
अहो !
जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. पृथ्वीवर पहाटेची पहिली किरणे जर कुठे पडत असतील तर ती या देशात असं मानलं जातं. या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वस्व गमावून सुध्दा राखेतून पुन्हा उभी राहण्याची जिद्द असलेला देश, ज्याची एक चुणूक दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला दिसलीच. पण धगधगत्या जिवंत ज्वालामुखीच्या सतत सानिध्यात असूनही आणि वरचेवर त्याचे चटके सहन करूनही, पुन्हा पुन्हा उभारी घेत, तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्या सहाय्याने उत्तरोत्तर प्रगती करणारा देश अशी आपली ओळख सगळ्या जगाला करून देण्यात यशस्वी ठरलेली इथली माणसे.
नमनालाच जपानचं इतकं कौतुक आणि या लेखाचं शीर्षक याचा काही संबंध जुळतो का?
बघू...
धरणी आपली 'माता' आणि चंद्राला आपण आधीच 'मामा' बनविलेला असल्यामुळे, आता सूर्याचं आणि पृथ्वीचं एकमेकांशी नातं काय याचा मी विचार करत होतो. सूर्याला रजनीनाथ म्हणतात पण रजनी म्हणजे रात्र आणि तिची जोडी जमते दिवसा सोबत. त्यामुळे मला वाटतं की सूर्य हा 'धरणीचा नाथ' किंवा 'प्रियकर' अशी कल्पना जास्त संयुक्तिक होईल.
त्याला आणखी एक कारण आहे,,,
प्रियकर - प्रेयसी हे सतत एकमेकांभोवती घुटमळत असतात,,, जरी त्यांचे नवरा-बायको झाले तरीही,,, आणि त्यांच्यामध्ये कितीही वाद-भांडणे (मारामाऱ्या नाहीत) झाली तरीही दोघांना एकमेकांशिवाय चैन पडत नाही... अगदी आयुष्यभर क्षुल्लक क्षुल्लक गोष्टी वरून दोघांनी एकमेकांचा कितीही उध्दार केला, तरीही पैलतीर दिसू लागला की 'आपलं हक्काचं माणूस' अवतीभवती असल्याशिवाय चैन पडत नाही. अगदी नेहमीच्या खणातला चष्मा शोधून देणं असो किंवा नवीन साडी नेसल्यावर दाद मिळवायची असो, आपल्या अहो-अगं शिवाय पान हलत नाही.
विश्वासाच्या आधारावर सुरू झालेलं हे नातं नवीन लग्न झाल्यापासून शेवटपर्यंत अधिक घट्ट होत जातं,,, मग त्यात कितीही ग्रहणे येवोत, हे ऋणानुबंध अधिक घट्ट होत राहतात. बहुतांशी आढळणारा एकाचा तापटपणा दुसऱ्याच्या शितलतेमुळे एकमेकांना पुरकच ठरतो.
यात अपवादात्मक परिस्थितीत मध्ये मध्ये कधीतरी असं होत असतं की दोघंही एकदम तापतात अन त्यांवर अवलंबून असणाऱ्या गरीब बापड्या प्राणीमात्रांची उपासमार घडते,,, पण बहुधा हे प्रकरण काही काळात शांत होत आणि बाहेरून एखादा थंडगार शिडकावा होताच वातावरण पुन्हा प्रसन्न होतं...
हे सगळं आत्ताच सांगण्याचं कारण काय, तर त्या जपान्यांनी कितीही आणि काहीही अर्थ सांगितले तरी, भारतीयांना जी गोष्ट परंपरागत पध्दतीने माहिती आहे आणि आधुनिक शास्त्रज्ञांनी काही दशकांपूर्वी जे सिध्द केलंय, की सूर्य हा एका जागी स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते,,,
त्यावरून आता तुम्हीच ठरवा,
कोणतं अहो घ्यायचं?
भारतीय की जपानी...
Comments
Post a Comment