लहानपण देगा देवा

 

Marathi Text Hardik Shubhechha | Freebek | Png text, Banner

लहानपण देगा देवा


त्यादिवशी अनिल ठाकुरचा वाढदिवस होता, त्यासाठी सवयीप्रमाणे शुभेच्छा लिहायला घेतल्या, आणि मनातले विचार कागदावर उमटले.

चिरतरुण अशा विशेषणाने सुरुवात करून, भरीला सदाहरीत, हसतमुख अशी स्वभाव-वैशिष्ट्ये जोडून शुभेच्छा लिहायला घेतल्या आणि मन भरकटलं. धावत सुटलं... रिले-रेस मध्ये कसं, बॅटन पुढच्या साथीदाराकडे पास करतात, तसेच काहीसं, एका विचारावरून दुसऱ्या मग तिसऱ्या,,,

तरुण ... लहान .... रुसवा ... फुगवा .... दुखावणे... समजावणे... तुटणे ... जोडणे ... मानसम्मान ....

बापरे !

कुठे पोचलो आपण?

ही वाट चालता चालता, आयुष्याची रेस धावता धावता, या अडथळ्यांच्या शर्यती मधील एकएक अडथळा पार करून ध्येयाच्या दिशेने पुढे जाताना मध्येच हे काय होऊन बसलं?

बरं होतं ना लहान होतो ते!

रुसवा धरून बसायच, गाल फुगवायचे (काही सन्माननीय अपवाद यासाठी नाकाचा उपयोग करायचे), रडायचे, भोकाड पसरायचे, आणि काही वेळाने सब कुछ आलबेल.

मान ही फक्त जिराफ नाहीतर उंटाची माहिती होती, आणि सन्मान... एखाद्या हॉटेलचे नांव नाहीतर भाषणातील एक महत्त्वाचा शब्द.

पण जसजसे मोठे होत गेलो, आपल्या विश्वाची व्याप्ती वाढू लागली, तसतसे आजूबाजूला माणसं वाढली, नवनवीन जोडली गेली, नवीन शब्द समजले, नवे नवे बनत गेले, शब्दसंग्रह वाढला, नवनवे अर्थ समजले,

त्यातच कधीतरी हे दोन शब्द मानेत मान अडकवून, आपल्या मानगुटीवर कधी बसले उमजलच नाही.

आणि मग जे घडू नये ते घडलं.

दोन 'मानांच्या' एकत्र येण्यामुळे मनं मात्र दुरावु लागली,

शब्दांचे अर्थ समजून घेता घेता 'अर्थ' च अधिक महत्त्वाचे झाले. आपल्या विश्वाचा व्याप वाढत गेला, त्यात माणसं वाढली, पण त्याचबरोबर माणसा माणसातील अंतरही वाढत गेलं.

मग काय? पुन्हा एकदा रुसवा... फुगवा.... समजूत काढणं आलंच.

पण आता त्यासोबत आलं अजून एक काम,

तुटलेली मनं जोडणं...

तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीतुन जवळ आलेल्या विश्वातील दोन माणसांमधील वाढलेल्या अंतराने असेल किंवा अर्थाला आलेल्या अधिकच्या महत्तेमुळे असेल, पण मनं जोडण्याचं अधिकचं काम मात्र वाढलं.

हे थोडं म्हणून की काय स्वर्गात बांधलेल्या गाठींनी यात भर घातली अन,

अवेळी गाठ सुटणे, निरगाठ घट्ट होणे, गाठीवर गाठ बसणे, गाठ बांधलेल्या शेल्याचं दुसरं टोक भलत्याच गाठीत गुंतणे, असे विविध प्रकार सुरू झाले.

यातून तुटलेलेे, सुटलेले, दुरावलेले सांधे जुळवायला अजून एक जागा निर्माण झाली,

आयुष्याची रेस आधीच अडथळ्यांची होती, आता ती गुंतागुंतीची अन काहीजणांना चक्रव्यूहासारखी भासू लागली. इतक्या भुलभुलैयापेक्षा ते लहानपणीचे सरळ साधं आयुष्य, ते रम्य बालपण अधिक सुंदर होतं.

म्हणूनच असेल कदाचित, पन्नाशी ओलांडून पुढे जाताना प्रत्येकाच्या मनात हाच भाव असावा...

लहानपण देगा देवा !


Comments