पैल तो गे काऊ... (भाग एक)

पैल तो गे काऊ... 








पैल तो गे काऊ... 

भाग एक

लहान असल्यापासुन आपण सतत बऱ्याच विषयांचा अभ्यास करतो, सुरुवातीला छोट्या छोट्या कथांमधुन, नंतर शाळा कॉलेजच्या पुस्तंकामधुन, तर कधी बाहेरच्या सिनेमा-नाटक, मालिका, कविता-कादंबरी अशा साहित्यकृतीतून मिळणाऱ्या ज्ञान आणि माहितीमुळे असेल, पण आपला अभ्यास सुरु होतो आणि तो अव्याहत चालुच असतो. माध्यम आणि वातावरण बदललं तरी या अभ्यासातून आपल्यावर होणारे संस्कार हे मात्र कायमस्वरुपी, म्हणूनच महत्वाचे असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हेच संस्कार आपल्यासाठी दिशादर्शक ठरतात.

आणि यातलेच काही आपल्याला विचार करायला, प्रश्न विचारायला, उत्तरे शोधायला उद्द्यूक्त करतात. सांसरिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना असं होण्याची शक्यता कमी असते. पण एकदा का चाळीस-बेचाळीशीचा टप्पा पार केला, शाळेत जाणारी मुलं थोडी मोठी झाली, त्यांच्या दिनक्रमात आपली त्याना अडचण होऊ लागली की मग असं काहीतरी घडण्याची शक्यता बळावते. काहींच्या बाबतीत हे यापेक्षाही लवकर घडतं, तर काही काहीजणांसाठी वयाची साठी यावी लागते.

बहुधा जबरदस्तीचं मोकळेपण लवकर वाट्याला आल्यामुळे असेल, पण मी या प्रक्रियेत लवकर आलो आणि ही (नको ती ) सवय मला लागली. नाही तर मला सांगा, कावळा, झाडू हे काय चिंतनाचे विषय होऊ शकतात का? आता या शिवधनुष्याला हात घातलाच आहे, तर बघतो प्रयत्न करुन पूर्ण उचलता येतं की माझासुध्दा दशानन होतो ते.

जन्मानंतर पहिल्या आठ-नऊ महिन्यात जेव्हा बसायची समज येते आणि बोळक्यात बऱ्यापैकी दात दिसू लागतात, तेव्हा पहिला घास घेताना हा हुशार पक्षी जो आपल्या आयुष्यात येतो, तो दात जाऊन पुन्हा बोळकं होऊन येणार्‍या शेवटापर्यंत साथ देण्यासाठीच. यामुळेच चिऊ-काऊच्या गोष्टीतला हा 'कावळा' माझ्या औत्सुक्याचा विषय झाला. मागील चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या प्रवासात तो विविध टप्प्यांवर भेटत राहिला, आणि कुतुहल चाळवत, वाढवत राहिला.

यासोबतचं आजच्या या विषयातलं दुसरं पात्र आहे 'झाडू'. लहानपणातुन सतत आजुबाजुला वावरणारी, पहिल्यांदा हवीशी वाटणारी, नंतर नकोशी होऊन कोनाड्यात पडलेली. तसं हिचं वास्तव्य नेहमी कोनाड्यातच असतं म्हणा, पण आताशा अडगळीत गेलेली. सुरुवातीला मोठ्या माणसाना त्या लांब केरसूणीने कचरा काढताना पाहिलं की प्रत्येक छोट्या मुलाला ती हवी असते, आपल्यापेक्षा उंची जास्त, तरीही हौस असते वापरायची आणि झेपत नसतानाही कचरा काढायची. पण वाढत्या वयासोबत आपली ऊंची त्या झाडुपेक्षा वाढली की संस्कार आणि जबाबदारी असूनही ती मात्र नकोशी वाटु लागते. कधीकाळी आपल्या त्या दुष्ट चेटकीणीचे वाहन असलेली ही झाडू, बघता बघता हॅरी पॉटर या पाश्चात्य हिरोला वाहून नेऊ लागली, आणि दुसरीकडे त्याचवेळी समाजसेवेचे निःस्वार्थी व्रत घेतलेल्या संत गाडगेबाबांच्या हातून आजच्या निवडणूक चिन्हापर्यंत पोचली.

तसं पाहिलं तर कावळा आणि झाडू या दोघांची जातकुळी वेगवेगळी, एक सजीव तर दुसरा निर्जीव, त्यामुळे म्हटलं तर दोहोंत साम्य काहीचा नाही. पण जन्माने वेगळे असले तरी दोघांचे कर्म एकसारखेच... घाण साफ करण्याचे. त्यांच्यातल्या या एका साम्यापोटी मी त्यांचा एकत्र विचार करायचा असं ठरवलं आणि हा माझ्यासाठी चिंतनाचा विषय झाला. तसंही जन्मापेक्षा कर्मच नेहमी श्रेष्ठ ठरत असतं असं म्हणतात. सुरुवात करू यातल्या महत्वाच्या पहिल्या पात्रापासुन.


कावळा - निसर्गाचा स्वच्छतादूत.



निसर्गनियमानुसार वाट्याला आलेलं काम, अगदी चोख़ पार पाडणारा एक जीव. घरासमोरच्या रस्त्यावर अथवा उकीरड्यावर, कौलांवरच्या किंवा अंगणातल्या ताटात दिसणाऱ्या अन्नाचा फडशा पाडुन तेवढा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निस्वार्थी वसा घेतलेला एक जीव. तसं शहरांमधुन हल्ली याचं दर्शन आणि 'भेट' दुर्लभच होत चालली आहे. पण आमच्या भागातल्या सोसायटीत एक दोन हौशी वल्ली आहेत, ज्या रोज सकाळी उठुन खायला दाणे वगैरे घालून या पक्षाना बोलावतात आणि त्यामुळे आम्हाला तरी यांच यथेच्छ दर्शन घडतं.

असं असतानाही, काही वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली, तेव्हा पुन्हा एकदा, आपल्या नावातच 'का वळा' असं प्रश्नचिन्हं घेऊन असणारा हा जीव स्वतःच वळून माझ्या मनात घिरट्या घालू लागला. मुंबईसारख्या महानगरात सर्वत्र दिसणाऱ्या कबुतरांच्या थव्यांना चुकवून, जिथल्या दादर चौपाटीवर आपलं अस्तित्व तो टिकवून होता, तिथल्या दोन वेगवेगळ्या दिवसातल्या एकंदर दोन अडीच तासांच्या कालावधीत त्याच्याशी आलेला माझा दोन-तीन मिनिटांचा काय तो संबंध. नंतरच्या धावपळीत तो उडुनही गेला, पण मनातल्या विचारविश्वातली त्याची फड्फड आणि कावकाव मात्र चालू राहिली. पोटातली कावकाव जशी आपल्याला भुकेची जाणीव देत अस्वस्थ करून सोडते, तद्वत ही कावकाव काही मला स्वस्थ बसू देत नव्हती, मनाच्या (किंवा मेंदूच्या) भुकेची जाणीव करुन देत खाद्य मागत होती.

   

फार पूर्वी कधीतरी, एके दिवशी कुणाला तरी या पक्षात असलेली हुशारी दिसली, अन माठातल्या पाण्यात दगड टाकणं त्याच्या वाट्याला आलं. श्रमाचं महत्व पटवण्यासाठी किंवा आलेल्या परिस्थितीवर मात कशी करावी यासाठी सांगितली जाणारी ही गोष्ट खरंच सुंदर आहे. पण रणरणत्या उन्हात, अतिशय तहानलेल्या अवस्थेत पाच पंच्वीस फेऱ्या पुन्हा पुन्हा उडत जाणं आणि एक-एक दगड शोधून, चोचीत उचलून आणुन टाकणं प्रत्यक्षात खरंच कितपत शक्य आहे असा प्रश्न कुणालाच पडला नाही. बरं, जीवाच्या आकांताने, जिवंत राहण्याच्या दुर्दम्य इच्छेपायी असं घडलं, म्हणजे आपल्या कथेच्या नायकाने ते केलं, तरी त्यानंतर मिळालेलं चोचभर पाणी पिऊन तृप्त होणं, हे त्या केलेल्या श्रमांच चीज? की इतक्या अथक श्रमाचा योग्य मोबदला न मिळणं हे तेव्हापासुनच होतं? असो.

असे कोणतेही वेडेवाकडे प्रश्न कुणालाही न पडता, कावळ्याच्या कथेतील ही हुशारी पिढ्यान पिढ्या टिकून राहिली. माठातलं पाणी काय ते थोडंसं कमी जास्त होत राहिलं, पण या व्यतिरिक्त विसाव्या शतकात येईपर्यंत त्यात तसुभरही फरक पडला नाही. अन् मग एके दिवशी कुठल्या तरी हुशार मड्क्याने (पक्षी: डोक्याने) कावळ्याचे श्रम वाचवण्यासाठी एक गंमत केली आणि तो चक्क चोचीत 'स्ट्रॉ' धरून पाणी पिताना दिसू लागला. ओळखलं का तुम्ही काय झालं ते? बरोबर, आता प्लॅस्टीकचा शोध लागला होता आणि माणसाने सुध्दा आपले श्रम कमी करुन अधिकात अधिक मोबदला मिळवण्याची शक्कल एव्हाना लढवली होतीच.

पण त्याची म्हणजे कावळ्याची, खरी हुशारी टिपली न्युझीलण्ड मधल्या एका अवलियाने. डॉ. अ‍ॅलेक्स टायलर (की टेलर) नावाच्या या असामीने ऑकलंड विद्यापिठात आठ भागांच्या एका कोड्यातून आपलं अन्न मिळवणारा, काक-वर्गीय हा काळा पक्षी किती हुशार असू शकतो हे सप्रमाण दाखवुन दिलं. तर त्याचवेळी दुसर्‍या टोकाला पश्चिमेकडे बीबीसीचा एक चमु आपले कॅमेरे सरसावून लंडनच्या रस्त्यावर काही दृश्य टिपत बसला होता. एका पक्ष्याची अन्न मिळविण्यासाठी चाललेली धडपड चित्रबद्ध करत होता. उत्कंठा, रोमांच, शिस्त आणि आपल्या नायकाची, मुख्य पात्राची हुशारी. निसर्गतः लाभलेली प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची, उपलब्ध साधनांचा यथायोग्य वापर करण्याची हातोटी (?), या सगळ्याचा अभुतपूर्व असा नजारा. इच्छुकांसाठी आंतरजालावर ही छोटीशी फिल्म उपलब्ध आहे.

त्या गोष्टीतल्या मडक्यात पाणी किती होतं आणि ते मिळविण्यासाठी किती खडे टाकले असावेत, हे प्रश्न कदाचित अनुत्तरीत राहतील. पण कावळ्याची हुशारी सिद्ध करायला हे दोन प्रयोग पुरेसे ठरावेत.

हे सगळं घडत असताना इतरत्र असलेले 'बाकीचे' कावळे मात्र आपलं परिसर स्वच्छतेचं काम इमाने इतबारे करतच होते. या पक्षासंदर्भात आणखीन एक उल्लेख कानावर यायचा, तसा तो काही दशके आधीपर्यंत सगळ्याच घरातुन झाला असावा बहुधा... काही ठराविक दिवसानंतर घरातील मोठ्या बाईला म्हणजे आपल्या आईला, काकूला, मावशीला, ताईला वगैरे कावळ्याचं शिवणं आणि म्हणुन त्यांना आपण न शिवणं. माझ्या किंवा आमच्या पिढीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पुढे जाऊन आमचं शिक्षण पुर्ण होईस्तोवर, याचं योग्य आणि खरं कारण समजुन येईपर्यंत, ते कावळेही कमी झाले आणि त्यांचं शिवणंही कमी झालं.

एवढं सगळं काकपुराण सांगुन झाल्यावर एक लक्षात आलंच असेल. आपल्या आजुबाजुला भले कावळ्यांची संख्या कमी झाली असली तरी त्यांचं महत्व मात्र काही कमी नाही झालं. उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे. (डिमांड-सप्लाय यांचं व्यस्त गुणोत्तर कारण आहे का? असेल बापडं, किंवा तसं नसेलही, आपला काय आज गणित हा विषय नाहीय.) वर्षातले पंधरा दिवस तर यांना खुप मागणी असते. आता यामागे दोन विचारसरणी आहेत. पूर्वापार चालत आलेल्या रुढी परंपरा, रिती-भाती, प्रत्येकाची श्रध्दा असा एक भाग आहे. तर रुढी परंपरा, रिती-भाती हे काही न मानता फक्त प्राणी-पक्षी यांच्याबद्दल कृतज्ञता, त्यांच्या संवर्धनाचा असा एक दुसरा विचार आहे.

काहीं जाणकारांच्या मते, आपल्या पूर्वजानी घालुन दिलेल्या या रूढी-परंपरा, रिती-रिवाज काय उगीच बनवल्या नाहीत, त्यामागे निश्चित अशी कारणं होती. कावळ्याला असणार्‍या अशा विशेष महत्वामागे असं सांगितलं जातं की त्याला दृष्य-अदृष्याच्या विविध जाणिवा असतात. जे आपल्या डोळ्याना दिसत नाही, ते त्याला जाणवतं, कळतं. म्हणूनच पुर्वी छपरावर बसुन कावळा ओरडला की कुणीतरी पाहुणा येणार असल्याची ती वर्दी मानली जात असे. ही गोष्ट इतर प्राणी--पक्ष्यांना अवगत नसते म्हणतात. पण मग चिठ्ठी पाठवण्यासाठी मात्र ससाणा, किंवा कबुतरच का पाठवलं जाई हा प्रश्न उरतोच. मला वाटतं याची दोन कारणं, एक म्हणजे या दोन पक्ष्यांची दुरवर उडण्याची क्षमता आणि दुसरं, दिलेलं प्रशिक्षण आत्मसात करण्याची क्षमता. त्यातच विशिष्ट जातीची कबुतरं वापरण्यामागे आणखी एक कारण होतं ते म्हणजे त्यांची स्मरणशक्ती किंवा दुरवरचा प्रवास वेगात पूर्ण करून पुन्हा मुळ स्थानावर परत येण्याची खुबी. माझा अंदाज असा की कदाचित आपला या कथेतला हा हिरो या दोन्हीमध्ये कमी पडला असावा. एखाद्या पक्षीतज्ञाला यावर जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करुन भाष्य करता येऊ शकेल.

आता मुद्दा उरतो तो वर्षातील विशिष्ट पंधरा दिवसांचा, किंवा एखाद्याच्या मृत्युनंतर केल्या जाणार्‍या कार्यातुन मिळणार्‍या विशिष्ट स्थानाचा. दृष्य-अदृष्यांच्या जाणिवांचा विचार करता असं मानलं जातं की कावळा या पक्षाला आत्मा दिसतो, किंवा आत्मे त्याच्या रुपातुन आपल्याशी संवाद साधतात, आणि म्हणून इहलोकीची यात्रा संपवून गेलेल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ दिलेला प्रसाद अथवा नैवेद्य कावळ्याने भक्षण करताच तो त्या व्यक्तीला मिळाल्याचं, पोचल्याचं मान्य करण्यात येतं.


या एका मुद्द्यामध्ये तीन वेगवेगळे मुद्दे किंवा प्रश्न उपस्थित होतात.

1. आत्म्याचं दिसणं किंवा जाणिव असते का?

2. असलीच तर त्यासाठी कावळ्याची निवड का आणि कुणी केली असावी?

3. दिलेला प्रसाद किंवा नैवेद्य पितरांना खरंच पोचतो का?


या प्रश्नांचा एकत्र विचार केला तर कदाचित हे कोडं उलगडणं सोपं जाईल. पण ते संपुर्ण सुटेलच असा काही माझा दावा नाही.

पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही यापैकी द्यावं लागेल. हा खरंतर खुप गहन विषय आणि अनेक अभ्यासु यावर संशोधन करुन आपले विचार, आपली बाजू सातत्याने मांडत असतात. ते काम आपल्या आवाक्या-बाहेरचं असल्याने आपण तुर्तास त्यात न पडणंच बरं. पण फक्त त्याच्या दोन शिर्षक बाजू विचारात घेवून उत्तर मिळवायचा प्रयत्न केला तर विषय समजण्याएवढा हलका फुलका होईल.

 एक, जर आत्मा आहे, म्हणजे जसा देव आहे तसा आत्मा आहे असं मान्य केलं, तर त्याचं अस्तित्व कुठे ना कुठे निदर्शनास येणार हे ही ओघाने आलंच. मग त्याची जाणिव होण्यासाठी ही जबाबदारी कुणाला तरी द्यावी लागणार, म्हणुन ती कावळ्याला दिली. आणि अस्तित्व आहे म्हटलं तर मग देवा प्रमाणे त्यालाही आपल्यातला वाटा प्रसाद किंवा नैवेद्य रुपात द्यावा लागणार. आहेच असं एकदा मान्य केल्यावर, नैवेद्य पोचला असंही मान्यच करावं लागणार. देवाच्या नैवेद्याचं ताट खरंतर नंतर आपल्यापैकीच कुणीतरी जेवायला घेतो, ते आपण मान्य करतो. (ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे संत नामदेव अपवाद). पण इथे तसं होत नाही. पितरांना दिलेलं अन्न कावळा खातो आणि ते त्यांना पोचलं असं आपण मान्य करतो.

 पण इथे मला आता नविनच प्रश्न उभे दिसतात,

- कावळाच का?  

- ते आत्मे कावळ्यालाच का दिसतात, इतर पशुपक्ष्यांना का नाही?

- आणि जर इतरांनाही दिसत असतील तर नैवेद्याचं ताट त्यांना का नाही? 

सापडतील, यांची उत्तरही सापडतील. तोपर्यंत दुसरी बाजू बघू. जर आत्मा ही एक कल्पना आहे, आणि प्रत्यक्षात तसं काही नसतं असं म्हटलं, तर मग इतर प्रश्न आहेतच.

 

- आत्मा ही कल्पना होती तर हे सगळे सोपस्कार का केले गेले?

- आपल्या पुर्वजांनी इतक्या सगळ्या पध्दती आणि रिती का बरे केल्या असतील?

- यातलं नंतरचं माजलेलं अवडंबर जरी आपण काढुन टाकायचं ठरवलं तरी काही प्रमाणात गोष्टी शिल्लक उरतीलच, त्याचं प्रयोजन काय असावं?

- कावळ्याच्या नावाने ठेवलेल्या ताटात एखादी चिमणी का बरे येऊन बसत नाही? आणि तशी ती आली तर चालेल का? त्या प्रसंगाचा काय अर्थ लावावा? 

आहे ना गंमत ! वाघ म्हटलं तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो. चिंतनाची हीच तर गंमत आहे. दोन्ही बाजू आपणच आपल्या समोर घेऊन बसलं की एकट्याने बुध्दीबळ खेळत असल्यासारखं होतं, अर्थात अशा खेळात कितीही प्रामाणिकपणे खेळायचं ठरवलं तरी आपण आपल्या पसंतीच्या कुठल्या तरी एकाच बाजुच्या सोंगट्याना जिंकवण्याचा नकळत प्रयत्न करतोच. आपण आपल्याच विरुध्द खेळत असल्याने कोणताही रंग जिंकला तरी शेवटी आपणच जिंकणार असतो. त्यामुळे अशा खेळाचा मुळ उद्देश जिंकणं हा नसुन विविध चालीना (प्रश्न) समर्पक तर्कशुध्द प्रतिचाल खेळणं हा असतो. 

माझ्या कुवतीनुसार माझ्या साधारण मेंदुला झेपेल एवढाच डाव-प्रतिडाव खेळत, माझी मलाच सापडलेली उत्तरे काहीशी अशी आहेत. 

जेव्हा या सर्व पध्दती, रिती-रिवाज निर्माण झाले, त्याकाळी माणसांची निसर्गाप्रती आणि नैसर्गिक गोष्टींच्या ठायी एक कृतज्ञतेची भावना होती. त्याच्या आजुबाजुला घडणार्‍या अनेक अनभिज्ञ गोष्टी, घटना आणि घडामोडी याचं उत्तर त्याच्याकडे नसावं. पण ते जाणुन घेत बसण्यापेक्षा, त्या सर्वाची जबाबदारी निसर्गावर म्हणजेच देवावर टाकून, आपण आपली नित्यकर्म करत रहावं यातच त्याचं सुख होतं. यातुनच गाय, कुत्रा, मांजर यासारख्या पाळीव प्राण्यांना घास देणं, तसंच जेवताना ताटातला एक घास ताटाबाहेर मुंगीसाठी ठेवणं यासारख्या छोट्या छोट्या कृतीमधुन प्राण्याबद्दलचं प्रेम आणि वाटुन घेण्याची प्रवृत्ती दिसुन येते. मुंगीसाठी ठेवण्यात येणार्‍या घासामागे एक 'शास्त्रीय' कारण आहे असं मला वाटतं. सामान्य ज्ञान आणि तर्कशास्त्र एकत्र केल्यावर असं असण्याची शक्यता जरा जास्त जवळची वाटते.

पूर्वीच्या काळी जेवायला बसत खाली जमिनीवर, आणि अन्न वाढलं जाई केळीच्या किंवा तत्सम मोठ्या पानांवर. म्ह्णजे आजुबाजुच्या मुंग्या पानातल्या अन्न पदार्थावर ताव मारायला येणार. हे टाळायचं असेल तर उपाय काय? सोपं आहे. थोड्याशा पाण्याची तटबंदी आपल्या पानांभोवती उभी करायची आणि त्याच्या बाहेर पानातल्या अन्नाचा एक घास ठेवुन द्यायचा. यामुळे होतं काय? तर, पाण्यामुळे मुंग्याना पानातल्या  अन्नाचा गंध येत नाही आणि पानाच्या दिशेने येणारी मुंग्यांची फौज बाहेरील घासाच्या दिशेने जाते. जोपर्यंत तो घास मुंग्या संपवतील तोपर्यंत आपलं जेवुन झालेलं असतं.

 चला, आता पुन्हा कावळ्याकडे वळु !

 आपल्या आजुबाजुच्या परिसरात सहजपणे आणि विपुल प्रमाणात उपलब्ध असणे, आणि स्वच्छताप्रिय असणे या गुणांच्या जोरावर बहुधा कावळ्याला हा मान मिळाला असावा. तसं तर चिमणीसारखे इतर छोटे पक्षीसुध्दा आजुबाजुला असतात. ते यातले वाटेकरी का नाही होऊ शकत? ते ही असतात, पण चिमणीचं अन्न म्हणजे धान्याचे दाणे तर पोपटाला फळं जास्त प्रिय, तोसुध्दा तसा खाण्याच्या बाबतीत चोखंदळ पक्षी. त्यामुळे त्यांच्या वाट्याला असं स्थान येत नाही. कावळ्याचं तसं नाही, त्याला अन्न म्हणुन काहीही चालतं, आणि म्हणूनच बहुधा या कामासाठी त्याची निवड झाली असावी. 

आता प्रश्न उरतो तो विशिष्ट जाणिवांचा, दृष्यापलिकडील काहीतरी अदृष्य बघण्याचा. जिवंत आणि मृत यांतील संदेशवहनाचा, त्यातील दुवा असण्याचा. तसं पाहिलं तर निसर्गाने सर्व प्राणिमात्रांना उपजतच अशी शक्ती दिली आहे, ज्याद्वारे पशुपक्षांना पुढील संकटाची चाहुल लागते आणि त्याचा उपयोग करुन इतरांना सावध करण्याचं काम ते सदैव करत असतात. येऊ घातलेला भुकंप आधी प्राण्यांना कळतो म्हणतात. काही पक्षी आपलं घरटं किती उंचावर बांधतात यावरुनही येणार्‍या पावसाचा अंदाज बांधला जातो. काही छोटे छोटे किटक, मुंग्या बाहेर निघाल्या की पाऊस अगदी उंबर्‍यावर पोचल्याची ती सुचना असते. वन्य प्राण्यांची हालचाल आधी झाडावरचे पशुपक्षी टिपतात आणि इतरांना सावध करतात. कधी गोठ्यातलं जनावर विशिष्ट आवाज करतं, तर कधी गावातले कुत्रे एकत्र वेगळ्या सुरात ओरडु लागतात. या सर्वामधुन पुढे येऊ घातलेला एखादा धोका अथवा वातावरणातील बदल त्याना जाणवत असतो हे निश्चित. पण तो नेहमी अदृष्यच असतो का? याचं उत्तर माझ्या दृष्टीने 'हो' आणि 'नाही' सुध्दा. 

येणारं हिंस्र श्वापद किंवा सरपटणारा जीव हे वर्तमानातले दृष्य धोके, पण येऊ घातलेला भुकंप, दुष्काळ, अतिवृष्टी हे भविष्यातील धोके, त्यामुळे ते अदृष्य स्वरुपाचे. 

मनुष्य हा सुध्दा त्याच निसर्गात जन्मलेला एक प्राणी. त्यात बुध्दीचं वरदान लाभलेला. त्यामुळे त्यालाही असा काहीतरी गुण मिळालेला असणारच. त्याचाच उपयोग करुन पूर्वी शेतकरी आपल्या निरीक्षणांच्या आधारे येणार्‍या पावसाची, बदलणार्‍या ऋतुमानाची भाकिते करत असत. काही काही लोक थोड्याफार प्रमाणात आजही करतात. या अशा संकेतामधुन आजुबाजुचा निसर्ग आपल्याला इशारे देत असतो. सावध करत असतो. ज्याचा उपयोग करुन आपलं जीवन सुकर व्हावं, बदल आणि संकटाना तोंड देता यावं म्हणुन आपण उपाययोजना करत असतो. निसर्गाच्या या ऋणातुन उतराई होण्यासाठी मग माणसाने काही नियम बनवले, त्याकाळच्या समजुतीप्रमाणे काही समाजमान्य पध्दती बनवल्या. आणि हे सारं असंच यापुढेही निर्धोक, विनाखंड चालू रहावं, घालुन दिलेल्या नियमांचं नीट पालन व्हावं, निसर्गाचं रक्षण आणि संवर्धन व्हावं, म्हणुन देव, आत्मा अशा गोष्टींचा आधार त्याला देण्यात आला असावा, असं मला वाटतं. 

पण जे ठरवतो तसं होतंच असं नाही, त्यामुळे, जसा काळ पुढे सरकत राहिला, तसे यात अनेक बदल होत गेले, त्या त्या वेळच्या समाजातील काही घटकांनी जुन्याला जोडुन काही नवे नियमही यात जोडले. पुढे जाऊन माणसाच्या मनातील भय आणि 'नियम मोडुन पुढे जाण्याची वृत्ती' याची सांगड घालुन, यालाच अनेक पोटनियम जोडण्यात आले. काळाच्या ओघात ही गोष्ट रिती-रिवाज, परंपरा अशा चक्रात अडकत गेली आणि निसर्ग संवर्धनाचा, त्याच्या उपकारातुन मुक्त होण्यासाठीचा मुळ उद्देश मागे पडुन सारा भर फक्त पध्दतीवर, इतर सोपस्कारावरच राहिला. 

मला आठवतं, आमच्या लहानपणी कावळ्याचं पान छपरावर ठेवण्यात येतं असे, त्याला 'काकोळ ठेवणं' किंवा 'वाडी ठेवणं' असा शब्द प्रचलीत आहे. ते ठेवल्यावर कावळ्याला येण्याचं आवाहन करुन, म्हणजे 'काव काव' असा मोठमोठ्याने आवाज करुन बोलावण्याची पध्दत होती, अजुनही काही ठिकाणी आहे. त्यानंतर आम्हां मुलांपैकी कुणाची तरी पाळी असायची त्यावर लक्ष ठेवण्याची. कावळा आला आणि ते अन्न भक्षण केलं की पळत पळत आत जाऊन निरोप द्यायचा म्हणजे मग बसलेल्या पंगतीची जेवायला सुरुवात व्हायची. हे काम करण्यातही एक शान असायची. जसं काही आपणच त्यांना जेवायला घालतोय, कारण आपला निरोप आत जाणार तेव्हा कुठे ताटकळत बसलेल्या जीवांना जेवण मिळणार ना!   

वरच्या कथनात आणखी एक मुद्दा आला आहे विशिष्ट कालावधीचा, वर्षातील पंधरा दिवसांचा. यामागेही काही कारण असावं का? का म्हणुन हाच पंधरवडा? दिवाळी नंतरचा का नाही चालणार? 

मला जाणवणारं याचं कारणसुध्दा काहीसं निसर्गशास्त्राला धरुनच आहे. 

पावसाळा सुरु झाल्यापासुन पुढचे आठ दहा आठवडे सारी जनता शेतीच्या कामात व्यग्र असते. धोधो कोसळणार्‍या पावसात मागील वर्षातील साठा केलेल्या अन्नाचा प्रामुख्याने वापर केला जात असतो. त्यातच प्राण्यांच्या प्रजननाचाही हाच काळ. अशा परिस्थितीत चारही बाजुला असलेल्या पाण्यातुन अन्न शोधुन मिळवणं हे पक्षांसाठी काहीसं कठीण. भाद्रपदाच्या दुसर्‍या पंधरवड्या पर्यंत पाऊस कमी होत आलेला असतो, पुढे येणार्‍या दसर्‍याला नवीन पीक तयार होणार असतं. अशा वेळी शेतीच्या पुढच्या कामांना निघण्यापूर्वी सर्व गावकर्‍यानी एकत्रितपणे पुर्वजांचे स्मरण करुन, त्यांचे आभार मानुन, एकत्र भोजनाचा आस्वाद घेण्याचा विचार त्यात असावा. आणि सोबतच पशु-पक्षांचा वाटा त्यांना मिळावा अशीही योजना असावी.  

काळ बदलला, परिस्थिती बदलली, जग बदललं. वेळेचं महत्व वाढलं आणि कमी झालेल्या संख्येमुळे किंवा वाढलेल्या मागणीमुळे या काक-प्रजातीय पक्षावर कामाचा अधिक ताण पडला. परिणाम... माणसानेच तडजोड केली आणि हे लक्ष ठेवणं, वाट बघणं कमी झालं... पंगती कमी झाल्या... एक सोपस्कार तेवढा उरला.


(क्रमश:)


Comments

  1. खूप छान आणि अभ्यासपूर्ण लिखाण आणि तुम्हाला श्रद्धा आणि त्यामागचा हेतू याची चांगली सांगड घालून विवेचन केले आहे.

    ReplyDelete

Post a Comment