K3G अर्थात काय कमावलं, काय गमावलं !

Latest Coronavirus News (Live Updates) 


                गेल्या वर्षीचा डिसेम्बर महिना मध्यावर आला असताना चीन देशातल्या वुहान या शहरामधुन कोरोना प्रकारातल्या विषाणु संसर्गाची सुरुवात झाली अशी बातमी आली. पुढचे पंधरा दिवस तसं फार लक्ष देण्यासारखं काही घडलं नव्हतं. उरलेलं सारं जग चीनमधुन येणार्‍या बातम्या बघत आणि त्याचे आपापल्या परीने अर्थ लावत आपलं रोजचं जीवन जगत होतं. आजकाल वर्तमानपत्र आणि टीव्हीवर दाखवल्या जाणार्‍या बातम्यांपेक्षा समाजमाध्यमांवरुन पसरणार्‍या गोष्टीना खरं मानुन जायची पद्धत आहे, त्यानुसार पुढील काही दिवसात चीनमधील असे अनेक व्हीडीओ पसरले ज्यात चीनच्या रस्त्यारस्त्यावर लोक एकतर मरताना अथवा सैनिक त्यांना पकडुन नेत असल्याचं चित्र दिसत होतं. याचवेळी या विषाणुने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती आणि त्याचे परिणाम जगातील इतर राष्ट्रांमध्ये दिसु लागले होते.

      कोणत्याही घटनेचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत असतात. ज्याचं प्रमाण अधिक, अंतिमत: निकाल त्याच्या बाजुने लागतो हा निसर्गनियम आहे. यालाच अनुसरुन कोरोनाचे विविध पातळ्यांवर, विविध घटकांवर काय काय परिणाम झाले असावेत याचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

      कोरोना सारख्या अनपेक्षित संकटाचा विचार करता त्याचे निसर्गावर आणि मानवावर निश्चितच परिणाम झाले आहेत. मानवाचाच विचार करायचा झाला तर जिथे जिथे मानवाचे अस्तित्व आहे, तिथे तिथे या विषाणुने आपले अस्तित्व दाखवले आणि त्याचा विविध स्तरांवर परिणामही दिसुन आला.  

       जागतिक स्तरावरील घडामोडींचा विचार करता, सर्वच देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले, अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडले. परिणामी बलाढ्य आणि प्रगत समजली जाणारी अनेक राष्ट्रे आणि त्यांचे प्रमुख परिस्थिती हाताळताना हतबल झालेले पहायला मिळाले. चीन सारख्या देशावर हा विषाणु कृत्रिमरित्या तयार करण्याचा संशय असल्याने अनेक देशानी चीनसोबतचे आपले आंतरराष्ट्रीय व्यवहार कमी केले, अथवा त्यावर मर्यादा आणल्या. चीन मधील एककल्ली विचारसरणीची महत्वाकांक्षी राजवट आणि गेल्या काही वर्षामध्ये चीनची अफाट वेगाने झालेली प्रगती, त्यांच्याकडील उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठांवर कब्जा करायची पध्दती या सगळ्यामुळे चीनचा पाय अधिकच खोलात गेल्याचे चित्र निर्माण झाले. सर्वच पातळ्यांवर अमेरिकेचे आणि युरोपातील देशांचे झालेले नुकसान बघता त्यानी कठोर पावले उचलणे अपेक्षितच होते. अमेरिकेने तर जागतिक आरोग्य संघटनेवर सुध्दा संशय घेतला आणि चीनला सहकार्य करत असल्याचा आरोप करुन आपला निधी रोखुन धरला. या सगळ्यात सर्वसामान्य जनतेचा विश्वास गमावण्याची वेळ संघटनेवर येऊन ठेपली. आधीच विषाणुच्या निर्मितीचा संशय आणि नंतर संसर्गामुळे होणारे मृत्यु लपवले जात असल्याची टीका यामुळे चीनकडे सगळेच संशयाने बघु लागले. या सर्वामुळे काही अंशी फायदा झाला तो भारताला, चीनमधुन बाहेर पडु पाहणार्‍या उद्योगांचे भारताने स्वागतच केले. कदाचित यामुळेच चिडलेल्या चीनकडुन गलवानसारखा प्रकार नंतर घडला आणि पुन्हा एकदा भारताने उचललेल्या पावलांमुळे चीनची पंचाईत झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा डागाळण्यासाठी हे निमित्त पुरेसं होतं.

Namaste Trump - Wikipedia

      या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय पटलावरदेखील कोरोना आपल्या परिणामांची छाप सोडत होता. जगभर साथ पसरत असताना फेब्रुवारीमधील अमेरिकेच्या अध्यक्षांची नियोजित गुजरात भेट आणि भारतीय भुमीवर उतरु दिलेली परदेशी विमाने याचं पुरेसं भांडवलं केलं गेलं. डिसेंबरमध्ये सुरु झालेल्या या संसर्गाचे नेमके चित्र आणि पुर्ण अंदाज कुणालाही समजलेले नसताना सर्व थरांतुन प्रशासकीय धोरणांवर आणि पर्यायाने सरकारवर घाऊक टीकास्त्रे सोडण्याचे कार्यक्रम सुरु झाले. जसजसे संसर्गाचे प्रमाण वाढत होते, आणि जगभरातल्या मृतांचे आकडे माध्यमांमधुन समोर येत होते, तसतसे भारत अजुनही सुरक्षित असल्याची भावना जीवंत होती. पण मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतातील बाधितांचे वाढलेले आकडे आणि उपचाराअभावी मृत्यु पावणार्‍यांची संख्या वाढु लागली, आणि स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या भरभराटीत दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या वैद्यकीय सेवेचा, तिच्या क्षमतेचा मुखवटा झटक्यात फाटला. नावाजलेल्या सरकारी रुग्णालयांची क्षमता रुग्णसंख्या हाताळण्यास कमी पडु लागताच, विविध शहरात स्वतंत्र कक्ष उभारले गेले. काल परवापर्यंत वैद्यकीय व्यवसायावर संशय घेणारे, सरकारी इस्पितळाना नावे ठेवणारे अचानकपणे डॉक्टर, नर्सेसमध्ये ईश्वराचा अंश शोधु लागले.

      वैद्यकीय सेवा पुरविणारे, सुरक्षा कर्मचारी, सफाई कामगार यांच्यावरचा कामाचा ताण प्रचंड वाढला. पण त्याच बरोबरीने समाजातील विविध स्तरांमधुन या लोकांविषयी आदर व्यक्त केला जाऊ लागला. पाच मिनीटांचा थाळीनाद असो, दीप प्रज्वलन असो, की रस्त्यावर, चौकाचौकात ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांना दिलेली अन्नसेवा... या सगळ्यामधुन फक्त आणि फक्त त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करणे, अथवा त्यांच्या ऋणातुन थोडेतरी उतराई होणे याच भावनांचे दर्शन झाले.

1.3 billion people. A 21-day lockdown. Can India curb the ...Silent spreaders trigger worry, relaxations come into effect ...Coronavirus lockdown: Narendra Modi has cut India's poor adriftCOVID 19 AND THE MIGRANT WORKERS IN INDIA -

      अनेक समाजसेवी संस्थानी, व्यक्तीनी, समुहानी पुढाकार घेत अन्नदान केले. हातावर पोट असणारे मजुर आणि त्यांचे कुटुंबीय, रस्त्यावरील भिकारी इतकेच काय स्थलांतर करणारा वर्ग अशा सगळ्यांसाठी अन्नछत्रे चालवली गेली. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी दिसणारे माणुसकीचे पुन्हा एकदा दर्शन घडले. संसर्गाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी घेतलेल्या लॉकडाउन सारख्या निर्णयाने कितीतरी उद्योगधंदे बंद पडले, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, कितीतरी लोक बेघर झाले, कुटुंबेच्या कुटुंबे शहरांकडुन गावाकडे स्थलांतर करु लागली, काही चालत, काही सायकल अथवा हातगाडीने तर काही मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी पोचण्याचा प्रयत्न करु लागले. शहरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमधुन संसर्ग पसरण्याचा धोका, अपुरी वैद्यकीय व्यवस्था आणि हाताला काम नसल्याने येणारी उपासमारीची वेळ यावर बहुतेकानी आपल्या गावी परतण्याचा पर्याय निवडलेला होता. त्याचे बरे वाईट परिणाम नंतर दिसुन आलेच. पण काही राज्यांमधुन या विषयाचे सुध्दा राजकारण केले गेले. कोरोना या विषयातील अर्धवट ज्ञान किंवा अपुर्‍या माहितीमुळे, भीतीपोटी, गावाच्या सीमा बंद करण्यासारखे आततायी निर्णय घेतले गेले. त्यातुन चुकीचे अर्थ लावले गेल्याने काही ठिकाणी नातेसंबंध बिघडण्याचे प्रकार घडले, तर काही ठिकाणी विलगीकरणाच्या योग्य सुविधा उपलब्ध करुन या समस्येवर तोडगा काढण्यात आला, आणि तिथे माणुसकीचे दर्शनही घडलेच.

      संसर्ग पसरु नये म्हणुन सुरुवातीच्या काळात सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांवर, एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली, त्यात जशी सिनेमागृहे, होटेल्स, रेस्टॉरंट, मॉल अशी ठिकाणे होती तशीच मंदिरे, चर्च, मशिदी अशी प्रार्थनास्थळे सुध्दा होती. याचा उद्देश होता तो गर्दी टाळणे आणि संसर्गाला आळा घालणे. पण काही माध्यमे आणि समाजमाध्यमानी यातील फक्त प्रार्थनास्थळांवर प्रश्न उपस्थित केले, देवाने केलेल्या पोबार्‍याविषयी भाष्य करुन श्रध्दा-अंधश्रध्देच्या बाजारात आपले नाणे चमकवण्याचा प्रकार केला. माणसात देव बघावा, मानवसेवा हीच ईश्वरसेवा असे उपदेश देणार्‍या संतांनी नेहमीच निर्गुण निराकाराची भक्ती केली. पण सर्वसामान्य जनांसाठी सगुण, साकार मुर्तीची आवश्यकता असते. त्यासाठीच चार लोकानी एकत्र येऊन आपली सुख-दु:खे सांगावीत, अडचणी मांडाव्यात, आणि सर्वानी मिळुन त्यातुन मार्ग काढावा या उद्देश्याने मंदिरांची, प्रार्थनास्थळांची स्थापना झाली. पण काळानुसार जशा बाकी गोष्टी बदलल्या तसेच मंदिरांचे हेतु आणि महात्म्य बदलले. गर्दी वाढली, मागणी वाढली आणि मगा पुरवठा वाढला. स्पर्धा निर्माण होताच मार्केटींगच्या तत्वाचा अवलंब केला गेला, त्यातुन अर्थकारण वाढले, आणि पुन्हा मागणी तसा पुरवठा हे चक्र असेच सुरु राहिले.

      अर्थकारण तर विज्ञानाने घडवुन आणलेल्या बदलांमुळे वैद्यक क्षेत्रातही वाढलेच. पण एकीकडे ग्राहक म्हणुन आपल्या आजारी नातेवाईकाच्या अथवा नेत्याच्या मृत्युला जबाबदार धरुन या व्यवसायातील लोकांवर हात उगारणार्‍याना अचानक त्याच कपड्यात ईश्वर दिसु लागला, जगाचा उध्दारकर्ता तारणहार दिसु लागल, हा बदला स्वागतार्हच म्हणायला हवा. पण तरीही त्या क्षेत्रातील बदललेल्या मुल्यांमुळे तो तात्पुरता असण्याची शक्यताच अधिक.  

      जसे कोरोनाच्या संसर्गाने सर्वच धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचे अवास्तव स्तोम माजवणार्‍या काहीना जमिनीवर आणले, तसेच विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील प्रगतीला अजुन किती मोठा टप्पा गाठायचा आहे याचेही भान आणुन दिले. औषध कंपन्या आणि त्यांचे संशोधक या संसार्गाची कारणे आणि त्यावरील योग्य असे उपचार शोधायच्या कामाला लागले आहेत. आज ना उद्या त्याना यश येईलच, एखादी लस किंवा औषध नक्कीच सापडेल आणि असे संसर्ग आटोक्यात येतील. पण तोपर्यंत उपलब्ध झालेल्या संधीचा काही व्यावसायिकानी पुरेपुर लाभ उठवुन घेतला. वाढणारा संसर्ग आणि रुग़्णांचे वाढते प्रमाण यामुळे खाजगी रुग्णालयातील जागादेखील कमी पडु लागल्या. परिणामी सेवेचे व्यवसायात रुपांतर झाले आणि मंदिरातुन नाहीशा झालेल्या मानवसेवेच्या ईश्वराने इथुनही काढता पाय घेतला.

COVID-19 lockdown effect: Dogs, people killing Karnataka wildlife ...India Needs A Sound Post-lockdown Strategy To Deal With Its After ...Coronavirus Lockdown: These Economic Activities Will Begin From Monday


      कोरोनामुळे बंद पडलेले व्यवसाय, नोकरी धंदे याचा परिणाम घरात, कुटुंबात झाला. अनेकाना आपल्या कुटुंबियांसोबत, मुलांसोबत, म्हातार्‍या माणसांसोबत अधिक वेळ घालवता आला. अर्थात त्याचेही बरे वाईट परिणाम आलेच. ज्यांचे कामाच्या स्वरुपामुळे दर्शनही दुर्लभ व्हायचे अशांच्या घरी असण्याने अनेकांचे संबंध अधिक दृढ झाले, तर काही घरांमधुन अति जवळीकीने ते बिघडले सुध्दा. सर्वच सदस्य सदा सर्वकाळ घरात असल्याने काही गृहीणींच्या कामाचा ताण वाढला, तर काही ठिकाणी महिला आणि पुरुष अशा दोन्ही वर्गाने पाककलेतील निरनिराळी कौशल्ये आत्मसात केली अथवा त्याचे प्रयोग केले. जगभरात इंटरनेटचा वापर खुपच वाढला, वर्क फ्रॉम होम सुरु होताच वर्क-लाईफ-बॅलन्स करणार्‍यांची तारांबळ उडाली. हळुहळु सुरु झालेल्या कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन उपस्थितीमुळे आणि त्यातुन पुर्ण होवु शकत असलेल्या कामामुळे, कंपन्यांना एक नवा मार्ग सापडला. कदाचित यातुन नजिकच्या भविष्यात ऑफिसचे नवे स्वरुप आपल्याला बघायला मिळेल. उत्पादन क्षेत्र वगळता एखाद्या कंपनीचे सत्तर पंचाहत्तर टक्के कर्मचारी घरुनच काम करतील, त्यामुळे कंपन्यांना बिल्डींग, ऑफिस, फर्निचर, प्रवास अशा प्रकारच्या खर्चाना आळा घालणे शक्य होईल. जर या मार्गाने कर्मचार्‍यांची उत्पादकता वाढु शकत असेल, तर कंपन्यांचा नफा वाढेल आणि एक नवीनच संकल्पना जन्म घेईल.

      दुसरं म्हणजे कौटुंबीक पातळीवर दुरचित्रवाणी वाहिन्यावरील दैनंदिन मालिकांचा रतीब बंद झाला आणि दुरदर्शनने अनेकाना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणीची सैर घडविली. रामायण, महाभारत, कृष्ण अशा मालिका बघताना त्यावेळचे तंत्र आता किती प्रगत झाले आहे हे जाणवुन गंमत वाटली.

      प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग आणखी एका गोष्टीसाठी झाला, शिक्षणक्षेत्र. मुलांच्या ऑनलाईन शाळा सुरु झाल्या. झुम, गुगल-मिटींग सारख्या सुविधा वापरुन शिक्षक मुलाना घरबसल्या शिकवु लागले. दुरस्थ शिक्षणाचा एक वेगळा प्रकार अस्तित्वात आला. जरी प्रत्यक्ष शाळेच्या वर्गातील शिक्षण आणि मिळणारे सर्वांगीण ज्ञान याची तुलना या नवीन पध्दतीशी होवु शकत नसली, तरीही ही येणार्‍या भविष्याची चाहुल असु शकते याची जाणीव झाली. ऊडदामाजी काळे गोरे हा नियम इथेही लागु पडला. काही शाळानी शालेय फीची सक्ती करुन आपले व्यवसायधार्जिणे रुप दाखवुन दिले, तर काही पालकानी मुलांच्या डोळ्यांच्या संभाव्य समस्यांचे कारण पुढे करत ऑनलाईन शिक्षणच नको अशी आततायी भुमिका घेतली. मुलांचे बाहेर खेळणे बंद झाले असल्यामुळे आधीच त्यांचा 'स्क्रीन-टाईम' वाढला होता, त्यात ऑनलाईन शिक्षणामुळे विकतचं दुखणं घरात येणार अशा मताच्या पालकानी मिनी-आंदोलने सुध्दा छेडली. शिक्षकवर्ग या सगळ्या नव्या पध्दतींशी झुंजत, जुळवुन घेत आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करीतच होते, पण भरीला पालकांची 'वर्गात' चालणारी लुडबुड त्यांच्यासाठी नवी डोकेदुखी बनु लागली. खेड्यापाड्यातील शाळांपर्यंत ही सुविधा पोचविण्याचे सरकारी आदेश असले, तरी नव्वदीत सुरु झालेल्या संगणकीय तंत्रज्ञानात, आपले अनेक तरुण जगभर लीलया काम करत असतानासुध्दा, आज तीस वर्षानंतरही एक देश म्हणुन आपण या तंत्रज्ञानात किती मागासलेले आहोत हे उघड झाले. 

Online classes, pre-recorded lectures, a major relief for students ...


      एकीकडे गुरु किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यामधील येणारा हा दुरावा, तर त्याचवेळी दुसरीकडे स्वत:चे सख्ये जन्मदाते, मुलं अथवा इतर नातेवाईक यांना या संसर्गामुळे मृत्यु आल्यास दिसुन येणारे दुराव्याचे दुर्दैवी प्रसंग हेही या कोरोनाची देन ठरले. अशा रुग्णाना वाळीत टाकल्यासारखे इतरांचे त्यांच्याशी वागणे असो किंवा मृत्यु झाल्यावर बेवारस अवस्थेत करावे लागणारे अंतिम विधी असोत, हे जितके भयप्रद आणि म्हणुन भावनाशुन्य होते, तितकेच माणुसकीच्या रेषेवरचे निर्दयी, निलाजरे, आणि असंवेदनशीलतेचे दुसरे टोक दाखवणारे होते. सतत माध्यमांमधुन दिसणारे मृत्युचे आकडे बघुन माणसे इतकी घाबरली की बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण पन्नास-पंचावन्न टक्क्यांच्या पुढे पोचुनही ते नेहमी दुर्लक्षितच राहिले. इतके की बारा वाजेपर्यंत बरी असणारी एखादी व्यक्ती आपला तपासणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे हे कळताचे पुढच्या तीन तासात प्राण गमावुन बसली.

      मनातले भय ही एक मोठी संधी असते आणि या भयाचा व्यापार करायला संधीसाधु टपुनच बसलेले असतात. मग ते कुणीही असतील, अंगा-धुपार्‍याचे उपाय सांगणारे, नवसाचे महात्म्य सांगणारे, गोरेपणाची गॅरंटी देणारे, जाडी कमी करण्याचे आमिष देणारे, किंवा अशा संकटकाळात जीव वाचवणार्‍या औषधाचा काळा बाजार करणारे, हे सगळेच भयाचा धंदा करणारे.  

      यातुन मग वैद्यक क्षेत्राच्या अंतर्गत शाखातील स्पर्धा, वाद तरी कसे सुटणार? प्राचीन आयुर्वेद, होमियोपथी आणि आधुनिक औषधशास्त्र या तिन्ही शाखातील मान्यवरानी आपापले उपाय सुचवले. त्या प्रत्येकावर श्रध्दा असणारा एक विशिष्ट वर्ग असतो आणि जो तो आपल्या पसंतीचे उपाय इतराना सुचवुन संसर्गाला चार हात लांब ठेवण्याविषयी खात्री देत असतो. होमियोपथीचे आर्सेनिक अल्ब, आयुर्वेदात सांगितलेले काढे हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे दावे करीत असताना, अ‍ॅलोपथीचे व्हिटॅमीनचे डोस आणि सोबत एखादे अ‍ॅन्टीबायोटीक हेच उपचार केले जात असल्याचे माध्यमांमधुन पसरु लागले. कोरोनाच्या संसर्गावर प्रत्यक्ष खात्रीशीर औषध किंवा लस अजुन दृष्टीक्षेपात नसताना, या उपचार पध्दतींवर मग वाद झडु लागले. कोण श्रेष्ठ, उपयोगी, कोण निरुपयोगी वगैरे बाबींवर चर्चा आणि लेख लिहिले गेले.

      या सगळ्यात एक गोष्ट मात्र पुर्णपणे दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे जोपर्यंत खात्रीशीर इलाज नाही तोपर्यंत हे सगळे उपाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारेच ठरतात, आणि शरीराची रोगाशी, आजाराशी लढण्याची शक्ती वाढवण्याच्या कामी सगळ्यात मोठी भुमिका असते ती मनाची. जसे संकटकाळात एखाद्याला मुर्तीपुढे मिनीटभर नतमस्तक झाल्याने हुरुप येतो, डॉक्टरच्या 'सगळं ठीक आहे' किंवा 'काही झालेलं नाही' अशा शब्दांमुळे एखाद्याच्या मनाला उभारी मिळते, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या काळात आजाराशी दोन हात करायला लागणारी ताकद या औषधांच्या सेवनाने मिळत असली तर. जोपर्यंत खात्रीशीर इलाज येत नाही, तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या उपायाने संसर्गापासुन बचाव करणे इतकेच आपल्या हातात असते. आणि या सगळ्यात मनातली भीती दुर होण्याने जर फरक पडत असेल, प्रतिकारशक्ती वाढत असेल तर त्याचे स्वागतच झाले पाहिजे.

      हात धुवा, मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा या प्रकारच्या बाह्य उपायांचा नक्कीच उपयोग होतो, पण मन खंबीर करण्याने जर फायदा होत असेल, निदान 'भीतीचा धंदा' करणार्‍यापुढे जायची वेळ टळत असेल तरीही पुरेसं आहे.    

      लॉकडाऊनच्या नियमांमध्ये या तिन्ही गोष्टी किती कटाक्षाने पाळल्या गेल्या यावर अनेकांचे दुमत असु शकेल. पुढे झपाट्याने वाढलेल्या रुग्णसंख्येवरुन हीच गोष्ट अनेकजण आकडेवारीनिशी सिध्द करतील आणि लॉकडाउन खरेच किती फायद्याचे यावर शंकासुध्दा उपस्थित करतील. पण कोरोनाचा जगभर प्रसार होत असताना, कुणालाच त्याविषयी निश्चित आणि खात्रीपुर्वक माहिती नसताना, किंबहुना आवर कसा घालावा आणि संसर्ग कसा रोखावा याचे मार्ग ठाउक नसताना, संपुर्ण लॉकडाऊन हा एकच उपाय योग्य होता. खोकला, शिंक, थुंकी याद्वारे पसरणार्‍या या आजाराला आळा घालण्यासाठी लोकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क येऊ देणे हेच अधिक हिताचे होते. तसे केल्याने प्रशासनाला खबरदारी घेण्यासाठी आणि पुढील उपाययोजना करण्यासाठी अधिक वेळ मिळाला, ज्याचे पर्यावसन कदाचित पुढे संभाव्य मृत्युचे प्रमाण कमी राखण्यात झाले असावे.

      पण जगभरातील देशांमध्ये केलेल्या या लॉकडाउनमुळे आधीच डबघाईला आलेली अर्थिक परिस्थिती अधिकच रसातळाला जाण्याचे भय निर्माण झाले. ज्यासाठी सर्वच देशाना विविध पातळ्यांवर जनतेसाठी, उद्योगांसाठी मदतीचा ओघ सुरु करावा लागला. अनेक प्रकारची पॅकेजेस जाहीर करावी लागली, ज्याचे बरे-वाईट परिणाम येणार्‍या काळात दिसतीलच. शेती, उद्योगधंदे, कारखाने, कंपन्या ऑफिसेस, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा असं सारं काही जितक्या लवकर सुरु होईल ते सरकारला हवेच आहे. अन्यथा या अनपेक्षित संकटामुळे वाढती बेकारी आणि त्यातुन निर्माण होणार्‍या उपासमारीमुळे अराजक फैलावण्याची शक्यता असु शकते, जी कोणत्याच देशाच्या सरकारला नकोशी असेल.  

      हा कोरोनाचा विषाणु खरा की खोटा, नैसर्गिक की कृत्रीम यावर विविध मतप्रवाह आहेत. काहींच्या मते हा विषाणु कृत्रीम आहे, मुद्दाम घडवुन आणलेले हे षडयंत्र आहे. जगभरातील खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला उभारी देण्यासाठी काही देशानी मिळुन, काही बलाढ्य उद्योगपतीना हाताशी धरुन केलेले हे एक षडयंत्र आहे अशी ठाम समजुत असलेला एक वर्ग आहे. तर, काहींच्या मते दर शंभर वर्षानी असा संसर्गजन्य आजार येतो ज्यात हजारो, लाखो जीव मृत्युमुखी पडतात. निसर्गाची ही एक समतोल साधण्याची पध्दती आहे, प्रक्रिया आहे.

Peacocks Dance On Mumbai Streets In Lockdown – Earth Is Not Owned ...Coronavirus Lockdown: Nilgai takes a stroll at Noida's sector 18 ...


      कोरोनामुळे माणसे बंधनात असल्याने, चार भिंतीत कोंडलेली असल्याने निसर्गाला आणि प्राणिमात्रांना मात्र आनंदाचे उधाण आले होते. रस्त्यावरची रहदारी थांबली आणि प्रदुषण कमी झाल्याने काहीना हिमालयाचे दर्शन थेट पंजाबमधुन घेता आले, तर रात्रीच्या वेळी मोकळ्या, निरभ्र, प्रदुषणविरहीत आकाशाचे सौंदर्य न्याहाळण्यात अनेक मुलांना खगोलशास्त्राची गोडी निर्माण झाली. विविध वनस्पती, पक्षी, प्राणी यांचे निरीक्षण करणे शक्य झाले. शहरातील तसेच हायवे, मुख्य रस्ते, गावागावातील हवा स्वच्छ झाली आणि अनेकांना आपले बरेच वर्षांपासुन दाबुन ठेवलेले पक्षी निरीक्षणाचे छंद पुर्ण करणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे, त्याला जवळुन अनुभवण्याच्या इच्छा पुर्ण करता आल्या.

      हे कोरोनाचे संकट नैसर्गिक आहे की कृत्रिम, षडयंत्र आहे की समतोल साधण्याची प्रक्रिया हे यथावकाश सिध्द होईलच, पण यानिमित्ताने निसर्गापुढे मानव किती क्षुद्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोरोनासारख्या कोणत्याही संसर्गजन्य, साथीच्या आजारापासुन वाचण्यासाठी आपल्या हातात फक्त उरते, ते म्हणजे खालील नियमांचे पालन करणे;

Ø  मन खंबीर ठेवा, त्यासाठी नियमीत ध्यान, सकारात्मक विचार करा,

Ø  शरीर सुदृढ ठेवा, त्यासाठी नैसर्गिक आहार, योग्य व्यायाम आणि पुरेसा आराम घ्या.

~~~

© प्रविण धुरी 12 जुलै 2020


येत आहे लवकरच...

COVID-19 vaccine

Comments

  1. खूपच अभ्यास करून लेख लिहिला आहे.

    ReplyDelete

Post a Comment