आसक्ती (भाग १)
रविवारचा दिवस, संध्याकाळचे पाच वाजत आले होते. आणखी तासाभराने अंधारायला
लागलं असतं. त्यापुर्वी आपली नेहमीची राऊंड पुर्ण करता यावी यासाठी चेरीला बाहेर पडणं आवश्यक होतं. त्यामागे खरंतर आणखीन
एक कारण होतं. कालच डब्बु परत आला होता, त्यालाही भेटता येणार होतं. त्याच्या घरची ती
घटना घडल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासुन तो बाहेर होता. त्याला आजच भेटणं गरजेचं
होतं.
तसा तिने आपला चेहरा एकदा साफ केला, सभोवती फिरुन स्वत:चं पुर्ण निरीक्षण केलं, सगळं टापटीप, नीटनेटकं असल्याची खात्री
होताच, तिने बसल्या जागेवरुन उठुन मान उंचावुन थोडा अंदाज घेतला. बाबा दिवाणावर
त्यांच्या नेहमीच्या जागी बसुन सकाळचा पेपर वाचत होते. आई किचनमध्ये संध्याकाळच्या
चहाची तयारी करत असावी, आणि तिच्या लाडक्या बंडुचा घरात कुठेच पत्ता नव्हता, 'गेला असणार शेजारच्या बंगल्यात
त्या हिरॉईनला भेटायला, आणखी उद्योग तरी काय आहे त्याला? डब्बुला सांगितलं पाहिजे
लक्ष ठेवायला,' असा विचार करत चेरी हळुच बाहेर आली.
बाहेरच्या व्हरांड्यात कुणीच नव्हतं, हे बघुन तिने जिन्याकडे धुम ठोकली आणि पळत पळत
काही क्षणातच ती शेजारच्या बंगल्याच्या कंपाऊंड वॉलपाशी पोचली. मेन गेट बंद होतं, पुर्वीसुध्दा तसं ते
क्वचितच उघडं असे. चेरीने हळुच डब्बुला आवाज दिला. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यावर प्रतिसाद ऐकु
आला. मेंटेनन्स नसल्याने कंपाऊंडची भिंत एका ठिकाणी थोडी कमकुवत होऊन पडली होती. तिकडच्या कमी उंचीचा फायदा
घेत, चेरी ऊडी मारुन त्याच्यावर चढुन आत शिरली. आवाज न करता आत उतरताना तिने समोर
डब्बुला उभा असलेला बघितला, क्षणभर तिला काहीच सुचलं नाही, ती तशीच एकटक त्याच्याकडे
बघत राहिली. डब्बुने मान हलवत, घशातुन थोडंसं खाकरल्यासारखं केल्यावर ती भानावर आली आणि
त्याच्यामागे चालु लागली.
दोन आठवड्यापुर्वी शेवटचं ती इथे आली होती तेव्हा किती छान गार्डन होतं हे, पण आता एकदम रयाच निघुन
गेली होती. आत जाता जाता तिने एकदा डावीकडे नजर टाकली तेव्हा तिचा अंदाज खरा
निघाला होता. बंडु त्या हिरॉइनसोबत बंगल्याच्या बागेत असलेल्या एकमेव झोपाळ्यावर
बसला होता, आणि दोघांचं काहीतरी गुफ्तगु सुरु होतं. डब्बुसोबत सावकाशीने चालत ती बंगल्याच्या
डाव्या बाजुने असलेल्या दरवाजाने आत शिरली. दोघंही इथेच भेटुन बोलत बसायची. 'तू खुपच वाळलायस, तुला खुप त्रास दिला का त्यानी, काय झालं भौ?'
'सांगतो, सगळं सांगतो.
प्रोफेसरांच्या जाण्याने आधीच मी खचलो होतो. आणि त्यांच्या मृत्युला सर्वानी मलाच
जबाबदार धरल्याने मी अधिकच अर्धमेला झालो होतो. दोन वेळा माझी ब्लड-टेस्ट झाली, आणखीही कसल्या कसल्या
टेस्ट करुन खात्री झाल्यानंतर कुठे त्यानी माझी सुटका केली आहे.' डब्बुचे हे उद्गार
ऐकल्यावर चेरीच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते आवरुन तिने त्याचं बोलणं लक्षपुर्वक ऐकायचं ठरवलं....
प्रोफेसर बळवंत सरंजामे, युनिव्हर्सिटीमधील एक प्रख्यात व्यक्तिमत्व. जीवशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयांचा
गाढा अभ्यास, शिकवण्याच्या विलक्षण सोप्या पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय.
त्यांचे जनुकीय संशोधनावरचे अनेक प्रबंध देशभरच्या विद्यापीठानी अभ्यासक्रमात
संदर्भ म्हणुन स्विकारले होते. त्यांच्याकडुन स्फुर्ती घेवुन अनेक विद्यार्थी
पोस्ट-ग्रॅज्युएशनसाठी जनुकीय संशोधनात आणि प्राणिशास्त्र विषयात रस घेऊ लागले
होते. पीएचडी करताना सरांचं मार्गदर्शन मिळावं म्हणुन त्यांच्या बंगल्यावर
विद्यार्थ्यांची सतत येजा असायची. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यानी अनेक
विद्यार्थी घडवले होते, अनेक संशोधक तयार केले होते. त्यांची एकुलती एक मुलगी, उर्वशी देखील त्यांना मदत
करत असे. पण तिचा इंटरेस्ट प्राणिशास्त्रात कमी, मानसशास्त्रात जास्त होता आणि त्यासोबतच तिला
पर्यावरण संवर्धनाची देखील आवड होती.
गेल्या वर्षभरापासुन मात्र प्रोफेसर थोडे अस्वस्थ असायचे. त्यानी हाती
घेतलेल्या एका प्रोजेक्टमध्ये त्याना अजुन म्हणावं तसं यश येत नव्हतं. काही प्रयोग
अपेक्षेनुसार परिणाम देत नव्हते. अशातच मार्च महिन्यात जगभर कोरोनाचं थैमान सुरु
झालं. हां हां म्हणता संसर्ग जगभरातुन पसरला. माणसे पटापट मृत्युमुखी पडु लागली. सगळीकडे
हाहाकार माजला. एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये जनुकीय संशोधनाच्या प्रगतीवर आपला
पेपर प्रेझेंट करण्यासाठी तीन दिवसाकरिता गेलेले प्रोफेसर तिकडेच अडकले. एवढ्या
मोठ्या बंगल्यात उर्वशी आणि सोबत तिचा कुत्रा अशी दोघंच होती. नेमक्या अशा वेळी
तिची बंडुशी ओळख झाली आणि बंडुने तिला या काळात शक्य ती सगळी मदत केली. देशभर लॉकडावुन असल्याने
प्रोफेसर कधी परत येतील हे सांगता येत नव्हतं आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी
उर्वशीला एकटीला बाहेर जाणं शक्य नव्हतं. या काळात बंडुने स्वत:हुन पुढे केलेला
मदतीचा हात तिने नकळतपणे स्विकारला, तेव्हा एका मल्टीनॅशनल फार्मा कंपनीत नोकरी करणारा बंडु, त्याच्या मनमिळावु
स्वभावामुळे तिला अधिकच आवडु लागला होता.
एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात सरकारने पाठवलेल्या विशेष विमानाने प्रोफेसर परत
आले, तेव्हा मात्र ते खुपच आनंदात होते. तिथल्या अनपेक्षितपणे घडलेल्या वास्तव्यात
त्यांना अनेक संशोधने आणि प्रयोग नव्याने बघता आले होते. त्यातच एका माणसाकडुन
त्यांना एक विशेष भेटदेखील मिळाली होती, ज्याचा उपयोग त्यांना आपल्या संशोधनामध्ये करता
येणार होता. दुसर्याच दिवसापासुन प्रोफेसर पुन्हा एकदा तळघरातल्या आपल्या
लॅबमध्ये अधिक वेळ घालवु लागले. तहानभुक विसरुन त्यांचे प्रयोग सुरु होते. तळघरातल्या
काही प्राण्यांवर प्रयोग करुन लवकरात लवकर त्याचे निष्कर्ष बघणे आवश्यक होते. जर
प्रयोग यशस्वी झाला तर या संशोधनाचा खुप मोठा उपयोग होणार होता.
उर्वशी मात्र काहीशी नाराज होती. तिला आपल्या लाडक्या पपांशी खुप काही बोलायचं
होतं, मनातलं खुप काही सांगायचं होतं. पाच वर्षांपुर्वी तिच्या आईचं कसल्याशा संसर्गाने निधन
झालं होतं, त्यानंतर पपा हेच तिचं सर्वस्व होतं. तिला त्यांच्या कामाचा अभिमान होता, पण निसर्गचक्रात ढवळाढवळ
केलेली तिला अजिबात आवडत नसे. त्या गोष्टीसाठी असणारा आपला विरोध ती उघडपणे बोलुन
दाखवायची. प्रोफेसर कॉन्फरन्सवरुन परतल्यानंतर जेमतेम एखादा तास तिच्याशी बोलले
असतील, नंतर ते लॅबमध्येच असत. आणि हा सगळा वेळ ती बंडुच्या अधिकाधिक जवळ येत गेली.
आपल्या मनातलं हे दु:ख सुध्दा तिने बंडुपाशी मोकळं केलं. अशा वेळी तिला सर्वात
जास्त आधार बंडुचाच वाटत होता.
या लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीचे काही दिवस बंडु घरीच होता, आणि नेमकं तेव्हाच त्याला
शेजारच्या बंगल्यातील उर्वशीच्या अडचणीची जाणिव झाली. प्रोफेसर बाहेर असल्याने
तिला कुणाच्या तरी मदतीची गरज लागणार हे त्याच्या लक्षात येताच तो तत्परतेने पुढे
झाला. कोरोनाच्या संसर्गाला घाबरुन बाकीचे लोक घरात बसलेले असताना बंडुचं बंगल्यातलं
जाणंयेणं वाढलं, आणि दोघांमध्ये नकळत एक बंध निर्माण झाला. तशी उर्वशी त्याला आधीपासुनच
आवडायची, पण तेवढ्यापुरतंच. त्याने कधी पुढे होवुन बोलायची हिम्मत केली नव्हती. मात्र काही दिवसातच त्यांचं
नातं इतकं घट्ट झालं, की एकदा उर्वशीचा हात हातात घेवुन बसलेला असताना, पपांचं कसं लक्षच नाही, ते कसे आपल्याच कामात
गुंतलेले असतात, असा तिने तक्रारींचा पाढा त्याला वाचुन दाखवला.
जुन महिना संपत आला तरी कोरोना कमी होण्याची काहीच चिन्हे नव्हती. रोज संसर्ग
झालेले आणि मृत्युमुखी पडलेले असे नवनवे विक्रमी आकडे बाहेर येत होते. एक भर पडली
होती, ती म्हणजे बरे होणार्या रुग्णांची संख्या देखील हळूहळू वाढत होती. दरम्यान उर्वशी
आणि बंडु एकमेकाच्या आणखी जवळ आले होते. बंडु पुन्हा कामावर रुजु झाल्याने त्यांची
मिनी-भेट आता संध्याकाळी उशिरा, बंडु घरी परतत असताना होत असे, आणि रविवारी संध्याकाळी मेगा-भेट
ठरलेली.
'हॅलो, यंग मॅन!'
अचानक पाठीमागुन आवाज आला तेव्हा दोघंही दचकली. मागे प्रोफेसरसाहेब दोघांकडे
एकटक बघत उभे होते. अंगात टी-शर्ट आणि एक जुनाट वाटणारी पॅन्ट, दाढीचे खुंट वाढलेले, बागेतल्या दिव्यांच्या
प्रकाशात चमकणार्या टकलावर मधुनच थोडेसे शिल्लक असलेले पण विस्कटलेले केस, आणि हातात चष्मा.
'ओह! हाय पपा!'
पहिली उर्वशी भानावर आली, तिला पपाना असं बघुन प्रथम काहीशी भीती वाटली होती, पण त्यापेक्षा जास्त आनंद
झाला होता. तिने बंडुची ओळख करुन दिली.
'गुड इविनिंग सर!' बंडुने अदबीने अभिवादन
केलं.
'गुड गुड! गुड इविनिंग!' असं म्हणत प्रश्नार्थक नजरेने उर्वशीकडे बघितलं.
'पपा, मी हेच तर तुम्हाला
कधीपासुन सांगायचा प्रयत्न करत होती,,, पण तुम्ही आल्यापासुन तुमच्या लॅबमध्येच बिझी.'
'लेट्स गो इनसाईड, आत बसुन बोलु, कम ऑन'
आज प्रोफेसरांचा मुड काहीतरी वेगळाच होता. आत येवुन हॉलमध्ये बसल्यावर
उर्वशीने सगळी हकीकत सांगितली. ते ऐकुन त्यांना अधिकच आनंद झाला.
'मस्त, मस्त, मस्त आहे. बेटा आवडलं
आपल्याला... यंग मॅन थॅंक्स टु यू, तुझ्यामुळे माझी एक चिंता मिटली. गुड चॉईस बेटा... टुडे इज
रिअली अ ब्युटीफुल डे. आज मी खुप खुष आहे.'
'ओह, थॅंक्यु पपा, पण आज आणखी काही झालंय का?'
'ओह येस... आज माझ्या
एक्सपरिमेंटचा तिसरा टप्पा पार पडला, नाऊ जस्ट वन मोर स्टेप अॅंड सक्सेस इज माईन.'
'कसला एक्सपरिमेंट?' इतका वेळ शांत बसलेल्या
बंडुने विचारलं. त्याला हे सगळं नवीन होतं.
'आता तुला सांगायला हरकत
नाही. यु आर फॅमिली नाऊ. बेटा तू पण ऐक. मला माहिती आहे तुला यात तेवढा इंटरेस्ट
नाही, तरीपण ऐक.'
दोघांनाही आपल्या समोर बसवुन प्रोफेसर सांगु लागले.
'तुम्हाला माहितीच असेल
निसर्गाची सापांना एक विशेष देणगी आहे, हा प्राणी कात टाकतो आणि ती त्वचा त्यांना परत येते, बरोबर! त्याचप्रमाणे
कासवांच्या काही प्रजातीना निसर्गाने दिर्घायुष्य बहाल केलं आहे. मी अनेक वर्षे या
दोन्हीवर संशोधन करत होतो. या दोन्ही गोष्टींचं मुळ कारण असणार्या जीन्सचा उपयोग
करुन काही एक विशिष्ट गोष्ट साध्य करता येईल का, असा माझा प्रयत्न होता. मी याच विषयावरचा पेपर
प्रेझेंट करण्यासाठी जेव्हा कॉन्फरन्सला गेलो होतो, तिकडे मला एक माणुस भेटला, डॉ. शिन त्सुंग.
लॉकडाऊनमुळे थांबायला लागलं आणि आमची या विषयावर बरीच चर्चा झाली. तेव्हा त्याने
मला आपल्याकडचे काही पेपर्स दिले. त्याचा अभ्यास केल्यावर मला एक कल्पना सुचली आणि
मी इकडे आल्यावर तसे प्रयोग सुरु केले. अॅन्ड यु नो वॉट, मला त्यात बर्याच
प्रमाणात यश देखील आलं आहे. आता फक्त ह्युमन ट्रायल झाल्या की बस.... मग आपल्याला
कसलीच भीती नाही.'
एवढं बोलुन होता होता प्रोफेसर साहेबांचे डोळे एका वेगळ्याच धुंदीने चमकु
लागले होते. दोन्ही श्रोत्याना अजुनही फारसं काही कळलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या
डोळ्यात मात्र फक्त प्रश्नचिन्हच दिसत होती. त्यांनी एकदा एकमेकांकडे बघितलं, तेव्हा बंडुनेच प्रश्न केला,
'पण सर, म्हणजे नक्की काय होणार
आहे? या प्रयोगाचा आपल्याला म्हणजे माणसाना काही विशेष फायदा होणार आहे का?'
'ओह येस, यंग मॅन... खुपच फायदा
होणार आहे... अरे आपलं आयुष्य कैक वर्षानी वाढणार आहे, आणि नुसतंच आयुष्य वाढलं
तरी शरीर म्हातारं होऊ नये म्हणुन त्वचादेखील नवीन असणार आहे. पुन्हा एकदा तारुण्य, तजेला, युथफुलनेस... कॅन यु
इमॅजीन, द होल कंट्री, होल वर्ल्ड इज फुल ऑफ यंग पिपल, नो मोर ओल्डीज... किती
सुंदर जग असेल ते... अहाहा.. आय जस्ट कान्ट वेट टु सी इट नाऊ.'
हे ऐकल्यावर बंडु आणि उर्वशी यांना काय बोलावं हेच सुचेना. हे अद्भुत होतं, हे संशोधन जर प्रत्यक्षात
आलं तर सगळं जग बदलुन जाणार होतं. आणि प्रोफेसर म्हणतात त्याप्रमाणे त्यांना
पहिल्या काही स्टेजीस मध्ये यश मिळालं होतं. बापरे! या संशोधनानंतर भारताचं नावं
जगभर होणार होतं. याचं पेटंट मिळताच तर बघायला नको, पुढचं आयुष्य एकदम बदलुन गेलं असतं. पण ह्युमन
ट्रायल ?
'पपा पण..?'
'काय बेटा? बोल, बोल, विचार तुला काय विचारयचं आहे ते.'
'पपा, पण ह्युमन ट्रायल? त्या कशा आणि कोणावर करणार
तुम्ही, आणि त्यातुन काही तरी चुकीचं...'
'हो मला कल्पना आहे, म्हणुनच ही ट्रायल मी
माझ्यावरच करणार आहे.'
'काय? पपा...!'
तिचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. हे सगळं विचित्र होतं. खुप रिस्की
होतं आणि तिचे पपा हे भलंतच धाडस करायला निघाले होते. परिणाम काय होणार, चांगले की वाईट? त्यात यश नाही आलं आणि
मृत्यु ओढवला तर काय? एकदम काटाच आला तिच्या अंगावर. काही वेळापुर्वीचा आनंद एका
क्षणात आपल्या पित्याला गमावण्याच्या शक्यतेमुळे भीतीमध्ये बदलला होता. तिने सगळा
जोर एकवटुन विरोध करायचं ठरवलं.
'नाही पपा, मी तुम्हाला असं काही करु
देणार नाही. यात रिस्क आहे आणि काहीतरी चुकलं तर तुमच्या जीवाला धोका होवु शकतो.
तुम्ही नको.'
'माय चाईल्ड, मला कळतेय तुझी काळजी, आय नो हाऊ मच यु लव्ह मी!
पण बेटा दुसर्या कुणाचा झाला तरी तो सुध्दा एक जीवच असणार ना! रिस्क तर त्याला
सुध्दा तितकीच असणार आहे जितकी मला.'
'पण सर तसं झालं तर निदान
तुम्ही काहीतरी उपाय करु शकाल ना! काहीतरी अॅन्टीडोट वगैरे सारखं... पण तुम्हालाच
काही झालं तर कोण बघणार?' बंडुने आपली शंका बोलुन दाखवली.
' येस, युअर कन्सर्न इज करेक्ट.
पण माझे आतापर्यंतचे सगळे अंदाज बरोबर आलेत. आणि माझ्या कॅल्क्युलेशनप्रमाणे हे सुध्दा
चुकणार नाही.'
यावर दोघानाही काय पुढे बोलायचं ते सुचेना तेव्हा प्रोफेसरच पुढे बोलले.
'अॅंड नाऊ वन फायनल
अनाउन्समेंट ऑफ द नाईट... मी या प्रयोगाचे दोन डोस आधीच घेतलेत, आणि आज रात्री तिसरा आणि
शेवटचा डोस घेणार आहे. त्यानंतर बरोबर बावीसाव्या दिवशी माझ्या शरीरात बदल घडु
लागतील. अॅंड इफ आय अॅम नॉट रॉन्ग, ऑफकोर्स आय अॅम नॉट... तर त्यापुढच्या अठ्ठेचाळीस तासात
मला नवीन त्वचा आलेली असेल... यंग मी.... अ न्यु मी'.
त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर त्या हॉलमध्ये बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. एक
प्रकारची गुढ, रहस्यमय शांतता तेवढी सर्वत्र भरुन राहिल्यासारखं वाटत होतं. मध्येच कधीतरी
आत आलेला उर्वशीचा लाडका कुत्रा, डब्बु तेवढा तिच्या पायापाशी बसुन हलके हलके गुरगुरत होता, तेव्हा त्याचे डोळे मात्र
समोरच्या खुर्चीत बसलेल्या प्रोफेसरांवर एकटक रोखलेले होते.
(क्रमश:)
-
प्रविण धुरी १३ सप्टेंबर २०२०

प्रवीण, नेहमीप्रमाणे सुंदर
ReplyDeleteलिखाण, उत्सुकता पुढील भागाची
खूप छान सर..तुमची भाषा अगदी खिळवून ठेवते..
ReplyDeleteखूपच छान लिहिलंय
ReplyDelete