
प्रेम-लग्न की
योजित-लग्न?
(Love की Arrange)
marriage ?
सुंदर विषय, बहुतेक सर्वांच्याच पसंतीचा असावा. ज्यांचं जमलं त्यांच्याही आणि जे सुदैवी ठरले त्यांच्याही...
मला तर वाटतं की हा विषय UPSC किंवा तत्सम परीक्षांच्या GD साठी ठेवावा. बघु 'उमेदवार' कसे प्रकट होतात ते...
आता मला काय वाटतं याबद्दल...
पहिलं प्रेमलग्न

जिथे दोन व्यक्ती काही ना काही कारणाने/निमित्ताने एकत्र येतात, ओढ वाटते, आकर्षण वाटते, भेटी, आणाभाका होतात आणि मग लग्न,,, झालंच तर संम्मतीने.
नाहीतर चार मित्र-मैत्रिणींच्या साथीने.
थ्रील असतं म्हणतात त्यात. आणि मग दोन-चार-सहा महिने, वर्ष संपून जातं.
'पण हा असा काय वागतो हल्ली?'
"यार, साला काय कळत नाय यार, हल्ली पूर्वीसारखी मजा नाय येत."
" नाही ना गं, म्हणजे अगदीच तसं नाही, पण तुला सांगू का, हा ना बदललाय आता."
"---"
"*---**"
"माझंच चुकलं, ###*#"
कालांतराने हे असं काहीसं होतं. मग कुणीतरी घरातलं मोठं (की अनुभवी) नाही तर एखादा कॉमन मित्र/मैत्रीण (अनुभवी ?) समजुत काढून विसकटु पाहत असलेली घडी पुन्हा नीट बसवतात.
काही वेळा ती जमते, काही वेळा पुन्हा उसवते.
हे असं कुठे चुकत असेल बरं?
रिवाईंड करून बघू...
सुरुवातीचं जे एकत्र येणं, आवडणं, आकर्षण, ओढ,,,
बास,,, बास,, इथून पुढे...
इथे सुरू होतं मार्केटिंग. (गिऱ्हाईकाला ) पटवण्यासाठी एक एक क्लुप्त्या वापरल्या जातात, कधी आवडीचा ड्रेस, रंग, कधी हेअरस्टाईल, गोड गोड मृदू बोलणं, लाडिक हावभाव,
आणि पलीकडे ?
तिकडेही तेच...
डॅशिंग,, स्टायलिश,, मित्राची मोटारसायकल, संध्याकाळी एखादा गुलाब, बदामाचा लाल फुगा, आणि काय काय...
एक मिनिट थांबून विचार करू, ह्या दोन्ही व्यक्ती खरंच अशा आहेत?
की नोकरी मिळवण्यासाठी बायोडेटा मध्ये हॉबी (Hobby) खाली कसं आपण ठळक अक्षरात लिहितो -
Reading, Music.
दोन चार दिवाळी अंक, गृहशोभा नाहीतर आवाज, फार झालच तर एकदा पार्टनर आणि एकदा बटाट्याची चाळ,
काही इंग्रजी वाचणारे सुध्दा असतात, पण कॉलेज मधल्या अभ्यासक्रमातल्या एखादया शेक्सपिअर नंतर पुढचं वाचन 'mills boon' च्या पुढे सरकलेल नसतं.
Music चं सुद्धा काहीस असंच.
तर मूलतः दोन्ही व्यक्ती खरंच अशा असतात का? जसं ते दोघे एकमेकांना दाखवत असतात. की खरा मी आत ठेवून वर मुखवटे चढवलेले असतात दोघेही?
खोटंच लाडिक वागणं, आवडत नसतानाही ऑरेंज रंगाचा ड्रेस घालणं,
जमत नाही, माहिती असतं,, तरीही ते छोट्या छोट्या (फालतू) विनोदावर खोटं खोटं हसणं.
असे कितीतरी मुखवटे, जे अंतिम साध्य प्राप्त झाल्यानंतर पुढच्या आठ दहा महिन्यात घालण्याची गरज वाटत नाही. आणि आतला कोंडून ठेवलेला खरा 'मी' पुन्हा डोकं वर काढतो,
' हल्ली बदललास/लीस तू'
यावर एकमत होऊ लागतं.
(यातला काळ कमी जास्त असू शकतो तसेच, या सर्वाला अपवादही आहेतच, म्हणून तर असं वेगळं शोधून लिहीण सोपं जातं ना).
आता अरेंज मॅरेज (योजित-लग्न)
हा मामला तसा साधा सरळ,,,
कुणीतरी मध्यस्थाने सुचवणे, दाखवणे-बघणे, देणे-घेणे नि मग अक्षता.
इथे मध्यस्थ आधी येतो आणि त्यानंतर सारा खेळ सुरू होतो. पहिल्यात जसं मार्केटिंग होतं तसं इथे थोड्याफार प्रमाणात असतं, पण ते तिऱ्हाईता कडून.
इथे महत्वाचं असतं ते after sales service किंवा customer service.
कस्टमर रिटेन्शन हे अधिक महत्त्वाच आणि म्हणून त्यासाठी जरुरीच्या अशा सर्व उपाययोजना केल्या जातात.
पण इथे कस्टमर कोण?
हे काय विचारणं झालं !
दोघेही कस्टमरच असतात, आणि म्हणून वेळोवेळी फीडबॅक मिळवण्याचा प्रयत्न करत रिटेन्शन कडे अधिक लक्ष देतात.... बघा बरं.
संसार सुरू झाल्यावर,,,
पहिलं वर्ष व्यक्ती समजून घेण्यात, त्यातच मानसिक नि शारीरिक जवळीक साधण्यात, झालंच तर इतरांना समजून घेण्यात,,,
तोपर्यंत आग्रहाखातर म्हणा किंवा भावनातिरेकाने म्हणा, दिड दोन वर्षात हाती खुळखुळा येतो आणि रात्री पुन्हा जागवाव्या लागतात. दोघात तिसरा तसा चांगला नव्हे, पण
इथे मात्र तिसऱ्या मुळे जवळीक अजून वाढते, समजुतदारपणा येतो, आणि दोघांच्याही होणाऱ्या या धावपळीत, नकळत ती आपुलकी, ते प्रेम अधिक बहरतं, विश्वास अधिक दृढ होतो. काही ठिकाणी अजून एका सदस्याच येणं सुद्धा आनंदाने स्वीकारलं जातं. आता जरी या साऱ्यामुळे नात्यांचा चौकोन बनला असला आणि दोघांतील अंतर वाढलेलं असलं, तरी मधला विश्वासरुपी कर्ण दोघांना एकमेकांच्या सोबत जोडून ठेवतो. आत कुठेतरी ठाऊक असतं की हा मधला दुवा पुन्हा कामाला येणार आहे जेव्हा बाजूचे दोन्ही कोन आपापल्या नव्या रचनेच्या शोधात निघतील.
पहिल्या मध्ये जर ती पारदर्शकता सुरुवाती पासून असेल तर नंतरचा समजुतदारपणा आपोआप येऊ शकतो आणि नातं उभं राहतं आणि अधिक घट्ट होत जातं.
दुसऱ्याचंही तसंच आहे, समजुतदारपणा दाखवून नातं स्वीकारलं जातं अन मग जेवढी पारदर्शकता जास्त तेवढं ते अधिक सुदृढ होत जातं.
आणि मग एके दिवशी...
या गोड नात्याचा रौप्यमहोत्सवी सोहळा साजरा करताना सारं कुटुंब आपल्यासोबत बसलेलं असतं, आनंदाने गाण्याच्या भेंड्या खेळत, मस्त एन्जॉय करत असतं, आणि बहिणीची अथवा भाचीची मुलगी गात असते ...
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

छान लिहिलंय,प्रत्येक ठिकाणी विचाराची सखोलता आणि आपलेपणा जाणवतो.
ReplyDeleteChhan
ReplyDelete