नियतकालिकांचं माझ्या जीवनातील स्थान
"राजा तू बोललास आणि हा मी
चाललो"
अशा वाक्याने संपणारी ती गोष्ट आजही अनेकांच्या
लक्षात असेल. अर्थातच याचं कारण या वाक्यानंतर लागुन राहणारी उत्सुकता, उत्कंठा आणि भोळा आशावाद
की निदान पुढील कथेत तरी राजा न बोलता आपला कार्यभाग पुर्ण करेल आणि त्या वेताळाला
आपल्या सोबत घेऊन जाईल. पण मग त्याला प्रश्नाचं उत्तर येत असताना तो नाही बोलला
आणि डोक्याची शंभर शकले झाली तर ? ही भीती असायचीच.
आता वयाच्या अर्धशतकीय पारीच्या उंबरठ्यावर
असलेल्या आणि ती पार केलेल्या पिढीने अनुभवलेल्या चांदोबाच्या अंकातील
विक्रम-वेताळाची कथा, ही नियतकालिकाशी जुळलेलं नातं दाखवणारी एक आठवण, आजही बहुतेकांच्या मनात
कुठेतरी एक कोपरा व्यापुन उरली असेल. यासोबतच येणारे 'चंपक' सारखे अंक, आमच्या आयुष्यात वाचनाची
गोडी निर्माण करणारी सुरुवातीची साधनं. त्याकाळात श्यामची आई हे पुस्तक जितकं
प्रिय होतं तितकंच, आम्हां बाल वाचकाना नियमीतपणे निरनिराळ्या कथा घेऊन येणारे असे काही अंकही
आवडत. ज्यातुन मनोरंजनासोबत महिती मिळत असे आणि प्रबोधनही होत असे.
यापुढची माझ्या लक्षात राहिलेली आणि ज्याचे
आम्ही नियमीत वाचक बनलो अशी नियतकालिके दोन प्रकारची; वर्षातुन एकदा येणारा
दिवाळी अंक आणि काही साप्ताहिके, मासिके. यात अगदी आवर्जुन नावे घ्यावीत असे... चित्रलेखा, जी. यात येणारी शब्दकोडी
सोडवणे हा एक चढाओढीचा कार्यक्रम असे. मनोरंजनासोबतच शब्दसंग्रह वाढण्यात या
कोड्यांचा निश्चितच हातभार लागला आहे. करमणुक आणि फिल्मी दुनियेची जी काही खबर यामधुन
मिळत असे ती आमच्यासाठी पुरेशी असल्याने आम्ही इतर कसल्याच मासिकांच्या वाट्याला
कधी गेलो नाही.
नाही म्हणायला, सलुनमध्ये केस कापायला
गेल्यावर, आपला नंबर
येईपर्यंत वाट बघण्याच्या त्या छोट्याशा अवधीत थोडासा आस्वाद नक्कीच घ्यायला मिळायचा, अशा अंकात प्रामुख्याने
रसरंग, स्क्रीन, ब्लीट्झ अशा चकचकीत आणि
गुळगुळीत पानांच्या, पानभर फोटो असणार्या काही मासिकांचा समावेश होऊ शकेल. या सगळ्या आठवणीतल्या
कप्प्यांमध्ये एक कोपरा व्यापुन बसलंय ते इंग्रजी 'रीडर्स डायजेस्ट'. जगभरातली अद्भुत माहिती, विविध संशोधने, अनेक विक्रम यासोबत हलके
फुलके विनोद यानी ठासुन भरलेल्या या छोटेखानी पुस्तकाने आमची इंग्रजीची भीती कमी
करून संवादशैली सुधारण्यासाठी, नवनवे इंग्रजी शब्द आणि त्यांचा दैनंदिन उपयोग करण्यासाठी
खुप मोलाची मदत केली आहे.
दुसरा प्रकार दिवाळी अंकांचा; विविध विषयांना, विविध कलांना, निरनिराळ्या क्षेत्रांना
वाहुन घेतलेले अनेक दिवाळी अंक वाचायला मिळाले. वडिलांच्या संस्कारांमुळे असे जुने
अंक शोधुन आणुन आम्ही आमची वाचनाची आवड जोपासत राहिलो. त्यातही भर असायचा तो
विनोदी कथा, ग्रामीण कथा, पोलिसी तपासाच्या कथा अशा
विषयांकडे. याबरोबरीने शतायुषी
सारखे आरोग्य विषयक अंक आजही माझ्या संग्रही आहेत. याचदरम्यान चारचौघी आणि
गृहशोभिका अशा काही नियतकालिकांनी आमच्या घरात स्थान पटकावलं होतंच.
गेल्या दोन दशकांमध्ये तंत्रज्ञानात आणि
मुद्रणक्षेत्रात झालेल्या बदलांमुळे, तसेच इंटरनेटमुळे सदा सर्वकाळ उपलब्ध झालेल्या
अफाट माहितीमुळे मुद्रित किंवा छापील
नियतकालिकांची गरज काही अंशी कमी होऊ लागली आहे. जुने किंवा नवे दिवाळी अंक तसेच
विशिष्ट विषयासाठी काढलेले मासिक अंक मिळवुन ते भविष्यातील उपयोगासाठी जपुन
ठेवायची वृत्ती कमी होत आहे. दुरचित्रवाणीवरील विविध वाहिन्या, युट्युब सारखी काही माध्यमे आणि फेसबुक, व्हाट्सअॅप सारखी काही समाजमाध्यमे यावरुन खर्याखोट्या माहितीचा ओघ सतत
वाहत असतो, ज्याची शहानिशा करुन योग्य ती माहिती, ज्ञान म्हणुन साठवुन ठेवण्याची तसदी घेतानाही आजकाल कुणी दिसत नाही.
दोन तीन शतकांपुर्वी जेव्हापासुन नियतकालिकाना
सुरुवात झाली, तेव्हापासुन खराब
होऊ शकत असणार्या, नाशवंत अशा कागदावर छापलेली माहिती जपुन ठेवण्याकडे कल असायचा, त्यात बदल होत होत
कायमस्वरुपी साठवुन ठेवता येईल असे संगणक आणि त्यापुढे जाऊन इंटरनेट सारखे माध्यम
हाताशी आल्यावर माहिती तर साठवता येऊ लागली. पण मला वाटतं तितकीच बेफिकीरीची
वृत्ती वाढु लागली. एखादं चांगलं वाक्य, एखादी कथा, कविता, विनोद असं काहीही वाचल्यावर त्याची नोंद करून
ठेवायची आणि पुढे कधीतरी जुनं साहित्य चाळुन त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा अशा
सवयी लोप पाऊ लागल्या. आता काही हवं असल्यास ते इंटरनेटवर मिळवायचा प्रयत्न होतो, पण त्याचमुळे ते हवं
तेव्हा उपलब्ध होणार या विश्वासापायी दुर्लक्षही केलं जातं.
पण याचीच दुसरी जमेची बाजु म्हणजे किंडल सारखी
माध्यमे, इ-साहित्य सारख्या
काही चळवळीतुन वाचनाच्या सवयी हळुहळु वाढु लागताहेत, आणि लेखकाला एकाच वेळी
अगणित वाचकांपर्यंत पोचायची संधी मिळु लागली आहे.
यात टप्प्याटप्प्याने सादर होणार्या साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक अंकांचा
निश्चितच मोलाचा वाटा असणार आहे. कारण बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे आणि
इ-साहित्यामुळे वाचनाच्या वाढणार्या सवयीतुन, संग्रह करता येतील अशा मुद्रीत साहित्याकडे
वाचकांचा ओढा पुन्हा एकदा वाढेल अशी मला खात्री आहे.
प्रविण धुरी ( फेब्रुवारी 2020 )
_______ ----__________
चित्र: https://bahuvidh.com/editorial/375

छान, काही जुन्या पुस्तकांची आठवण झाली.
ReplyDelete