उर्जा (Energy) ही कधीही निर्माण करता येत नाही किंवा
नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रुपातुन दुसर्यात परावर्तित करता येते, आणि म्हणुन
निसर्गातील एकुण उर्जेचे प्रमाण हे सदैव तेवढेच राहते.
निसर्गातील उर्जेसंबंधाचा हा विज्ञानाने सांगितलेला एक नियम, शालेय जीवनात प्रत्येकाने
एकदा तरी वाचला असणार. या तत्वाचा उपयोग करुन शास्त्रज्ञानी अनेक शोध लावले आणि
त्याची मानवाच्या प्रत्यक्ष जीवनात उपयुक्तता देखील दाखवुन दिली आहे. सोलार एनर्जी
हे याचं सर्वात सुंदर उदाहरण. पण त्यापलीकडे जावुन विचार केला तर प्रत्येक ठिकाणी
या उर्जेच्या नियमाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. त्याचं सर्वज्ञात असं आणखी एक
उदाहरण म्हणजे, आपण सर्वजण अगदी प्राणीसुध्दा जे अन्न खातो ते एकतर वनस्पतीपासुन मिळते अथवा
दुसर्या प्राण्यांपासुन. आणि या दोन्हींचे मुळ घटक आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अशी मुलद्रव्ये.
ज्यांच्या ज्वलनाच्या प्रक्रियेतुन निर्माण होणारी उर्जा आपल्या शरीराला मिळते.
वनस्पती, प्राणी, अथवा मानवी देह यांचं मृत्युनंतर काय होतं? तर ते कोणत्या ना कोणत्या स्वरुपात निसर्गात
विलीन होतात, म्ह्णजे मातीत विघटन होवुन किंवा ज्वलनानंतर निर्माण होणार्या अग्नी, राख, आणि वायु या स्वरुपात ते
पुन्हा निसर्गाशी एकरुप होतात. याचा अर्थ जी उर्जा हे शरीर निर्माण करण्यासाठी
वापरली गेली, त्या शरीराला वाढवण्यासाठी पोषणाच्या स्वरुपात दिली गेली, तीच उर्जा कार्य संपल्यावर
पुन्हा निसर्गाला अर्पण केली गेली, यात कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही.
आता थोडंसं मागे जाऊ, थोडंसं म्हणजे बरंच, बरं का...
अगदी या विश्वाच्या निर्मितीपर्यंत नको... पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत ठीक आहे.
बीग-बॅन्ग थीअरी किंवा जे काही आहे त्यातुन हे विश्व निर्माण झालं असं म्हटलं
जातं. तसंच काही करोडो वर्षांपुर्वी सुर्याच्या विघटनापासुन पृथ्वी आणि इतर ग्रह
निर्माण झाले आणि आपली सुर्यमाला बनली असेही म्हटले जाते. त्याविषयी अनेक
शास्त्रज्ञानी बरंच काही लिहुन ठेवलं आहे, अनेक अभ्यासु लोक त्यावर आपले तर्क, अभ्यासपुर्ण निरीक्षणं आणि
विवेचनं सातत्याने मांडत असतात. त्यामुळे तुर्तास आपण फक्त आपल्या उर्जा या
विषयावरच थांबू.
जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा सुरुवातीला ती खुप गरम होती, असणारच... सतत आग ओकणार्या
सुर्यापासुन जन्म झाला होता, काहीतरी गुण हा असणारच. हळुहळु बाहेरच्या वातावरणामुळे ती
थंड होत गेली. प्रथम वरचे हवेचे आवरण थंड झाले असावे, नंतर पृष्ठभाग, नंतर त्याखालचा थर, असं करत करत हा गारवा आत
आत पोचला असावा... केंद्रस्थानी असणारा लाव्हारस अजुनही गरम आहे, आणि पुर्वी तो
सारखा सारखा पृष्ठभागावर यायचा अशा नोंदी आहेत. जसजसा पृष्ठभाग थंड होत गेला तसे
हवेतील ऑक्सीजन आणि हायड्रोजन यांच्या संयोगाने जमिनीवर पाणी तयार झाले असावे.
हेसुध्दा कुणीतरी तर्कसंगत दृष्टीकोनातुन आधीच शोधले असणारच. मुद्दा तो नाही आहे.
जी उर्जा परावर्तीत होवुन पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपला परिणाम दाखवु लागली, त्यातुन पहिल्यांदा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन अशा मुळ
घटकांच्या संयोगाने वनस्पती निर्माण झाल्या. नंतर छोटे जीव, मोठे जीव जन्म घेवु लागले. आणि खुप वर्षानंतर
कधीतरी मानवाचा जन्म झाला. म्हणजेच, पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात फक्त वनस्पतींचे जंगल आणि
पाण्याचे साठेच असले पाहिजेत. किंवा जिथे काही कारणामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य
निर्माण झाले, तिथे फक्त मातीची कोरडी वाळवंटे निर्माण झाली. जी उर्जा नैसर्गिकरित्या
सुर्याकडुन परावर्तित झाली, त्यामधुन याच घटकांची निर्मिती झाली असणार. या जंगलामधुन
वास्तव्य करणारे प्राणी एकतर उपलब्ध वनस्पती खाऊन किंवा दुसर्या प्राण्याला खावुन
जिवंत राहत असावेत. मानवाचा जन्म झाल्यानंतर देखील काहीसा असाच प्रकार सुरु राहिला
असावा.
या प्राण्यांपासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि पुढे पुढे अन्न मिळवण्याच्या स्पर्धेत
टिकुन राहण्यासाठी, जसजसा माणसाने आश्रय शोधायला सुरुवात केली, तसतसा झाडांचे अन्य उपयोग
त्याच्या लक्षात येऊ लागले. गुहेतील वास्तव्य, त्यावेळच्या गरजा, अग्नीचा शोध आणि वापर, नंतर चाकाचा उपयोग, निवार्यासाठी घर आणि बरंच
काही... अशा सगळ्या प्रक्रियेमधुन जाताना मानवाने जंगलातील झाडांचा उपयोग करायला
सुरुवात केली. पृथ्वीवर मानवाची संख्या वाढु लागली आणि जंगले कमी होण्यास सुरुवात झाली, त्याबरोबर प्राण्यांची
संख्यादेखील कमी होवु लागली. पण याचे प्रमाण इतके नगण्य होते आणि त्यात मानवाची
विचारक्षमता अजुन पुरेशी प्रगत झालेली नसल्याने, हा बदल दखल घेण्याजोगा नव्हता.
मानवाच्या प्रगतीने हळुहळु अधिक वेग घेतला आणि त्या प्रगतीच्या बरोबरीने त्याची
संख्यादेखील वाढु लागली. अन्न मिळवण्यासाठी प्रवासाला सुरुवात झाली, शेतीला सुरुवात झाली. आपलं जीवन सहज सोपं
करण्यासाठी अनेक नवनवे शोध तो लावु लागला. त्यातुन अनेक नव्या गोष्टींची निर्मिती
झाली. त्याच्या वाढणार्या संख्येला आता जागा अपुरी पडु लागली. जमिनीखाली आणि
आकाशाच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला. जंगले आणखी कमी झाली. प्राणी आणखी कमी
झाले. जमिनीवरचे आणि खालचे पाण्याचे स्त्रोत कमी होवु लागले.
एक लक्षात येतंय का? हे सगळं घडत असताना निसर्गातील उर्जेचे प्रमाण सदैव तितकेच
राहते हे मुळ सत्य इथेही कार्यरत असणारच होतं. पृथ्वीच्या निर्मितीनंतर काही
वर्षानी मग आणखी एक उलथापालथ झाली. काही भुभांगांच्या वर असलेलं बरंच काही अचानक
पृथ्वीच्या उदरात, म्हणजे पृष्ठभागाच्या खालच्या थरात गाडलं गेलं. पुरातत्व संशोधकानी
तेदेखील शोधुन काढलंय बरं का! त्यात पुरातन काळातल्या अनेक वनस्पती, प्राणी आणि मानवांच्या
अवशेषांचा ठावठिकाणा सापडला. मोहेंजोदडोचा उल्लेख वाचला असेलचं. शहरच्या शहरं गडप
झाली होती. हासुध्दा निसर्गाचा उर्जा-संवर्धनाचा किंवा संतुलनाचा परिणाम होता का?
अनेक वेळा जंगलाना वणवे लागत असतात, काही मानवाच्या चुकीने अथवा स्वार्थाने असतात
म्हणे. पण हे वणवे काही आजची समस्या नाही. त्याचे संदर्भसुध्दा फार जुने आहेत.
कुठे ना कुठे येणारे पुर, अचानक येणारी वादळे, लागणारे वणवे यातुन कोणत्या ना कोणत्या प्रकारे
उर्जेचे परावर्तन हे होतच असणार. पाण्याचा प्रवाह यात सुध्दा गतीजन्य उर्जा आहे, ज्याचा उपयोग करुन माणसाने
वीज निर्मिती केली. वार्यात देखील उर्जा आहे. यांचे निसर्गातील संतुलन बिघडले की
हाच प्रवाह अधेक वेगात सुरु होतो. आणि पुन्हा योग्य त्या प्रमाणात संतुलन झाले की
सर्व शांत होते. आपण मानव मात्र हे चक्र समजुन न घेता झालेल्या नुकसानीची, पडझडीची मोजदाद करत बसतो, तो भाग निराळा.
पृथ्वीवरील प्रत्येक घटक हा या उर्जेचाच एक भाग आहे. म्हणजेच जर निसर्गातील एक
घटक वाढत असेल तर दुसरा कोणता ना कोणता घटक कमी होणार हे ओघाने आलेच. पृथ्वीच्या
पृष्ठभागावरील मानवाची संख्या वाढत असेल तर झाडांची, जंगलांची, प्राण्यांची संख्या कमी होणार. जमिनीवरची माती, जमिनीखालचे पाणी, जर कमी होणार असेल तर
त्यामागे जमिनीवरचे कोणतेतरी घटक वाढताहेत हे निश्चित. अनेक वर्षांच्या प्रवासात
पृथ्वीच्या पृष्ठभागावरची उष्णता कमी कमी होत गेली, पृथ्वी थंड होत गेली. तिला थंड करण्याला बाहेरील
वातावरण काही अंशी कारणीभुत होते, तशीच झाडेपेडे, आतील पाण्याचे साठे कारणीभुत होते. हे सर्व मिळुन उर्जा
परावर्तीत करत होते, त्यातुन नव्याने उर्जा घेवुन काही घटक जन्म घेत होते.
यानंतर कधीतरी एक मोठी उलथापालथ होते आणि कुठलेतरी घटक कायमचे नष्ट होतात, गाडले जातात, तर काही बदललेल्या
परिस्थितीला अनुसरुन स्वत:मध्ये बदल करत मार्गक्रमणा सुरु ठेवतात. पण निसर्ग आपले
उर्जेचे प्रमाण मात्र कायम ठेवतो.
उर्जेचा हा नियम जर सत्य मानायचा झाला, आणि तो अजुनपर्यंत तरी सत्यच मानला गेलाय, तर अवचित येणारी वादळे, पाऊस, पुर किंवा पडणारे दुष्काळ
अथवा येणारी रोगराई आणि या सगळ्यानंतर होणारी निसर्गाची हानी, ही खरंच हानी असते
का असा प्रश्न उभा राहतो. मानवी नजरेतुन आणि प्रगत झालेल्या बुध्दीच्या
दृष्टीकोनातुन भलेही ही अपरिमीत हानी भासत असली, तरी ती निसर्गाच्या दृष्टीने खरंच तशी असते का? मानवाने आपल्या बुध्दीच्या
जोरावर लाभ आणि हानी याचे त्याच्या दृष्टीने काही आडाखे बांधले, काही व्याख्या ठरवल्या, पण तेच अंतिम सत्य आहे का? आणि जर तसं असेल तर
त्यानेच शोधुन काढलेल्या उर्जेच्या नियमांचे काय? या सगळ्या प्रक्रियेत निसर्ग आपल्या उर्जेचे
संतुलन ठेवत, फक्त तिचे स्वरुप तेवढे बदलत असतो?
पण याचा अर्थ आपण काहीच करायचं नाही असा होतो का? शेवटी निसर्ग सगळ्याची
उलथापालथ करुन धुळधाणच करुन टाकणार आहे, तर मग कशाला उगाच असं म्हणायचं का?
नाही, तसं अजिबात नाही. निसर्गात जन्म घेतलेला प्रत्येक जीव, वनस्पती असो की प्राणी हा
आपली जीवनयात्रा पुर्ण करत असतो. आणि त्या प्रवासात वाट्याला आलेल्या उर्जेचे
रुपांतर इतर घटाकांमध्ये करण्याचे निसर्गाने बहाल केलेले चक्र अव्याहतपणे सुरु
ठेवण्याला हातभार लावत असतो. मानवाचे सुध्दा तसेच आहे, शेवटी आपणही याच निसर्गाचे
एक भाग आहोत. त्यामुळे आपण आपला वाटा उचलणे हे आपले कर्तव्यच ठरते.
फक्त निसर्गातील वनस्पती आणि इतर प्राणी यांच्यापेक्षा एक वेगळी देणगी
आपल्याला मिळाली आहे, बुध्दीची देणगी, तिचा सुयोग्य आणि समर्पक उपयोग करुन, निसर्गात घडु शकणारी ही
उर्जेच्या संतुलनाची प्रक्रिया लांबवणे, तिची वेळ शक्य तितक्या लवकर येऊ नये असे
प्रयत्न करणे आपल्या हातात निश्चितच आहे. वर म्हटल्याप्रमाणे निसर्गातील मुळ
साधनांचे संवर्धन व्हावे, त्यांचे प्रमाण अधिकाधिक रहावे आणि उर्जेचे त्या दिशेने
होणारे परावर्तन कमी वेगाने व्हावे, इतके तर आपण नक्कीच करु शकतो.
वृक्षसंवर्धन, भुजल-संवर्धन, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, प्राणी-पक्षी यांचे संवर्धन, मानवनिर्मीत वस्तुंची
योग्य प्रकारे विल्हेवाट हेच त्यातले काही उपाय. फक्त त्यासाठीचा हा एक वेगळा
दृष्टीकोन.
याला आणखी एक वेगळे परिमाण आहे, अध्यात्माचे. ज्यात या उर्जेला चैतन्य म्हटले आहे, जे एकातुन दुसर्यात
परावर्तीत होते. आत्मा असाही त्याचा उल्लेख आहे. अध्यात्मानेसुध्दा शरीर हे नश्वर
मानुन त्याचे विघटन मान्य केले आहे, पण या चैतन्याला अमरत्व दिले आहे. हे चैतन्य, ही उर्जा परावर्तीत होवुन
दुसर्या शरीरात जाते, दुसरा देह धारण करते म्हणजे तरी दुसरे काय? ती उर्जा कोणत्या ना
कोणत्या स्वरुपात निसर्गात आपले अस्तित्व टिकवुन असते, ती नष्ट होत नाही. पण
म्हणुन कुणी आत्म्याच्या रुपात तिचा शोध घेवु नये. पाण्याच्या गतीजन्य उर्जेपासुन
विद्युत लहरी बनतात, त्या पुढे प्रकाशात परावर्तीत होतात, पण म्हणुन कुणी त्या
प्रकाशात पाण्याचे गुणधर्म शोधत नाही. प्रकाशलहरी काही वेळा उष्णता निर्माण करतात, तर कधी एखाद्या घटकाला
अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत उपयोगी पडतात, तेव्हा त्यात मुळ प्रकाशाचे अस्तित्व शोधले जात
नाही. इथे उर्जेचे घडणारे परावर्तन मान्य केले जाते.
काहीसे तसेच एखाद्या प्राण्याच्या अथवा मानवाच्या मृत्युनंतर त्याच्या
शरीरातुन बाहेर पडणारे, परावर्तीत होणारे चैतन्य, त्या उर्जेचे बदलणारे स्वरुप मान्य करायला हवे.
लक्षात घ्या, शेवटी निसर्ग आपले उर्जेचे संतुलन कधीच बिघडु देत नाही.
खरं ना! चिंतन करुन बघायला काय हरकत आहे!
© प्रविण धुरी (१४ सप्टेंबर २०२०)


Nice article.
ReplyDeleteExited for next one.
Informative
ReplyDelete