विठ्ठला,, कोणता झेंडा घेऊ हाती ?

सैनिकांचे गाव 'चौकुळ' |


विठ्ठला,  कोणता झेंडा घेऊ हाती ?

 

मध्यंतरी एक पोस्ट वाचनात आली होती, त्याचा काहीसा संदर्भ प्रांतवाद आणि त्यातही मराठी-गुजराती असा होता. महाराष्ट्रातील किती गावातील कुटंबातुन किती युवक सैन्यात जातात याची माहिती देऊन एक मुद्दा मांडला होता की गुजराती समाजातील युवक सैन्यात जाऊन देशसेवा न करता फक्त व्यापार करतात. आणि या सगळ्याला पार्श्वभुमी होती माननीय पंतप्रधानानी व्यापारी वर्गाला उद्देशुन बोललेल्या एका वाक्याची.  

थोडा वेळ राजकारण आणि प्रांतीय अस्मिता बाजूला ठेवून विचार करायला हरकत नाही असं म्हणुन मी या परिस्थितीवर भाष्य करायचे ठरवले.

 

अगदी स्वातंत्र्यापुर्वीचा काळ विचारात घेतला तर लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यातल्या ( ज्याचा राज्य म्हणून जन्मच मुळी स्वातंत्र्या नंतर झाला आहे) नेत्यांनी, वीरांनी ज्या प्रमाणात या लढ्यात भाग घेतला त्या तुलनेत गुजरात मधील लोकांचा सहभाग हा कमीच होता. गांधी, पटेल, देसाई असे काही हातावर मोजता येतील असे नेते या संग्रामात पुढे होते.

इतिहासकालीन नोंदीचा विचार केला तरीही मराठी राजे, लढवय्ये आणि त्यांच्या फौजा अगदी दिल्ली, पानिपत, अटकेपार झेंडा घेऊन लढल्याचं दिसून येईल.

मग या सगळ्यात गुजराती समाज/ लोक अस्तित्वातच नव्हते का? असतील तर कुठे होता?

मला वाटतं हा समाज मुळचाच व्यापारी वृत्तीचा, त्यामुळे हाती तलवार घेण्याऐवजी तागडी घेण्याची निवड त्यांनी केली असावी, त्यातच काही भौगोलिक, पारंपरिक घटकही याला कारणीभूत झाले असावेत.

एका बाजूला मराठा लढवय्ये, तर दुसरीकडे राजस्थानी योध्दे या दोघांच्या मधे या समाजाने व्यापार करून आपलं आणि समाजातील इतर घटकांच पोट भरण्याचा मार्ग निवडला असावा. (इतिहासाचे अभ्यासक जास्त चांगली माहिती देतील). आणि हे सर्व करत असताना राज्यकर्त्याना न दुखावता, त्यांच्याशी जुळवून घेत आपल्या समाजाची काळजी घेतली, एकमेकांना सहाय्य केलं आणि सोबतच उन्नती साधली.

 

आता येऊ वर्तमानात.

व्यापार उदीम करणाऱ्या गुजराती समाजाने तो वाढवला, इतर प्रदेश आणि क्षेत्रांमध्ये प्रवेश करून आपली आणि समाजाची प्रगती साधली. योध्दे असलेल्या राजस्थानी समाजाने व्यापार, उद्योग आणि शिक्षण या क्षेत्रात कार्य केलं, आणि आपलं योगदान दिलं.

लढवय्ये मराठे (महाराष्ट्र राज्यातील जनता) जे खरे तर मुळचे जमीन कसणारे शेतकरी, ज्यांच्या पुढील पिढ्यानी आपला पिढीजात शेतीचा व्याप आवरून, शिक्षण (?) घेत नोकरीच्या वाटा शोधल्या. सातार्‍यातील काही गावेसिंधुदुर्गातील चौकुळ, चेंदवण सारख्या आणखी काही भागातील लढवय्ये आजही लढवय्येच आहेत, इतका अपवाद वगळता, इतरांनी मुंबई पुण्यासारख्या शहरातून वेगळीच लढाई लढायला सुरुवात केली. मोगल, ब्रिटिश हे परकीय आक्रमणकर्ते होते, त्यांच्या विरुद्धच्या लढायांची उदाहरणे देत काहींनी शत्रूची व्याख्या बदलली आणि या लढवय्या मावळ्यांना लढाईत गुंतवून ठेवलं.

परिणाम?

मुळचा व्यापारी समाज आपला व्याप वाढवत राहिला, नवे प्रांत आणि क्षेत्र आपलीशी करत राहिला,

आणि हे नव्या धारेतले लढवय्ये! त्यांच्या हाती ना मुळच्या शेतीतुन काही लागलं ना या नव्या युध्दातून.

पूर्वीचे राजे, नेते समाजातील घटकांचा विचार करून, त्यांच्या हितासाठी चळवळी उभ्या करत, पण आता परिस्थिती बदलली आहे, कोण, कोणाचं, कशातून हित साधू पहात आहे, याचा डोळसपणे विचार न करता अशा फुकाच्या प्रादेशिक अस्मितेला बळी पडत राहिलो तर परिस्थिती अधिकच धक्कादायक होणार.

 

एका बाजूला विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून जग जवळ आलं म्हणायचं, मुंबई सारख्या महानगरात वाढणाऱ्या गर्दीमुळे रस्ते, पाणी, ट्रॅफिक अशा निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांवर बोलायचं, आणि त्याचवेळी मुंबईतुन काही व्यापाराची केंद्र बाहेर जाताहेत त्यावर राग व्यक्त करायचा. कापड गिरण्या, हातमाग, औषध कंपन्याचे कारखाने, आणि त्याला संलग्न  इतर छोटे मोठे उद्योग हे कधीच मुंबई आणि महाराष्ट्र बाहेर गेलेत. एक उद्योजक, किंवा व्यापारी म्हणून विचार करता यात काहीच चूक नाही. गेल्या काही वर्षांत मुंबईतील वाढणारे जागांचे भाव आणि वाढलेला राहणीमानाचा खर्च आणि त्यामुळे सतत  वाढणारा उद्योगाचा खर्च (पगार, वीज, पाणी, वाहतूक) याचा विचार करता कुणीही विवेकी माणूस आपला उद्योग अशा ठिकाणी हलवणारच जिथे हे खर्च कमी होऊन नफा वाढु शकेल.

त्याची जागा या शहरांमधून आयटी आणि फायनान्स सारख्या कमी भांडवल लागणाऱ्या उद्योगानी घेतली. काही काळ तेही तेजीत चालू लागलं. पण याचवेळी हैदराबाद, बेंगलोर, गुरंगाव सारख्या शहरांमधून हेच उद्योग अधिक तेजाने वाढले. आणि या सोबतच अजून वाढला मुंबईतील जागांचा भाव आणि राहणीमानाचा खर्च.

 

अधिक धक्कादायक परिस्थिती येण्यापूर्वी आपल्या हातात तीनच पर्याय,

१. तंत्रज्ञानामुळे अंतर कमी झालेले असताना स्वतःला या मायानगरीच्या पाशांपासून लवकरात लवकर मोकळं करून घेणे,

२. बदलणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन, इतरांना नावं न ठेवता, व्यापार उदिमात सहभागी होणे,

३. मुळ पारंपरिक व्यवसायाकडे वळून, त्यातील अडचणीवर मार्ग काढत त्यातूनच प्रगती साधणे.

 

नाहीतर मग आहेच... 

विठ्ठला $$.$ $$.. $$. कोणता झेंडा घेऊ हाती ?

story on Village of Satara District of Maharashtra Military ... 


Comments