दृष्टीदान




जुन महिना सुरु झाला आहे, आणखी अडीच तीन महिन्यानंतर गणेशोत्सव येणार. यावर्षीच्या सुरुवातीपासुनच कोरोनाने ज्याप्रकारे धुमाकुळ घातला आहे ते पाहता म्हणावा तेवढा उत्साह अजुन दिसुन येत नाही आहे. हे कोरोनाचे संकट आणखी किती दिवस, महिने आपल्यासोबत राहणार याविषयी कुणीच ठामपणे सांगु शकत नाही आहे.

                आमच्याकडे कोकणातील गणपतींच्या कार्यशाळांमधुन या दिवसांमध्ये गणपतीच्या मुर्ती घडवण्याची लगबग सुरु होते. शाडुमाती आणुन तिच्यावर सगळे सोपस्कार करुन विविध आकाराच्या, रुपाच्या मुर्त्या बनवल्या जातात आणि त्या सुकवुन मग त्याना रंग चढवला जातो. पण यावर्षी ही कामे सुध्दा उशीरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यातच 'निसर्ग' चक्रीवादळाने निसर्गाचे रौद्र रुप दाखवले आणि कोकणची परिस्थिती अधिकच बिकट करुन ठेवली.

                तरीही इतक्या सगळ्या संकटातुन एक जमेची बाजु समोर येताना दिसली. गेल्या चार महिन्यांमध्ये कंपन्या, कारखाने बंद ठेवावे लागले, सर्वच प्रकारची वाहतुक कमी झाली आणि याचे परिणाम नकळतपणे वातावरण स्वछ होण्यात दिसुन आले. हवेतील प्रदुषण इतके कमी झाले की मध्यंतरी पंजाबमधील एक बातमी आली होती, अनेक वर्षानंतर कुठल्याशा गावातुन हिमालयाचे दर्शन झाले. एक मात्र खरं की हवा, पाणी सगळंच बर्‍याच प्रमाणात स्वछ झालं, दिवसा आणि रात्री आकाशदर्शन करण्यातला आनंद वाढला. निसर्गातील, पाण्यातील अनेक प्राणी पक्षी पुन्हा एकदा विहरताना बघता येऊ लागले. त्यांचे आवाज किलबिलाट ऐकु यायचा, पण भरीला आता नुसत्या डोळ्यानी हा आनंद मिळवता आला.

                आवाज आणि स्पर्श याच्या पलीकडे या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी डोळे खुप महत्वाची भुमिका बजावतात. अगदी एखाद्या निर्जीव गोष्टीतील सौंदर्य वाढवण्याचं, खुलवण्याचं कामदेखील डोळे करतात. गणपतीच्या कार्यशाळेत मुर्ती घडवल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असायचं तर ते मुर्तीचे डोळे रंगवण्याचं काम. त्याला डोळे उघडणे म्हटलं जातं. माझ्या लक्षात आहे, लहानपणी आम्ही गणपतीच्या दिवसात या कार्यशाळेत पुन्हा पुन्हा जात असु, अगदी गणपतीचा दिवस येईपर्यंत. आपल्या गणपतीचे डोळे उघडले का हे बघायचं आणि येऊन घरी निरोप पोचवण्याचं काम आम्हा मुलांकडे असायचं. डोळे उघडताच त्या निर्जीव मुर्तीत चैतन्य आल्यासारखं, जिवंतपणा आल्यासारखा वाटायचा. हीच किमया आहे डोळ्यांची.

                तसं काही मुर्त्या बंद डोळ्यांच्या देखील असतात, पण त्या आत्मबल वाढवण्यासाठी आत्मचिंतन करणार्‍या वाटतात. पण डोळे 'उघडे' असलेली मुर्ती मात्र आपल्याकडे बघते आहे, संवाद साधते आहे असे वाटते. तिच्या दृष्टीत आपल्याला तेज दिसते, आपलेपणा दिसतो.

                एखादी निर्जीव मुर्ती सजीव करण्याचं काम हे डोळे करु शकतात, त्याना दृष्टी देऊ शकतात, त्यांच्याशी संवाद साधण्याचं माध्यम बनु शकतात, तर विचार करा सजीव, जिवंत माणसाच्या आयुष्यात हेच डोळे किती महत्वाची भुमिका बजावत असतील. हा आनंद न घेऊ शकणार्‍यांची संख्या जगात खुप आहे. आजमितीला भारतात जगाच्या एक चतुर्थांश व्यक्ती दृष्टीहीन आहेत. दोन्ही डोळ्यानी अंधत्व दहा लक्ष लोकाना असुन तीन लाखापेक्षा जास्त अंध बालके आहेत. डोळ्यांची बाहुली खराब असणार्‍या अंध व्यक्तींची संख्या पाच लाखाच्या घरात आहे.

                आपण ठरवले तर यातील अनेकाना आपण नवी दृष्टी देऊ शकतो, मरणोत्तर नेत्रदान करुन.

                दरवर्षी होणार्‍या सरासरी दहा लाख मृत व्यक्तीपैकी केवळ दहा हजार लोकच नेत्रदान करतात. आणि हा आकडा खुपच लहान आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तीना नवी दृष्टी मिळु शकते, दोघेजण या सृष्टीला डोळे भरुन पाहु शकतील. गणपतीच्या मुर्तीचे डोळे उघडल्यानंतर येणारा जिवंतपणा त्यांच्याही डोळ्यांमध्ये येईल, त्याना इतरांशी आणि इतराना त्यांच्याशी संवाद करणं सोपं होईल.

                एकदा निश्चय केला की ही प्रक्रिया पुर्ण करणं फारसं कठीण नाही. आपण फक्त नेत्रपेढीचा अर्ज भरुन ठेवायचा आणि नातेवाईकानी अशा व्यक्तीच्या मृत्युनंतर लगेचच त्या नेत्रपेढीला कळवायचं. बाकीच्या गोष्टी आणि काय काळजी घ्यायची असते त्याचं योग्य मार्गदर्शन ते करतातच. केवळ अर्ध्या तासात डोळ्यातील बाहुली आणि पडदा काढायचं काम केलं जातं. काही लोकाना अशा कृतीमुळे मृत शरीर विद्रुप दिसण्याची भीती सतावते. पण असं काहीही होत नाही. आणि तसंही, एका मृत शरीराच्या अनंतात विलीन होण्यापुर्वीच्या काही क्षणासाठीच्या सौंदर्याची काळजी करायची की दोन चेहर्‍यांना नवं सौंदर्य कायमचं बहाल करावं याचा विचार झाला पाहिजे.

                निसर्गातील अद्भुत किमया अनेकाना बघता यावी यासाठी आपले नेत्रदान करुन, त्याना नवी दृष्टी देण्याचा संकल्प आजच अमलात आणुया.

प्रविण धुरी - 10 जुन 2020

Comments