गृप-डिस्कशन

  

  tips for group discussion for job


गृप-डिस्कशन

    बीएससी झाली, रिझल्ट लागला, आणि चारचौघां प्रमाणे चंदूसुध्दा मुंबईच्या वाटेने निघाला.  कोकणातल्या सुशिक्षित तरुणांना आपले करिअर घडवण्यासाठी म्हणजे नोकरी करून चार दिडक्या गाठीला जमवण्यासाठी जे काही पर्याय असतात, त्यातलाच एक म्हणजे मुंबईनगरी. नोकरी मिळवायची,  चार कमवायचे, दोन खर्चायचे, एक गावाला अन एक गाठीला,  असं सगळं गणित आधीच ठरलेलं असतं.

    मग त्यातूनच पुढे लग्न,  उपनगरात एखादं वन-रुम-किचन असं सगळं जुळवून आणायचं हे ओघाने आलंच.

    तर, चंदू आला मुंबई नावाच्या महानगरीत.  गाव सोडताना बाबांनी दिलेले पाचशे रुपये आणि एका मित्राच्या वडिलांनी दिलेले पाचशे असे गाठीला हजार रुपयांचं भांडवल.  ज्यात पहिला पगार येत नाही तोपर्यंत भागवायचं,  आणि त्यात तो कधी येईल हेही माहीत नाही.  अशा बेभरवशाच्या काळात असलेले/झालेले मित्र हे देवासारखे भासतात.

    चंदुचा असाच एक मित्र-देवा, सहदेव नांव त्याचं, पण देवा म्हणूनच ओळखायचे सगळे.  आणि खरंच देवासारखा धावायचा सगळ्यांसाठी.  

    हा देवासुध्दा बीएस्सी करून वर्षभर आधी मुंबईत आला,  आपल्या एका नातेवाईकांच्या सहा सदस्यांच्या कुटूंबासोबत, एका खोलीच्या संसारात राहुन,  बाहेरच्या पडवीत झोपून भावी सुखी आयुष्याची मोठी स्वप्न बघत होता.

    स्वप्नांची पण एक गंमत असते, त्यांना पडायला कोणतीही जागा चालते,  मऊशार गादी असो की कडक काँक्रीट, संगमरवरी थंड की शेण सारवलेली गारेगार जमीन, स्वप्न कुठेही ( धड)पडतातच.

    असा हा स्वप्नाळू देवा, एका कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR ची नोकरी करत होता. MR ची म्हणजे खरं तर सेल्सची नोकरी, पण गळ्यात टाय,  हातात बॅग आणि पायात नेहमी पॉलिश केलेले बूट यामुळे थोडं वलय आणि बघणाऱ्यांच्या नजरेत प्रतिष्ठा असलेली.

    देवाला माहीत होतं की बीएस्सी केल्यावर ही MR ची नोकरी पटकन मिळून जाते,  आणि याला असलेल्या वलयामुळे बेकार पण होतकरू उमेदवार पटकन तयारही होतात. संधी दिसली की तिथे देवा आपल्या मित्रमंडळीना पाठवून देई,

     'मन्या, उद्या सनमध्ये जाऊन ये, सांताक्रूझ बांद्रा ओपन झालाय',  किंवा कधी तरी नाक्यावर भेटला की,

     'सुनील, अरे मालाडचा तो मोऱ्या ग्लॅक्सोला गेला नारे, बघना आपल्या बंड्यासाठी कॅम्लिनमध्ये', असं म्हणून सावंताच्या सुनीलला गळ घालायचा.

    आठवड्याभरापूर्वी चंदू मुंबईत आला, गोरेगावला आरे रोडला मामेभावा सोबत रहायला लागला.  आणि आज संध्याकाळी देवाने दिलेल्या निरोपाप्रमाणे त्याला स्टेशनला भेटण्यासाठी आला होता.

उकाळा Ukala Marathi Recipe - YouTube

    आठ चाळिसला, पंधरा मिनिटं वाट बघितल्यावर, देवा आला. त्याचं चकचकीत टायमधलं 'जेंटलमनी' रूप बघून, चंदूचे डोळे आणि तोंड आवासल्या अवस्थेत अन चंदू स्वतः संमोहित अवस्थेत होता.

    तशाच भारलेल्या स्थितीत त्याने देवाच्या मागून चालायला सुरुवात केली.  स्टेशनसमोरच्या चहाच्या दुकानात गेल्यावर एका टेबलावर दोघे बसले.  देवाने दोन 'उकाला'ची ऑर्डर दिली आणि

        'क्या हाल है मदनभाई? आज गिऱ्हाईक कमती है, क्या बात है?' असं म्हणून चौकशी केली.

    देवाची असलेली ओळख आणि आपुलकी बघून चंदू अधिकच भारावला.  आता यापुढे त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात देववाणीच.

        'चंदू, अरे काय विचारतोय मी? जाशील ना उद्या?'

    आणि चंदू भानावर आला,

        ' अं, ,,, हो हो... नक्की, जाईन ना!'

        'बरं, हा घे त्यांचा अॅड्रेस,  शारदा फार्मा, पार्ल्याला जा, पूर्वेला स्टेशनपासून जवळच आहे.'

        ' ठीक आहे.'

        'संध्याकाळी परत इकडेच भेट, बोलू मग बाकीचं.'

 

    दहा मिनिटानंतर 'उकाला' पिऊन, आतल्या फुटणाऱ्या आनंदाच्या उकळ्यांना कसंबसं आवरत,  चंदू तिथून बाहेर पडला,  आणि घराच्या दिशेने निघाला.  पहिल्या इंटरव्ह्यूला जायचं होतं उद्या आणि तो आतापासूनच आनंदाच्या भरात चालत चालत, चालत कसला मनातून उडतच घरी पोचला.

    सकाळी जेव्हा हातातील फाईल सांभाळत, टायची गाठ नीट करत चंदू पार्ला स्टेशनवर उतरला,  तेव्हा खरंतर घामाघूम झाला होता. दोन मिनिटं फॅनखाली उभं राहून मग बूट-पॉलिशवाल्याकडे जाऊन 'शूज' चमकवून घेतले.  मनातून वाटणारी पहिल्या इंटरव्ह्यूची भीती आतल्या आत दाबत चंदूने स्टेशनचा जिना चढून चालायला सुरुवात केली. देवाने समजावलेल्या रस्त्यावर चालत जाताना अगदी सहाव्या मिनिटाला 'शारदा' हे नाव दिसलं. खूप बरं वाटलं. कंपनीसमोर उभं राहिल्यावर, एखादी लपवलेली गुहा शोधल्यासारखा आनंद झाला. उगाचच, अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटलं.

    वॉचमनच्या नजरेत कौतुकासोबत दडलेला आणखी एक अनोळखी भाव कसला,  याचा विचार करतच तो रिसेप्शनला पोचला.  दरवाजातून आत येताच, आता प्रथमच त्याला एसीचा गारवा जाणवला आणि चेहऱ्यावर असलेल्या घामाची जाणीव झाली.  त्याने खिशातुन रुमाल काढुन त्याने चेहरा पुसतच रिसेप्शनवरच्या मुलीला नाव सांगितलं,

        'गुड मॉर्निंग, आय अॅम चंद्रकांत मारकडे'.

        'गुडमॉर्निंग, यु कॅन सीट इनसाईड'.

    छानसं हसत तिने एका दिशेने  'अंगुलीनिर्देश' केला.

    आणि तिने दाखवलेल्या दरवाज्यातून चंदू आत शिरला. एवढा वेळ 'विशेष' असण्याचं आलेलं फिलिंग,  आत शिरताच अचानक गायब झालं. तिथल्या बारा-पंधरा उमेदवारांच्या गर्दीत चंदू अचानक हरवून गेला. एका रिकाम्या खुर्चीवर बसल्यानंतर त्याला थोडं बरं वाटलं, त्या गर्दीचा आता आधार वाटला.

        'हॅलो, मी चंदू'

        'हॅलो, मी नितीन.'

    देवाच्या 'टीप'चा फायदा झाला. बाजूच्या माणसाबरोबर बोलल्यावर थोडं हलकं वाटलं.

        'बहुत गर्दी है ना?'

        ' दो राउंड हो गया, वॉकइन है ना, लोग आते रहेंगे, शामतक चलेगा ये.'

        'मेरा फर्स्ट टाइम है'.

        'अच्छा ! फ्रेशर हो, तो चान्स लग सकता है.'

        'फ्रेशर को लेंगे क्या?'

        'कम पगार में मिल जाते है.'

 

group of people waiting to interview - Urgenci | Recruitment ...

    आतून थोडं बरं वाटलं, म्हणून अजून बोलणं सुरू ठेवलं.

        'कितने राउंड होते है?'

        'पहला  'ग्रुपडिस्कशन'  और बाद में  'पर्सनल राउंड'.  सिलेक्ट हुआ तो सीधा लेटर मिल जाता है'.

    इतक्यात एका खोलीतून पाच-सहाजण बाहेर आले, त्यातील दोघांना एका वेगळ्या रूम मध्ये बसवण्यात आलं.

    इतक्यात एका माणसाने येऊन नांव वाचली, नितीनसह सहा जणांना एका खोलीत पाठवलं,  दुसरा एक सहा जणांचा ग्रुप दुसऱ्या खोलीत गेला.

    आता तिथे चार-पाचजण उरले होते. चंदुचा नंबर पुढच्या ग्रुपमध्ये लागणार होता, आता त्याची छाती अधिकच धडधडायला लागली. आतापर्यंत आणखी तीन-चार नवीन उमेदवार येऊन बसले होते.

    ग्रुप-डिस्कशन हा प्रकार चंदुसाठी नवीन होता, त्यात पहिलाच इंटरव्ह्यू,  देवाने सुद्धा काही विशेष माहिती दिली नव्हती, त्यामुळे ही खिंड त्यालाच लढायला लागणार होती.

 

        'मिस्टर चंद्रकांत'

    त्याच्या नावाचा पुकारा होताच तो उठून उभा राहिला,  इतर पाच जणांसोबत चंदू एका खोलीत गेला आणि तिथल्या खुर्चीवर बसला. बाकीचे पाचहीजण पूर्ण तयारीनिशी असल्याचे लक्षात येताच, चंदूने मनातल्या मनात कितीची गाडी पकडायची याचं गणित केलं आणि पुढे काय होतंय त्याची वाट बघत बसला.

    बाहेर असताना त्याला ग्रुप-डिस्कशनच्या विषयाबद्दल समजलं होतं, त्यानंतर चंदूने मनोमन काही ठरवलं, आणि म्हणून तो आता बिनधास्तपणे पुढची वाट बघत होता.

    दोनच मिनिटात एक साधारण पंचेचाळीशीची व्यक्ती आत आली, आणि पुन्हा एकदा सर्वांची नांव वाचून हजेरी घेतली.

        'धिस इज युअर फर्स्ट राउंड, गृप- डिस्कशन.  यु विल गेट फाईव्ह मिनिट्स टू शेअर युअर थॉट्स.

    टुडेज्  टॉपीक,  इज मंडल आयोग अँड इट्स रेकमंडेशन ऑफ रिझर्वेशन युजफुल फॉर धी सोसायटी?'

    आणि मग भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत म्हणाला, ' युअर टाईम स्टार्ट्स.... नाऊ'.


Group Discussion Cracking Tips in Hindi - BehtarLife.com 

    पहिलाच इंटरव्ह्यू, त्यात इंग्रजीचे वांदे,  आणि आता इतक्या सगळ्यांसमोर इंग्रजीतुन वाद घालायचा म्हणजे चंदुसाठी बीएस्सीच्या फिजिकल केमिस्ट्रीपेक्षा कठीण पेपर होता.

    त्याच्या उजव्या हाताला बसलेल्या एकाने एव्हाना बोलायला सुरू केलं होतं.

        ' धिस कमिशन गेव्ह सजेशन्स फॉर ओबीसी...'

    त्याचं बोलून पूर्ण व्हायच्या आत समोर बसलेला दुसरा एकजण बोलू लागला,

        'बट धिस इज नॉट करेक्ट वे,  रिझर्वेशन नेव्हर हेल्पड...'

        ‘…..’

    ...आणि बरंच काही.

 

    आतापर्यंत चंदू काहीच बोलला नव्हता, बोलणाऱ्या इतर पात्रांकडे तो आळीपाळीने शांतपणे पहात होता. मनाशी आधीच ठामपणे ठरवलेलं असल्याने तो या सगळ्याचा आनंद घेत होता.  त्याला पुढे आपलं काय होणार याची कल्पना आली होती, म्हणून तो खूपच रिलॅक्स होता.

    मध्येच त्याची अन कंपनीच्या त्या मॅनेजरची पुसटशी नजरानजर झाली, त्याला तसं व्हायला द्यायचं नव्हतं, पण आता नजर भिडली होती, काय करणार? चंदुने पटकन संभाषणाकडे लक्ष वळवलं, तिघे अजून तावातावाने चालूच होते. त्यात आता इतर दोघे जमेल तसं आपलं घोडं दामटवायचा प्रयत्न करत होते.

 

    इतक्यात मॅनेजरचे शब्द कानावर पडले,

        'ओके, ओके, युअर टाइम इज अप. नाईस सेशन, थॅंक्यु'.

        'मिस्टर चंद्रकांत, डु यु वॉन्ट टू से समथिंग? आय गिव्ह यु वन मोर मिनिट.'

 

    चंदूने सुटलो म्हणून सोडलेला निःश्वास अर्ध्यातच अडकला.  आता काहीतरी बोलायला लागणार याची त्याला कल्पना आली. सर्व शक्ती पणाला लावून तो खुर्चीतून उठून उभा राहिला.

        'थॅंक्यु सर,' असं म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली.

 

        'सर, आय थिंक धिस गृप-डिस्कशन इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम'.

    त्याने पहिला बॉम्ब टाकला.  अचानक झालेल्या या हल्ल्याने खोलीत भयाण शांतता पसरली.

    द्युतात हरलेल्या पांडवांनी द्रौपदीला डावावर लावणं योग्य की अयोग्य असा गहन प्रश्न सोडवण्यासाठी सारे बुद्धीवंत जमलेले असताना, एका सामान्य विदुषकाने उठून द्युत खेळणेच कसे मुळात चुकीचे आहे हे ठामपणे सांगितले, तर जी अवस्था होईल तसंच काहीसं झालं होतं.

    कारण त्या क्षणापर्यंत सर्वांनी द्युत खेळणं आणि त्यात काहीही पणाला लावणं हे योग्य आहे, असंच गृहीत धरलं होतं, त्या मुळ गृहितकावरच हा आघात होता.

     तसंच काहीसं चंदूच्या या वाक्याने इथे घडलं होतं. मॅनेजरसकट सारेच आता चंदूकडे आवासून बघत होते, पुढे आणखी काय अनपेक्षित ऐकायला येणार याची प्रतिक्षा करत होते.

7 effective tips to improve your group discussion skills

        ' वी आर हिअर फॉर धी जॉब ऑफ MR अँड वी आर गोईंग टू मीट डॉक्टर्स टू एक्सप्लेन अवर प्रोडक्टस.'

     एक छोटासा पॉज घेऊन चंदूने नजर सर्वांवर फिरवली. दहा सेकंद संपले होते, अजून पन्नास सेकंद त्याला बोलायचं होतं,  दोन्हीकडून गोची होती, एकतर इंग्रजीतुन एवढा वेळ बोलायचं, आणि आता जे बोललो ते पुढे स्पष्ट करायचं.

        'छ्या! आधीच इथून बाहेर पडायला हवं होतं, आता ही आणखीन एक चूक, काय गरज होती बोलायची? सरळ सांगायचं होतं की नको आहे मला अजून वेळ आणि ही नोकरीसुद्धा. दुसरी बघितली असती, आहेत की अजून बऱ्याच कंपन्या, कुठे तरी मिळून गेली असती एखादी,  अयुबला भेटलो तर त्याच्या ओळखीने नक्की काम झालं असतं.

        काय उपयोग त्याचा? तोंड उघडलं ना इथे, आता काय तरी बोलायलाच लागणार.'

        त्या दोन-तीन सेकंदात विचारांनी डोकं भणाणून गेलं, आत गोंधळ झाला होता सगळा. तरीही जे बोललो ते पूर्ण करावंच लागलं असत.

 

      चंदू पुढे बोलू लागला.

        ' डॉक्टरस गिव्ह अस टू मिनिट्स.....

      त्यात आम्हाला कंपनी, प्रॉडक्ट्सबद्दल बोलून, सॅम्पल देऊन, एक नाही तर दोन प्रॉडक्टसाठी सपोर्ट मागायचा असतो. तिथे काय मंडल आयोगवर डिस्कशन करणार? '

        ' इन्स्टेड ऑफ धिस, अवर टॉपिक शुड बी लाईक 'ग्रोइंग TB इन इंडिया' ऑर 'हाऊ टू इन्क्रीज अवेरनेस ऑफ मलेरिया'.

        'धिसवे,,,,, डॉक्टरांच पण लक्ष तुमच्याकडे येईल, त्यांच्या कामाचं तुम्ही बोलताय. मलेरियाचे, टीबीचे पेशंट कमी होणं डॉक्टरच्या धंध्यासाठी वाईट. बट ही विल लिसन टू यु, टॉक टु यु, अँड यु विल गेट हिज अटेंशन'

        'यावर त्याच्याशी बोलणं झालं, त्यांना मतं मांडायला मिळाली, तर नंतर ते तुम्हाला नक्की सपोर्ट देतील.  त्यांनाही ब्रेक हवा असतो, कुणीतरी बोलायला हवं असतं, कुणीतरी ऐकणारा हवा असतो.  आणि त्यांच्या आवडीचं बोलायला अन समोर ऐकणारा मिळाला तर,   ही विल बी हॅपी अँड गिव्ह अस मोअरसपोर्ट.'

        'दिवसभर येणारे पेशंट आणि त्यांच्या आजारपणाच्या कहाण्या,  त्यावरची तीच अन तसलीच औषध आणि भर म्हणून दोन-चार व्हिजिटवर येणारे MR,  तेही तेच तेच विषय बोलणार. तो बिचारा डॉक्टर मनातुन वैतागलेला असतो, नकळतपणे विचारत असतो आपल्याला,,, अरे, मी कधी बोलू? माझं कोण ऐकणार?,,, मला ही बोलायचं आहे, यापेक्षा वेगळं किंवा यातलंच, पण माझ्या आवडीचं'.

        'देअरफोर वी शुड नॉट हॅव गृप-डिस्कशन,  इन्स्टेड वी शुड लर्न टू लिसन टू अदर्स, अँड लिसन कामली अँड केअरफुली'.

 

        'थँक्स' असं म्हणून चंदू खाली बसला. त्याला आता पाणी हवं होतं, एवढा वेळ बोलल्यावर त्याच्या घशाला कोरड पडली होती,  तळहातांना घाम आला होता.

       मागच्या एका मिनिटात तो काय बोलला हे त्याला परत विचारलं असतं तर आता काही आठवणार नव्हतं.

    खोलीत पसरलेली शांतता मॅनेजरच्या आवाजानेच भंग झाली.

        ' ओके, वेट फॉर फ्यु मिनिट्स हिअर',  आणि तो तडक बाहेर निघून गेला.

 

     चंदूने खिशातून रुमाल काढून हात आणि चेहरा पुसला, आणि आपली फाईल हातात घेऊन बसून राहिला.  काही वेळापूर्वी तावातावाने एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्यापैकी कुणीही काहीच बोलायला तयार नव्हता.

    पुढची काही मिनिटं अशाच अस्वस्थतेत गेली, काहीच समजतं नव्हतं. प्रत्येकजण बाहेरच कानोसा घेत होता.

 

      इतक्यात,  दुसरीच एक व्यक्ती खोलीत आली आणि चौघांना बोलावून बाहेर नेलं,  चंदू आणि एक मुलगा तिथेच राहिले.

`      चंदूच्या लक्षात आलं, त्याने घडाळ्यावर नजर टाकली, एक पंधरा, म्हणजे अडीच वाजेपर्यंत रूमवर पोचू शकत होता, मेसवर मावशीकडे जेवायला जाता येणार होतं. दुपारी थोडी झोप काढायची आणि संध्याकाळी देवाला भेटून काय सांगायचं, याची आखणी तो मनातल्या मनात करू लागला.

      समोरच्या माणसाची चुळबुळ त्याच्या लक्षात आली.

 

        'क्या हुआं?'

        'वेस्टर्न लाईन का चार व्हेकन्सि अभी खाली है,  इनको लेगया मतलब लगताय अपना काम नहीं होगा.'

        'किधर रहते हो?'

        'दहिसर, और तुम?'

        'गोरेगाव.'

 

    मघाचीच व्यक्ती आत आली अन दोघांना सोबत घेऊन गेली. चंदूला एका केबिनमध्ये जायला सांगितलं अन दहिसरवाला दुसऱ्या.

    दारावर टकटक करून ते उघडून आत पाउल टाकताच,

        'येस, मिस्टर चंद्रकांत, कम इन' असा आवाज चंदूच्या कानावर पडला.

        ' सीट डाऊन.'

    चंदू अवघडल्या अवस्थेत खुर्चीत स्थिरावला. आता काय ऐकायला मिळणार या विचारांनी तो शांत बसून राहिला. मघाशी केलेला शहाणपणा आता निस्तरावा लागणार होता, गृप-डिस्कशनमधून वाचलो, पण आता इथे मंडल आयोग चाल करून आला तर त्याला सामोरं कसं जायचं या विचारांनी चंदू अधिकच अस्वस्थ झाला.

        ' बी कम्फर्टेबल.'

      बसल्या बसल्या चंदूने टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाकडे आशाळभूतपणे पाहिलं, आणि लगेच समोर बसलेल्या व्यक्तीकडे नजर वळवली. इतक्या वर्षांचा अनुभव गाठीला असलेल्या त्या मॅनेजरच्या लक्षात आलं असावं, त्याने ग्लास पुढे सरकवला. चंदूने स्वतःवर जमेल तितका ताबा ठेवत ग्लास रिकामा करून खाली ठेवला. घसा मोकळा झाला, छातीतील धडधड थोडीशी कमी झाल्यासारखं वाटलं.

Personal Interview Tips | Personal Interview for Jobs after MBA ... 

        'सो, मिस्टर चंद्रकांत, टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ.'

    आणि इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. सात एक मिनिटानंतर बरीचशी प्रश्नोत्तरे झाल्यावर मॅनेजर बोलला,

        'वेल, मिस्टर चंद्रकांत, वी आर हॅपी वुइथ युअर परफॉर्मन्स. बिफोर वी मेक एनी फायनल ऑफर टू यु, लेट मी टेल यु समथिंग,,, आय पर्सनली लाईक युअर व्ह्यू इन धी गृप डिस्कशन.  यु एक्सप्रेसड युअरसेल्फ फ्रीली विदाऊट एनी वरी.....'

        'फायनल ऑफर' या दोन शब्दांच्या पुढे जे काही मॅनेजर बोलत होता ते चंदूच्या कानावर आदळत होतं पण मेंदूच्या ग्रहण-बिंदूपर्यंत पोचतच नसावं. त्यामुळे चेहऱ्यावर पसरलेलं हलकसं स्मित तसंच ठेवून तो फक्त ऐकत होता. मघाशी डोळ्यात दाटलेली काळजी हळूहळू जमा होत असलेल्या पाण्यात विरघळत चालली होती.

Envelope With Job Offer Letter . 3d Rendering Stock Illustration ...

        'कीप इट अप, ऑल दि बेस्ट फॉर यु!'

      असं म्हणत मॅनेजर उठून उभा राहिला तेव्हा चंदू भानावर आला.  त्याने हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात हातात घेऊन  'थॅंक्यु'  एवढंच काय ते तो बोलू शकला.

      ऑफर लेटरसाठी भरायचा फॉर्म घेऊन जेव्हा चंदू केबिनच्या बाहेर आला तेव्हा त्याला काहीच सुचत नव्हतं. भारावल्या स्थितीत समोरच दिसणाऱ्या खुर्चीत बसून त्याने फॉर्म भरला, आणि तो टेबलामागे बसलेल्या माणसाच्या हातात दिला.

        सगळं अगदी सिनेमात किंवा कादंबरीत असतं तसं स्वप्नवत होतं.

        दोन पंचवीसची लोकल पकडताना त्याच्या फाईलमध्ये 'शारदा'च्या लेटरहेडवरचं अंधेरी या एरियासाठीच ऑफर लेटर होतं. मेसवर जेवण मिळेल की नाही याची आता चिंता नव्हती. मंडल-आयोग काय हेच मुळात आपल्याला माहीत नव्हतं हे आता त्याच्या लक्षात आलं. आज प्रसंग निभावून गेला पण असं रोज रोज होणार नाही,  थोडं थोडं वाचन रोज करायचं,  कमीत कमी वर्तमानपत्र नियमित वाचायचं असं मनाशी ठरवून त्याने समाधानाने स्मितकेलं... आता कधी एकदा  'देव'दर्शन करून सगळं त्याला सांगतो असं झालं होतं.

       मंडल-आयोग, रिझर्वेशन आणि गृप-डिस्कशन याचा कसलाही वापर करता त्याला आज नोकरी मिळाली होती.  

~~~~~~~

        'अहो ! चला आता आंघोळीला. त्या गृपवरच्या डिस्कशनमधून काही मिळणार नाहीये, इथे आपलं आपल्यालाच बघायचं आहे, कितीही चर्चा केलात तरी प्रत्यक्षात काही आणाल तेव्हाच काहीतरी गिळायला मिळेल, नाहीतर पुरणपोळ्या काय, करंज्या काय, आणि माशांची नाव काय, सारं फक्त गृप-डिस्कशनच.'

      बायकोच्या आवाजाने चंदू भानावर आला आणि बाथरूमकडे जाता जाता विचार करू लागला,

        आज पंचवीस वर्षांनी परिस्थिती तशीच आहे, मोठासा फरक नाही पडला, तेव्हाही गृप-डिस्कशनचा उपयोग नव्हता नि आजही फारसा नाहीये,  फक्त आपल्याला येतं म्हणून मनाचं समाधान.

~~~~~~~~~ ~~~~~~~~~ ~~~~~~

(ही कथा सत्य प्रसंगावर बेतलेली पण पूर्णपणे काल्पनिक आहे. यातील प्रसंग तसेच पात्रांची आणि स्थळांची नावे, याचा कुणाशी संबंध दिसून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

प्रविण धुरी (मार्च, २०१९)


Comments

  1. लेख खूप मस्त होता..मला माझ्या फर्स्ट interview ची आठवण आली..

    ReplyDelete
  2. वा, खूप छान कथा.. आज पन्नास ग्रुप वर रोज
    आभासी चर्चा सत्रांमध्ये वावरणाऱ्या माणसांना त्यातील फोलपणा अगदी चपखल शब्दात सांगणारी... मस्त 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment