आसक्ती

 आसक्ती (भाग २)


दुसर्‍या दिवसापासुन प्रोफेसर पुन्हा आपल्या लॅबमध्येच जास्त वेळ घालवु लागले. बंडु आणि उर्वशी दोन दिवस एकमेकाला भेटलेच नाहीत. नवीन समजलेल्या माहितीमुळे दोघेही प्रचंड तणावाखाली होते. हे गुपित आणखी कुणापाशी बोलायची सुध्दा सोय नव्हती. त्यात लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थीही येत नव्हते. सगळं घर आता उर्वशीला भयाण वाटु लागलं होतं. तिच्या डोक्यातुन या प्रयोगाविषयीचा आणि त्याच्या परिणामांचा विचार जातच नव्हता. तिसर्‍या दिवशी न राहवुन तिने बंडुला फोन केला आणि भेटायचं ठरवलं. त्या रात्री दोघेही बराच वेळ बोलत बसली होती. बंडुने सुध्दा या प्रयोगाच्या संभाव्य परिणामांची तिला जाणिव करुन दिली. जाण्यापुर्वी तिला धीर देत जवळ घेतलं आणि पपांवर नीट लक्ष ठेवायला सांगितलं.

पुढचे पाच दिवस अत्यंत तणावात गेले. प्रोफेसर क्वचितच लॅबमधुन वर यायचे. रात्रीच्या वेळी मात्र तिला एक दोन वेळा जाग आली, तेव्हा किचनच्या बाजुने बराच वेळ काहीतरी आवाज होत असल्याचं तिने ऐकलं होतं. कदाचित त्यांना भुक लागत असावी म्हणुन ते वर येऊन काहीतरी खात असावेत असा तिचा अंदाज होता. कारण सकाळी फ्रीजमधील काही भाज्या किचनच्या ओट्यावर अर्धवट कापलेल्या अवस्थेत असत तर दुधाचं रिकामी भांड तिथेच खिडकीपाशी असायचं आणि किचनची खिडकी मात्र उघडी दिसायची.

त्यानंतर दोनच दिवसानी एक विपरीत घडलं. बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये किचनच्या खिडकीपासुन काही अंतरावर एक मांजर मेलेली सापडली. तिने लगेच बंडुला याची कल्पना दिली, तेव्हा दोघानी मिळुन एक खड्डा खणुन त्या मांजरीला पुरुन टाकली. त्या रात्री डब्बु मात्र बराच वेळ ओरडत असल्याचं तिला आठवल.

दुसर्‍या दिवशी बंडुने ऑफिसमध्ये रजा टाकली आणि तो दिवसभर बंगल्यावर उर्वशीसोबतच थांबला. प्रोफेसर साहेब दुपारी जेवायला वर आले, तेव्हा ते काहीसे हसुन त्याच्याशी थोडंसं बोलले, पण आज त्यात तो पुर्वीचा उत्साह नव्हता. त्यांची तब्येत देखील बरीच खालावलेली जाणवत होती. डोळे काहीसे खोल गेले होते. कपडे काहीसे सैल झाल्यासारखे वाटत होते, चेहरा एखाद्या आजारी माणसासारखा दिसत होता. पुर्ण जेवण न करता ते लगेच उठुन निघुन गेले.

'हल्ली असंच करतात, तरी आज जेवायला सोबत बसले. मला खुप काळजी वाटु लागली आहे त्यांची.'

'मला वाटतं आपण आता एखाद्या डॉक्टरना हे सगळं सांगायला हवं.'

'बरोबर आहे तुझं बंडु, पण या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये कोण डॉक्टर आपल्याला मदत करणार आहे?'

'तेही खरंच, आपण दोन दिवस बघु, प्रयत्न करु, नाहीतर काहीतरी वेगळा उपाय काढायला लागेल.'

'म्हणजे?'

'ते नंतर सांगतो. तू आता शांत हो, त्यापुर्वी मला त्यांचे पेपर्स बघायला मिळतील का?'

'थांब देते, पण त्याचं तू काय करणार आहेस? तुला काय उपयोग त्याचा?'

कपाटातुन दोन फाईल्स काढुन देत तिने विचारलं.

'या ओरिजिनल आहेत, खाली लॅबमध्ये कॉपीज आहेत. त्यामुळे जरा जपुन वापर. पपाना कळलं तर ओरडतील मला.'

'ठीक आहे, मी बघतो आणि सांगतो नंतर.'

बंडु त्या फाईल्स घेवुन घरी आला, तेव्हा आई नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात होती आणि बाबा टीव्हीसमोर बसुन कोरोनाच्या बातम्या ऐकत होते. तो सरळ आपल्या बेडरुममध्ये शिरला आणि दार बंद करुन त्या दोन्ही फाईल्स घेऊन बेडवर बसला. तेव्हा इतका वेळ बेडरुमच्या एका कोपर्‍यात निवांत बसलेली त्याची लाडकी चेरी हळुच उठुन येऊन त्याच्या कुशीत पहुडली.

उर्वशीला त्या रात्रीसुध्दा मध्येच जाग आली आणि तिने काही आवाज ऐकले. त्या आवाजांच्या बरोबरीने आज डब्बुच्या गुरगुरण्याचा थोडासा मोठा आवाज देखील तिने ऐकला. पण त्या मांजरीच्या प्रकारानंतर बेडरुमबाहेर जावुन बघायची मात्र तिची हिम्मत होईना. त्यामुळे बाहेरच्या त्या आवाजांचा कानोसा घेत ती तशीच पडुन राहिली आणि पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.

सकाळी मोबाईलच्या आवाजाने डोळे उघडले, तेव्हा बरंच उजाडलं होतं आणि बाहेरुन डब्बुचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. मोबाईल उचलुन तिने हॅलो म्हटलं तर समोरुन बंडु होता.

'हॅलो, अगं झोपलीस की काय अजुन! दार उघड आणि बाहेर ये लवकर.'

'काय झालंय? अरे काल रात्रीसुध्दा तसेच आवाज येत होते, त्यामुळे बराच वेळ जागीच होते, खुप उशीरा कधीतरी डोळा लागला... तुला ओरडायला काय झालंय? तो डब्बु सुध्दा बाहेर ओरडतोय कधीपासुन.'

हे बोलत असतानाच तिने बेडरुमचं दार उघडलं आणि ती बाहेर आली. हॉलमध्ये सगळं अस्ताव्यस्त दिसत होतं, कुणीतरी मुद्दाम विस्कटुन टाकल्यासारखं. ती तशीच किचनकडे वळली. तिथली अवस्था काही वेगळी नव्हती. जमिनीवर काहीतरी पडलेलं दिसत होतं, तपकिरी लालसर रंगाचे ते कसलेतरी सुकलेले तुकडे होते.  तिच्या कानात बंडुचे शब्द पडले...

'हॅलो, हॅलो... उर्वशी हॅलो...'

'अरे इथे बघ काय झालंय, सगळ्या घरात कुणीतरी राडा करुन ठेवलाय.' तिला आता रडायला यायचं बाकी होतं.

'तेच सांगतोय, दार उघड पटकन.'

जेव्हा उर्वशीने बंगल्याचं मुख्य दार उघडलं, तेव्हा बाहेरचं दृश्य पाहुन ती अवाक झाली. डाव्या बाजुच्या भिंतीमागुन डब्बु सारखा ओरडत होता आणि तिकडे गेटबाहेर खुप गर्दी जमली होती. तशाही परिस्थितीत तिने आपला नाईट ड्रेस सावरत बंडुला शोधायचा प्रयत्न केला. गेटजवळच तो हात दाखवत उभा होता. त्याला बघताच तिच्या जीवात जीव आला. तिने तसंच धावत जावुन गेटचं कुलुप काढलं आणि त्याला आत घेतलं. कुणीतरी पोलीसाना फोन केला असावा. बंडुच्या मागोमाग दोन पोलीस आणि एक ऑफिसर आत शिरले. उर्वशीला या सगळ्याचा काहीच अर्थ लागत नव्हता. बंडु तिला आणि पोलीसाना घेऊन आतल्या दिशेला निघाला, जिथुन डब्बुच्या ओरडण्याचा आवाज येत होता. तिथलं दृश्य भयानक होतं. रक्ताच्या थारोळ्यात कुणीतरी निपचीत पडलं होतं आणि डब्बु भुंकत भुंकत त्याच्या भोवती फेर्‍या मारत होता. त्या शरीरावर एकही कपडा नव्हता. पाय पोटाजवळ मुडपुन, डोकं आणि मान उंचावलेल्या अवस्थेत ते पडलं होतं. गळ्याजवळ झालेल्या जखमेतुन बराच रक्तस्त्राव झाला असावा. संपुर्ण शरीरावर सुकलेल्या रक्ताचे डाग दिसत होते. उर्वशीला हे सगळं फार वेळ बघणं शक्यच नव्हतं. भीतीमुळे ती इतकी घाबरली की बंडुचा हात पकडलेल्या अवस्थेतच तिला चक्कर आली आणि ती त्याच्याच अंगावर कोसळली. त्यालाही ते फार वेळ बघवणार नव्हतं. दोन्ही हातानी उर्वशीला सावरत तो बंगल्याच्या पुढील भागात आला आणि तिला झोपाळ्यावर नीट झोपवुन पाणी आणायला बागेतल्या नळाच्या दिशेने धावला.

तिकडे डब्बुच्या तोंडाला आणि पायांना लागलेलं रक्त बघुन, इथे काय झालं असावं हे कुणीही ओळखलं असतं. पण त्याच्या जवळ जायची मात्र कुणाचीच हिम्मत नव्हती. शेवटी विशेष पथकाला बोलावुन त्याला डार्ट्ने बेशुध्द करण्यात आलं आणि नंतरच पुढची कारवाई करणं शक्य झालं. तोपर्यंत पोलीसानी घरात येऊन पाहणी केली.

काही वेळातच तिथे पोचलेल्या फ़ोरेन्सीक टीमने सॅम्पल गोळा करायला सुरुवात केली. आणि पंचनामा होताच ती बॉडी प्लॅस्टीकच्या पिशवीत गुंडाळुन अ‍ॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आली. प्राथमिक सोपस्कार आटोपताच ऑफिसर बंडुपाशी आला.

'घरात आणखी कोण कोण असतं? आणि प्रोफेसरसाहेब कुठे आहेत?'

'ते आपल्या लॅबमध्ये खाली तळघरात असतील. या दोघांशिवाय इथे आणखी कुणीच राहत नाही.'

'आपण कोण?'

'मी हिचा मित्र, बाजुच्याच बिल्डींगमध्ये राहतो.'

इतक्यात एक हवालदार आतुन घाईघाईत बाहेर आला आणि त्याने ऑफिसरच्या कानात काहीतरी सांगितले. तसे दोघेही घाईतच बंगल्याच्या आता निघुन गेले. एव्हाना उर्वशी शुध्दीवर आली होती. मघाचं दृश्य आठवताच तिने पुन्हा एकदा बंडुचा हात घट्ट पकडला.

'काय चाललंय हे आपल्याकडे? त्यादिवशी ते मांजरं, आज हा कुणीतरी माणुस... आणि माझा डब्बु...'

असं म्हणुन ती पुन्हा रडु लागली, थरथरु लागली आणि बंडु तिला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करु लागला. तोसुध्दा त्याच गोष्टीचा विचार करत होता. समोर येऊन कुणीतरी उभं राहिलं हे त्याच्या लक्षात येताच तो थोडा सावरुन बसला.

'घरात कुणीच नाही आहे, आणि खाली लॅबमध्ये देखील कुणी नव्हतं. हे कपडे मात्र सापडले आहेत, त्यांची ओळख पटते का बघा?'

'पपा...??'

ते कपडे प्रोफेसरसाहेबांचेच होते. याचा अर्थ तो मृतदेह... उर्वशीला या शंकेने पुन्हा एकदा चक्कर आली.

 

आज एक आठवडा उलटुन गेला होता, पण उर्वशीला तो प्रसंग आणि ते दृश्य विसरता येणं शक्य झालं नव्हतं. दोन दिवस हॉस्पीटलमध्ये काढल्यानंतर बंडु तिला आपल्या घरी घेऊन आला होता. पुढच्या चार दिवसात पोलीसानी पुन्हा एकदा संपुर्ण घराची आणि लॅबमधील सगळ्या सामानाची तपासणी केली होती. पण तिथे काहीच आक्षेपार्ह आढळलं नव्हतं. काही पिंजर्‍यांमधुन असणारे विविध प्रकारचे प्राणी तेवढे पशु-वैद्यकीय कॉलेजमध्ये पाठवण्यात आले होते. बंडुनेच पुढाकार घेत दोन तीन माणसे बोलावुन संपुर्ण घर साफ करुन घेतलं आणि मग उर्वशी आपल्या घरी परतली.

पण तिला एकटीला आता हे घर खायला उठायचं. त्यात तिचा लाडका डब्बुदेखील सोबत नव्हता. पुन्हा एकदा तिने बंडुची मदत घेऊन चौकशी केली, तेव्हा आणखी काही निरीक्षण करुन, काही टेस्ट करुन नंतर त्याला पाठवण्यात येणार असं कळलं.

जेव्हा एक आठवड्यानंतर डब्बु परत आला, तेव्हा त्याने गाडीतुन उतरताच उर्वशीच्या अंगावर उडी घेत एवढ्या दिवसाच्या विरहाची कसर भरुन काढली. पण आता तो बदलला होता. त्याचा पुर्वीचा खेळकरपणा, मस्ती कमी झाली होती. त्याला आंघोळ घालुन, टॉवेलने नीट पुसुन उर्वशीने काही वेळ आपल्या जवळ बसवलं आणि नंतर दोघंसाठीही जेवण बनवलं. 

नेहमीप्रमाणे संध्याकाळी जेव्हा बंडु तिला भेटायला आला तेव्हा त्याच्या हातात पपांच्या फाईल्स होत्या. पोलीस लॅबमधल्या घेऊन गेले होते, पण या दोन्ही ओरीजीनल मात्र बंडुकडेच राहिल्या होत्या. दोघंही सवयीप्रमाणे झोपाळ्यावर बोलत बसली.

'वाचलंस का तू सगळं?'

'हो, मला जास्त काही कळलं नाही, पण माझा अंदाज आहे की पपांवर या प्रयोगाचेच साईड इफेक्ट झाले असावेत, किंवा त्यातली काहीतरी चुकीची स्टेप, यामुळे हे घडलं असावं.'

'असं कसं म्हणतोस तू? पपा किती कॉन्फीडन्ट वाटत होते, त्यांचे आतापर्यंतचे सगळे प्रयोग एकदम सक्सेसफुल झालेत.'

'बरोबर आहे तुझं, पण हे बघ...'

असं म्हणुन बंडुने एका पानावर तिचं लक्ष वेधलं...

'यात म्हटल्याप्रमाणे, जीन्समधले हे बदल नवीन जन्माला येणार्‍या जीवात दिसले पाहिजेत. पपानी जे प्रयोग प्राण्यांवर केलेत, त्यांचे पुर्ण रिझल्ट यात नाहीत. पण यात जे आहे त्याप्रमाणे त्यांच्या पिल्लांमध्ये हे बदल घडुन येतील ही शक्यता वर्तवली आहे.'

'अरे बापरे! पपा ही एवढी मोठी चुक कशी काय करु शकतात?'

'तुला आठवतं त्यानी आपल्याला कॉन्फरन्सच्या वेळी मिळालेल्या भेटीबद्दल सांगितलं होतं?'

'हो, करेक्ट.. त्यातुन नक्कीच त्यांना काहीतरी सापडलं असणार.'

'ते पेपर्स किंवा त्याचा उल्लेख यात नाही. अगदी आपण बोलत बसलो होतो त्याच्या आधीच्या दिवसाच्या नोंदी सुध्दा आहेत, पण त्या पेपर्सबद्दल मात्र काहीच सापडलं नाही.'

'असं कसं होईल?..'

'मला वाटतं की पपानी निर्णय घेऊन हा प्रयोग स्वत:वरचं करुन बघायचं ठरवलं असणार. आणि ते काही अंशी यशस्वीदेखील झाले. पण त्याच्या साईड इफेक्ट्सची त्यांची पुर्ण तयारी नव्हती.'

'हे कशावरुन म्ह्णतोस तू? मी त्यांच्या अशा प्रयोगाना विरोध केला तरी पपांच काम एकदम परफेक्ट असायचं हे मला माहिती आहे.'

'बरोबर आहे. पण हे बघ... इथे त्यानी स्वत:च लिहुन ठेवलंय. सापांना कात टाकताना ज्या वेदना होत असतील, तशा वेदना माणसाला होण्याची शक्यता आहे. पण हे आताच खात्रीपुर्वक सांगता येणार नाही त्यासाठी हा प्रयोग यशस्वी होण्याची गरज आहे. गिनीपिगवरच्या प्रयोगात अशा वेदना झाल्याच्या नोंदी नाहीत. तशाच प्रकारे सापांना वेदना होत नसतीलही. पण कदाचित हा मेंदुच्या वेगळ्या रचनेचा परिणाम असावा. प्रत्यक्ष परिणाम बघण्यासाठी मला माझ्यावरच प्रयोग करुन बघावं लागेल.'

'बाप रे, म्हणजे पपांना हे माहिती होतं तर?' 

'हे बघ अजुन एक... माणसाच्या शरीरात आतील अवयवांची रचना ही प्राण्यांपेक्षा वेगळी असते, त्यामुळे या प्रयोगानंतर घडणार्‍या बाह्य बदलासोबतच अंतर्गत अवयवांची रचना कशी बदलते हे बघणं आवश्यक आहे.'

'मला वाटतं त्यांच्या शरीरात काही अंशी हे बदल झाले होते, त्यामुळेच ते हल्ली नीट जेवत नसत आणि रात्रीच्या वेळी किचनमध्ये जावुन खाण्याचा प्रयत्न करत. गेले काही दिवस फ्रीजमधल्या भाज्या तशाच सगळीकडे पसरलेल्या असायच्या.'

'म्हणजे पपांना जाणिव होती की असं काही घडु शकतं.'

'बरोबर आहे तुझं. पण काय करायचं आता या सगळ्याचं?'

'बघु ठेवुन दे, नंतर बघता येईल काय करायचं ते.'

'तसं नाही, मला हे सगळं विकुन आता इथुन लवकरात लवकर मोकळं व्हायचं आहे.'

त्याचवेळी बंडुने बघितलं, दुरवर कंपाऊंड वॉलवरुन उडी मारुन चेरी आत आली आणि डब्बुसोबत खेळायला आतल्या बाजुला निघुन गेली.

****

'रात्री कसलातरी आवाज ऐकु आला म्हणुन मी उठुन कानोसा घेतला. तर आधीच्या रात्रीप्रमाणे यावेळीसुध्दा आवाज घराच्या आतुनच येत होता. त्यावेळी पपा किचनमध्ये काहीतरी खाणं शोधत असायचे म्हणुन यावेळी मी गप्पच बसलो. पण काही वेळातच आवाज वाढला, म्हणुन या माझ्या छोट्या खिडकीतुन मी आत गेलो, तर काय?'

'काय झालं, काय बघितलंस तू?' चेरीला आता धीर धरवत नव्हता.

'आत कसली तरी एक मोठी आकृती जमिनीवरुन सरपटत पुढे सरकत होती. मी वास घेऊन बघायचा प्रयत्न केला, पण कसलातरी उग्र वास येत होता. मला कोण आहे तेच कळेना. तोपर्यंत ती आकृती किचनकडे सरकली. मी हळुच त्याच्या मागे गेलो तर वाटेत सगळीकडे काहीतरी पडलेलं दिसलं. शी... त्याला रक्ताचा वास येत होता. मला वाटलं कुणीतरी जख्मी आहे म्हणुन मी ओरडायला सुरुवात केली. पपा किंवा ताई कुणीतरी उठुन यावं म्हणुन मी ओरडत होतो.'

'हो बरोबर आहे... मग कुणीच नाही आलं का?'

'आला ना... तोच सरपटणाराच बाहेर आला.. आणि तो माझ्या दिशेनेच येऊ लागला.'

'बापरे... तू घाबरलास?'

'हो तसा थोडासा घाबरलो, पण मग मी माझ्या जागेवर जाऊन ओरडायला लागलो. आणि बघतो तर काय... काही वेळात तोच त्या खिडकीतुन बाहेर आला.'

'मग रे.... पकडलं तुला त्याने?'

'छ्या... मला वाटलं तसं आधी. हा मला पकडणार... पण मी ओरडत ईकडुन तिकडे फिरत राहिलो.. पण शेवटी जेव्हा तो माझ्याजवळ आला आणि हाताने मला पकडायचा प्रयत्न करु लागला, तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता. मी त्याच्या हाताला चावलो, जेव्हा त्याने आपलं डोकं वर उचलुन माझ्याजवळ आणलं, तेव्हा त्याचा गळाच माझ्या समोर आला... घेतला जोरदार चावा... मग कसला उठतोय?'

'हं... वाचलास तू.'

' हो पण सकाळी समजलं ते पपाच होते, तेव्हा मात्र मी त्यांना उठवण्यासाठी सारखा प्रयत्न करत होतो, त्यांना किती हाका मारत होतो.. पण ते उठलेच नाहीत. आणि जेव्हा गर्दी झाली तेव्हा तर मला काहीच समजेना. निदान ताई तर यायला हवी होती, तिने तरी येऊन पपाना बघायला हवं होतं... कुणीच आलं नाही. पण इतक्यात मला जोरात काहीतरी टोचलं आणि मग मी एकदम त्या हॉस्पीटलच्या पिंजर्‍यातच जागा झालो.'

'बापरे किती भयानक आहे हे! माझ्याच्याने तर ऐकवत सुध्दा नाही.'

'सकाळी आलो तेव्हा ताईनी जवळ घेऊन आंघोळ घातली, जेवण दिलं,,, किती रडलो म्हणुन सांगु तुला! पण मी जाणुन बुजुन नाही मारलं त्यांना.'

'ठीक आहे, तू आराम कर. विचार करु नकोस जास्त. आता आपल्याला पुन्हा भेटता येणार की नाही कोण जाणे! कदाचित हीच आपली शेवटची भेट.'

असं म्हणुन चेरीने एकदा त्याच्याकडे डोळे भरुन बघितलं, थोडंसं डब्बुच्या जवळ गेली. पण लगेच स्वत:ला सावरत तिथुन निघाली, तेव्हा ती दोघं अजुनही तिथेच बोलत बसली होती. चालता चालता तिच्या मनात एक विचार आला म्हणुन ती बंडु बसला होता तिकडे वळली, तसा डब्बु देखील तिच्यामागे निघाला. झोपाळ्याजवळ पोचताच चेरी बंडुच्या तर डब्बु उर्वशीच्या पायांकडे घोटाळत राहिले. तेव्हा बंडु सांगत होता.

'ठरलं तर मग, आपण पुढच्या महिन्यात लग्न करायचं आणि सगळ्यानी नाशिकला शिफ्ट व्हायचं. तिथुनच या बंगल्याचे व्यवहार पुर्ण करु आणि तू म्हणतेस तसं सरांच्या स्मृतीसाठी कॉलेजला काय द्यायचं ते ठरवु. चालेल ना!'

उर्वशीने हसुन होकार दिला आणि बंडुचा हात हातात घेत त्याच्या भावी जोडीदाराच्या डोळ्यात बघितलं.

तेव्हा तिथेच आणखी एक जोडी आनंदीत होऊन नजरा चोरत उभी होती.

(समाप्त‌)

-

प्रविण धुरी १३ सप्टेंबर २०२०

आसक्ती (भाग )

Comments

  1. लिखाण मस्त
    Cid सारखं चित्र समोर साकारलं

    ReplyDelete

Post a Comment