शिंड्रेलाचा बूट

 Women's Pumps High Heels Shoes

शिंड्रेलाचा बूट

 

    सकाळी उठल्यापास्न डोक्याचा नुसता भुगा झालाय राव,,, काय कळना झालंय,,,, हित बसून तरी किती येळ रहाणार सांगा,,, भूक लागती,,, तहान लागती,,, घरी जायला बी हवं की न्हाई,,, पण ही आजकालची पोरं,,, तुम्हाला सांगतो, कवा काय ईचारतील ह्याचा नेम न्हाई,,, ह्यांच्या डोक्याचं मीटार इतक्या तेज धावतंय, आपली दमछाक होते ना राव,,, आता आमी काय कमी हुशार होतो काय, पण ही आजकालची छटाकभर,,, लय फुडं गेल्याती,,,, होय खरं, तुमाला कुटं ठाव हाय काय झाल्यालं त्ये,,, बसा दोन मिनिटं,,, वायच कळ काढा,,,, सांगतो,,,,

 

    आमचा शिर्पा,,, त्याचं खरं नांव श्रीपाद,,, त्याला आवडत न्हाई शिर्पा म्हटलेलं,,,,पण हित तुमच्याकडे चालतंय,,, माझा साडेचार वरसाचा नातू,,,आमच्या शिमरनचा लेक,,, एकुलता एक, लाडात वाढलेलं पोरगं,,, आमी बी दोगं लै लाड करतो त्याचे,,, सुट्टीत आलं की माझी घरकारीन काय करू नि कसं करू, किती करू म्हणत सगळं करते,,,, अन माझं काम, गावांत फिरवून आणायचं,,,, पेरू, चिंचा, बोरं, करवंद असं जे जे मिळालं ते ते खाऊ घालायचं,,, नदीच्या पाण्यात डुंबायचं,,, आन राती निजताना कुशीत घेऊन एक छानशी गोष्ट सांगायची,,, म्हणजे ते दिवसभर थकून भागून दमलेलं पोरगं गोष्ट संपन्यापूर्वीच गप झोपी जायचं,,,

 

    तर काल बी आसच झालं,,,, आमी दोगं बी रानातनं हिंडून घरी आलो,,,, शिर्पा आंघोळ करून आला अन शेजारच्या मीने कडनं आणलेलं कसलं तरी गोष्टीचं पुस्तक घेऊन बसला,,, मी माझी आंघोळ उरकली,,, दिवाबत्ती केली,,,, उद्याच्या कामाची यादी केली अन आमी दोगं एकत्रच जेवायला बसलो,,, पण आज स्वारी गप जेवत होती,, काय बोलली न्हाई,,, एक दोनदा मी प्रयत्न केला,, पण तेव्हढच बोलून गप जेवला अन हात धुऊन निघून गेला,,, मनात म्हटलं दमला आसल,, नीज येत आसेल,,, म्हणून माज आवरून घेतलं,,,, हिनं पटकानी हाथरून लावलं आन आवाज दिला,,,

'आबा गोष्ट',, पोरगं कुशीत शिरत, बिलगत बोललं,

आणि मग आमचं नेहमीपरमानं सुरू झालं,,, 'बरं, आज कसली गोष्ट पायजे? राजाची का परीची?'

'नाही, आज सिंड्रेलाची गोष्ट सांगा',

'वा रे पट्ठ्या, आज एकदम शिंड्रेला?'

'ते मीनाताईने बुक दिलं होतं ना, त्यात होती, पण माझी हाफच रीड करून झाली, तू सांग ना पूर्ण, तू छान सांगतो',

'बरं बाबा सांगतो,'

ही आजकालची इंग्लिश शाळेत जाणारी पोरं,, तुमाला सांगतो,,, जाऊ द्या,,,

तर मी त्याला शिंड्रेलाची गोष्ट सांगायला सुरवात केली,,,

    ती शिंड्रेला,,,, तिची सावत्र आई,,, दोन भयनी,,,दवंडी,,, उदास शिंड्रेला,,, मग जादू,,, तो भोपळ्याचा रथ,,, ती उंदराची बग्गी,,,, तो ड्रेस,,, ती पार्टी,,, राजकुमाराची भेट,,, बाराचे ठोके,,, घाईने जाताना पडलेला बूट,,, जादू संपली,,, राजकुमाराची बूट घेऊन शोधाशोध,,, कुठल्याच राजकन्येच्या पायाच माप न जुळणं,,, शेवटी शिंड्रेलाच्या पायात बूट फिट्ट बसणं अन दोघांची भेट,,,आनंदीआनंद.

गोष्ट संपली, पण यावेळी पोराचे डोळे काही तशे नेहमीसारखे बंद झाले न्हवते,,, मी म्हटलं

'अरे झोप आता, शिंड्रेलाला भेटला तिचा राजपुत्र',,,

'पण आजोबा, मला एक प्रश्न पडला आहे,'

'तू आता झोप, सकाळी ईचार काय ते' ,,, माझी झापडं मिटायला लागली होती,,,

'ओके, पण सकाळी विचारणार, तेव्हा नक्की सांगायचं',,,

'ठीक आहे',,,

शेवटी झोपला एकदाचा,,,

 

    सकाळ झाली तेव्हा पठ्ठ्या आधीच उठून बसला होता,,, माझं उरकुन येईस्तोवर हा बाहेर माझीच वाट बघत बसला होता,

'गुड मॉर्निंग आबा',

'गुड मॉर्निंग',

'आबा, आता विचारू?'

' काय ते?'

'माझा कालचा प्रश्न, स्टोरीतल्या सिंड्रेलाचा,,,'

'बोला, काय म्हणतोय आमचा राजपुत्र?',,,

' आबा, मला सांगा, तो एक शु सिंड्रेलाच्या पायात एन्डला फिट्ट बसला तो,,,'

' हं, त्याचं काय झालं?'

' आबा, जर तो इतका फिट्ट बसणारा होता तर पार्टीत तो कसा पडला? दॅट टाईम तो सैल कसा झाला होता?'

'  ???  '

' सांगा ना, की सिंड्रेला रात्री ट्वेल ओ क्लॉकला जादूने बारीक झाली होती आणि सकाळी परत फॅट झाली?'

'...'

'...'

'हां,,, आलो आलो सरपंच, येतो हां मी जाऊन अन मग सांगतो तुला ह्याचं उत्तर,,, आलोच'.

 

     तेंव्हापास्न मी हित बसून हाये, घरी जायचंच भ्या वाटून राह्यलंय,

    तुमच्याकडे कुनाकडे हाय का ह्याचं उत्तर, तर लगोलग सांगा,,,, मी हितंच, पारावर बसून हाय,,,

    आवो कुटं निघाला,,,, ओ आयका तर,,, आवो दादा,,, ओ दाजी,,, सांगा की राव,,, तुमच्या घरात असं एखादं बेनं आसल तर त्येला ईचारून या अन सांगा,,, न्हायतर मग या हितच मुक्कामाला,,, राहू संगतीनं...

 

~

प्रविण धुरी

©७ जानेवारी२०२०


Comments