बंडुचे प्रकरण
" आई मी निघतो
गं ! "
एप्रिल महिन्याचा तिसरा शनिवार. आज हाफ डे नव्हता, पण घ्यायला लागणार होता, म्हणजे आजच्या दिवसाची
गरजच होती तशी. आणि त्यासाठी काय कारण सांगावं याचा विचार करतच बंडु घरातुन निघाला
होता. शनिवारी टिफीन नसायचा, त्यामुळे सकाळची धावपळ नसल्याने बंडुची आई थोडी उशिराच
उठायची. तसा बंडुसुध्दा शनिवारी ऑफिसला ऊशीरा जायचा. दुसर्या व चौथ्या शनिवारची सुट्टी आणि इतरवेळी
एक तासाची सवलत असायची. अकरा वाजेपर्यंत पोचता यायचं, पण आज अपवाद होता. नेहमीप्रमाणे
आज वेळेत जायचं आणि दुपारी सटकायचं असा त्याचा बेत होता. अंधेरीला ईलेक्ट्रेकॉन
ईंडियाच्या हेड-ऑफिसमध्ये हे त्याचं पाचवं वर्ष होतं आणि आतापर्यंत त्याच्या काम
करण्याच्या पध्दतीने बंडुचं रेप्युटेशन चांगलं होतं. शक्यतो सुट्टी न घेता आणि त्यावर गरज असेल
तेव्हा सुट्टीच्या दिवशी येऊन कामं पुर्ण करणारा अशीच त्याची ख्याती होती. त्यामुळे
गरज असलीच तर तो कधीतरी असा लवकर निघुन जायचा आणि त्याला कुणाचीच आडकाठी नसायची.
आजही जेव्हा त्याने दादरहुन अंधेरीला जाण्यासाठी लोकल पकडली, तेव्हा डोक्यात ऑफिसातल्या
कामांची यादी तयार होवु लागली. पण आज काहीतरी बिनसलं होतं, त्या यादीत संध्याकाळचं
काम मध्ये-मध्ये डोकावु लागलं. शेवटी त्याने सगळे विचार बाजुला सारले आणि हातातला
पेपर उघडुन वाचू लागला. हेडलाईन्स वाचत, नजर फिरवत तो पानं परतत राहिला, पण तिथेही त्याचं लक्ष
लागेना. पेपरची घडी करुन बॅगेत सरकवला आणि मोबाईल काढुन मेसेज बघायला सुरुवात
केली. पण स्क्रीनच्या वॉलपेपरवर नजर जाताच त्याने मोबाईल बंद केला, आणि डोळे मिटुन बसला.
गेले तीन महिने ज्या क्षणाची तो वाट बघत होता, तो दिवस, तो क्षण आज समोर आला असता बंडु मात्र त्यापासुन
नजर चुकवत होता, दूर जायचा प्रयत्न करत होता. त्याच्या हृदयाची गती वाढत होती. डोक्यात अनेक
विचार एकमेकात मिक्स होवुन, हातात हात घालुन नाचत होते. त्यात जसे भुतकाळातले काही
क्षण होते, तसेच भविष्यकाळातील रंगवलेल्या काही स्वप्नांचे सुंदर क्षण सुध्दा होते.

![]()
'नेक्स्ट स्टेशन अंधेरी, अगला स्टेशन अंधेरी'
असे शब्द ऐकु येताच तो भानावर आला आणि झटपट उठुन दरवाज्याकडे सरकला. स्टेशनच्या
बाहेर येऊन रिक्षात बसेपर्यंत घामाने चिंब भिजायला झालं होतं. मनातल्या मनात
गर्दीला आणि गर्मीला चार शिव्या घालतच त्याने रिक्षावाल्याला 'एमायडीसी' एवढंच सांगितलं.
बिल्डींगच्या पायर्या चढताना त्याने मुद्दामहुन पहिल्या मजल्यावर थोडा वेळ
काढला. व्हरांड्यातुन आत जावं की नाही असा विचार करता करता नकळत तो आत शिरला
सुध्दा. त्या लांब पॅसेजमधुन तसाच चालत तो पुढच्या जिन्याने वर गेला. अजुन ऑफिस
उघडलं नव्हतं. 'काय झालं असावं', 'का लेट झाला असावा', 'इतका लेट कधी होत नाही' असा विचार करतच तो चौथ्या मजल्यापर्यंत आला.
दहाला अजुन पाच मिनिटे बाकी होती, आणि ऑफिस तर साडेदहाला उघडतं. तो स्वत:शीच हसला आणि आपल्या
टेबलवर जाऊन बसला. वर्मा, खारमोजे, आणि कुमार हे तिघेही त्याच्यापुर्वीच आले होते, आणि आपापल्या ठिकाणी बसुन
त्यांची कामं सुरु होती. बाकीची मंडळी अकरापर्यंत येणार... इतक्यात दशरथने पाणी
आणि चहाचा कप आणुन त्याच्यासमोर ठेवला.
गुड मॉर्निंग साहेब !
काय दशरथ, कसा आहेस?
मस्त आहे साहेब, या गर्मीने जरा हैराण केलंय, बाकी मजेत आहे.
ट्रेनची तिकीटं काढलीस की नाही, गावी जायचंय ना मे महिन्यात? - बंडुने हा प्रश्न मुद्दामच विचारला होता. आता
त्याला हवी असलेली माहिती मिळणार होती.
नाही हो साहेब, ट्रेनची तिकटी काय मिळत नाहीत आपल्याला... आपली बस बरी.
अरे हो, विसरलोच नाही का, तू तर बसने जातोस ना गावी? नाम्याला सांगितलं की नाही तिकीटांचं?
केली, केली बुकींग केली... असं म्हणुन दशरथ निघुन गेला. बंडुचा वार फुकट गेला होता.
दीड वाजता लंच ब्रेक झाला तेव्हा तो वर्मा आणि कुमारसोबत खाली उतरला. ते
दोघीही कधीच डबा आणत नसत, नेहमीच जाऊन मावशीकडे जेवायचे, आज बंडुसुध्दा
त्यांच्याबरोबर निघाला होता. कधीतरी तो असा बाहेर जेवायचा, त्यात मावशीकडचं जेवण छानच
असायचं. आज जेवण झाल्यावर तो मुद्दामहुन फोनवर बोलत गेटपाशीच थांबला. पाच मिनीटातच
त्याची अपेक्षा पुर्ण झाली... बिल्डींगच्या पायर्या उतरुन ती येत होती. निळ्या आणि
पिवळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये ती अधिकच उठुन दिसत होती. डाव्या खांद्यावरची
ओढणी फिरवुन उजव्या हातात घेतली होती आणि चालताना तिच्यासोबत हातांचा चाळा सुरु
होता. डोळ्यांवरचा बारीक काळ्या फ्रेमचा चष्मा आणि केसांमधुन डोकावणारी कपाळावरची
टिकली... केसांचा साधना कट ठेवला होता तिने आणि म्हणुन बंडुला ती खुप आवडायची, अगदी शोभुन दिसायची त्यात.
नाजुक ओठांवरचं मंद स्मित आणि त्यातुन हलकेच डोकावणारे ते चमकणारे शुभ्र दात...
अहाहा...
बंडु फोनवर बोलत होता, पण त्याचं सारं लक्ष तिच्याकडेच होतं. तिनेसुध्दा पुढ्यात
येता येता बंडुकडे बघुन छानसं स्मित केलं, त्यावेळी तिचे डोळे चमकल्याचा भास बंडुला झाला.
'नाही गं, आज जरा लवकर निघणार आहे मी, सर सुध्दा नाहीयेत, त्यामुळे तीन वाजताच निघेन
मी.' ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती. दोघी गेटमधुन बाहेर गेल्या, पण त्या लगेच परत येण्याची
शक्यता होती. अजुन थांबावं की नको या
संभ्रमात बंडुला निर्णय घेता येईना. पण आज लवकर बाहेर पडायचं आहे हे आठवताच तो तडक
ऑफिसच्या दिशेने निघाला.
सव्वातीन वाजता बंडु भांडुपला जाणार्या बसमध्ये बसला होता. मागील दरवाजापासुन
दोन सीट सोडुन तो बसला होता. त्याचं सगळं लक्ष मात्र पुढच्या दोन सीटकडे होतं. आज
कसंही करुन साधनाला भेटायचच आणि आपल्या मनातला विचार तिला सांगायचा, लग्नाबद्दल विचारायचं. ती
होय म्हणणार याची बंडुला पुर्ण खात्री होती. त्यासाठीच तो आज भांडुपला निघाला
होता. यापुर्वी माघी गणपतीला तो भांडुपला सुर्वेच्या घरी गेला होता, तेव्हा तिच्या घरी
जाण्याचा योग आला होता. त्यामुळे तिच्या घरच्यांची आधीच ओळख झाली असल्याने, आपण तिला मागणी घातल्यावर
होकार मिळणार याचा त्याला विश्वास होता.
![]()
बसल्या बसल्या त्याच्या मनाने पुढचं चित्र रंगवायला सुरुवात केली होती. तिचे
वडील रिटायर झालेत, आई शिक्षिका आणि भाऊ शेवटच्या वर्षाची परिक्षा देतोय, म्हणजे मेमध्ये मुहुर्त
बघायला हरकत नाही. बंडुच्या वांगेवाडी चाळीतील मंडळी आणि मुंबईतील काही नातेवाईक
याच्या पलीकडे आणखी कोणाला बोलवायचं नाही. आईला एवढ्या सगळ्यांचं करायला झेपणार
नव्हतं. नाही म्हणायला सुमीआत्या आणि सुलुताई आल्या असत्या, पण त्यातुन उद्भवणारे वाद
त्याला टाळायचे होते. आणि लग्नानंतर नैनीताल हे तर त्याचं आधीपासुनच ठरलं होतं.
खुप आधीपासुन, शम्मीकपुरचे सिनेमा आवडायचे तेव्हापासुन त्याचं हे स्वप्न होतं. म्ह्णजे
खरंतर त्याला काश्मीरलाच जायचं होतं, पण तिकडची एकंदर परिस्थिती बघता त्याने नैनितालवर तडजोड
केली होती. आतापासुनच तिकीट बुकींगला लागायला हवं होतं. दल-लेक नाही बघता आला तरी
चालेल...
'पवई लेक...'
अचानक तो भानावर आला. बस पवई लेकच्या स्टॉपवर थांबली होती, आणि बरीच माणसं उतरुन गेली
होती. त्याच्या लक्षात आलं, ती जागेवर नव्हती. त्याने पटकन खिडकीच्या बाहेर बघितलं.
उतरुन गेलेल्या माणसांमध्ये ती सुध्दा होती आणि आता ती रस्ता क्रॉस करुन दुसर्या
बाजुला जात होती. कसलाही विचार न करता तो उठला आणि बसच्या मागील दरवाजाकडे सरकला.
त्याच्या सुदैवाने सिग्नल रेड असल्याने बस थांबली आणि तो तसाच मागुन उतरला. आजची
संधी आणि आजचा दिवस त्याला वाया जाऊ द्यायचा नव्हता. अजुनही सिग्नल रेडच होता, त्यामुळे त्याने झटक्यात
रस्ता क्रॉस केला आणि...
ती आजुबाजुला कुठेच दिसत नव्हती. काहीच समजत नव्हतं, अचानक कुठे गायब झाली
असावी? बंडुने सगळीकडे नजर फिरवली, पण तिचा कुठेच पत्ता नव्हता. आत्ता कुठे तो नैनितालला
पोचला होता, अजुन बरच काही घडायचं बाकी होतं. तिचा हात हातात घेऊन बसायचं होतं, तिच्याशी मनसोक्त बोलायचं
होतं, तिच्या डोळ्यात डोळे घालुन भविष्याची स्वप्ने रंगवायची होती, आणि तिच्यासोबतचे ते मधुर
एकांतातले क्षण, तो नैनितालमधला गारवा आणि त्यात तिच्या मिठीची उब, तो हॉटेलचा स्वीट-रुम आणि
त्यातला तो मोठा वर्तुळाकृती पलंग...
हॉटेल अला-मोड.... समोरच दिसणार्या बोर्डवरची अक्षरं वाचताच एक पुसटशी शंका बंडुच्या
मनात येवुन गेली. 'आत जावं का?' असा विचार करत तो स्टॉपवर बसुन राहिला. अचानक गायब झालेली
ती आत असण्याचीच शक्यता होती. पण आपण आत तरी कसं जाणार? आणि समजा गेलोच, तर जाऊन करायचं काय? ती आत असली तर काय? आणि तिच्यासोबत कुणी असेल
तर? ती कुणाला भेटायला आली असेल का? कोण असेल? एक ना अनेक,,,, बंडुच्या डोक्यात प्रश्न आणि शंकांचं गोडावुन होवु
लागलं... नवनव्या प्रश्नांची गाठोडी आणि शंकांची बोजकी येऊन पडु लागली.
इतक्यात हॉटेलच्या मुख्य दरवाज्यातुन एका तरुणासोबत ती बाहेर येताना दिसली... दोघंही पार्कींगमध्ये
असलेल्या स्कोडामध्ये बसले आणि क्षणात निघुन गेले. बंडु तिथेच स्तब्ध होवुन उभा
राहिला.
*******
सोमवारी सकाळी बंडु नेहमीप्रमाणे ऑफिसला जायला निघाला. गर्दी आणि गर्मी तशीच
होती, किंबहुना आज थोडी अधिक वाढलेली होती. अंधेरी स्टेशनबाहेरुन बस पकडताना आज
त्याची अजिबात चिडचीड झाली नाही. त्याने शांतपणे एमआयडीसी अस सांगुन तिकीट घेतलं. आपल्या
नेहमीच्या स्टॉपवर उतरून बिल्डींगच्या गेटमधुन आत शिरत असताना...
'एक्सक्युज मी. कलरमेटच ऑफिस इथेच आहे ना?'
त्याने मागे वळुन बघितलं आणि.... गोड स्मित करणारे लालचुटुक ओठ, त्यातुन दिसणारे शुभ्र दात
आणि जिवणी, उघडझाप करणार्या पापण्यांमधील ते टपोरे डोळे, उजव्या खांद्यावरुन रुळणारे मोकळे सोडलेले केस...
आपल्या टेबलवर पोचताच बंडुने आपली बॅग नीट ठेवली, आणि आपल्या मोबाईलवर
साधनाचा फोटो बदलुन तिथे टपोर्या डोळ्यांच्या ऐश्वर्याचा फोटो ठेवला.
- ©प्रविण धुरी (२१ ऑगस्ट् २०२०)
हा हा हा.....तू नही और सही..
ReplyDeleteखूपच छान लिहीलंत्..
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteInteresting
ReplyDeleteअसं खरच कैक लोकांसोबत होत असेल. आशा सोडायची नाही मात्र. आशावादी बंडू. :)
ReplyDelete