बाप्पा मोरया
आवाज - शुक शुक.... अहो $..$...$ ऐकलात काय.... तुम्हीच...
आवाज - हो $..$ हो.... मी तुकाच आवाज
दितसय, लक्ष खय आसा तुझो?
गेलो अर्धो तास मी बस स्टापवर उभो आसय, आज अनंत चतुर्दशी, बाप्पाच्या विसर्जनाचो
मोठो दिवस, त्यामुळे आज बस कमी.
दुसरी शिफ्ट संपवन भायर पडाचा टायमींग बारा वाजता. पण आज जरा सुट मेळली म्हणान
तासभर लवकर निघालय. त्यात आज जरा गर्देतुन चलाचो कंटाळो म्हणान ह्या रिकाम्या रस्त्यार
बसची वाट बघी होतंय. थोडो भोवाडो पडता, पण ते ढोल आणि गाडयेंच्या पॅ पॅ पासुन तर सुटका
होता. आणखी दोघजाण होते बरोबर, पण तेंची बस येतुकच ते गेले आणि मी आता धा मिनटांपासून
एकटोच होतय. आजुबाजुक चिट्पाखरूसुध्दा नाय होता, पाठल्या गल्लेतसुन काय ते
आवाज येत होते. असा आसताना मघापासून कोणतरी माका आवाज देत होतो. मी पहिलो लक्ष दिवक नाय. भास आसात म्हणान गप रवलंय. तसो माका भय बीय दिसना नाय, पण वगीच नसती लचांडा नको
म्हणान जरा...
आवाज - इकडे बघ...
उजवीकडे... खालते खालते... इकडे आसय मी.
कोणी ता परत हाक मारल्यान तेव्हा खयसुन येता म्हणान मी जरा कानोसो घेतलय, तर बस स्टापच्या पाठल्या
आंगान
कोणतरी बोला होता. तसोच पाठीमागे गेलंय तर कोण नाय होता.
आवाज - अरे मीच आसय बाबा, वायच पुढे ये भिया
नको.
तसोच जरा पुढे सराकलय आणि काय सांगा... बघितच रवलय...
पाठल्या गडग्याच्या भिंतीकडे तोंड करुन कोणतरी बसलेला होता, जवळ जावन बघलय तर... एक
बाप्पाची घरगुती मुर्ती होती, आणि तेच्यातुनच आवाज येत होतो.
मी - अरे !... बाप्पा !...
हय कोणी ठेवलो ?
त्यात आणि बोलणारो बाप्पा, म्हणजे स्पेशल इफेक्ट
आसतशे दिसता असा म्हणत तपासूक सुरवात केलंय. कॅमेरो, माईक, स्पीकर असा काय तरी आसाकच व्हया ना, सापडताला.
बाप्पा - अरे काय नाय आसा
बाबा, तुझ्यासारखोच मी त्या ढोलाच्या आवाजाक कंटाळलय म्हणान हय
येवन बसलय. मघाशीच तुका आवाज देणार असतय, पण ते होते ना
सवंगडी तुझे, म्हणान जरा वाट बघीत रवलय.
मी - छ्या ! ह्या काय तरी येगळा आसा, काय गौड्बंगाल आसा
ता माका बघुकच हव्या. तसो सोडुचया नाय मी.
मनातल्या मनात विचार करीत त्या आवाजाकडे लक्ष दीवन बघित रवलय.
बाप्पा - अरे खुळ्या ! आयक
माझा, ता कर्नाटक आणि बंगाल कित्या एक करतस आता? इकडे बस बघया असो.
आता मात्र माझ्याकडे काय उपाय नाय होतो. तेच्या पुढ्यातच बुड टेकयलय. डोळ्यार आजुनय विश्वास
बसाक नाय होतो, पण आता सांगतय कोणाक? आसो, पुढे काय वाढुन ठेयला
ता बघुचा म्हणान बसलय, म्हटला आयकाचा काय सांगता ता आणि कोणी काय ट्रीक केलीसा ती सुध्दा शोधुया.
मी - बोला, काय म्हणतास? आणि आधी एक सांगा, हय असो निर्जन
रस्त्यार माका एकट्याक सो गाठल्यात? दुसरो साधोसो कोण आसतो तर
हार्ट्फेलच होता. मी घट काळजाचो म्हणान बरा.
बाप्पा - बघलंस, तुका उत्तर म्हायती
आसा तरी माका इचारतस.
एकदम गुगलीच पयल्या वाक्यार.
बाप्पा - खरा सांगा, सगळे कायतरी मागीत
आसतत, पण तुझा गाऱ्हाणा वायच वेगळा होता, म्हटला बोलाचा
तुझ्या वांगडा.
मी - मी कधी तुमका गाऱ्हाणा घातलंय ? काय तरी सांगा नको.
हेच्यारच कळला माका, ही कसली तरी ट्रीक आसतली.
बाप्पा - परत सुरु झाला तुझा
! जरा गप रव आणि मी सांगतय ता ऐकून घे आधी.
ह्यावेळचो आवाज जरा कडकच वाटलो माका. पण बाप्पा आसलो तर कधी चिडता नये ना, आता जरा लक्ष दिवन ऐकुचा
ठरयलय, म्हणजे सापडताला
काय सिक्रेट आसा ता.
बाप्पा - तू कितीही नाय
म्हटलस तरी माझी काळजी करतय ह्या ठावक आसा माका. म्हणान तर माझी मुर्ती भिजत
नेणारे छत्रेतले लोक बघुन तुका तक्रार करीन सारखी वाटली ना, सांग.
आता माझी ट्युब पेटली.
मी - पण ता तर मी असाच म्हटलंय, विरोधाभास दिसलो
म्हणान, माझी सवय आसा ती. आणि तेच्यार पुढे आणखी चार ओळीसुध्दा
सुचले... ते भक्तांसाठी.
बाप्पा - बरोबर, म्हणानच तू. माका सांग, प्रत्येकजण काय तरी मागतच
आसता, होय की नाय ? बऱ्याचदा स्वत:साठी, कधी दुसऱ्यासाठी. तक्रारी तर सदा
सर्वकाळ चालूच आसतत. तुझो स्वभाव कसो ? फटकळ आसस, पण तुझ्या समोर असो
कोणय गरजू दिसलो तर धावतय ना तू? आज माका गरज आसा, म्हणान तुका आवाज
दिलय.
मी - ऑं ह्या काय नवीन आता ? फिरकी घेतास काय
माझी ?
बाप्पा - बघ कसा आसा ! तुमका
बोलान सारख्या वाटला की तुम्ही कोणातरी जवळच्या माणसाकडे बोलतात, आपल्या आवडीच्या
देवळात जावन मनातला बोलान टाकतात, कायच नायतर तुमचो गृप आसता
थय भडाभडा सगळा सांगतात, बरोबर ना ! आमचा तसा काय नाय, म्हणान तुझ्यासारखो
कोणतरी शोधुचो लागता.
मी - पण बाप्पा, मी तर तुमचो भक्त सुध्दा
नाय, मग...
बाप्पा - ऐक रे. ह्यावर्सा पावस खुप पडलो, होय का नाय ? सगळीकडे पाणी इला, पार केरळापासून कोकण, कोल्हापुर, सांगली असा करीत
नाशिक, मग तिकडे गुजरात, राजस्थान मग उत्तरेकडे, पाणीच पाणी नुसता.
मी - ह्या तू म्हणतस ? अरे सगळ्याचो कर्तो
करवितो ना तू आणि आता तूच असा बोलतस ? कमाल आसा तुझी सुध्दा !
बाप्पा - पण त्या पाण्यात तुमची
देवळा बुडत होती, माणसा बुडत होती, तुमची शेती भाती पाण्यात
गेली, तेव्हा खुप वायट वाटला ना !
मी - मग काय केलस नाय ता ! थांबवचा होतय मरे सगळा, आता कित्या सांगतस
माका.
बाप्पा - इतक्याच न्हय तर रस्ते, डोंगर व्हावान गेले, घरा बुडली, भिंती पडले, बोटी उलाटले, गाडये अडाकले, कितक्या नुकसान
झाला आसताला ना !
बाप्पाची तंद्री लागलेली दिसा होती. माझ्या बोलण्याकडे लक्षच नाय होतो.
बाप्पा - यावर्षी चतुर्थेक मुर्ती
आणताना आणि आज विसर्जनाक नेताना सुध्दा वरसुन ओतणारा पाणी आणि खाली खड्ड्यातला
पाणी. लोकांचे हाल झाले, नाय रे ? तुका म्हायत आसा, पुरात देवळा बुडा
होती तेव्हा काही लोक म्हणा होते की देव आपला घर वाचवक शकलो नाय तर तुमका माणसाक
काय वाचवतोलो ? माणसाच येतली जीव वाचवक. आणि मग त्या होडयेतल्या बाईन
जेव्हा त्या जवानाच्या पायाक हात लावन नमस्कार केल्यान, आठावता मा ? माका वायट नाय
वाटाक हां ह्या ऐकून. उलट बरा वाटला, निदान काही प्रसंगात तरी
माणसाची खरी किंमत कळली तुमका.
बाप्पा - माका एक कळना नाय, ही देवळा, ही घरा, गाडये, रस्ते, धरणा, पुल ह्या जा काय
आसा ता कोणाचा? तुमचा माणसाचाच ना ! 'ता देऊळ ह्या माझा
घर' असा मी कधी सांगलय ? काय सात बारार माझा नाव
घाला म्हणान भांडाक इलय ? तुम्ही बांधल्यात आणि तुम्हीच ठरवल्यात, तेचे वाटे तुम्हीच
माणसानीच केल्यात. मग माका कित्या गाळी घालतास ता तुटला, मोडला, बुडला तर ? आणि इतकीच माझ्या
भिजण्याची, बुडण्याची काळजी आसती तर माझी मुर्ती जी तुम्हीच बनवतात, ती अशी थंडगार
पाण्यात बुडवतात कशी ? तुमची उत्सवाची गरज आसा म्हणान मुर्ती आणायची आणि संपली की
तुम्ही ती बुडवायची, तेव्हा ती काळजी खय जाता ?
बाप्पा - ती देवळा सुध्दा अशीच रे, कोणी भल्या माणसान
भल्या विचारान लोकांचा भला करुक उभी केली पण नंतर नंतर तुमच्यातल्याच काही
दीडशाण्यानी तेची दुकाना केली. ता चलतासा तवसर तेची गरज आसा, आणि ती गरज लवकर
आटातशी दिसना नाय माका.
बाप्पा - रस्ते... तुम्हीच बांधल्यात, मग तेच्यावरच्या
खड्डयाची जबाबदारी माझ्यार कित्या ? नाचाची गाणी तुमची, नाच तुमचो, गाडये तुमचे, मग ट्रॅफीक जाम मी
कित्या सोडव ? ते रस्ते, ती धरणा, ती कंत्राटा सगळा तुम्हीच
ठरवतात, मग कोण काय आणि किती खाता ताय तुम्हीच बघा. माझ्या नावार जे
मोदक करतात ते तरी मी खातय काय रे? तुम्हीच हादडतात मा माका नेवेद म्हणान दाखवन ? आठावता, मागे ता दुध पिवक
घातलेल्यानी काही लोकानी, ता काय मी पित होतय ? काही जण सांगत होते
तेच्यामागचा विज्ञान, पण मग तुमच्या त्या श्रध्दाबायचा काय करुया ? बिचाऱ्यांका खुळ्यात काढल्यानी
तेव्हा. वगीच आपला कायय झाला की माझ्यार बील फाडतात तुम्ही आणि मगे येतात 'निस्तर आता' म्हणान सांगुक.
बाप्पा - बोल मरे, तोंड उघडा टाकुन
बघतंय कित्या आता ?
आवशीक ... .... इतक्या सगळा ऐकान माकाच दम
लागलेलो आता. आपण वाढदिवस विसरल्यावर चिडलेल्या बायकोची मशीनगन धडधडाची थांबल्यार
कसा वाटता, तसा झाला माझा.
मी - बाप्पा, वायच दम घे, तुझा बोलान झाला तर
मी बोला काय ! तू आज एकदम सुटलंच म्हटल्यार ऐकुन घेवक नको तुझा ? कसा आसा, माका वाटता तो
प्रत्येकाच्या श्रद्धेचो भाग आसता.
तसो मी विज्ञानवादी, पण ही श्रध्दाबाय बऱ्याच वेळा मदतीक धावान येता, जोडयेक वायच मानसशास्त्र
घेतला की प्रश्न सोडवक सोपे जातत, असो माझो अनुभव. त्या जोरार मी बोलाक सुरु केलय.
मी - जो तो आपल्या मनाक पटता तसा करता. तुझा बरोबर, ही घरा, गाडये, पुल, रस्ते सगळा आम्ही
केला, ती कंत्राटा, ती देवळा आणि ते सण-सोहळे
सुध्दा आमचे. पण डोंगर, नदी, समुद्र हे तर तूच निर्माण केलय ना ? ही झाडा-पेडा, पशु-पक्षी, इतक्याच काय आमका
सुध्दा तूच जन्म दितंस, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तू बुध्दीची देवता, ती बुध्दी सुध्दा
तुझ्यामुळेच मिळता ना आमकां! म्हणान असा काय झाला की तुझी आठवण येता.
मी - आता ह्यो पावस, ऊन, वारो, वादळ ह्या काय
आम्ही निर्माण केला? तुझीच देन ना ती, मग जर पावस कमी-जास्ती
झालो, तर आम्ही कोणाक विचारायचा? वादळ, तुफान इला, झाडापेडा पडली, पाणी चढला, कधी मिळानासा झाला
तर आम्ही बापड्यानी कोणाकडे बघायचा ?
बाप्पा - लेकरा, ते डोंगर, नदी, समुद्र ह्या सगळा
जसा मी दिलेलय, तसाच ठेयल्यात काय रे तुम्ही ? झाडापेडा, आणि जनावरां तशीच
आणि तितकीच आसत ? माणसाची संख्या वाढताहा आणि बाकी सगळा कमी होयत चललाहा , बरोबर ना ? निसर्ग जसो होतो
तेच्यात किती बदल केल्यात तुम्ही ? तर मग पावस आणि वारो
तितकोच कसो रवात सांग बघुया. कधी कमी पडतलो तर एखाद्या वर्सात खयतरी भरभरान
ओततोलो. सगळीकडे एकाच वेळी, एकाच मापाचो एकसारखो पडाक ती काय पिज़्ज़ाची फॅक्टरी आसा ? ह्या बरा, म्हणजे पाणी आसला
तरी मी वाईट आणि नसला तरी मीच जबाबदार !!
बाप्पा - आता तू बुध्दीचा कारण दिवन
माकाच जबाबदार धरतस, तर त्याच बुध्दीचो उपयोग करुन माका सांग, तुमच्यातले काही
दीडशाणे नको तिकडे ही बुध्दी वापरतत, आणि माडयेर माडये चढयतत, तर काही जण वापर न
करता नुसतेच टाळ कुटत कौलाची वाट बघत बसतत, मगे तेंची आसलेली कौला
सुध्दा फुटतत, आता हेकासुध्दा मीच जबाबदार ?
मी - असा आसा. बघ, सगळी ही तुझीच
लेकरा, ह्या जग कायता तुझ्या आशीर्वादानच चलता. कोणाक कमी कोणाक
जास्ती, तसा झाला तरच एकमेंकाक धरून रवतले सगळे ना, सगळ्याकडे सगळा
आसला तर दुसऱ्याची गरजच उराची नाय. जेच्याकडे जा नाय, ता मेळवच्यासाठी, तो जेच्याकडे ता
आसा तेका शोधतलो ना, आता ह्या माझ्याकडसुन खेका वदवन घेतस ? तू निसर्ग बनवलस
आणि बुध्दी दिलस तर तेचो कमी-जास्त वापर सुध्दा तुझ्याच इच्छेन होतासा ना ! मगे ? रामदास स्वामीनी
तुका सगळ्याचो सुखकर्ता आणि दुखहर्ता म्हटला ता काय उगीच ? तुझे महान भक्त
सगळे ह्याच सांगुन गेले, की पशूपक्षात, जनावरात, झाडापेडात, माणसात, निसर्गात सगळीकडे
तुझाच वास्तव्य आसा.
बाप्पा - ह्या पटता तुका ? तू तर भक्त नाय ना, मग ? ह्याच कारण आसा मी
गजालीसाठी तुका हाक मारलय. तू सगळ्याचो सगळ्या वाटेन विचार करतस आणि बोलतस. आणि तरीही माझ्या
पावसात, माझ्याच भिजण्याची चिंता करतस, जर मी सगळ्यात आसय
असा तुका वाटता तर मघाशी तू म्हटलय तसा, मी त्या नमस्कार करणाऱ्या बाईत होतय तसो जेच्या
पायाक हात लावल्यान त्या वर्दीत सुध्दा होतय, जर मी दिलेली बुध्दी मजले
चढवक कामाक येता तर तुका ह्या सगळा समजान घेवक सुध्दा तीच उपयोगी पडता. एखादो
तेच्याकडचा चाक काठयेन खेळाक वापरता, तर दुसरो ताच स्टेअरींग
म्हणान वापरता तर आणि कोण वजन न्हेवक नायतर माणसांचा वजा न्हेवक वापरता. तसाच आसा
ह्या. चाक एकच, प्रत्येकाचो वापर वेगळो.
कळतासा तुका मी काय सांगतय
ता !
बाप्पा - डोळे बंद करुनसो बसलय ! ए झीला, लक्ष खय आसा तुझा ?
असा म्हणत असतानाच माका तेनी खांद्याक धरुन हलवक सुरु केल्यान. माका कळाना काय
झाला ता, कानावर तेची
हाक
ऐकूक येत होती आणि सोबत घंटेचो आवाज. सगळा शरीर सुध्दा गदागदा हला होता.
आवाजाचो अंदाज घेत जरा डोळे उघडुन बघितलय तर समोर एक माणुस अंधुकसो दिसलो, माका हालवत होतो.
कंडक्टर - शुक शुक... अहो... ऐकलत का... हो
तुम्हीच...
कंडक्टर - डोळे उघडा... चला, लास्ट स्टॉप आला.
मी - कुठे पोचलो आपण ?
मी आता थोडो जागो होत होत कंडक्टराक विचारलय.
कंडक्टर - ओशिवरा डेपो आला, तुम्हाला कुठे
जायचं आहे ?
खिडकीतून बाहेर बघितलंय तर
दुसऱ्या बसचो कंडक्टर बेल वाजवत बस मागे घेत होतो. मी बस मधुन उतरून डेपोच्या बाहेर इलय.
समोरच उभ्या रिक्षावाल्याक बांगुरनगर विचारताच तो तयार झालो, तसो आत बसलंय, जरा आश्चर्यच वाटला, पटकन ऐकनत नाय असे
रिक्षावाले... खिशातलो मोबाईल काढून बघितलय....
तर स्क्रीनवर मुलीनं कालच
शाळेत बनवलेल्या बाप्पाच्या मुर्तीचा फोटो आणि तेच्या पायाजवळ, वेळ दाखयणारी फक्त
चार शून्य होती...
~`~`~`~`~
© प्रविण धुरी ( 14
saPToMbar 2019 )

Comments
Post a Comment