Skip to main content
'ती' आणि मी
प्रेम कधी कुणी कुणावरही करावं, वया-बियाचं बंधन नसावं,
आमचंच बघा कसं दोघांचं, जन्मोजन्मीचं जणू नातं असावं.
चाळीशीतली भेट आमची, पुर्वी कैकदा आम्ही सामोरं यावं,
जवळ घ्यावस वाटलं तरीही, बऱ्याचदा 'ती'ने खोटंच रुसावं.
सरळ साधा स्वभाव 'ती'चा, कधी गुढ बनुन येतो,
आस्वाद घेता शृंगाराचा, कधी बेधुंद करुन जातो.
मुखडा कधी अंतरात्मा, मला घायाळ करुन जातो,
हळुच 'ती'च्या कुशीत मी, देहभान विसरुन शिरतो.
सुस्वभावी मला बायको आहे, मुलगी अगदी परी आहे,
बायको 'ती'चं कौतुक करते, ही गोष्ट देखील खरी आहे.
जोडी आमची शोभुन दिसते, बघणारे म्हणती बरी आहे.
खरं सांगू का तुम्हाला, 'ती'ची बहीण जास्त प्यारी आहे.
'ही'ची काया वळणावळणाची, 'ती'चा देह गणितात बसतो,
चढऊतारावर 'ही'च्या कधीतरी, आपलाच प्रमेयपात होतो.
'ती'चा साथ काही क्षणांचा, पूर्णालाही अंती अपुर्ण गमतो,
'ही'च्या सोबत क्षणच निवांत, ही होते रिती मी पूर्ण रमतो.
आवडुन जातो कधीतरी 'तो' ही, भाऊ तीचा मोठा एक
भरदार छाती दमदार गडी, स्वभाव रोखठोक अन् दिलफेक.
प्रवचनं, वर्णन, स्पष्टीकरणं, अन् सदा बडबड लेक्चरं कैक.
कंटाळा आणतो मात्र कधीकधी, अफाट माहितीचा जलाभिषेक.
ती, ही, तो अन् मी, असं मेतकुट आमचं जमलंय,
आनंदाने राहतो इथे, कसं कुटकुट प्रेम भरलंय,
हेवा करो कितीही कोणी, जर छान आमचं जमतंय,
षटकोनी या कुटुंबामध्ये, सुख भरभरुन नांदतय.
कविता, कथा अन तो लेख, प्रहसनं, नाटक, विनोद, विचार,
इतक्या सगळ्या भावंडामधुनी, घट्ट अधिक आम्ही चार.
'ती'च्याशी जुळती प्रेमबंध, कथेशी जरी थाटतो संसार,
'ती' माझी अन् मी 'ती'चा, नातं हळुवार उलगडते सार.
~~~~~
प्रविण धुरी ( 17 / 09 / 2019 )
Comments
Post a Comment