शाळेपासुन रोज मला तुझी सोबत असायची,
कल्पनेत हरवुन मला तुझ्या स्वप्नात जायची,
एकटक किती वेळ मी तुला बघत बसायची,
मास्तरांचा मार नी बोल हसत हसत झेलायची.
कॉलेजात एक दिवस तुझ्या सोबत असताना,
गुज-गोष्टी त्या अपुल्या बाबानी पाहिलं करताना,
त्रेधा तिरपीट उडाली पटवुन त्यांना देताना,
खुदकन हसु यायचं मग अभ्यासही करताना.
आज इतक्या वर्षानी तुझ्याजवळ येऊन,
थोडीशी खळबळ मनात तेच भाव दाटुन,
तू मात्र धीरगंभीर तसाच आहेस अजुन,
काय उपयोग आता त्याचा किती काही वाटुन.
वाटायचं किती वेळा झोकुन तुझ्याकडे द्यावं,
तुझ्या मिठीत बाहुपाशात रतं रितं व्हावं,
आईबाबानी तेव्हाच माझ्या नजरेसमोर यावं,
अन् मी मोठ्या कष्टाने स्वत:ला आवरावं.
लग्नानंतर मी इथे जेव्हा जेव्हा आले,
भेटता तुला बंध नव्याने उमलुन आले,
ताजं होवुन त्यावर मी मार्गस्थ झाले,
आठवणीत कप्प्यात पुन्हा बंदिस्त झाले.
गुदगुल्या होती पायांना थंड मजा स्पर्शाची
रोमांचित होई सर्वांग अडचण वाटे वस्त्रांची,
होई वेडे मन अधीर उब ओढते अंतरीची,
समर्पण वाटे करावे लाज काय जनतेची.
तू मात्र तमा कशाची फिकीर करीत नसतो,
स्वभाव कधी तुझा कोरडा आतला बाहेर दिसतो,
भावनांचा पूर कधी दुथडी भरुन वाहतो,
सुखदु:ख सर्वांची तू जशी पोटात घेतोस,
बरंवाईट जे मिळालं ते आपलंसं करतोस,
सांग बरं गुपितं जरी अशी सारी जपतोस,
सांगणार्याला कधीतरी का उघड्यावर आणतोस.
चिमुकल्या दोन बछड्यांची, आणि त्यांच्या बाबांची,
आठवण ओघळते, मिटता झाकणं पापण्यांची,
आयुष्यभर हीच ठेव, तुझ्या 'आप' तत्वाची,
ओंजळ भरून घेते, तुझ्या माझ्या क्षणांची.
~~~~~~~~~~~~~
प्रविण धुरी (01 /10 /2019 )

Comments
Post a Comment