गुरू आणि शिक्षक


गुरू आणि शिक्षक

आमच्या एका गृपवर गुरू आणि शिक्षक या विषयावर एक चर्चा रंगलेली होती. त्यात अनेक उदाहरणे घेत विविध मित्रानी आपली मते व्यक्त केली. खुप मुद्देसुद आणि अतिशय सुंदर, विचारप्रवर्तक विश्लेषणयुक्त अशी ही चर्चा ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलेले काही मुद्दे असे होते -

१. गुरू हा निस्संग, संन्यासी वृत्तीचा, निस्वार्थ, मोहमायेत न गुंतणारा, आणि तत्वज्ञानावर आधारित शिकवण देणारा असा असतो, किंवा असावा,

तर,

२. शिक्षक हे गुरूचं कालानुरूप बदललेलं रूप, ज्यात तत्वज्ञान मागे पडून व्यवहारावर आधारित शिकवण हा पाया बनत गेला, आणि यातील दोन्ही घटक आपापल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी व्यवहार करत कार्य करू लागले.

सांदीपनी - कृष्ण आणि रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद, या गुरु-शिष्यांच्या जोड्या सर्वानाच ठाऊक आहेत.

चर्चेदरम्यान एक मुद्दा असा होता की गुरू आणि शिक्षक यातील फरक बघताना, यश-अपयशाची आणि सोबतच त्याबदल्यात दिल्या-घेतल्या जाणाऱ्या मोबदल्याची मोजपट्टी लावणे आवश्यक आहे.

त्याचाच आधार घेतला तर, वर उल्लेख आलेल्या दोन्ही गुरूंना सुध्दा ती लावावी लागेल, त्यातील मोबदल्याचा मुद्दा काही काळ बाजूला ठेवू, आणि यशापयाशाची पट्टी आधी वापरुन बघु.

या जोडीतील गुरुचे महत्व निश्चितच आहे, पण माझ्या मते ते शिष्य डोळ्यासमोर ठेवून बघितल्यामुळे जास्त अधोरेखित झाले आहे.

या सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कृष्णासमवेत इतरही अनेक शिष्य शिकले असतील, कृष्ण तिकडे येण्यापूर्वी आणि तो येऊन गेल्यानंतरही, तरीही त्यांची थोरवी सांगताना नाव कृष्णाचेच घेतले जाते. माझ्या माहितीप्रमाणे बलराम आणि सुदामा सुध्दा शिकायला तिथेच होते,

आणि नंतर आपण कृष्ण सुदामा यांच्या मैत्रीची कथा वाचतो तेव्हा सुदामाचं आयुष्यातील यश हे कृष्णापेक्षा भिन्न असतं, तरीही गुरुशिष्य ही जोडी मात्र सांदीपनी-कृष्ण अशीच येते.

 

रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या जोडीला सुध्दा अशाच पातळीवर बघितलं तर नेमके असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. नरेन्द्र नामक युवकाचा स्वामी विवेकानंद होण्यात रामकृष्णांचा मोठा वाटा आहे, पण त्यांच्या समकालीन इतर शिष्यांचे काय? त्यांच्या आयुष्यात आलेल्या यश-अपयशाचे काय?

 गुरू म्हणून या दोन्ही व्यक्ती महानच आहेत. मला तरी वाटतं की त्यांनी निस्संग, निस्वार्थ भावनेने शिकवण दिली असावी आणि तीही आपल्या सर्वच शिष्याना... एकसमान.

असं असुनही गुरुची जोडी फक्त एकाच शिष्याबरोबर का?

 

थोडं अलीकडच्या काळात येऊ, सचिनला घडवणारे द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या रमाकांत आचरेकर सर. त्यांना आजही सचिनचे प्रशिक्षक असेच बघितले जाते. सचिनने घेतलेली त्यांची भेट, आणि त्याची सरांप्रति असलेली भावना याकडे सर्व जग वेगळ्याच आदराने बघते.

पण याच सरांनी इतरही अनेक शिष्य घडवले असतील, त्यातले किती यशस्वी आणि किती अपयशी झाले हे बघता येणे सोपे आहे. एक गुरू म्हणून जी भावना सचिनला प्रशिक्षण देताना होती, तीच भावना इतरही मुलांच्या बाबत असावी, कारण त्याकाळी सचिन 'सचिन' झाला नव्हता. जसा कान्हा 'कृष्ण' झाला नव्हता आणि नरेंद्र 'स्वामी विवेकानंद' झाला नव्हता.

आज मागे वळून बघताना आपण, भगवद्गीता सांगणारा कृष्ण, स्वामी विवेकानंद, आणि विक्रमादित्य सचिन असे बघत असतो आणि त्यांच्या गुरुची जोडी शिष्यासमवेत जमवून विवेचन करतो.

जर अपयशाचा विचार करायचा झाला तर कदाचित या गुरूंच्या पदरात अनेक पटीने अपयश पडू शकते.

 

म्हणून आता मुद्दा येऊ शकतो, मोबदल्याचा.

या प्रत्येकाचा काळ वेगळा, त्याप्रमाणे जीवन जगण्याच्या कल्पना वेगळ्या, आणि म्हणून गरजा वेगळ्या. काळानुसार निस्संग, निस्वार्थी, संन्यासी या शब्दांच्या व्याख्या आणि संदर्भ वेगळे.

सांदीपनी ऋषींच्या काळात इतरही अनेक ऋषी आणि त्यांचे गुरुकुल असावेत, त्यांच्या शिष्यातील काही त्या त्या क्षेत्रात यशस्वी असावेत. पण एकूण व्यवस्था आणि चरितार्थ चालवण्याची पध्द्त त्या काळाला साजेशी असावी.

पुढे रामकृष्णांच्या काळात बदल झाले त्यानुसार व्याख्या बदलल्या, चरितार्थाची साधने बदलली, गरजा बदलल्या, एखादा तरीही संन्यस्त वृत्ती (जी वैयक्तिक असते) ठेवून जीवन व्यतीत करू शकला.

सचिनच्या जमान्यात येईस्तोवर व्याख्या अधिक बदलल्या, गरजा बदलल्या, चरितार्थची साधने अधिक मोठ्या प्रमाणात बदलली.

 आणि मोबदला हा निकष लावायचा ठरवला तर गुरू आणि शिक्षक ही वर्गवारी अधिक गुंतागुंतीची होतेकारण,

समजा,

एका शिक्षकाने मोबदला घेऊन सर्वांना शिक्षण दिले, नंतर जे अपयशी ठरले त्यांच्या मोबदल्याचा परतावा दिला, तर त्यांना दिलेले ज्ञान हे 'फुकट' 'मोफत' ठरते, आणि जे यशस्वी झाले त्यांनी मिळवलेले ज्ञान हे विकतचे ठरते, म्हणजेच लौकिकार्थाने दाम न घेता शिकवण देणाऱ्या गुरूकडून फक्त अपयशी शिष्यच तयार होत राहतील, आणि यशस्वी होण्यासाठी दाम मोजावे लागते म्हटले, तर निस्वार्थी ज्ञानदान करणारा तो गुरू ही संकल्पना मोडीत निघते.

याउलट, जे यशस्वी झाले त्यांना परतावा दिला, तर एका अर्थाने ते यशाचे निस्वार्थी भागीदार म्हणून गुरू ठरतील, पण अपयश मात्र दाम मोजून देत असल्याने, भविष्यात त्यांच्याकडे 'अपयश' शिकायला जाणाऱ्या शिष्यांचा तुटवडा निर्माण होऊन त्यांचे गुरुपणच धोक्यात येईल

 

 यावरून मला तरी असे वाटते की,

गुरु हा प्रथम शिक्षकच असतो, नंतर शिष्याच्या मोठेपणावर त्याला गुरुची थोरवी बहाल केली जाते.

आणि, शिक्षकाने दिलेल्या ज्ञानाच्या बदल्यात त्याला मिळणारा मोबदला विचारात घेणे सर्वस्वी चूक ठरते.

 

शिक्षकाने कोणत्या मोह-मायेपासून स्वतःला दूर ठेवावे हे काळानुसार बदलते, तरीही योग्य विद्यार्थी घडवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे हे शिक्षकाच्या हातात असते.

तसेच विद्यार्थ्यांने स्वतःला शिष्यात परिवर्तन करणे आणि आपल्या शिक्षकाला गुरुत्व बहाल करण्यासाठी प्रयत्न करणे हे त्या विद्यार्थ्याच्या हातात असते.

 

अशा प्रकारे शिक्षक-विद्यार्थी या नात्यातून दोघांच्याही सहभागाने गुरू-शिष्य ही परंपरा पुढे चालू राहू शकते.

-

प्रविण धुरी

०६ जुलै २०२०


Comments