाळी पाडवा, म्हणजेच नव्या शुभारंभाचा दिवस. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वर्षाची एकदा सुरुवात होते. पण हिंदु पंचांगानुसार हा योग दोन वेळा जुळुन येतो, चैत्र पाडवा, आणि दिवाळी पाडवा. यातील दिवाळी पाडवा थोडासा जास्त भाग्यवान, कारण त्याच्या वाट्याला शुभेच्छांच्या बरोबरीने नव्या खरेदीच्या दिवसाच महत्वही जोडलं गेलंय. काही कारणास्तव धनत्रयोदशीला खरेदी करु न शकणारे या दिवशीची संधी साधुन घेतात. याच बरोबर दुकानांमधुन ग्राहकांची अलोट गर्दी होण्यासाठीचं आणखी एक कारण हे नंतर येणारा भाऊबीजेचा दिवस.

    पण याशिवाय पाडवा या दिवसाचं स्वत:चं असं एक विशेष आहे. हा दिवस लग्न झालेल्या पती-पत्नी साठी विशेष महत्वाचा मानला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीला प्रेमाने ओवाळते आणि तितक्याच (?) प्रेमाने पती तिला एखादी छानशी साडी किंवा तत्सम गृहोपयोगी वस्तु भेट म्हणुन देतो. नाहीच जमलं तर पाकिटात घालुन एक रक्क्म तरी दिली जातेच. याप्रथेमागे कोणतं पुराणशास्त्र आहे अथवा हे असं का केलं जातं हे आम्ही कधीच विचारलं नाही. लहान असताना, गृहिणी असलेल्या आईने बाबांना आणि काकीने काकांना ओवाळताना पाहिलेलं असतं आणि आता बहुतेकांच अर्धांग कमावतं असेल तरीही ही रीत तेवढ्याच आस्थेने आणि प्रेमभावनेने पाळली जाताना घराघरातुन दिसुन येते.

    दिवाळीच्या इतर दिवसांच्या चालीरिती मध्ये काहीसा फरक पड्ला असला तरी पाडव्याची ही रीत मात्र अजुनही शाबुत आहे, उलट काही अंशी अजुन वाढली आहे, बहुतांशी कुटुंबामधुन आता पतीपत्नी दोघेही कमावणारे असल्याने भेटवस्तुंचं आदानप्रदान परस्परां कडुन केलं जातं.

 

    चौथा दिवस भाऊबीज किंवा यमद्वितिया.


    बहीण-भावाच्या नात्याला साजरं करण्याचा हा वर्षातला आणखी एक दिवस. पुराणातील कथेप्रमाणे, यमधर्माने आपली बहीण यमुना हिच्याकडे भेट देऊन तिच्यावरच्या प्रेमापोटी वर देऊन, तिला या दिवसाबद्दल आश्वस्त केले. कार्तिक शुक्ल द्वितिया या दिवसाची अशीच काहीशी महती. आजी कडुन ऐकलेल्या गोष्टीतील एवढाच भाग आज लक्षात राहिला.

    या दिवसाचा उत्साह सकाळपासुनच असायचा, कारण आज बहीण ओवाळणार, आणि वयाने लहान असला तरीही भाऊ तिला ओवाळणी घालणार. केवढ्या उत्सुकतेने वाट बघितली जायची या दिवसाची ! त्यावेळी बाबांकडुन मिळणारे पाच किंवा दहा रुपये ओवाळणी म्हणुन घालताना ऊर अगदी भरून यायचं, उगाचच मोठं, कर्त-सवरतं, कुणीतरी जबाबदार व्यक्ती झाल्यासारखं वाटायचं. ही भावना रक्षणकर्ता म्हणुन राखी बांधुन घेताना वाटणाऱ्या भावनेपेक्षा वेगळी होती. तिकडच्या भावनिक वचनापेक्षा ही अशाश्वत भौतिक भेट जास्त महत्वाची असावी का? की देण्यासोबत वाट्याचं आपल्यालाही काहीतरी परत मिळणार याचा आत कुठेतरी लपलेला आनंद .... कुणास ठाऊक !

    मात्र ही प्रथा दिवसेंदिवस जास्तच महत्वाची होत गेली. ज्यात वेगवेगळ्या स्तरावर चालणाऱ्या विविध प्रकारच्या भेटवस्तुंच्या मार्केटींगचा फार मोठा हात आहेच, पण त्याचबरोबर इतर नाती दुरावत असतानाही, भावाबहीणीचं हे उत्कट आणि नाजुक नातं अधिकाअधिक फुलत गेल्याचा, ते समजुतदार नि जबाबदार होत, प्रौढ बनल्याचा महत्वाचा वाटा आहे. म्हणुणच की काय या दिवशी गाड्याना तुडुंब गर्दी असते. हातात भेटवस्तुंच्या पिशव्या सांभाळत सहकुटुंब प्रवास केला जातो. सकाळी ' हिच्या भावाकडे ' आणि रात्री 'नणंदेकडे' अशी सोयिस्कर सर्वसमावेशक वाटणी केली जाते. भावंडांची संख्या जास्त असेल तर दरवर्षी एक-एकाकडे जमायचं याचं योग्य नियोजनही केलं जातं. यामुळे जबाबदारीचा भार हलका झाल्याने नात्यांची वीण मात्र अधिकच घट्ट झाल्याचे दिसुन येते.

    भाऊबीजेचा कार्यक्रम या चौथ्या दिवशी शक्य न झाल्यास, सर्वांच्या सोयीने नंतर येणाऱ्या एखाद्या रविवारी जमवुन आणला जातो. पण दिवाळी हा सण मात्र या दिवशी संपतो.

    शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या या बाकी असणारा गृहपाठ (व्हेकेशन वर्क), सहामाहीचा (मिड-टर्म किंवा फर्स्ट सेम) निकाल लागायचा असेल तर त्याची उत्सुकता, आणि उरलेला फराळ यामध्ये संपतात. दिवाळी साजरी करायला स्थलांतर केलेल्या पाखरांना घरट्याकडे परतायचे वेध लागतात. कन्फर्म तिकीटांची सोय झाली नसल्यास, तशाच अवस्थेत भरगच्च गर्दीत परतीचा प्रवास करताना जाणवणारा शीण, त्या चार दिवसातल्या आठवणीमुळे काहीसा सुसह्य होऊन जातो.

    यानंतर नव्या उर्जेने, नव्या तजेल्याने, उत्साहाने पुढच्या दिवाळसणाचे प्लॅन आखत प्रत्येकजण नव्या दिवसाची सुरुवात करतो ....आणि संध्याकाळ.... आहेतच पुन्हा एकदा शीत्ली, राणा अथवा राधिका मसाले किंवा सरंजामे उद्द्योग.

    आजकाल टीव्ही वरच्या मालिका किंवा सिनेमा मधुनही दिवाळी उत्साहात साजरी केली जाते, त्यांच्या कथानकांमध्ये तसे आवश्यक बदलही केले जातात. त्यात विविध मार्गानी प्रेक्षकाना सुद्धा सामवुन घेतलं जातं.

    सतत बदलत असणाऱ्या आपल्या भवतालच्या परिस्थितीमध्ये टीव्ही, मोबाईल, इंटरनेट सारखी कर्मणुकीची माध्यमं व इतर समाजमाध्यमं अधिकच भर घालतात आणि त्यामुळे बदलाचा वेगही वाढतो किंवा तसा आभास तरी निर्माण होतो. असा आजुबाजुला झपाट्याने बदल होत असताना, आपल्या आदर्शांच्या व्याख्या बदलत असताना, परंपरा आणि रुढीं यामध्ये, सणांमध्ये, दिवाळीमध्ये होणारे बदल अपरिहार्य आहेत. ते स्विकारलेच पाहिजेत.

    पण या बदलांमुळे, भौतिक प्रगतिमुळे जग जवळ येत असताना, माणसा-माणसा मधील अंतर मात्र वाढत गेल्याच जाणवतं. विज्ञानाने स्पर्शाचा अधिकाअधिक उपयोग करुन घेत तंत्रज्ञानाची अनेक दारे-खिडक्या उघडली असताना, माणसाना माणसाचा स्पर्श मात्र दुर्मीळ होत चालल्याचं दिसू लागल आहे. समाजात कमी होत जाणारी माणुसकी, संपत चाललेली सहनशक्ती, वाढणारी असुया, प्रत्यक्षात कमी होणारी पण समाजमाध्यमां मधुन ओथंबुन वाहणारी संवेदनशीलता विचार करायला भाग पाडते.

    आणि आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे राहुन दिवाळी सारख्या सणाकडे पुन्हा एकदा वळुन पाहताना, माझ्या मनाला त्यात एक वेगळाच भाव, एक वेगळाच प्रकाश दिसू लागतो. दिवाळीच्या चार दिवसांमध्ये चार तेजस्वी दिवे दिसू लागतात, आणि एक नवा अर्थ त्यातुन उमगायला लागतो. वसुबारस आणि धनत्रयोदशी या दोन दिवसात प्राणिमात्र व वृक्षवल्ली या निसर्गातील दोन घटकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केल्यावर, आता वेळ असते स्वत:ला आणि भोवतालच्या समाजाला योग्य दिशा दाखवण्याची, निसर्गाच्या सानिध्यात वावरत असताना योग्य रितीने वाट्चाल करण्याची

त्यासाठीचे हे चार दिपक...     

    पहिला दिवा - निवृत्ती दिवा

    आपल्या आत असलेल्या सर्व दुष्प्रवृत्तींना निवृत्त करायचे. एकत्र करुन त्यांचा नरकासुर करायचा आणि त्याला पहिल्या दिवशी भल्या पहाटे अग्नीला समर्पित करायचे. तद्नंतर नविन सुगंधित विचारांच्या साबणाने आंघोळ करुन, शुचिर्भुत होऊन, समाजातील इतर सत्प्रवृत्तींच्या सहवासात फलाहार करायचा. आणि शक्य असेल त्या सर्व घटकांपर्यंत हा प्रकाश पोचवायचा.

    दुसरा दिवा - ज्ञान दिवा

  समाजातील सर्वच थरांमधुन बोकाळलेला भ्रष्टाचार, व्यभिचाराचा अंधार दूर करण्यासाठी, लक्ष्मीपुजनाच्या दिप प्रज्वलनासोबत ज्ञानप्रसाराचा एक दिवा प्रत्येकाने लावावा. कोणत्या ना कोणत्या माध्यमाद्वारे शक्य होइल तितक्या दूरवर हा ज्ञानाचा प्रकाश नेण्याचा प्रयत्न करावा. असं झाल्यास, कालांतराने त्या ज्ञानी समाजात साजरं केलं जाणारं लक्ष्मीपुजन निश्चितच अधिक आनंददायी असेल.

    तिसरा दिवस - सोपान दिवा

    आतल्या दुष्प्रवृत्ती आणि भोवतीचा अंधार दूर झाल्यावर ही वेळ नाविन्याची पहिली पायरी चढण्याची. सदाचाराच्या पहिल्या सोपानावर परस्पराना सद्भावनेचे आलिंगन देत सुविचारांचा दिवा लावायचा आणि परस्परांप्रती सद्वर्तनाचे वचन देत पुढे मार्गस्थ व्हायचे.

    चौथा दिवस - मुक्ताई दिवा

    सद्वर्तनाच्या आणि सुविचारांच्या प्रकाशात सुरुवात केल्यावर, पुढच्या प्रवासात मुक्त बंधुभावाचा दिवा सोबत घेऊन वाटचाल करायची. मुक्ताईच्या बंधुप्रेमाचा प्रकाश सदैव आपल्याला योग्य दिशा दाखवत राहील आणि कोणत्याही वाईट प्रवृत्तींच्या अंध:कारा पासुन आपणा सर्वांना नेहमीच मुक्त ठेवील.

    अहाहा ! किती सुंदर काव्यात्मक विचार ! निवृत्ती, ज्ञानोबा, सोपान, मुक्ताबाई.

    पण यावर अंमल कसा करायचा? हे चार दिवे लावायचे म्हणजे नक्की करायचे काय?

    पहिल्या दिव्यासाठी, आपल्या आतला एखादा असा गुण (?) शोधायचा ज्यामुळे आपल्याच मनात अंधार दाटुन येतो, निराशा येते, माणसं आपल्यापासून दूर जातात, इतरांशी आपली भांडणा होतात. एकदा शोध सुरु केलात की यात खुप काही सापडू शकतं. छोट्या छोट्या गैरसमजाच्या काटक्या, आत कुठेतरी गुंडाळुन ठेवलेली जुन्या भांडणांची लक्तरे, खोट्या अहकांराचे वेगवेगळ्या प्रसंगी अर्धवट विझवुन ठेवलेले सुतळी -बॉम्ब, बरंच काही सापडेल. बस्, यातलंच तर एक एक करत काढुन त्याचा नरकासूर बनवून जाळायचे आहे. सगळंच एकदम नाही जमलं तरी ठीक, ही दिवाळी शेवटची थोडीच आहे.

  दुसरा ज्ञानोबांचा दिवा, समाजातल्या, आजुबाजुच्या ओळखी-अनोळखी लोकांमधील असे स्वयंप्रकाशमान दिवे शोधायचे आणि त्यांच्या सहवासात अधिकात अधिक काळ घालवायचा. एखादा निवृत्त कर्मचारी, पोस्टमन, किंवा शिक्षक, एखादा कविमनाचा पोलिस, कुणीही असू शकतो. त्यांच्या कडून ऐकण्यासारखं, शिकण्यासारखं खुप काही असू शकतं, चालती बोलती अनुभवांची विद्यालय असतात ही. आपलंही काही सांगावं. एकदा दिव्यासाठी तेल मिळवणं सुरु झालं की योग्य ज्ञानाचा प्रकाश वाटणंही जमायला लागेल.  

    सोपानाचा नव्या आरंभाचा दिवा, जसजसा आतला अंधार कमी होईल, स्वयंप्रकाशित दिव्यांचा सहवास वाढू लागेल, तसा नित्य नव्या आरंभासाठी मार्ग दिसत जाईल. नवीन कवी-कट्टा, गल्लीचे सफाई अभियान, शाळेची किंवा होस्पिटल मधल्या साहित्याची दुरुस्ती, ड्युटीवरच्या पोलिस कर्मचारी वा एसटी /बेस्ट मधल्या स्टाफसोबत फराळाचा कार्यक्रम,... अगदी काहीही असू शकतं. आनंद वाटण्याची नवी सुरुवात प्रत्येकाची वेगळी असू शकते.

    मुक्ताई... पहिल्या तीन दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्यावर, हा छोटासा दिवा आपल्याला पुढील वर्षभर प्रकाशमान ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचा. ही छोटीशी बंधुभावाची पणती नेहमी आपल्यासोबत असली म्हणजे इतरांसोबतचे आपले नातेसंबंध नेहमीच दृढ राहतील, आणि मुक्तपणे आपल्याला जीवनाचा आनंद घेता येईल. जर पुन्हा या दु:प्रवृत्ती, दुर्गुण आपल्या आसपास फिरकल्या तर त्यांचे नरकासूर वेळीच या पणतीतल्या तेजाने जाळता येतील.

    हे सारं जरी खरं असलं तरी, एखाद्या कवितेचा अर्थ जसा प्रत्येकाला नव्याने जाणवू शकतो, तसाच, याचाही प्रत्येकाने आपापला अर्थ शोधावा आणि मार्गक्रमणा करावी हे उत्तम.

    निवृत्ती ज्ञानोबा सोपान मुक्ताई

    या चार दिव्यांच्या प्रकाशात सर्वांचे आयुष्य उजळुन निघो आणि येणारे पुढचे सारे दिपोत्सव आपल्या सगळ्यांच्या जीवनात यशाच्या दीपमाळा सतत तेवत ठेवो

    हिच त्या माऊली चरणी प्रार्थना.   

    प्रविण धुरी, मुंबई

    (19 नोव्हेंबर 2018 / का.शु.11)


Comments

  1. खूपच छान,दिवाळीचं जुन्या,नव्या साजरा करण्याच्या पद्धतींचं
    वर्णन.
    निवृत्ती,ज्ञान,सोपान,मुक्ताई दिव्यांची कल्पना खूपच छान!

    ReplyDelete

Post a Comment