रविवारचा चहा आणि चर्चा




वाढती बेकारी - एक ज्वलंत समस्या

"टींग टींग ...  टींग टींग टींग टींग..... "
अशी घाईघाईत बेल वाजली म्हणजे नक्कीच रघुकाका आले असणार, असा विचार करतच कुसुमताईनी दार उघडलं.
कुसुमवहिनी - या या रघुकाका !  सुस्वागतम !

पायातील चप्पल दारामागे काढुन ठेवली आणि हातातला पेपर हालवत रघुकाकानी प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.

रघुकाका - अरे !  काय चाललय काय म्हणायचं याला ? किती ही अराजकता? सत्ता काय हातात दिली तुमच्या, वाटच लावताय सगळ्याची.... यासाठी काय तुम्हाला आणलं होत निवडुन ?
रघुकाकानी सोफ्यावर बसुन कुसुमताईनी दिलेल्या पाण्याचा ग्लास एका दमात रिकामी केला आणि जरा आजुबाजुला नजर फिरवली.
कुसुमवहिनी - काय झालं ? काय शोधताय?
रघुकाका - वहिनी, तुमचा नवरा कुठे आहे? त्याला शोधतोय,,,
कुसुमवहिनी - येतायत, खाली जाऊन येतो म्हणाले, येतीलच इतक्यात. पण तुम्हाला काय झालं इतकं चिडायला ? चहा घेणार ना तुम्ही?
रघुकाका - ते सांगतोच, पण मलाही उत्तर हवी आहेत सगळ्याची. हवं तर तोपर्यंत चहा होऊन जाऊ दे एखादा.

विभोर -  गुड मॉर्नींग काका, तुम्ही कधी आलात?
रघुकाका -  मॉर्नींग विभोर.. पण या असल्या बातम्या वाचुन ती कसली गुड राहतेय म्हणा ?
विभोर - काय झालय तरी काय आज ? सकाळीच तुमचा मुड खराब झालाय तो?
रघुकाका - हे वाच, पारलेजी बिस्कीटाचा सेल कमी झाला म्हणून प्रॉडक्शन कमी करतायत आणि त्यापायी कामावरुन कमी करणार आहेत लोकाना.
विभोर - अहो काका, हा तर एकच प्रॉब्लेम सांगताय तुम्ही, अजुन खुप आहेत. हे बघा बाबा सुध्दा आले. तुम्ही हा चहा घ्या तोवर, मग बोलु आपण.
साने - ' काय राघोबादादा ! एकदम आक्रमणच दिसतय आज.'  

दारातुन आत शिरता शिरता सानेनी प्रतिक्रिया दिली.

कुसुमवहिनी - ' मग काय, मैदान मारायचंच या आवेशात एंट्री झाली आहे'.

नवऱ्याच्या हातातील पिशवी घेत कुसुमताईनी उत्तर दिलं. 
दुरुस्त करुन आणलेला पिशवीतला ट्रांझीस्टर टेबलवर काढुन ठेवला आणि साने रघुकाकांच्या शेजारी बसले. त्यांच्या मागोमाग आत आलेले वराडकर सुध्दा खुर्चीवर टेकले होते. रविवारची मैफल जमू लागली होती.
सानेंची मुलगी विभावरी हातात गरम गरम वाफाळणारा चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली, आणि सर्वाना एक एक कप देऊन झाल्यावर आपला कप घेऊन तिथेच एका बाजुला बसली.

विभा -  काय रे विभोर, असा काय मोठा प्रॉब्लेम झालाय?
रघुकाका - तु पेपर बघितला नाहीस का आजचा? हा बघ....

रघुकाकानी हातातला पेपर तिच्याकडे दिला.

रघुकाका - अर्थव्यवस्था डबघाईला नेतायेत हे. मंदी दिसु लागली आहे सगळीकडे. एकामागुन एक चुकीचे निर्णय घेतले त्याचे परिणाम आहेत हे, नाहीतर काय? पहिल्या पाच वर्षात काय दिवे लावलेत ना त्याची फळ भोगतोय आपण. नोटाबदली, जीएसटी सारखे बिनकामाचे उद्योग करायचे आणि काय तर म्हणे स्वच्छता अभियान, बेटी बचाओ, काळा पैसा बाहेर काढणार, आतंकवाद कमी करणार. सगळे नुसते फुकाचे बोल. शेतकरी आत्महत्या करतोच आहे आणि तुम्ही बसलाय जनधन अकाऊंट उघडत आणि नोटांचे रंग बदलत. तिकडे सीमेवर सैनिक मरतायत, इकडे शेतकरी आणि आता नोकरी गेल्यावर बेकारीने उरलासुरला सामान्य माणुस, तो सुध्दा जीव देण्या पलीकडे काय करणार आहे अशाने सांग.

चारही श्रोते आवासुन या आवेशपुर्ण भाषणात इतके गुंग झाले होते की दारातुन आत आलेले बंडुनाना आणि हरीतात्या कुणाच्या लक्षातही आले नव्हते. ना जाणो हे बालंट आपल्यावर नको यायला म्हणुन की काय, पण तेही दोघे अगदी शांतपणे एका बाजुला उभे राहुन रघुकाकांचा आवेश उतरण्याची वाट बघत राहिले.
एका दमात इतक सगळं बोलल्यामुळे किंवा त्या आवेशामुळे असेल पण रघुकाकाना थोडासा श्वास लागला.
भानावर येताच विभा पटकन उठुन रिकामे कप आणि ट्रे घेऊन आत गेली.

साने - ऐकलं का नाना? बोला आता तुम्हीच, द्या काय ती उत्तरं याना. या सगळ्याला जबाबदार कोण?
बंडुनाना -  मी,, मी.. त ते.. मी काय सांगणार?

अचानक झालेल्या हल्ल्याने बंडुनाना बावचळुन गेले.

हरितात्या - बरोबर आहे रघुचं, अरे इतकं सगळं घडुनही तुम्ही गप्पच, वर आणि इथले प्रश्न सोडवायचे बाजुला टाकुन खुशाल परदेश हिंडताय, कसे?

हरीतात्यानी समस्या अधिकच गंभीर आहे हे दाखवण्यासाठी हातभार लावला. रघुकाका आणि हरीतात्या जवळपास एकाच वयाचे, त्यातच मेंडीकोटाचे सख्खे भिडू. 

विभोर -  काका, समस्या दिसतेय खरी मोठी. किती सारे मुद्दे एकदम मांडलेत हो, पण आपण एक एक करून विचार करुया का? म्हणजे आपल्यासुध्दा लक्षात येईल की नक्की चिंता कसली केली पाहिजे आणि सरकारकडून अपेक्षा काय ठेवली पाहिजे. चालेल का ?

विभोरने सराईताप्रमाणे सुत्र संचालन आपल्या ताब्यात घेतलं.

रघुकाका - हं

रघुकाकानी मुकसंमती दिली तसं विभोरने आपला मुद्दा पुढे सुरु केला.

विभोर -  बंद पडत असलेले ऑटो कंपन्यांचे प्लांट्स, बिस्कीटांची आणि अंतर्वस्त्रांची मंदावलेली विक्री, पडून असलेला माल आणि उत्पादित सामान, बांधुन तयार असलेली पण विक्री न होता पडुन असलेली घरे किंवा फ्लॅट्स, अनेक कंपन्यामधुन नोकरीवरुन कमी करण्यात येत असलेली माणसे, या सगळ्याचा परिणाम म्हणुन गेल्या पंचेचाळीस वर्षात प्रथमच उच्चतम पातळी गाठलेला बेकारीचा आकडा आणि या सर्वाला जबाबदार असणारं मोदी सरकार. काका बरोबर ना, अजुन काही राहिलं नाही ना ! मला काय वाटतं या सगळ्या परिस्थितीची मुळ कारणं काय आहेत याचा नीट विचार करायला हवा. तरच त्याच्यावरच्या उपायांबद्दल चर्चा करण्याला अर्थ राहिल.
विभा -  दादा, ते सगळं ठीक आहे, पण मला सांग एवढे सगळे मराठी शब्द तू न चुकता कसा काय बोललास ?

अंतर्वस्त्र, उच्चतम असे सगळे मराठी शब्द ऐकुन विभा आश्चर्यचकीत झाली होती.

वराडकर - विभाबाई, नवल आहे खरं, पण ते आपण नंतर बघू. मला काय वाटतं, हा बदल जसा म्हटला जातोय तसा काही गेल्या दोन-तीन वर्षातला नाही आहे. वेगात झालेली वाढ काही काळानंतर स्टॅग्नंट होते म्हणतात, तसा निसर्गनियम आहे. तसच काहीसं इथे घडत असावं.
रघुकाका - म्हणजे तुला काय म्हणायचय, या सगळ्याला आधीच्या कॉंग्रेसच्या सरकारातली जास्तीची वाढ कारण आहे. अरे अजुन किती वर्ष मागील सरकाराशी तुलना करणार? झालं ना पहिल्या पाच वर्षात !
हरितात्या - तसं नाही रे, आधी तो काय म्हणतोय ते ऐकून तर घे. नाही तरी या वेळी पहिल्यापेक्षा अधिक बहुमतानी निवडुन आल्यावरही पहिल्या कार्यकाळातल्या निर्णयाना शिव्या झेलतच सुरुवात करावी लागतेय ना त्याना. चुकलच असेल काही तर दिसेलच ना, पण काय ते तर शोधू आधी.
विभा -  काका, जर दिवसेदिवस वाढणारी बेकारी हा विषय घेतला, तर खरच परिस्थिती खुपच कठीण आहे. गेल्या तीन वर्षात जवळपास पाच लाखाच्या वर लोकांनी नोकरी/रोजगार गमावला आहे. जर देशाचा जीडीपी वाढतोय तर मग हे असं का होतय? की हे जीडीपीचे आकडेसुध्दा उगाचच फुगवून दाखवले जात आहेत?
साने -  बरोबर आहे तुझं, पण त्यासाठी हे सगळं मुळातुन समजुन घ्यायला हवं.

सानेनी विभाला उद्देशुन सांगताना त्याचा रोख मात्र रघुकाकांकडे राहील याची काळजी घेतली.

साने -  जीडीपी म्हणजे देशाचं एकत्रीत सकल राष्ट्रीय उत्पादन. त्याचे निरनिराळे घटक आहेत. देशातल्या निर्माण होणाऱ्या नोकऱ्या हा यातील काही घटकांचा एकत्रीत परिणाम आहे. त्यामुळे जरी यांचा परस्परांशी संबंध असला तरी एक कमी म्हणून दुसरंसुध्दा कमी असं म्हणणं चुकीच ठरू शकतं. अमेरिका युरोपमध्ये याच जीडीपीचे आकडे हे 3.2%, 2.1%, 0.1% असे आहेत, म्हणजे तिकडे आपल्यापेक्षा कितीतरी प्रमाणात बेकारी आहे अस म्हणायच का?
विभा -  तर मग बाबा हा सगळा कशाचा परिणाम आहे?
विभोर -  बाबा, तुमच्या या एक्स्प्लनेशन नंतर मला वाटतं की बेकारी हा जर मुद्दा म्हणुन किंवा त्याच प्रमाण समजुन घ्यायच असेल तर त्याचे दोन मुख्य भाग विचारात घेतले पाहिजेत. बरोबर ना?
बंडुनाना -  ए बाबा, हे असं कोड्यात बोलु नको. काय ते नीट सांग.
विभोर -  नानाकाका, कसं आहे ना, कोणतंही प्रमाण बघताना, तुलना करताना किंवा पर्सेंटेज बघताना सुध्दा त्याला दोन घटक लागतात, ज्यात " कितीपैकी आहे " हा भाग सुध्दा महत्वाचा असतो.
विभा -  म्हणजे, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर. बरोबर ना !
विभोर -  बरोबर. एकूण उपलब्ध नोकऱ्या हा न्युमरेटर तर एकूण उपलब्ध उमेदवार हा डिनॉमिनेटर. म्हणजे याचा संबंध प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे लोकसंख्येशी जोडला जातोय.
विभा -  म्हणजेच जर काही कारणामुळे न्युमरेटर कमी झाला किंवा डिनॉमिनेटर वाढला तर येणार उत्तर हे पहिल्यापेक्षा कमीच येणार, बरोबर ना ?
रघुकाका - ए ! थांबा रे जरा पोरानो, तुमचा गणिताचा तास आता बंद करा आणि या राजकारणातलं अर्थशास्त्र जरा समजावून सांगा.
वराडकर - रघु बरोबर आहे पोरांच गणित. ऐक. अरे गेल्या पन्नास वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या किती पटीत वाढली आहे? त्याच पटीत नोकरीच्या संधी वाढल्या आहेत का? नाही. त्यामुळे ही अशी परिस्थिती कधी ना कधी येणारच होती.
साने -  वराडकर, वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारी नोकरीची संधी हे इतकंच नाही आहे, बरं का. गेल्या काही दशकातील प्रगतीकडे जर नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल की झपाट्याने बदलणारं, प्रगत होणारं तंत्रज्ञान, नित्य केलं जात असलेलं संशोधन आणि त्याचा दैनंदिन जीवनात वाढत जाणारा वापर, अवती-भवती वाढलेली सुखसोयीची साधनं, त्यामुळे बदलणारं आपलं राहणीमान, झालंच तर सोबत येणारा चंगळवाद या सगळ्याचा एकत्रित विचार करून त्याची लोकसंख्येशी सांगड घालून बघितल्यावर कळेल की कसा परिणाम होतोय ते.
विभा -  बाबा, पहिलं जास्ती सोपं होतं, हे तुम्ही आणखीन कठीण करुन ठेवलत.
साने -  विभा, मला सांग बरं. एखादा निरोप पोचवण्याच्या पध्दतीत कसा फरक पडला आहे?
विभा - पुर्वी म्हणजे काहीशे वर्षापुर्वी घोडेस्वार निरोप घेऊन जात असत. नंतर पोस्टाने पत्राच्या माध्यमातुन दिला जायला लागला, नंतर तारेची सुरुवात झाली, मग टेलिफोन, इमेल, मोबाईल मेसेज, आणि आता इंस्टंट चॅट. अगदी लगेच.
साने -  बरोबर...
हरितात्या - आणि हो व्हिडीओ कॉल सुध्दा...

हरितात्या हल्लीच व्हिडीओ कॉल करायला शिकले होते.

साने -  खरं आहे, यामध्ये जसा तंत्रज्ञानाचा भाग आहे, तसाच त्यात लागणाऱ्या माणसांच्या संख्येचा सुध्दा मोठा वाटा आहे बरं का ! जितक्या संख्येने आणि जितक्या अंतरावरून आज संदेशांची देवाणघेवाण होते, त्याचा विचार केला तर तेवढ्या कामासाठी किती घोडेस्वार लागले असते, किंवा हे सगळच जर पोस्टाने करायचं असतं तर किती माणसं लागली असती. मग तितक्या माणसाना नोकरी मिळाली असती की नाही? आता पोस्टाचा वापर कमी झाला, पोस्टातून केली जाणारी तार बंद झाली. लॅंड्लाईनच्या वापराचं प्रमाण कमी झालं. बंदच झाल्या या गोष्टी, मग यामुळे किती बेकारी वाढली असली पाहिजे ? पण खरंच ती तशी वाढली का? की त्या गोष्टी, त्या सुविधा बंद झाल्यामुळे किंवा त्यासाठी त्याजागी नवा पर्याय समोर आल्यामुळे आपली गैरसोय झाली नाही आणि म्हणुन ती बेकारी नाही. विचार करा.

कुणाकडुन काहीच उत्तर न आल्याने सानेनी आपला मुद्दा पुढे सुरु केला.

साने -  रघोबा, गेल्या आठवड्यात तुमचं पुर्ण बॉडी चेकअप केलं ना? किती टेस्ट होत्या सगळ्या?
रघुकाका - एकूण त्र्याऐंशी टेस्ट आणि सोबत इसीजी एक्स्रे फुकट.
साने -  अरे वा ! किती वेळ लागला रिपोर्ट मिळायला?
रघुकाका -  कसला वेळ? अरे सकाळी साडेसात वाजता गेलो होतो, पहिल्या उपाशी पोटावरच्या टेस्ट केल्या, नंतर साडेआठ वाजता त्यानीच नाश्ता दिला, ईडली वडा साम्बार, सफरचंद, थोड्या पपईच्या फोडी आणि दुध.  त्यानंतर दोन तासानी खाल्ल्यानंतरच्या टेस्ट करून अकरा वाजता घरी आलो देखील. रिपोर्ट संध्याकाळी इमेल वर आले अस सुधा सांगत होती, तीच मग दुसऱ्या दिवशी जाऊन सगळे एक्स्रे व रिपोर्ट घेऊन आली. काही झालं नाही, सगळं एकदम नॉर्मल, ठणठणीत तब्येत.
साने -  मस्त. तुला आठवतं, ह्याच सुधाच्या वेळी वहिनीना दवाखान्यात नेलं होतं, त्यांना ताप यायचा, काविळ, मलेरिय, टीबी किती शंका आणि शक्यता?  तेव्हा सगळ्या टेस्ट करून रिपोर्ट मिळायला किती वेळ लागायचा?
रघुकाका - हो तर, तिसऱ्या दिवशी मिळाले होते रिपोर्ट.
बंडुनाना -  आणि आपला कामेरकर, त्याला हार्ट अ‍ॅटॅक आला होता तेव्हा, सगळ्या तपासण्या पुर्ण होऊन कळेपर्यंत दोन दिवस कशी अवस्था होती आपली?
रघुकाका - हो रे ते सगळं खरं आहे, पण त्याचं इथे काय?
साने -  बघ, असं आहे, तेव्हा पॅथॉलॉजीच्या किती लॅब होत्या? कॉलेजमधून बीएस्सी करून बाहेर पडल्यावर बहुतेकांचा कल हा डीएमएलटी करण्याकडे होता. काही जण स्वत:ची लॅब सुरू करत तर काही नोकरी मिळवुन समाधानी असत. दिवसात प्रत्येकजण कितीशी सॅंपल तपासत असतील तेव्हा? डॉक्टर आणि हॉस्पिटलही मोजकेच होते. हळूहळु डॉक्टरांची, हॉस्पिटलची संख्या वाढत गेली, तशी लॅबची संख्या वाढायला हवी होती. पण तितक्या प्रमाणात वाढली का? नाही. कारण त्या दरम्यान बदललेलं तंत्रज्ञान आणि या क्षेत्राचा झालेला बाजार. नंतर आलेल्या मेट्रोपॉलीस, थायरोकेअर आणि तत्सम मोठ्या लॅबमुळे यात कशी वाढ झाली तिचा विचार करा. या मोठ्या लॅबमधील मोठाली मशीन्स आणि त्यांची हजारो टेस्ट एका दमात करायची एकूण क्षमता याचा विचार करता, किती पॅथॉलॉजी लॅब आपल्याला लागल्या असत्या? किती उद्योग वाढला असता? किती उलाढाल वाढली असती? किती मुलांचं करीअर झाल असतं?

सानेनी आपल्या श्रोत्यांकडे एक फिरता कटाक्ष टाकला.

साने -  मग असं म्हणायच का, या सगळ्या मोठ्या नावामुळे कितीतरी होतकरू टेक्निशियन बेकार झाले? खरंच जेवढी बेकारी वाढायला हवी होती ती वाढली का ?
विभा -  पण बाबा, त्या सगळ्या लॅबमधुन हेच टेक्नीशीयन्स काम करतात ना ? मग लोकांना नोकऱ्या मिळाल्या ना तिकडे !
बंडुनाना -  विभे, बरोबर आहे तुझं, पण प्रमाण फारच व्यस्त आहे गं. तुझा बाबा सांगतोय त्यात थोडंबहोत तथ्य आहे बरं का.
विभा - पण बाबा, हे फक्त एकाच क्षेत्राला लागू पडतं की तुम्हाला म्हणायचं आहे असं सगळीकडेच घडतंय?
साने -  अगदी तसच नाही म्हणता येणार. काही क्षेत्रांमध्ये वाढल्या ना रोजगाराच्या संधी, आणि तेवढ्या नोकऱ्या मिळाल्यासुध्दा होतकरू आणि योग्य तरूणांना. म्हणजे अस बघ, प्रगत झालेल्या तंत्रज्ञानामुळे एकीकडे लॅंडलाईन बंद पडले पण मोबाईल वाढले, मग त्या क्षेत्रातल्या संधी वाढल्या, मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या वाढल्या. तिथे मजुर वर्गाची गरज वाढली. त्याला लागणारं सॉफ्टवेअर आणि विविध अ‍ॅप्सच्या रुपात सर्विसेस वाढल्या. योग्य माणसाना न्याय आणि काम मिळालं ना.
विभोर -  तर मग वाढणाऱ्या मोबाईलच्या संख्येबरोबर त्यातल्या नोकऱ्या / रोजगार सुध्दा वाढायला नको का? तुम्ही म्हणताय त्याच्या नेमकं उलट.
साने -  तू जर एक मोबाईल फॅक्टरीचा मालक असशील तर आपलं उत्पादन वाढवण्यासाठी काय करशील? नवी माणसं कामावर घेशील की नवी मशीन खरेदी करशील?
विभोर -  मिळालं माझ्या प्रश्नाच उत्तर.
रघुकाका - हो, पण ते अर्धवट आहे. अरे असं जर प्रत्येकजण फक्त मशीन आणुन काम करत राहिला तर बेकारी अशीच वाढत राहणार असंच म्हणायचय का तुला?
साने -  तसं नाही रे रघु, पण मला सांग, आपल्या वेळी नव्हती का रे बेकारी? तुला आणि मला काय मागितल्या बरोबर नोकरी मिळाली आहे का? आपण किती खेपा मारल्या आहेत, किती चपला झिजवल्या आहेत? आठवतय ना?
रघुकाका - हो तर, तेव्हासुद्धा बेकारी होतीच, पण आता ती आवाक्याबाहेर वाढली आहे. आणि त्यावर हे सरकार गंभीरपणे काही करत नाही हा माझा आक्षेप आहे.
हरितात्या - ते तर आपल्या वेळी आपले वडीलधारे सुध्दा असच म्हणायचे. मला तर किती शिव्या पडायच्या, परीक्षाना बस, कधी कुठल्या बॅंकेची, कधी कुठल्या विमा कंपनीची... सतत आपलं ही ना ती परीक्षा दे म्हणुन अप्पा मागे लागत. पण शेवटी चिकटलो कुठे बघितलस ना?
वराडकर - आमचे दादासुध्दा हेच म्हणायचे की सरकारने काहीतरी केलं पाहिजे. मी आपला लवकर निभावलो पण आमच्या श्रीचंच बघ ना. अरे वयाची चाळीशी येतायेता त्याला कोर्टात क्लार्कची नोकरी मिळाली, त्यानंतर लग्न, मुलंबाळं. मी मोठा म्हणुन दादानी त्याची सगळी भिस्त माझ्यावर टाकलेली. तोपर्यंत काही ना काही छोटे मोटे उद्योग चालायचे त्याचे. काही कमी नव्हतं, बीकॉम झाला, अकाऊंटस्चा अभ्यासही चांगला होता. पण त्यांच्या बॅचमधल्या फार कमी जणाना नोकरी मिळाली बरं का, बरेच जण काही ना काही कामं करुन, छोट्यामोठ्या नोकऱ्या करुन भागवताहेत.
विभा -  पण बाबा हे तुम्ही सांगता ते जर खरं मानलं, तर या पाच वर्षातच ही वेळ का आली आहे? आताच हा बेकारीचा आकडा एवढा का वाढला आहे?
साने -  वर जे मी पॅथॉलॉजी लॅबचे उदाहरण दिल ना ते प्रातिनिधीक आहे. नीट लक्ष देवुन विचार केला तर तुझ्या लक्षात येईल की काही अंशी हेच कारण सर्वत्र लागू पडेल. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये आपल सगळं लक्ष हे उत्पादन - मॅनुफॅक्चरींग - क्षेत्राकडुन सेवा - सर्वीस - क्षेत्राकडे जास्त वळलं आहे. एखादा नवीन कारखाना सुरु होणं म्हणजे कितीतरी नवीन उद्योगाच्या संधी तयार होतात. पण हेच म्हणणं सेवा क्षेत्रासाठी तंतोतंत लागु पडेलच अस नाही. याचाही परिणाम आहेच.
रघुकाका -  हे मात्र तुझं काहीतरीच हां, अरे सर्वीस इंडस्ट्री वाढली म्हणुन थोडी तरी कसर भरून निघाली, नाहीतर काय झाल असतं, विचारच करायला नको.
साने -  खरं आहे, पण अंशत:, कसर भरून निघाली पण थोडीशी. मी सर्वीस इंडस्ट्री नको म्हणत नाही आहे. माझं म्हणणं इतकच की त्यासोबत उत्पादन क्षेत्र मजबुत करण्याकडे आपला कल असायला हवा. कारण बॅंक, इंशुरन्स, हॉस्पिटॅलिटी अस सगळं आहे, पण त्या सेवेचा उपभोग घेण्यासाठी तुझी कंपनी समजा जी घड्याळं बनवते, तिने मोबाईलपायी आपलं उत्पादन बंद केलं, तर तुला पगार कुठुन देणार आणि तू त्या सेवा कशा काय घेणार?
विभा - असं कसं, आता तुम्ही येणाऱ्या बदलाना, तंत्रज्ञानाला सुध्दा नको म्हणताय?
विभोर -  नाही गं. उलट बाबा म्हणतायत की तंत्रज्ञानाचा वापर करून आपला उद्योग कसा वाढवता येईल हे बघितल पाहिजे, सर्वीस इंडस्ट्री सोबत मॅनुफॅक्चरींग सुध्दा वाढलं पाहिजे. पण मग बाबा, जर लोकांकडे नोकरी नसेल, पगार मिळत नसेल, उत्पन्न नसेल तर ते यातला विमा असो किंवा घड्याळ नाहीतर मोबाईल, कसा घेणार? हा प्रश्न तसाच राहतो. त्यासाठी बेकारी कमी झाली पाहिजे ना? सगळ्याना काम मिळाल पाहिजे.
साने -  अगदी खरं आहे तुझं. सर्व लायक हाताना काम मिळालं पाहिजे.
विभा -  बाबा हे चिटींग आहे. तुम्ही हो म्हणताय आणि त्यात अट सुध्दा टाकताय.
रघुकाका -  नाहीतर काय ! आपला मुद्दा पटवून देण्यासाठी तू आपला काही पण बोलत सुटला आहे आणि आम्ही आपले ऐकतोय.
साने -  अरे तसं नाही, मी काय म्हणतोय ते ऐका तर. आता आपण थोडा वेगळा विचार करुन बघू. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, बरोबर? सगळ्याना मान्य? यात तरी दुमत असु नये.
विभा -  हो, त्याचं काय?

रघुकाका गप्पच, पण मानेनेच होकार भरला.

साने -  आजही आपल्याकडे एक मोठा वर्ग शेतीवर उपजीविका करतो, जी बहुतांशी लहरी निसर्गावर अवलंबुन आहे. त्याबरोबरच गावात कितीतरी पुरक उद्योग आहेत. जस सुतार, मोटार रिपेअर करणारा, इलेक्ट्रीशिअन, प्लंबर, इतर मेकॅनिक, आणि असे बरेच असतील. एका पिढीने आपलं पुर्ण आयुष्य त्यात घालवलं आहे. आपले संसार, आजारपणं, मुलांची शिक्षण, लग्न सार काही त्यावरच निभावलं, बरोबर ना !

थोडासा पॉज घेऊन सानेनी आपला मुद्दा पुढे सुरु केला.

साने -  पण आज त्यापैकी किती जणांची पुढची पिढी त्याच किंवा तत्सम उद्योगात राहु इछित आहे? गावात अशा कामासाठी योग्य प्रशिक्षित माणसं उपलब्ध नाहीत आणि इकडे शहराच्या आकर्षणापायी लोकांचा लोंढा वाढतो आहे. बरं शहरात येउन करायच काय तर मिळतील ती छोटी मोठी काम करुन उदरनिर्वाह चालवायचा आणि मिळेल त्या अवस्थेत दिवस ढकलायचे. घरगड्यापासुन ते ड्रायव्हरपर्यंत, चपराश्यापासुन ते मुलाना सांभाळण्या पर्यंत, सगळी कामं केली जातात. याचा दुसरा परिणाम म्हणजे ज्यांची ही कामं आहेत त्याना पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ उरतो आणि त्यापासुन वेगळ्याच समस्या निर्माण होतात. शहरावर ताण वाढतो तो निराळाच.

साने -  यासाठी मी म्हणालो की सर्व लायक हाताना काम मिळाल पाहिजे. सरकारने निश्चीतच बेकारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण ते योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणं आणि तशा सुविधा निर्माण करणं, तसच उत्पादन, व्यापार उदीम वाढवण्यासाठी सहाय्य करणाऱ्या योजना आणणं, असे उपाय करून. त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणुन सर्वाना काम मिळेलच की मग. नाहीतर काल शेतकरी कर्जमाफी मागत होता, उद्या कारखानदार मागतील. फुकट वाटत राहून कुणाचं भलं होणार आहे सांगा बरं.
रघुकाका -  अरे हे सगळं ऐकायला खुप छान वाटतं. आणि तू सुध्दा या सरकारचा समर्थक असल्यासारखा गोलगोल उत्तर देऊन आम्हाला गुंडाळायला बघतो आहेस. मी बेकारी वाढली आहे असं म्हटलं तर तू ती आधीसुध्दा होती अस म्हणतोस आणि यावर सरकारने काय केलं असं विचारलं तर हे सगळं तत्वज्ञान ऐकवतोयस. सरकारने मागील पाच वर्षात काही न केल्यामुळे ही बेकारी वाढली आहे हेच खरं.
विभोर -  काका, मी सुध्दा याच मताचा होतो, आणि म्हणुनच मी आज हे प्रश्न विचारत होतो. कारण कॉलेज संपल्यानंतर मी सुध्दा या प्रवाहात फेकला जाणार आहे, त्यामुळे त्यात यशस्वीपणे तरून जाण्यासाठी, स्वत:ला योग्य प्रकारे तयार करण्यासाठी काही प्रश्नाची उत्तरे मिळवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. बाबानी जे सांगितलं त्यावरून मला मघाच्या समिकरणात अजुन एक घटक महत्वाचा वाटतो.
सर्वाना काम / रोजगार / उपजिविकेचं साधनं मिळाल पाहिजे हे जरी खरं असलं, तरी बेकारीच प्रमाण ठरवताना एकूण लोकसंख्या आणि त्यातील नोकरी/ रोजगार मिळालेले किती यांच प्रमाण बघत असताना, मुळात रोजगारक्षम किंवा रोजगाराला लायक किती हा नंबर सुध्दा विचारात घ्यावा लागेल. दोन पातळीवर याच ट्रॅकींग करावं लागेल तर पूर्ण चित्र स्पष्ट दिसेल. आणि त्यानंतर हे चित्र बदलण्यासाठी योग्य शिक्षण- प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उभ्या करण्याची. नाहीतर स्वत:च्या स्वार्थासाठी नुसती कॉलेजेस काढुन काय होणार? अकार्यक्षम असे अजुन काही हजार बेकार तरूण बाहेर पडतील त्यातून, दुसरं काय?
हरितात्या - बरोबर बोलतोय तु विभोर, अरे गरज आहे म्हणजे काम करायची तयारी आहेच अस खात्रीलायक म्ह्णता येत नाही, तसच काम करतोय म्हणजे गरज आहेच असही नाही. त्यामुळे योग्य माणसालाच काम मिळालं तरच त्याचा सगळ्याना उपयोग होतो.
रघुकाका -  पण या सगळ्याचा, कमी होणारा बिस्कीटांचा सेल, खरेदीदार नसल्याने पडुन असलेली घरे, गाड्यांची मंदावलेली विक्री याच्याशी कुठे मेळ बसतोय? ते तर लोकाना कामावरून कमी करणारच आहेत, बेकारांची भर पडणारच आहे की.
साने -  रघु, ही मुद्द्यांची सरमिसळ होते आहे. अरे बिस्कीटांचा सेल कमी होणं म्हणजे नक्की काय? याची दोन किंवा अधिक संभाव्य उत्तर असु शकतात. एक फक्त पार्लेच्या एका ब्रॅंडची बिस्कीट खाणं कमी झालय, की त्यांच्या सगळ्याच बिस्कीटांचा सेल कमी झालाय, आणि दोन सगळ्याच कंपन्यांच्या बिस्कीटांचा सेल कमी झालाय का? या प्रत्येक केसमध्ये कारणं वेगळी असतील आणि त्यावरच्या उपाययोजना सुध्दा.
वराडकर - अगदी बरोबर, आणि तसाच विचार इतर दोन मुद्द्यांचा सुध्दा व्हायला हवा. सरसकट एकच वाक्य सगळ्याला लागु पडु शकत नाही.
हरितात्या - साने, बिस्कीटांच्या बाबतीत तुझं म्हणणं पटलं, पण घरबांधणी क्षेत्रात तर मंदी आहे खरं ना ?
वराडकर - तात्या, हा खरंतर मंदीशी संबंधीत विषय पण अप्रत्यक्षरित्या नोकरीशी याचा संबंध येतो. गेली काही वर्ष सातत्याने आपण हे रडगाणं ऐकत आहोत की हजारोनी घरं बांधुन तयार आहेत पण विकत घेण्यासाठी ग्राहकच नाही. त्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला आहे. बरोबर ना ?
हरितात्या - तर काय? ज्याच्या त्याच्या तोंडी आपलं हे एकच वाक्य, फ्लॅट विकलेच जात नाहीत, पडून आहेत सगळे. कितीतरी बिल्डींगा बांधुन उभ्या आहेत किंवा बिल्डरकडे पैसे नाहीत म्हणुन काम अर्धवट सोडलेल्या स्थितीत आहेत.
साने -  अरे तयार उत्पादन पडुन असेल तर विक्रेता काय करतो? आपलं गुंतवलेलं भांडवलं मोकळं करण्यासाठी मुद्दल परत येईल इतक्या किंवा कधीकधी त्याहीपेक्षा पाच दहा टक्के कमी करुन माल विकतो ना? नाहीतर रस्त्यावर यायची वेळ येते. बरोबर ना? कुणीही आत्महत्या करणं वाईटच, तो गुन्हाच आहे, पण मला सांगा, गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यानी केलेल्या आत्महत्यांचा वाढता आलेख सर्वानीच ऐकला असणार, पण किती बिल्डरानी आत्महत्या केल्याचं ऐकलेत? त्यांचही नुकसान होतच असणार ना, मग? कधी केलात विचार. जर इतकं नुकसान होतय तर का नाही अर्ध्या किमतीत विकत कोणी आपले फ्लॅट?
वराडकर - मी बोलू का ? माझं एक निरीक्षण आहे, गेल्या काही वर्षात मुंबई-पुण्यासारख्या शहरात किंवा आसपास जी बांधकाम झाली ना त्यात मध्यम वर्गीयाला परवडेल अशा किमतीची किती घर बांधली गेली असतील हा संशोधनाचा विषय ठरावा. किमती बघितलात? अरे मुळात आमची म्हणजे संख्येने जास्त असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकाची गरज आहे वन बीएचके, बजेट आहे पन्नास पंचाव्वन लाख, ते सुध्दा लोन घेवुन. आणि तुम्ही घरं बांधताय टु बीएचके, अडीच बीएचके, थ्री बीएचके आणि किमती काय तर दीड कोटी, अडीच कोटी, सोबत गार्डन, जीम, स्विमींग पुल, क्लब हाऊस. कुणी विचार केलाय का की एवढा पैसा खर्च करू शकणारा जो क्लास आहे तो फक्त पंधरा ते वीस टक्के असेल, आणि आमच्यासारखे पन्नास लाखवाले निदान साठ टक्के असतील, पण जर आमच्यासाठी तुमच्या दुकानात मालच नसेल तर आम्ही येणारच कशाला तुमच्या दुकानात? मग बसा बोंबलत मंदी आहे म्हणुन.
विभा -  क्या बात काका ! एकदम सहा सिक्सर एकाच ओवर मध्ये, वा, छा गए जनाब !
साने -  अग तो म्हणतोय त्यात खुप तथ्य आहे. वस्तुस्थिती काहीशी त्याच्या जवळपास जाणारीच आहे. काय रघु, बरोबर ना? तुझ्या भाचेजावयाने, मीरेच्या नवऱ्याने घेतलं का रे घर? या मंदीच्या मार्केट्मध्ये बिचारा तीन वर्षे प्रयत्न करतोय. हो ना ?
रघुकाका -  मान्य, काही अंशी हा मुद्दा जरी मान्य केला तरी त्यामुळे देशातली परिस्थिती फार सुखावह आहे असं कुणी म्हणू शकत नाही. जीएस्टीचा परीणाम आहेच की त्यामुळे व्यापाऱ्याना तोटा होतच आहे. त्याचं काय?

रघुकाकांचा आवाज आणि आवेश थोडा कमी झाला होता तरी आपला मुद्दा सोडत नव्हते.    

साने -  जीएसटी लावल्यामुळे बिस्कीटं खाणं बंद केलं असं म्हणणाऱ्याला माझ्या समोर उभा कर मग उत्तर देतो मी याचं. जीएसटी हा पुर्ण वेगळा मुद्दा आहे त्यावर आपण नंतर बोलु कधीतरी.
कुसुमवहिनी - खरं आहे, आता बिस्कीटांचा विषय पुरे करा, नाहीतरी ती तब्येतीला तशी बरी नसतातच, मैदाच खुप असतो त्यात. या वयात तुम्हाला सगळ्यानाच मैदा कमी खाल्ला पाहिजे. त्यापेक्षा गरमागरम कांदेपोहे खा आणि सोबत मस्त आल्याचा चहा. - बघा तबीयत कशी खुष होऊन जाते.

विभाने पटकन उठुन आईच्या हातातील ट्रे मधील पोह्यांची एक एक प्लेट प्रत्येकाच्या हातात द्यायला सुरुवात केली. आणि शेवटची प्लेट घेऊन ती परत आपल्या जागेवर जाऊन बसली.

रघुकाका -  हे मात्र बरं केलंत हं वहिनी, एवढा वेळ तोंडाच्या वाफा दवडल्या, आता जरा पोटासाठी तोंड हालवू, बरोबर ना !

रघुकाकानी विषयाला बगल दिली.

कुसुमवहिनी - भावोजी, मी एवढा वेळ आत पोहे करत असली तरी माझे कान आणि सारं लक्ष बाहेर तुमच्या चर्चेकडेच होत बर का. मला काय वाटत सांगु का ! एखादा असा रिपोर्ट आला आणि दोनचार बातम्या आल्या तर घाबरून जायची गरज नाही. हां, पण पुढे येणाऱ्या बिकट परिस्थितीचे मात्र हे संकेत असु शकतात. त्यासाठी सावधपणे काही पावलं उचलली पाहिजेत. आणि आपलं अर्थ-मंत्रालय, कामगार-मंत्रालय उपाय काढणारच की यावर. ते गप्पा थोडेच बसणार आहेत, थोडी वाट बघितली पाहिजे आपण. जगाचा विचार करता आपली अर्थव्यवस्था बरीच सक्षम आहे त्यामुळे इतक्यातच काही सगळं संपल असाही आव आणण्याची आवश्यकता नाही. माझ्या मते, उत्पादन क्षेत्र जसं वाढल पाहिजे तसंच त्यासाठी मार्केटही वाढलं पाहिजे. देशांतर्गत खरेदी करायची क्षमता, आपले इम्पोर्टस या सगळ्याचा विचार करून नविन मार्केट शोधणं सुध्दा तेवढचं गरजेचं आहे. त्यासाठी युरोप सारख्या खंडातुन योग्य देश निवडुन त्यांच्यासोबत वाटाघाटी करून विदेश व्यापार निती बनवणं आणि आपल्या उत्पादकाना आणि मालाला नवी बाजारपेठ निर्माण करणं हा महत्वाचा भाग आहे. चींनसारखा देश आपल्या कडुन काही खरेदी करायची शक्यता कमी, अमेरिका तंत्रज्ञानात अग्रेसर, त्यामुळे चीन आणि आपण दोघांसोबत स्वत:च्या फायद्याचाच सौदा करणार, तिथे द्विपक्षीय सौदेच होणार. आफ्रिकेत गरीब देश आहेत. तिथे आपल्याला एक्स्पोर्ट्ची संधी आहे, पण त्याला मर्यादा आहेत. अरब देशांकडुन आपण तेल घेतोच आहोत. म्हणजे राहता राहिला युरोप, जिथे एक्स्पोर्ट वर भर देण्यासाठी बराच वाव आहे.
आता काय आहे. हे काम इथे बसुन तर होणार नाही, त्यासाठी अशीच पोहे खात चर्चा तिकडे शेजाऱ्याकडे जाऊन सुध्दा करायला लागणार, तर काही तरी नवी माहिती हाती लागणार, नव्या वाटा सुचणार. बरोबर ना.
विभा -  मम्मा, सॉलीडच आहेस तू पण. मानलं तुला, एकदम फिनीशींग स्टार.
विभोर -  अग आपली मम्मा अर्थशास्त्र घेऊन एमए आहे म्हटलं.
बंडुनाना -  अच्छा ! वहिनी आता समजल बर का आपले रघुकाका दौऱ्यावर का असतात ते. ईथल्या चहा आणि पोह्यांचा आस्वाद घ्यायलाच ना.
हरितात्या - आता पुढच्या रविवारी पाचव्या मजल्यावर जाऊ दौऱ्यावर.... काय रघुकाका चालेल ना!
रघुकाका -  अवश्य, अवश्य.... फक्त तिकडे येताना सोबत आपल्याकडील उत्पादन परिक्षणासाठी घेउन या म्हणजे झालं.
कुसुमवहिनी - काही नको, त्यापेक्षा तुम्ही इथेच येवुन काय ते यथेच्छ पोटभर परीक्षण करा. माझी काहीच हरकत नाही.

चला तर भेटू पुढच्या रविवारी.
‍‍‍‍‍‍‍‍‍‍````` ````` ````` `````
© प्रविण धुरी  (24 ऑगस्ट 2019)

Comments