तो
आम्ही भेटायचो रोजच, अगदी बालपणापासुन
मैत्री आमची घनदाट आणि प्रेम मनापासुन,
तो नेहमीच जवळ यायचा अन सोबत मला करायचा,
खेळायचा, नाचायचा, कधी अलगद मिठीत धरायचा,
वयात आले तेव्हा प्रेम आमचं फुललं,
वाढलं, सुखावलं, त्याच्या स्पर्शाला भुललं,
त्याचं जवळ असणं, कानात रुंजी घालणं
माझ्या केसांशी खेळणं, बट हलके कुरवाळणं,
हे असं सारं रोजचं हवंहवंसं वाटू लागलं,
नसेल आसपास तर दु:ख मनात दाटू लागलं,
अशातच एक दिवस समुद्रावर तो भेटला,
वाळूत फिरताना माझा हात हाती घेतला,
लाटांच्या साथीने जरा जास्तच चेकाळला,
जनलज्जा सोडून माझ्या अंगांगाला खेटला,
बेसावध क्षणी एका तोल त्याचा सुटला,
परकराला हात जाता संयम माझा सुटला,
सोडवली मिठी अन् पळत घर मी गाठलं,
दारं खिडक्या झाकून आत कोंडून मला घेतलं,
काही क्षण असेच शांततेत गेले,
येतोय मागुन हा आभास देत राहिले,
खिडक्यांच्या तावदानावर सुरू झाली टकटक,
दारावर धडका देत सुरू झाली झटापट,
आत यायचा त्याचा इरादा होता पक्का,
मीही खमकी आज द्यायचा होता त्याला धक्का,
कंटाळून शांत होवून तो शेवटी निघुन गेला,
मीसुध्दा सावरले, प्रसंग तो विस्मरणात गेला.
गाव सोडून मी आता मोठ्या शहरात निघाले,
विनवणी घेऊन तिथेही पठ्ठे आगारात आले.
इथे आता काही त्याचा मागमुस नसतो,
सय येते तेव्हा खिडकीत उभा भास असतो.
अगदीच नाही सहन होत अंगांगाची लाही होते,
गच्चीत जाते अन् त्याची आर्जवे मी करते,
डोळ्यांची कवाडे मिटता, खिडकी अन घर आठवते,
शांत मी झोपून जाते, कवेत त्यालाच तर साठवते.
हवेहवेसे वाटे पुन्हा तुझे खट्याळ अन बेभान रुप,
आली गावी सोडुन सारे तिथली छांव अन बेफाम धुप,
अनेक तुला असतील सख्या, दामिनी वर्षा उषा
निशा,
माझ्यावाचुन काय अडेल ते, असती तुला चारही
दिशा,
खिडकी दारे सारी उघडली वाळुत फिरता मध्येच थिजली,
तुझ्या एका स्पर्शासाठी कशी घामाने बघ चिंब भिजली,
साथ सदैव तुझी लाभुदे, एकच मागणे हे समीरा,
सरणावर चिता जळुदे, किंवा रक्षा उडु दे अंबरा.
~~~~~~~
प्रविण धुरी 24/09/2019

Comments
Post a Comment