सांगा मी काय करु?
१. संजना
सारंग शेवटचा सामोरा आला त्याला आता तीन वर्षे होत आली होती. संजना सुरुवातीची दोन वर्षे त्याची खुप वाट बघायची, तिला त्याच्या येण्याबद्दल कसलातरी विश्वास
वाटायचा, खात्री वाटायची. तिचं हे आजारपण सुरु झाल्यानंतर सहा महिनेपर्यंत त्याचं
येणं जाणं होतं, नंतर मात्र हळुहळु ते कमी होत गेलं.
लग्नाच्या दुसर्याच वर्षी तिला पहिल्यांदा
त्रास झाला. तसं शाळेत असताना एक दोनदा ती आजारी पडली होती, तेव्हा डॉक्टरनी तिचं हृदय
काहीसं कमकुवत असण्याबद्दल सांगितलं होत. म्हणुन मग तिचं पुढचं शिक्षणही अर्धवटच
राहुन गेलं. याच कारणामुळे लग्न जमणं अवघड वाटत असतानाच,
बाबानी दूरच्या नात्यातल्याच एका मुलाबरोबर जमवुन आणलं. घरात फक्त ही तीनच माणसं, सासु थोडीशी जुनाट वळणाची असली तरी सारंग तसा स्वभावाने चांगला होता. एका
खाजगी कंपनीत सिक्युरिटीची नोकरी होती. परिस्थिती अगदीच बेताची नसली तरी इतकी
वाईटही नव्हती आणि म्हणुन लग्न जमवतानाच संजनाच्या बाबानी त्याना मुलीच्या
आजारपणाची पुरेशी कल्पना दिली होती.
संजनाचे आतासे कुठे सुखाचे दिवस सुरु झाले होते.
ती जवळच्याच एका कंपनीत पॅकेजींगचं काम करु लागली होती. सारंगची शिफ्ट्ची नोकरी असल्याने
त्याचं घरी असण्याचं टाईमटेबल नक्की नव्हतं, त्यात संजनाची नाजुक तब्येत. अशातच सासुबाईना आजी बनायची घाई झाली
होती. त्या आग्रहाला नकार देणं न जमल्याने असेल कदाचित पण अचानक एके दिवशी संजनाची
तब्येत बिघडली. एक महिनाभर तिच्यावर शक्य ते उपचार केल्यावर तिला थोडं बरं वाटु लागलं.
पण आता तिच्याने काम होईना, थकवा वाढला. आणि सासुबाई अधिकच
वैतागु लागल्या, आठवड्या पंधरवड्यातुन होणारा माहेरचा उध्दार
आता दिवसाआड होवु लागला. या सगळ्याला सारंग देखील कंटाळला.
पण एकुलता एक मुलगा, परिस्थिती जेमतेम,
नाशिकात अशी दुसरी जागा मिळणं कठीण या सगळ्याचा एकत्रित विचार करुन असावं बहुधा, सारंगने व्यावहारिकपणे शांत
राहणंच निवडलं. आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. संजनाची तब्येत आता अधिकच बिघडु
लागली. एक मोठी बहीण आणि भाऊ नाशिकमध्येच होते. मधल्या काळात बाबा गेल्यानंतर
आईसुध्दा गावातुन येऊन भावासोबत राहत होती. त्याचाच काय तो एक माहेर म्हणुन तिला
आधार होता. काही दुखलं-खुपलं की जाऊन सगळं त्यालाच सांगायची.
आणि अशातच एके दिवशी, दुपारी किचनमध्ये काम करत
असताना तिचं डोकं ठणकु लागलं. आराम करावा म्हणुन जाऊन ती बेडवर पडली असेल नसेल, तोच सासुबाईंची बडबड सुरु झाली. नाईट शीफ्ट असल्याने बाजुलाच झोपलेला
सारंग त्या आवाजाने उठुन बसला आणि वैतागतच बाहेर गेला. संजना डोकेदुखीने हैराण
होती त्यामुळे तिचाही पारा चढला. तरातरा बाहेर येऊन तिने किचन आवरता आवरता आपल्या
तोंडाचा पट्टा सुरु केला, आणि पाचव्या मिनिटाला ती कोसळली.
ही गोष्ट कशी कोण जाणे, पण पुढची दहा मिनीटे बाहेरच्या
रुममध्ये असणार्या दोघांच्याही लक्षातच आली नाही.
नंतर सगळीच धावाधाव झाली. संजना शुध्दीवर आली
तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. डोकं खुप दुखत होतं, उजव्या हातात असह्य वेदना होत
होत्या तर डाव्या बाजुची मात्र काहीच जाणीव नव्हती. तिने बोलायचा प्रयत्न केला पण
शब्दच बाहेर येईना झाले. पाचव्या दिवशी हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळाला, तोपर्यंत तिला समजलं होतं की तिचं अर्ध शरीर प्रतिसादच देत नाही आहे.
आज तीन वर्षे संजना या बेडवर अशीच पडुन आहे.
काही दिवस बहिणीकडे तर काही दिवस भावाकडे अशा रितीने तिचा मुक्काम असतो. सर्व काही
इतरांवर अवलंबुन असल्याने जीव नकोसा झाला आहे. ताईच्या घरी तिचा संसार, तिचा शाळेत जाणारा मुलगा आणि
एका पतसंस्थेत काम करणारा तिचा नवरा. ताई दिवसभर शिकवण्या
घ्यायची आणि त्यातच हिचं दुखणं. संजनाला या परिस्थितीवर रडु यायचं. दादाची
परिस्थितीसुध्दा काही फारशी बरी नव्हती, त्याला दोन मुली.
सुरुवातीचे काही दिवस वहिनीने मनापासुन सगळं केलं. पण कायमचं हे ओझं तिलाही नकोच
होतं. आई तिच्याकडे बघत बसायची पण काहीच बोलायची नाही, आणि
संजनाला आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवता यायच्या नाहीत. अशा सगळ्या दुर्दैवी
अवस्थेत अनेक वेळा आत्महत्येचा विचार तिच्या मनात डोकावुन गेला होता, पण मरण येणं तरी कुठे तिच्या हातात होतं?
तिच्या वाट्याला आलेल्या या भोगासाठी दोष तरी
कुणाला द्यायचा? प्रत्येकजण आपापलं जगणं आपल्या मार्गाने जगत होता,
अडचण फक्त तिच्या असण्याची होती. पण तिला पुर्ण जाणीव होती की तिच्या असण्याने जसा
कुणाला फारसा फरक पडत नव्हता, तसा तिच्या नसण्याने देखील
कदाचित पडला नसता. आणि अशावेळी म्हणुनच तिच्या मनात तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत
होते,
'काय करु मी आता? '
'याचा शेवट काय? '
'यातुन सुटका कशी व्हायची?'
-------- ------
प्रविण धुरी
२४/१०/२०२०
(संजनाबद्दल काय वाटतं तुम्हाला?
तिच्या या प्रश्नांना उत्तरे
काय आणि कशी मिळतील?
आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.)

खरंच ह्या प्रश्नांची उत्तरे खरंच खूप कठीण आहेत!
ReplyDelete