सुटका

Meghalaya: The Wettest Place on Earth - The Atlantic

 सुटका


यंदाचे वर्ष वेगळेच जाणार याची जाणीव सुरुवातीलाच झाली होती, मार्चात आलेल्या या कोरोनाच्या संकटाने पुढे काय वाढुन ठेवले आहे याची चुणुक मिळाली होती. गेल्या वर्षीचा पाऊस बरा म्हणता म्हणता डिसेंबरपर्यंत लांबला आणि कलमातुन येणार्‍या उत्पन्नाकडे आशा लावुन बसलेल्या सगळ्यांची पार वाताहात झाली. अवकाळी पावसानंतर कमी झालेली थंडी यामुळे अपेक्षेप्रमाणे मोहोर आला नाही, आणि आंबा, कोकम, काजुच्या झाडांवर पुरेसं फळ धरलं नाही. भातशेतीचं तर पावसाने आधीच नुकसान करुन ठेवलं होतं. त्यामुळे जे काही पीक आलंय त्याला चढा भाव मिळेल म्हणुन अनेक बागायतकर आस लावुन बसले होते. तर त्यात या कोरोनाने विघ्न उभं केलं होतं.

वरच्या आळीतील सरवणकरांचं घर आता एक मजली स्लॅबचं झालं होतं. सत्तरी पार केलेला अण्णा सरवणकर आता थकला होता. आपल्या बाहेरच्या खोलीत, नाहीतर पोर्चातल्या झोपाळ्यावर तो बसुन असायचा आणि आल्या गेल्याबरोबर चार शब्द बोलायचा. गेल्या वर्षापासुन त्याची स्मृती कमी कमी होत गेली होती, त्यामुळे माणसं पटकन ओळखु यायची नाहीत, पण जुन्या गोष्टी मधुन मधुन आठवायच्या. तसा मग जो समोर भेटेल त्याला काहीबाही सांगत बसायचा. मागच्या तीस वर्षात ढोर मेहनत करुन त्याने आपली शेतीभाती, बागाईती फुलवली होती. पाच एकरातली भातशेती आणि स्वत:च्या मेहनतीने फुलवलेली वरच्या पंचवीस एकरातली फळफळावळ आणि भाजीपाला यामुळे घरात सुबत्ता आली होती. त्याचा पोरगा, बाबल्या हाताला आल्यापासुन शेतात राबायचा. अण्णा स्वत: अंगठेबहाद्दर, पण पोराला त्याने बरा तयार केला होता. बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना बाबल्याने बागाईत जोपासली, वाढवली. पुढे तिची इतकी भरभराट केली की दरवर्षी आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटला पाठवुनसुध्दा लोकल मार्केट्साठी शिल्लक उरायच्या. मग त्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, उरल्याच तर म्हापसा अशा पाठवायचा. बाबल्या मुळचाच हुशार, त्यामुळे त्याने वाशीतल्याच एका दलालाच्या मदतीने एक्सपोर्टसुध्दा करुन बघितला होता. त्यात पाच वर्ष बक्कळ कमाई झाली होती. पण यंदा लक्षणं काही बरी दिसत नव्हती. कोरोनाने सगळ्याच धंद्यांची वाट लावली होती. ट्रान्सपोर्ट बंद असल्यामुळे यंदा सगळा माल लोकल बाजारातच विकायला लागला, पाऊसही लवकर सुरु झाला आणि नुकसान अधिकच वाढलं.

तिन्ही सांजेला चिंब भिजलेल्या अवस्थेत बाबल्या घरात शिरला तेव्हा अण्णा नेहमीसारखा झोपाळ्यावर बसला होता. गेले चार दिवस बाहेर धो धो कोसळणारा पाऊस थांबायचं नाव काढत नव्हता. भरीला आडव्या तिडव्या वार्‍याने छत्रीचा काहीच उपयोग होत नसे. माणुस पुर्ण भिजुनच जायचा. बाबल्याने हातातली छत्री बंद करुन पाणी गळुन जाण्यासाठी कोपर्‍यातल्या हुकला अडकवली आणि चप्पल काढुन खांद्याची बॅग बाजुच्या खुर्चीवर ठेवुन तो अण्णाजवळ आला. डोकीचं टक्कल, खोबणीतुन खोलवर गेलेले डोळे, आत गेलेले गाल आणि चारच दात शिल्लक असलेल्या बोळक्या तोंडात सुपारीचं खांड चघळत आणि आपल्याशीच कसलातरी विचार करत बसलेला अण्णा, जुनाट शालीत लपेटुन ठेवलेल्या एखाद्या बारीकशा गाठोड्यासारखा दिसत होता.

" अण्णानु काय वो, बरा आसा मा, " बाबल्याने नेहमीप्रमाणे चौकशी केली.

"आंग जड होताला, वार्‍याक शे बसलात? चला, भितुर बसा चला" असं म्हणुन त्याने म्हातार्‍या बापाला हाताला धरुन उठवलं. गेले चार पाच दिवस अण्णाची तब्येत अधिकच नाजुक होती.

"बाबल्या ! कधी इलस?" अण्णाने झिलाचा स्पर्श ओळखला होता. ऊठुन चालताना त्याने बोलायला सुरुवात केली.

" तुका ठावक आसा, ते राती असोच पावस असलो, सगळीकडे चिडीचीप काळोख, ढगांच्या आनि वार्‍यापावसाच्या आवाजाशिवाय काय आयकुक येय नसला.. माका आवाजान निजच नसली, सगळी रात कुस बदलीत, तळमळत काढलय... ठावक आसा?"

"होय तर!" उंबर्‍यातुन आत येता येता बाबल्याने उत्तर दिलं. ही गोष्ट तो वरचेवर ऐकत असे.

"आताय तसोच पावस पडता नाय वो!"

"काळोखाच्या राती मधीच लायट दिसा आनि मगे धडाड्धुम असो आवाज...रातभर निसते इजे कडकडत आसले. कशी नीज लागतली, त्यात घर मोडक्या, शंभर ठिकानी गळती लागलेली, नळ्याचा छप्पर कधी आपल्यार पडात हेचोच भय दिसा.."

"मगे तुम्ही कधीशे निजल्यात ते राती?" पलंगावर बसवता बसवता बाबल्याने विचारलं.

"निजल्यात? नाय रे, आता निजतलय, ह्यो काय. पण हाली नीज लागनाच नाय. तुझो आजो सपनात येता, आनि मधीच जाग येता, मगे जागोच आसतय."

बाबल्याच्या लक्षात आलं, अण्णा विसरले आणि गोष्ट पुन्हा अर्धीच राहिली. तो तसाच आत गेला, बाथरुमात चार तांब्ये गरम पाणी अंगावर घेतलं आणि टॉवेल गुंडाळुन बाहेर आला. त्याची बायको सगुणा मागच्या पडवीत भाकर्‍या थापत होती. गॅस आला असला तरी बापुच्या आग्रहावरुन त्याने नवीन घरात मागच्या बाजुला मुद्दाम चुल लावुन घेतली होती. भाकर्‍या, आंबोळ्या, मटण, चिकन असं शिजवायला बरं पडत असे. अण्णाना आणि मुलांनासुध्दा चुलीवरच्या जेवणाची चव खुप आवडायची.

चूल hashtag on Twitter

"काय वो, आजय भिजल्यात दिसता! तुमका कितकेदा सांगलय वायच दिसा-उजेडी परतान येयात, नसतो घोर लागता आमच्या जीवाक. आनि इकडे या, हे बघा तुमचे कपडे, पावसात वायच चुलीवर घातले की सुकतत तरी. "

शेवटची भाकरी तव्यावर टाकुन होताच हात टोपात विसळत बायको बोलली. पाऊस वाढला की तिचं हे नेहमीचं वाक्य होतं, आणि बाबल्याला सुध्दा याची सवय झाली होती. दोरीवरचे सुकलेले कपडे अंगात घालता घालता बाबल्या बोलला,

" होय गो, कामा आसतत ती काय अर्धवट टाकुन येव? "

हंड्यावरच्या तांब्यातुन घेतलेलं सगळं पाणी घटाघटा संपवल्यावर तांब्या परत होता तसाच ठेवला आणि तो आत जायला वळला.

" वायच रवा, जेवक वाढतंय, जेवा आनि मगे बसा तुमचा दफ्तर उघडुन."

" होय वाढ. पोरगी खय आसत?"

" वर आसतली, तेंकाय हाक मारा."

 

रात्रीची जेवणं होताच दोन्ही मुलं वरच्या खोलीत पळाली. सगुणा तिची कामं आवरायला मागीलदारी गेली आणि अण्णाने पुन्हा अंथरुणावर अंग टाकलं.

"झिला, ए झिला..."

"काय वो अण्णानु, काय व्हया काय?"

"वायच पांघरुण घाल पायार."

थकलेल्या अण्णाचा म्हातारा कृश देह त्या पलंगाने आपल्यात सामावुन घेतला होता. मोठी उशी तिच्या जवळ असलेली टॉर्च, दुसर्‍या बाजुचा लोड आणि जवळच्या टेबलवरचा पाण्याचा तांब्या याच गोष्टी पटकन नजरेत भरुन येत होत्या. बाबल्याने पायाजवळची गोधडी बापाच्या अंगावर घातली, तसं त्या देहाचं उरलंसुरलं अस्तित्व त्या पलंगाशी एकरुप झालं आणि चेहर्‍याच्या खाली गोधडीची एक ओबडधोबड रेघ तेवढी दिसु लागली. बाबल्याने एकदा म्हातार्‍याच्या चेहर्‍याकडे आणि झापड येऊन खोबणीत गुडुप होऊ पाहणार्‍या डोळ्यांकडे बघितलं. आणि लाईट बंद करुन तो आपल्या खोलीकडे वळला. पटकन त्याच्या लक्षात आलं, तसा थबकला, बाहेर जाऊन आपली खुर्चीवरची बॅग घेवुन आला आणि मग मुख्य दरवाजा बंद करुन झोपायच्या खोलीत आला.

6 killed in relentless rain in Maharashtra, life hit

अजुन पाऊस कमी व्हायचं चिन्हं नव्हतं. झाडांचे, ढगांचे, वीजेचे, पडणार्‍या पावळीचे, वाहणार्‍या पाण्याचे असे सगळे आवाज आता अधिकच वाढल्यासारखे वाटत होते. सगुणा सगळी कामं संपवुन, दारं, खिडक्या बंद करुन जेव्हा खोलीत आली तेव्हा बाबल्या टेबलवर कसलेतरी कागद उघडुन बसला होता. आताचे कागद नेहमीप्रमाणे व्यवहाराचे नव्हते हे तिच्या लक्षात आलं होतं. गेले चार पाच दिवस बाबल्या वेगळ्याच विचारात होता, आणि थोडा अस्वस्थ सुध्दा दिसत होता. पण तिने काही विचारलं नव्हतं. एवढ्या वर्षांच्या संसारानंतर तिला ठावुक झालं होतं, वेळ आली आणि बोलावसं वाटलं की नवरा तिच्याशी बोलणार आहे, आपल्या मनातली घालमेल तो तिला सांगणार आहे.

तिने सोबत आणलेले हळदीच्या दुधाचे कप टेबलवर ठेवले आणि शांतपणे अंथरुणं घातली. ताटातले दोन कप काढुन ठेवले आणि उरलेले दोन कप मुलाना देण्यासाठी ती निघुन गेली. पण बाबल्याचं या सगळ्याकडे लक्षच नव्हतं. त्याने पुन्हा एकदा पुढ्यातल्या पोपटी रंगाच्या पेपरवर दिसणारी अक्षरे वाचुन घेतली. डोळे बंद करुन एक खोल श्वास घेतला आणि सगळे कागद एकत्र बांधुन फाईल पुन्हा बॅगेत ठेउन दिली.

" काय वो, काय झालासा काय? दुधसा घेतलात नाय ता अजुन?"

" इसारलय, जरा विचारात होतय, ता रवला पिवचा, आण, दे ता इकडे."

तरीही बाबल्या काहीच बोलला नाही, तेव्हा सगुणाने विषय न वाढवता गप्प राहायचं ठरवलं. इतक्यात बाहेरच्या खोलीतुन आवाज ऐकु आला.

" तुका ठावक आसा, ते राती असोच पावस असलो, सगळीकडे चिडीचीप काळोख, ढगांच्या आणि वार्‍या-पावसाच्या आवाजाशिवाय काय आयकुक येय नसला.." अण्णा बडबडत होता.

"ओ, आयकल्यात..."

"हुं.."

"मी काय म्हणतय, अण्णांची तब्येत माका जरा बरी दिसणा नाय. उद्या जावन वायच डाक्टराक घेवन येशात?"

"व्हय, सकाळी बघतय."

"म्हणजे तशे बरे आसतत, पण हाली हयता बडबडणा वाढलासा... एकसारख्या खयच्या तरी रातीबद्दल बोलत आसतत. निदान एकदा डाक्टराक इचारुन तरी बघया म्हणतय मी,, काय तरी वशेधपाणी करुक येयत, आयकतात ना?"  

"होय, जातंय"

एवढं बोलुन बाबल्याने कुस वळवली. पाऊस अजुनच वाढला होता. अर्धा पाऊण तास गेला असेल, पण एरव्ही पडल्याबरोबर झोपणारा बाबल्या आज तळमळत होता. बाहेर अण्णाचा आवाज अधुनमधुन येतच होता. आणखी काही वेळ असाच गेला पण डोळ्याला डोळा लागेना तेव्हा बाबल्या उठुन बसला.

"सगुणे... गो सगुणा... निजलय?" त्याने हळुच आवाज दिला.

सगुणा बराच वेळ विचार करत होती, घोवाच्या मनाची घालमेल तिला जाणवत होती. चार दिवसापासुन त्याची चाललेली धावपळ बघुन काहीतरी बिनसलय याचा तिला अंदाज आला होता. त्यामुळे तीसुध्दा काहीशी जागी होती. तिने डोळ्यावर घेतलेला आडवा हात बाजुला करुन बघितलं तर नवरा उठुन बसलेला दिसला.

"काय ओ, काय झाला? नीज येना नाय? काय झालासा सांगा तरी..."

बाबल्याने क्षण दोन क्षण विचार केला आणि तिचा हात हातात घेतला.

" अण्णांचो जीव घुटमाळतासा, अडाकलोसा, तेंची सुटका करुक व्हयी असा माका वाटता."

"अगे माझे बाय! ओ काय बोलतास ह्या? सोभता तुमका असला बोलणा? रामेसरा माफ कर रे बाबा, चुकान बोलान गेलेत ते, असा काय चुकीचा नाय वागाचो आमी, माफी कर.   तुमच्या जीभेक काय हाडबिड आसा की नाय?" देवभोळ्या सगुणेने हात जोडुन बसल्या जागी नमस्कार केला आणि दोन्ही हात आपल्या गालफाडावर मारुन घेतले. आपला नवरा असला काहीतरी विचार करत असेल हे तिला स्वप्नात देखील पटलं नसतं.

"शु.. शु.. शु... अगे आयक तरी मी काय म्हणतंय ता." समजावणीच्या सुरात पण हळु आवाजात बाबल्या बोलु लागला.

"आणि काय आयकाचा रवला आता?" वैतागली होती ती. हे असलं बोलणं करुन वर आणखी समजावुन सांगायचं हे तिला पटतच नव्हतं. तिने आपले हात सोडवुन घेतले पण पट्टा सुरुच ठेवला.

"तरी मी म्हणतय, हाली वरचेवर वाडीक खेका जातास? ही कागदपत्रा बनवक गेल्लास ना जमिनीची? माका आधीच संशय येवक व्हयो आसतो. तुमका आधीच आवरुक मेळला असता. याक सांगान ठेयतय, मी जरी सुन आसलय ना, तरी माझ्या सख्या बापाशीपेक्षा जास्त माया करतय मी आणि तेसुध्दा माका आपल्या चेडवासारखेच माया लावतत. तेव्हा मी तुमका असला काय करुक दिवचय नाय."

"गे माझ्या आवशी, वायच गप रव आनि माझा आयकान तरी घे." बाबल्याचा आवाज थोडासा चढला तशी सगुणा गप्प झाली.

"हुं.."

"तुका ठावक आसा ना दरवरसा आपण थोडे नाल, आणि पेटये रामाकाकाकडे धाडतो. रामाकाका गेलो तरी आपण खंड पडाक दिवक नाय आनि काकीकडे लागात ता सगळा पुरवत रवलो. तेच्या दोनव झिलांच्या साळेच्या एड्मिशनाक पैशे लागले तेव्हासुध्दा धाडुन दिले. पण ह्या सगळा आपण बापुंका सांगाक नाय आसा, कधीच तेंका हेच्याबद्दल कळाक दिवक नाय. होय मा! "

"मगे?... तेचा आता काय?" सगुणा अजुनही घोवाच्या मनात सासर्‍याच्या मरणाबद्दल नक्की काय चाललय याचाच विचार करत होती.

"तुका ठावक नाय, पण रामाकाका वांगडा एकदा हिश्श्यावरसुन अण्णांचा भांडण झालेला, तेव्हा अण्णानी तेका सरळ सांगला, जा काय आसा ता बापाशीन अण्णाच्या नावार केलासा आनि आपल्याकडे आसलेलो तसो कागद सुध्दा दाखयलो. गाववाल्यानी सुध्दा त्या कागदाच्या भरोशार अण्णांची बाजुच उचलुन धरली, तलाठ्यान सुध्दा तो मजकुर बरोबर आसा ह्या वाचुन सांगितला... आनि त्यावेळपास्न रामाकाकान घरदार आनि गावाचं तोंड बघितलान नाय."

"अवो, पण ह्या सगळ्यात अण्णाच्या सुटकेचो खय प्रश्न येता?" तिला अजुन कोडं सुटलं नव्हतं.

"सांगतंय, माका असा दिसता आता शेवटच्या क्षणाक अण्णांका भावाच्या कुटुंबाची काळजी वाटत आसतली. आपण जावन तेंका सांगाया की आपण तेंची सगळी काळजी घेतव. मी आज सावंत वकिलाकडसुन जमिनीचे पेपर सुध्दा करुन आणलय. सोळा एकर जमीन मी दोनय भावांच्या नावार केलसय, दोघांका आठ आठ एकर. कसा आसा, आज ह्या कोरोनाचा संकट उभ्या रवलासा, तिकडे तेंका काय झाला तर बघनारो कोन नाय. तेव्हा मी काकीकसुध्दा सांगलय, तुम्ही गाडी करा आणि तिघाय इकडेच या. आपलो वाडीचो फ्लॅट आसा ना तिकडे तेंका रवानेत, बाकीचा आपण बघुया सगळा... काय म्हणणा तुझा? अण्णांच्या जीवाचो घोर सरात आणि एका वझ्यातुन सुटका होयत तेंची. कागदार अण्णांचो आंगठो घेतलो की झाला. ते बघ, बॅगेत पेपर आसत, तू एकदा वाचुन बघ."

सगुणा इतकावेळ शांत बसुन सगळं ऐकत होती. तिच्या लक्षात आलं की आपण नवर्‍याबद्दल गैरसमज करुन घेत होतो. तिने पुढे होवुन त्याचे हात हातात घेतले त्यावेळी बाबल्याला काळोखात तिचे डोळे लकाकल्या सारखे वाटले. उष्ण अश्रुच्या थेंबाचा स्पर्श त्याच्या हाताना झाला, तेव्हा त्याने चमकुन तिच्याकडे पाहिलं.

"चुकलय मी, माफ करा ओ माका, मी वगीच तुमच्याबद्दल नाय थयसलो विचार करीत होतय."

रात्रीचे साडेदहा होत आले होते. पाऊस काहीसा कमी झाला होता. बाहेरच्या खोलीत अण्णा अजुनही बडबडत होता. लाईट लागली म्हणुन त्यानी डोळे उघडुन बघितलं तर बाबल्या त्यांच्या पलंगाजवळ बसला होता आणि त्याची बायको आतल्या दरवाजाजवळ उभी होती. बाबल्याच्या हातात कसलेतरी कागद होते.

" अण्णानु, ओ अण्णानु.... जागे आसात ना!"

"झिला? काय रे काय झाला? सकाळ झाली काय?"

"नाय, अजुन रातच आसा. पण वायच बोलाचा होता तुमच्यावांगडा."

म्हातार्‍या अण्णाला कसलाच अर्थ लागत नव्हता, पण त्याने हळुहळु उठुन बसायचा प्रयत्न केला तसा बाबल्याने त्याला हात देत बसवला आणि बाजुचा लोड आधाराला दिला.

"अण्णानु, मी आज वाडीक गेल्लय, तेव्हा येताना सावंत वकिलाकडसुन हे जमिनीचे पेपर करुन आणलय, तेच्यार तुमचो आंगठो व्हयो होतो." असं म्हणत असताना हातातले पेपर आणि शाईचे पॅड त्याने पलंगावर ठेवले. अजुनही जमिनीची मालकी अण्णाकडेच होती पण त्याला आता स्मृतीभ्रंशामुळे हे सगळं कितीसं आठवत होतं कोण जाणे. त्याचे बोलणं ऐकल्यावर अण्णा पुन्हा भुतकाळात हरवला आणि बोलु लागला..

"तुका ठावक आसा, ते राती असोच पावस असलो, सगळीकडे चिडीचीप काळोख, ढगांच्या आणि वार्‍या-पावसाच्या आवाजाशिवाय काय आयकुक येय नसला.. माका आवाजान निजच नसली, सगळी रात कुस बदलीत, तळमळत काढलय..."

"अण्णानु, आयकल्यात? माका ठावक आसा, म्ह्णानच हे कागद करुन आणलय, हे बघा... पैलाडची सोळा एकर जमीन आनि वाडीचो फ्लॅट आपण रामाकाकाच्या झिलांका देवया. तसो मी तेंका लागात ती सगळी मदत करत होतय, आनि तुमका शब्द देतय, यापुढेसुध्दा करतलय, तुमी बिनघोर रवा. कसलाच वझा घेव नकोत. मी तेंका कधीच अंतर देवचय नाय, यंदाच्या चतुर्थेक तेंका मी आणतलय इकडे आनि आपण सगळ्यानि एकत्रच गणपती पुजुया. चलात ना!"

अण्णा शांत बसुन सगळं ऐकत होता. त्याच्या चेहर्‍यावर कसलेच भाव नव्हते, पण बाबल्याचे बोलुन पूर्ण झाले तसे त्याने एकदा सुनबाईकडे पाहिले, एकदा सगळ्या खोलीभर नजर फिरवली आणि पुढे होत आपल्या डाव्या हाताचा अंगठा पॅडवर टेकवला.

 

साडेपाचला सगुणाला जाग आली तेव्हा पाऊस थांबला होता. पुर्वेकडे नुक्तच तांबडं फुटु लागलं होतं. तिने ऊठुन आपली कामं आवरायला सुरुवात केली. मागील दारची झाडलोट करुन ती पुढचं दार उघडुन बाहेर गेली तेव्हा अण्णा शांत झोपला होता. बाहेरच्या अंगणात पडलेला पालापाचोळा आणि वरच्या पडवीत आलेलं पावसाचं पाणी झाडुन जेव्हा ती आत आली तेव्हा अर्धा तास होवुन गेला होता. अण्णा सकाळी सहापर्यंत उठायचा आणि त्याला उठल्याबरोबर चहा लागायचा.

बाबल्याला कसल्यातरी आवाजाने अचानक जाग आली. त्याला आपण कशामुळे जागे झालो हे पटकन आठवेना. पुन्हा डोळे मिटत असताना मात्र पडलेलं स्वप्न त्याला व्यवस्थित आठवलं. हेच स्वप्न त्याला अनेकवेळा पडायचं. अशाच एका पावसाच्या रात्री त्याला अचानक जाग आली होती. त्याने बघितलं तर अण्णा उठुन आज्या झोपला होता त्या बाकापाशी जात होता आणि त्याच्या हातात एक कागद होता. आपला बाप पुढे काय करतो हे त्याने नीट बघायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला दिसलं की अण्णाने तो कागद उघडुन आज्याच्या हाताजवळ नेला. मग दिव्याच्या उजेडात एकदा निरखुन बघितला आणि पुन्हा घडी करुन आपल्या बंडीच्या आत ठेवला. त्याचं वय दहाबारा वर्षाचं, तसं लहानच होतं, त्यामुळे त्याला या सगळ्याचा काहीच अर्थबोध झाला नाही. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा घरात गोंधळ होता. आज्या अजुन उठलाच नव्हता. मग कुणीतरी त्याला आज्या मेल्याचं सांगितलं. रात्री धोधो कोसळणारा बाहेरचा पाऊस आता थांबला होता. तिरडीवर ठेवण्यापुर्वी पुन्हा एकदा त्याला आज्याला नमस्कार करायला सांगितला तेव्हा आज्याच्या डाव्या अंगठ्याला लागलेली काजळी त्याला दिसली होती. आणि मग तीनच महिन्यानंतर रामाकाकाचं झालेलं भांडण, त्यावेळी अण्णाने एक कागद काढुन सगळ्याना दाखवला, ज्यावर काळ्या रंगाचा एक डाग होता. 

बाबल्याच्या मनात एकदम विचार चमकुन गेला, तसा तो पलंगावरुन ऊठला आणि बाहेरच्या खोलीत आला. अण्णाचा चेहरा एकदम शांत होता. कसलाही ताण अथवा चिंतेचं सावट त्याच्यावर नव्हतं. ओठसुध्दा कसल्यातरी सुटकेच्या समाधानाने स्मित करत असल्यासारखे भासत होते. रात्रीच झोपेत कधीतरी अण्णाने या जगाचा निरोप घेतला होता. आणि त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर रात्रीची निळी शाई मात्र अजुनही तशीच होती.

 

© प्रविण धुरी (२७ ऑगस्ट २०२०)

(मधु मंगेश कर्णिक यांच्या 'अंगठा' या कथेवरुन सुचलेली)

Shiny SM-1 Finger and Thumb Print Ink Pad: Amazon.in: Office Products

Comments

  1. अप्रतिम. वाचायला चालू केले आणि कथा संपेपर्यंत ना थांबता वाचन केले. मला तर खूप आवडली ही कथा

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहीली कथा..कोकणातलं वातावरण अगदी डोळ्यापुढे उभं केलं. संवादही छान वाटले वाचताना..

    ReplyDelete
  3. खूप छान.मालवणी भाषा असली तरी नीलिमा बोरवणकर मॅडम ची गाज कादंबरी वाचल्यामुळे समजायला सोपी गेली. मन पुन्हा त्या वातावरणात गेले.

    ReplyDelete

Post a Comment